बुधवार, १ मे, २०१३

गाडगे महाराजांची गोष्ट



गोष्ट गाडगे महाराजांची 

  • मला कुणी शिष्य नाही, मी कुणाचा गुरू नाही


ऊस डोंगा परि रस नोहे डोंगा
``सखू माहा कारभार अटपला! मराले शेवटी मी लोकाच्या उंबरठ्यात ईऊन पळलो! मेल्यावर मळ जायाले पैसा लोकाचाच; कायनं आली असिल हे अवदसा? देवका-याच्या दारुनं! काहाचे हे देव अन् काहाचे ते दगळा गोटवाईचे देव का रे? दारूच्यापाई घरदार, वावर जमिन मान मयराद्याले सोळल्यानं आपल्या संसाराचे कोयसे झाले. आता माहा आईक. आताच्या आता तो खंडोबा ती आसरा अन् सर्वच्या सर्व देवपाटातले दगळगोटे दे फेकुन भुलेसरीत. आखीन एक काम आपल्या लाळाच्या डेबुले वारा नोको लागु दिऊ त्या देवदेवीचा. निर्मय राहुदे त्याला या देवदेवी अन् देवका-याच्या पापापासुन. अरेरे काहाचे हे धरम अन् कुयधरम? या खोट्या देवाईले कोंबळे बक-याईचे इनाकारन कापन्याच्या पापी फंदात मी पळलो नसतो त दारुच्या नांदात कायले गोयलो असतो? लोकाईले काम्हुन बदलामी देवाव? माझ्या जोळ पैशाईचा आसरो होता तथुरोक मले त्याहीनं दारुसाठी कोरलं. लोक असेच असतात सखू. पन आता माह्या डेबुजीले संभाळवो बरं? तो पिसाट, देवाले न माननारा झाला तरी बरं होईन. पन त्याले या बकरेखाऊ अन् दारुपिऊ देवाचा नांद लागु देऊ नोको बरं?’’


देवकार्याची फलश्रुति
``सखू, माझा कारभार आटोपला! मरायला अखेर मी परक्यांच्या दारवंटात येऊन पडलो! मेल्यावर जाळायला सुद्धा पैका परक्यांचाच. कशाने आली ही अवदसा? देवकार्याच्या दारूने. कसले हे देव नि कसले त्या दगड धोंड्यांचे ते देवकार्य? दारूच्या पायी घरदार शेतवाडी मानमरातबाला मुकून आपल्या संसाराचे कोळसे झाले. आता माझे ऐक. आत्ताच्या आत्ता तो खंडोबा, ती आसरायी आणि ते सगळे देव्हा-यातले दगडधोंडे दे भिरकावून भुलेश्वरी नदीत. आणखी एक काम. आपल्या लाडक्या डेबूजीला वारा नकोसा लागू देऊ त्या देवदेवींचा. निर्मळ ठेव त्याला ये देवदेवी नि देवकार्याच्या पापापासून. अरे अरे! कसले हे धर्म नि कुळधर्म! या खोट्या देवांना कोंबडी बक-याचे हकनाहक बळी देण्याच्या पापी फंदात मी पडलो नसतो तर दारूच्या व्यसनात कशाला गुरफटलो असतो? लोकांना दोष कशाला द्या. होती माझ्याजवळ पैक्याची माया, तोवर पोखरले दारूसाठी त्यांनी मला. समाज असाच असतो सखू. पण आता माझ्या डेबूजीला संभाळ. तो सैराट नास्तिक मुलगा झाला तरी परवडले. पण त्याला बोकडखावू दारुड्या देवांचा नाद लागू देऊ नकोस.’’
इतके बोलून झिंगराजीने प्राण सोडला. सखूबाईने हंबरडा फोडला. व-हाडातील अमरावती तालुक्यातील कोतेगावची ही सन १८८४ सालची गोष्ट. झिंगराजी हा शेणगावच्या घरंदाज नागोजी परिटाचा नातू. घराणे सुखवस्तू. जातीने परिट, तरी मुख्य व्यवसाय शेतीचा. गोठा गाई-म्हशी-बैलानी डवरलेला. परीट जमात मागासलेली. तशात नाक्षर. अनेक अडाणी रूढी, भलभलती कुलदैवते, त्यांना नेहमी द्याव्या लागणा-या कोंबडे-बकरे-दारूचे नवस, यांचा कहर माजलेला. कोणी कितीही शहाणा असला, विचारी असला, तरी जमातीच्या मुर्वतीसाठी वर्षातून एकदा तरी देवकार्याचा धुडगूस घालून  दारूच्या पाटात बक-याची कंदुरी प्रत्येक घरात झालीच पाहिजे, असा त्यांचा सामाजिक दण्डक. घरातल्या हव्या त्या ब-या वाईट भानगडीसाठी खंडोबाला आसरायीला किंवा गावदेवाला संतुष्ट करायचे म्हटले का आलीच कंदुरी नि दारू. मूल जन्माला आले, करा कंदुरी. तान्ह्या मुलाला पडसे ताप खोकला आला, बोलवा भगताला देव खेळवायला, कापा गावदेवापुढे कोंबडे, दाखवा दारूचा नैवेद्य, लावा त्याचा आंगारा का म्हणे होणारच ते खडखडीत. देवकार्य केले म्हणजे पाहुण्यांच्या बरोबरीने यजमानानेही दारूचा एक घोट तरी घेतलाच पाहिजे. घेतला नाही, तर देव कोपणार, अंगावर नायटे-गजकर्ण उठणार, घरादाराचे वाटोळे होणार. अशा धमकीदार धर्मसमजुतीपुढे मोठमोठ्या मानी माणसांनाही –इच्छा असो वा नसो – मान वाकवून दारू प्यावीच लागते. देवकार्यच कशाला? पाहुणा राहुणा आला की त्याच्यासाठी (मटणाचा बेत नसला तरी) दारूची बाटली आणलीच पाहिजे. दारू देणार नाही तो यजमान कसला नि घरंदाज तरी कसला?
सारी परीट जमात असल्या फंदात अडकलेली, तर बिचारा झिंगराजी त्या चरकातून सुटणार कसा? बरीच वर्षे त्याने दारूचा मोह टाळून, संसार-व्यवहार कदरीने केला. अखेर आजूबाजूच्यांच्या नादाने तो देवकार्यांच्या निमित्ताने अट्टल दारूड्या बनला. दारूचे व्यसन लागायचाच काय तो अवकाश असतो. ते लागले का संसाराच्या नौकेला हळूहळू भोके पडून, ती केव्हा सफाचाट रसातळाला जाईल, हे ज्याचे त्यालाही समजत उमजत नाही. सर्वस्वाला मुकून झिंगराजी फुप्फुसाच्या रोगाने अंथरुणाला खिळला. घरदार, शेतवाडी, गुरेढोरे, आधीच वाटेला लागलेली. विष खायलाही फद्या जवळ उरला नाही. जवळ बायको सखूबाई आणि सन १८७६ साली जन्माला आलेला एकुलता एक मुलगा डेबूजी. दोन वेळा साज-या व्हायची पंचाईत, तेथे कसले आले औषधपाणी? भरभराटीच्या ऐन दिवसांत झिंगराजीशेट झिंगराजीशेट म्हणून तोंडभर वाहवा करून त्याच्या पैशाने दारूबाजीच्या मैफली उडवणारे आता थोडेच त्याच्या वा-याला उभे राहणार? शेणगावच्या भुलेश्वरी (भुलवरी) नदीच्या पलीकडे कोतेगाव येथे त्याचे मावसभाऊ यादवजी आणि जयरामजी रहात होते. त्यांनी या पतित कुटुंबाला आपल्याकडे नेले. त्याच ठिकाणी मरणाला मिठी मारण्यापूर्वी झिंगराजीने सखूबाईला प्रारंभाचा उपदेश केला.

  •  मुलगी परत घरी आली

मूर्तिजापूर तालुक्यात दापुरे गावी तिचे माहेर होते. वृद्ध आईबाप हयात असून कर्तबगार भाऊ चंद्रभानजी घरदार, शेतवाडी पहात होता. ६०-६५ एकर जमीन, नांदते मोठे घर, १०-१२ गुरेढोरे, घराणे चांगले सुखवस्तु होते. म्हाता-या हंबीररावाला झिंगराजीच्या मृत्यूची बातमी समजताच, त्याने चंद्रभानजीला पाठवून संखूबाई नि डेबूजीला घरी आणवले. छोटा डेबूजी काही दिवस इतर मुलांच्या बरोबरीने खूप खेळला बागडला, गावाबाहेर हुंदाडला, नदीत डुंबला, आईच्या हाताखाली राबला. एक दिवस तो चंद्रभानजी मामाला म्हणाला - ``मामा, गुरेचारणीसाठी नोकर कशाला हवा आपल्याला? मी जात जाईन रोज आपली गुरे घेऊन चरणीला. मला फार आवडते हे काम.’’ अरेच्चा, वाटला तसा हा पोरगा ऐतखावू दिसत नाही. याला कामाची हौस आहे. हे चटकन ओळखून चंद्रभानजीने डेबूजीची गुरेचरणीच्या कामावर नेमणूक केली.

डेबूजीच्या क्रांतिगर्भ जीवनाचा श्रीगणेशा गुरेचरणीने झाला. खरेच, लोकोत्तर युगपुरुषांच्या चरित्राचा ओनामा गुरेचरणीनेच होत असतोसे दिसते. यादव श्रीकृष्णाने बालपणी गुरेचरणीचीच दीक्षा घेतली होती.


डेबूजीचे गोवारी जीवन
डेबूजीने रोज मोठ्या पहाटे उठावे, गोठा साफ करावा, शिळ्या भाकरीचा तुकडा चावून वर घोटभर पाण्याने न्याहारी करावी, दुपारच्या जेवण्यासाठी दिलेली कांदा भाकरीची पुरचुंडी बगलेच मारावी आणि गाई-म्हशी-बैल चरणीला घेऊन जावे. माध्यान्हीला सूर्य आला का गुरांना पाणी पाजून त्यांना सावलीत बसवायचे, आपण भाकर खायची नि रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरि भजने गात जवळच लवंडायचे. कित्येक वेळा गुरे डेबूजीची नजर चुकवून शेजारच्या शेतात घुसायची. राखणदार तणतणत यायचा. डेबूजी त्या गुराला वळवून आणून, त्याची हात जोडून क्षमा मागायचा. या त्याच्या विनम्र वृत्तीला इतर गवारी पोरे टिंगलीने हसायची. एकादवेळी राखणदाराची चपराकही तो मुकाट्यने सहन करायचा. पण उलट शब्द


कधी बोलायचा नाही.
गुराढोरांची जोपासना डेबूजी स्वतःपेक्षा विशेष अगत्याने करायचा. वेळी आपण भाकर खायला विसरेल, पण गुरांची दाणावैरण वेळच्या वेळी द्यायला एकदाही चुकला नाही. सकाळ संध्याकाळची त्याची गोठेसफायी पाहून शेजारी पाजारी चकित व्हायचे. ४-५ दिवसांआड गुरांना नदीच्या पाण्यात घालून चांगली मालीश करी. त्यामुळे चंद्रभानजीची गुरे म्हणजे दापुरीत नमुनेदार म्हणून जो तो वाखाणू लागला.


डेबुजीची गोवारी भजन-पार्टी
मामी कौतिकाबाई पहाटे उठून जात्यावर गाणी गायची. ती गुणगुणण्याचा डेबूजीला नाद लागला. गावातली मंडळी कधीकाळी भजने गायची ती ऐकून वेडीवाकडी म्हणायची त्याने सुरुवात केली. थोड्याच दिवसात गोवारी मंडळ जमवून नदीच्या काठी भजने चालू केली. राकेलचा रिकामा डबा म्हणजे मुरदुंग आणि दगडांच्या चिपांचे टाळ, या साहित्यावर डेबूजीचे हे भजनी मंडळ भजनाच्या कार्यक्रमात खूप रंगू लागले. रोज कोणी ना कोणी एकादा नवीन अभंग ऐकून पाठ करून आणावा नि या टोळीने तो आपल्या भजनात चालू करावा. कामधाम आटोपून रात्रीची भाकर पोटात गेलीरे गेली का हे भजनी मंडळ काळोखात गावाबाहेर जायचे नि हरिनामाचा गजर करीत बसायचे. मध्यरात्रीपर्यंत असे होत राहिल्यामुळे, इतर मुले उशीरा उठायची नि उशिरा कामाला लागायची. त्याची तक्रार चंद्रभानजीच्या कनावर गेल्यामुळे, डेबूजीने एकटेच भजनासाठी बाहेर जाण्याचा क्रम चालू केला. पण त्याचे सवंगडी त्याचा पिच्छा सोडणार थोडेच?

  •  सार्वजनिक भंडा-याचा श्रीगणेशा

डेबूजी मंडळाच्या भजनाचे पुढे सप्ताह होऊ लागले. सप्ताहाची समाप्ति प्रसादाने झाली पाहिजे. पोरांची डोकी ती! कित्येकांनी आईबापांजवळ मागून, कित्येकांनी गावात भिक्षा मागून, धान्य जमा केले. गुराख्यांच्या वनभोजनासाठी गोडधोड करून द्यायचा खेडेगावच्या लोकांचा प्रघात असतोच. झाले. हां हां म्हणता नदीच्या काठावर गुराख्यांनी अन्नकोट उभा केला. डेबूजी  म्हणाला - ``गळेहो आपुन त साराईच जेवतो खावतो. पन जरा भवताल पाहा ना? किती तरी अंधले, लंगले, रगतपिते, भिकारी मानसं आहेत. त्याहीले बिच्या-याहीले चुकुन तरी कधी नव्हीची जेवारी बाजरीची भाकर पोटभर खायाले भेटत नाही. आज आपुन त्याहीले सगळ्याईले बलाऊन आनुन पोटभर जेव्याले घालू. अन्नदानासारखं महापुन्य नाही. ते आपले गरीब भाऊ अन् बहयनी जेवल्या म्हंजे तोच देवाले खरा नीवद होईन.’’

डेबूजीच्या भजन मंडळात एक वाबन नावाचा महार गुराखी होता. त्याने महारावाड्यातले सारे बाप्ये बाया नि मुले शेपाटून आणली. आजूबाजूचे इतर गोसावी फकीर भिकारी पण बोलावले. डेबूजीने सगळ्यांना एक पंगतीत शिस्तवार बसवून पुंडलीक वरदा हारि विठ्ठलच्या जयघोषात जेवण घातले. ते लोक जेवत असताना डेबूजीने निवडक भजने तल्लीनतेने गायली. जेवणा-या मंडळींचा आणि गुराख्यांचा तो प्रसाद सोहळा पहायला जमलेल्या दापुरीच्या गावक-यांना एक नवलच आज तेथे  दिसले. नंतर गुराखी मंडळी पंगतीने बसली. डेबूजीने बाबाजी गणाजी महाराला अगदी आपल्या शेजारी बसवले. केरकचरा झाडून साफ केल्यावर हा समारंभ आटोपला. पण त्या भ्रष्टाकाराची कुरबूर डेबूजीच्या आजोळी नि गावभर काही दिवस चालूच होती. पण डेबूजीचा खुलासा खोटा पाडण्याचे धैर्य किंवा अक्कल मात्र कोणातही नसे. दापुरीला डेबूजी असे तोवर असले अन्नदानाचे उत्सव त्याने अनेकवेळा केले.


मुलाचे पाय पाळण्यात दिसले म्हणे!
गाडगे महाराज या टोपण नावाच्या असामान्य लौकिकाने वृद्ध डेबूजी गेली ४५वर वर्षे हीच भेदातीत अन्नदानाची लोकसेवा बृहन्महाराष्ट्राच्या कोनाकोप-यात साजरी करताना पाहून, दापुरीच्या त्याच्या त्या बालवयातल्या वर्तनाचामुलाचे पाय पाळण्यात दिसले अशा ठराविक शब्दांनी गौरव करण्याचा श्रीयुती किंवा संताळी मोह पुष्कळांना होत असतो. इतकेच काय, पण भविष्यकाळी हा कोणीतरी मोठा साधू सत्पुरुष होईल, अशी पुष्कळांनी अटकळ बांधली होती, असे धडधडीत खोटे विधानही करायला कित्येक चुकत नाहीत. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात? कुणाला दिसतात? कोण ते पहातात? बरे, ते दिसतात तर मग त्या बालकाला त्या पायांच्या लक्षणांप्रमाणे पुढे कोणकोण काय काय कसकसले उत्तेजन देतात? प्रत्यक्ष जन्मदात्या आईबापांनाही त्या पायांच्या लक्षणांची कसली काही कल्पना नसते, अटकळ नसते, जाणीव नसते. ती लक्षणे कुणाला दिसत नाहीत आणि कुणी ती पाहतही नाहीत.  आत्मविश्वासाने नि आत्मक्लेशाने एकादा माणूस मोठा कर्तबगार झाला, नामवंत झाला, म्हणजे मग त्याच्या बालपणीच्या ख-या खोट्या आठवणी उकरून काढून, भविष्याचे सिद्धांत लढवण्याची कसरत लोक करतात, एवढाच त्या पाळण्यातल्या पायांचा अर्थ आहे. स्पृश्यांस्पृश्यांच्या सहभोजनाबद्दल आणि नदीकाठच्या भजनाच्या व्यसनाबद्दल बिचा-या बाल डेबूजीला चंद्रभानजी मामाचा खावा लागलेला कणक्या चोप आज या कल्पना-पंडितांच्या हिशेबी कशाला जमा धरलेला असेल? शिवाय महार, मराठे, परीट, सुतार, लोहार, सवंगडी आपण एकत्र का बसवतो खेळतो नि दुपारच्या न्याहारीला एकत्र जेवतो, या कृत्याच्या दूरगामी परिणामांची तरी बाल डेबूजीला काही निश्चत जाणीव असणार थोडीच? आम्ही सगळे एक, यापेक्षा कसली विशेष भावना त्या वयात त्याला असणार? शक्यच नाही. हा एक सद्गुणांचा अंकुर आहे नि तो आपण वाढवला पाहिजे, अशी पुसटसुद्धा कल्पना त्याच्या विचारांना चाटून गेली नसेल. मनाला ज्यात गोडी वाटते तेवढे करावे, अशी बालमनाची ठेवणच असते. तिची बैठक सद्गुणांवर स्थिरावणे नि पुढे ती वाढीला लागणे, हा मानवी जीवनातला एक भाग्यवान अपघातच  समजला पाहिजे.

एकादा मनुष्य रंकाचा राव झाला म्हणजे त्याच्या कर्तबागारीचे श्रेय आईबापाला नि आजूबाजूच्या अलबत्या गलबत्यांना मोफत वाटण्याची वाईट खोड लोकांना असते. रामदासाने म्हणजे शिवाजीला राजकारण शिकवले म्हणून तो स्वराज्य स्थापन करू शकला. या सर्वत्र रूढ केलेल्या प्रवादात या वाईट खोडीचा पाजीपणाच स्पष्ट उघड होत नाही काय?  अनाथ गुराखीपणापासून लोकहितवादी गाडगे महाराज या कर्मयोगी पदवीपर्यंत सिद्ध केलेल्या डेबूजीच्या जीवनाच्या यशवंत शर्यतीचे श्रेय एकट्या गाडगेबाबांचे आहे. त्यात इतरांना वाटेकरी बनवण्याचा मोह मूर्खपणाचा आहे.

  •  पोहता येत नाही म्हणजे काय?

दापुरी गावच्या पूर्णा नदीच्या हिवाळ्या-उन्हाळ्यात फार मोठा खोल डोह पडायचा. गावातली बरीच मोठी मंडळी नि मुले त्यात पोहायला डुंबायला जायची. एक दिवस डेबूजीच्या मनाने घेतले, ही सगळी माणसे धडाड पाण्यात उड्या मारताहेत, सरासर पोहताहेत, पाणतळी खोल बुडी मारून भरारा वर येताहेत, मजा आहे मोठी. आले डेबूजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना. आपल्याला पोहता येते का नाही, याचा कसला सुद्धा विचार न करता, स्वारीने घेतली धडाड उडी डोहात. आणि मग – आणि मग –

आणि मग? कसचे काय अन् कसचे काय! लागला गटांगळ्या खायला. घाबरला. ओरडू लागला. आजूबाजूच्यांना वाटले हा मौज करतो आहे. नाकातोंडात पाणी जाऊन गुदमरून बुडतो आहेसा दिसताच एका दोघांनी पकडून काठावर आणला. उपचार केले तेव्हा सावध झाला. ``पोहता येत नव्हते तर झक मारायला उडी घेतली कशाला?’’ जो तो बडबडू लागला. बातमी गावात गेली. आई, मामा, आजोबा धावत आले. ``कुणी सांगितलं होतं तुला उडी मारायला बाबा’’ म्हणून आईने डेबूजीला पोटाशी धरले आणि ``भलभलत्या फंदात पडायची गाढवाला फार खोड’’ म्हणून मामाने दिली भडकावून एक डेबूजीच्या. ``खबरदार पुन्हा पाण्यात पाऊल टाकसील तर, तंगडी मोडून टाकीन.’’ असा सज्जर दम भरला.


माणसाला अशक्य काय आहे?
नेपोलियनप्रमाणेच डेबूजी  गाडगे बाबांच्या कर्तव्यकोशात अशक्य हा शब्दच नाही. बरोबरीचे सवंगडी धडाधड उड्या मारतात, सपासप सरळ्या मारीत या काठचे त्या काठाला जाता, मनमुराद डुंबतात आणि मी का वेड्या अनाडी बावळटासारखा त्यांच्याकडे पहात नि त्यांचे कपडे संभाळीत काठावर बसू? छट्! हे नाही चालायचे. पोहायला मला आलेच पाहिजे.

दोन प्रहरी आजूबाजूला कोणी नाहीसे पाहून, पाण्यात उतरून डेबूजी दररोज पोहण्याचा यत्न करू लागला. एक दोन महिन्यांच्या आतच त्याचा आत्मविश्वास बळावला आणि पोहण्याचा, तरंगण्याचा, बुडी सराळ्या मारण्याच्या नाना प्रकारात त्याने एवढे प्रावीण्य मिळविले की त्या बाबतीत गावचा नि आसपासचा एकही आसामी त्याच्याबरोबर टिकाव धरीनासा झाला.

पावसाळ्यात नदीला महामूर पूर आला म्हणजे पुरात सापडलेल्या माणसांना नि जनावरांना वाचवण्याचे कर्म महाकठीण, मोठमोठ्या पटाईत पोहणारांची अक्कल थरथरू लागायची. पण डेबूजी तडाड उडी घेऊन कमाल शहामतीने त्यांना सफाईत तडीपार खेचून काढायचा. असाच एकदा पूर्णेला पूर आला असता, पल्याडच्या काठावर पोहत जाण्याची अमृता गणाजी नावाच्या मित्राने डेबूजीशी पैज मारली. लोक नको नको म्हणत असताही दोघांनी टाकल्या धडाड उड्या. नदी तर काय, एकाद्या खवळलेल्या महासागरासारखी रों रों करीत, गरार भोवरे भिरकावीत तुफान सोसाट्याने चाललेली. सहज भिरकावलेला लाकडाचा ओंढा धड शंभर पावले सुद्धा सरळ जाई ना. भोव-यात गचकून झालाच तो बेपत्ता! आणि हे दोघे आचरट तर चालले आहेत सपासप हात मारीत पाणी तोडीत! काठावरच्या लोकांच्या तोंडचे पाणी पळाले. काय होतय नि काय नाही. डेबूजी तर रंडक्या मुंडक्या अनाथ आईचा एकुलता एक मुलगा. कुणी भरीला घातला नि कुणी चिथावले? नसता आपरमात अंगी लागायचा. बरे, घरच्या मंडळींना कळवायचे, तर ती वेळही निघून गेलेली. आता कोणी घरून आलेच तर काठावरच्या लोकांनाच शिव्याश्राप खावे लागणार. सखुबाई तर काठावरच माथे फोडून घेणार.

लोक थिजल्या डोळ्यांनी नुसते पहाताहेत तोच हां हां म्हणता पार दूरवरच्या पैलथडीवरून डेबूजीची भीमगर्जना ऐकू आली. ``आलो रे आलो, सफाईत येऊन पोहोचलो.’’ पण त्याचा तो पैजदार दोस्त? अरेरे, तो कुठेच दिसे ना. कशाचा दिसतो तो? काठाजवळ जाता जाताच एका भोव-याच्या गचक्यात तो सापडला नि बुडाला. त्याचे प्रेत पुढे सहा मैलांवर कोतेगावी काठाला लागलेले आढळले. पोहण्याप्रमाणेच आट्यापाट्या, हुतुतु, लगो-या, गोट्या आणि कुस्त्या या कलांतही डेबूजी दापुरीच्या पंचक्रोशीत कुणाला हार जाईनासा झाला. घरचे खाणेपिणे तसे म्हटले तर यथातथाच. पण अखंड कष्टांची नि श्रमसाहसाची आवड उपजतच त्यांच्या अंगी बाणल्यामुळे, डेबूजीची देहयष्टी पोलादी कांबीसारखी टणक कणखर बनत गेली. ना कधी थेटे ना पडसे. आज ७५ वर्षांचे वय झाले आहे तरी हव्या त्या प्रचंड डोहात बेधडक उडी घेऊन सहज लीलेने तडीपार होताना बाबांना पाहून त्यांचे जवान अनुयायी सुद्धा एकमेकांच्या तोंडाकडे पहात उभे रहातात.

  •  गुराख्याचा नांग-या बनला

डेबूजी चांगला १४-१५ वर्षांचा पु-या उफाड्याचा जवान झाल्यामुळे, चंद्रभानजीने त्याची गुरेराखणी बंद करून, `` डेबूजी, तू आता शेतावर औताला जात जा.’’ असे सांगितले. शेतक-याच्या पोराच्या हातात औत येणे आणि पांढरपेशाचा पोर मॅट्रिक होणे, जवळजवळ सारखेच म्हटले तरी चालेल. फरक एवढाच की पांढरपेशा पोरगा मॅट्रिक होऊन कमावता होतोच असे नाही, पण शेतक-याचा पोर औताला लागला का त्यांची कमावणी तेव्हाच चालू होते.

पडेल ते काम चोख कुसलतेने करायचेही डेबूजीची कर्मयोगी वृत्ती लहानापणापासून दिसून येते. शेतीचा नांगर हातात येताच, शेतीच्या सगळ्याच लहानमोठ्या तपशिलांच्या कामाला त्याने पक्का आवर घातला. औताच्या बैलांची निगा राखण्यात त्याची पहिल्यापासूनच मोठी कदर. स्वत-ला वेळेवर भाकर मिळो न मिळो, पण बैलांची वैरण, त्यांची गोठेसफाई, रोजची नदीतली अंगधुणी, गोणपाटाच्या रकट्याने त्यांचे अंग पुसणे इत्यादि कामे डेबूजी अगदी तन्मयतेने करायचा. खांद्यावर आसूड नि नांगर टाकून जवान डेबूजी भजने गुणगुणत आपले बैल घेऊन शेताकडे जाऊ लागला का दापुरी गावच्या बाया बाप्ये नजर लावून कौतुकाने त्या बैलांकडे पाहायचे. शेतकाम डेबूजीने पत्करल्यापासून शेतांची सुधारणा झाली, उत्पन्नही वाढले. हरएक काम तो जातीने पाहू लागल्यामुळे, बांध-बंदिस्तीपासून तो पिकाच्या राखणीपर्यंत उधळमाधळीचा किंवा चोरीमारीचा प्रश्नच रहात नसे. धान्याची कणसे दाणे धरू लागली आणि कपाशीची बोंडे डोळे उघडू लागली का डेबूजीचा मुक्काम कायमचा शेताच्या माचीवर. हातात लठ्ठ बडगा घेऊन रात्रभर जागरण. शिवाय दिवसाची दलामल असायचीच. सारांश, शेतीच्या कामात डेबूजी ईश्वर-भक्तीइतकाच तल्लीन रंगलेला असायचा. कायावाचेमनेकरून केलेल्या सेवेच्या भक्तीला बिनचूक, प्रसन्न होणारा शेतीशिवाय दुसरा परमेश्वर नाही, हा सिद्धांत डेबूजीला याच कोवळ्या वयात मनोमन पटला आणि येथेच त्याच्या भावी चारित्र्याच्या उज्वल कामगिरीचा पाया भक्कम बसला.


कसे होणार याचे दोन हाताचे चार हात?
लहानपणी मुलामुलींची लग्ने लावण्याचे व्यसन खेड्यापाड्यात आणि मागासलेल्या नाक्षर शेतकरी वर्गात फार. बालविवाहांना शिक्षा ठोठावणारे कायदे आज जारी आहेत, तरीही त्यांचे हे व्यसन आजही लपूनछपून चालूच आहे. लग्नाशिवाय माणसाची माणुसकीची ठरत नाही, असा त्या अडाण्यांचा समज. ही लग्ने तरी थोड्या खर्चात, आंथरुण पाहून पाय पसरण्याच्या बाताबेताने करतील तर हराम! घरची कितीही गरिबी असो, सकाळ गेली संध्याकाळची पंचाईत असो, लग्नाचा थाट सरदारी दिमाखाचा उडालाच पाहिजे. तेवढ्यासाठी – परवा नाही – शेतभात, गाडीघोडा, ढोरंगुरं टक्के करून सावकाराच्या घरात गेली तरी बेहत्तर, पण लग्नाचा थाट दणक्या खणक्याचा झालाच पाहिजे. या फंदाने महाराष्ट्रातला शेतकरी वर्ग जेवढा कर्जबाजारी होऊन भिकेला लागला तेवढे इतर कोणत्याही व्यसनाने त्याच्या जीवनाचे कोळसे केलेले नसतील.

सखूबाई नि डेबूजीची अवस्था काय विचारता? ना बिस्तर ना बाड, देवळी बि-हाड. आजोबा मामाचा आश्रय मिळाला नसता तर सखूबाईला हात पोर घेऊन गावोगाव भीकच मागावी लागली असती. जात-जमातीला सगळ्याना हे माहीत होते. अशा ना घर ना दार पोराला कोण देतो आपली मुलगी? सोयरा बघायचा तो त्याच्या घरदार शेतीवाडीवरून पसंत करायचा. मग ते घरदार, शेतीवाडी तीन सावकारांकडे सहा वेळा गहाण पडलेली का असे ना. त्याची पर्वा कोणी करीत नसे. इतकेच नव्हे तर जवळ कवडी दमडी नसताही, लग्नाच्या थाटाने सोय-यांचे नि गावक-यांचे डोळे दिपण्यासाठी खुद्द नव-या मुलालाच एकाद्या सावकाराकडे ७-८ वर्षांच्या मुदतबंदीने पोटावारी कामासाठी कायम बांधून दिल्याचा करारनामा करतात आणि लग्नासाठी पैसा काढून तो उधळतात. असे खेडूतांचे नाना छंद असतात. त्यापायी खेडीच्या खेडी गुजर, मारवाडी, पठाण सावकारांच्या घशात जावून, म-हाठा शेतकरी पिकल्या मळ्यावर पोट बांधून सावकराचा गुलाम बनला तरी या अडाणी लोकांचे डोळे अजून उघडत नाहीत.


काय पाहून मुलगी द्यायची?
`डेबूजी माझा नाती, चंद्रभानजीचा भाचा, त्याची कर्तबगारी पंचक्रोशीत सगळ्यांना ठावी, मग त्याची सोयरीक जमायला हरकत कसली? शब्द टाकायची थातड, पाहुण्यांची वरदळ लागेल आमच्या आंगणात.’ हा हंबीररावाचा नि चंद्रभानजीचा भ्रम थोड्याच दिवसांत दूर झाला. `मुलगा चांगला आहे हो, पण त्याच काय पाहून आम्ही मुलगी द्यावी? ना जमीन ना जुमला. ना घर ना दार.’ येई तो पाव्हणा हाच नकार देऊन चालता होऊ लगाल. मानी माणसाला नकार सहन होत नाहीत. चंद्रभानजी म्हणजे दापुरीतला एक पुढारी शेतकरी. गावात त्याचा शब्द खाली पडत नसे. नकारांनी पाणथळून न जाता, त्याने खटपटींचा जोर वाढवला आणि कमालपूर येथील धनाची परटावर आपले वजन पाडले. त्याला मुलगा पसंत पडला. पण त्याची बायको काही केल्या रुकार देई ना. हो ना करता १८९२ साली डेबुजीचे लग्न हंबीररावच्या घरी थाटात साजरे झाले. घरात सौ. कुंताबाई सून आल्यामुळे, सखुबाईच्या वठलेल्या जीवनाला पालवी फुटली.

  •  चंद्रभानजीवर सावकारी पाश

सुखवस्तु घरंदाजांवर कर्जाचे पाश टाकण्याच्या सावकारी युक्त्या जुक्त्या अनेक असतात. तशात तो सुखवस्तु नाक्षर आणि मानपानाला हपापलेला असला तर सावकारी कसबात तो तेव्हाच नकळत अडकला जातो. दापुरे गावच्या शिवाराच्या पूर्वेला पूर्णानदीच्या काठी बनाजी प्रीथमजी तिडके नावाच्या सावकाराचा एक ५ एकर जमिनीचा सलग तुकडा होता. जमीन होती उत्तम पण तिची ठेवावी तशी निगा न ठेवल्यामुळे ती नादुरुस्त नि नापीक झाली होती. तिडके सावकाराने तो तुकडा चंद्रभानजीला विकला. विकत घेताना काही रक्कम रोख दिली नि बाकीची रक्कम दोन वर्षांत हप्त्याने फेडण्याचे ठरले. मात्र या खरेदीचा वाजवी कागद रजिस्टर केला नाही. ``कागदाशिवाय अडलं आहे थोडंच? जमीन एकदा दिली ती दिली. माणसाची जबान म्हणून काही आहे का नाही?’ असल्या सबबीवर कागद आज करू उद्या करू यावरच दिवस गेले. दोन वर्षांत डेबुजीने त्या जमिनीची उत्तम मशागत करून ती सोन्याचा तुकडा बनवली. दोन वर्षात देण्याचे हप्तेही फेडले. तो सावकार चंद्रभानजीला हवे तेव्हा हव्या त्या रकमा नुसत्या निरोपावर देत गेला. त्या सावकाराच्या इतर कुळांच्या देण्याघेण्याच्या भानगडी चंद्रभानजीच्या सल्ल्याशिवाय मिटेनाशा झाल्या. सावकाराने त्याच्यावर आपल्या विश्वासाची एवढी मोहिनी टाकली की चंद्रभानजीच्या शब्दाशिवाय सावकार कोणाचे ऐकेनासा झाला. भोळसट चंद्रभानजी गर्वान फुगला. स्वतःची श्रीमंती दाखवण्यासाठी कुळधर्म, देवकार्य, उत्सव, मेजवान्यांचा थोट उडवण्यासाठी तिडक्याकडून रातोरात वाटेल त्या रकमा मागवीत गेला. तिडक्याची तिजोरी आपलीच गंगाजळी असा जरी त्याला भ्रम झाला, तरी तिडके होता जातीचा सावकार. त्याने एकूणेक एक रकमेचा जमाखर्च लिहून ठेवला होता. एक दिवस तो त्याने चंद्रभानजीला गमती गमतीने दाखवला आणि या भरंसाट कर्जाच्या फेडीसाठी दे आपली सारी जमीन खरेदी लिहून, असा पेच टाकला. चंद्रभानजीचे डोळे खडाड उघडले. त्याच्या डोळ्यापुढे अंधारीच आली. सावकारी सापळा कसा असतो ते त्याला आज उमगले. त्याने ५६ एकर जमीन गहाण लिहून खत रजिस्टर करून दिल्यावरच घरी परतायची त्याला मुभा मिळाली.


सावकारशाहीची जादू
डेबुजीला किंवा घरात कोणालाही ही गहाणाची भानगड चटकन उमगली नाही. शेताचे धान्य कपाशीचे पीक तर घरात महामूर येते, पण सावकाराचे लोक येऊन ते उघड्या डोळ्यांसमोर घेऊन जातात का नि कशाला? याचा डेबुजीला बरेच दिवस काही थांगच लागेना. घरासमोर कपाशीचा पर्वत उभा रहावा. धान्यांचे डोंगर एकावर एक चढावे आणि एकाद्या दिवशी उठून पहावे तर आंगण मोकळे! अखेर चंद्रभानजीच्या गहाणाचे बेण्ड गावात फुटले. गावातही कुजबूज उठली. घरंदाज म्हणून मिरवणा-या शेतकरी पुढा-याची जमीन गहाण पडणे ही मोठी नामुष्कीची गोष्ट. वरचेवर सावकराकडून रोख रकमा उचलता येईनाशा झाल्यामुळे, खर्चासाठी रोकड रकमांची तंगी पडू लागली. अंगावरच्या नित्याच्या खिडूकमिडूक दागिन्याशिवाय बासनातले ठळक नद दूरगावी नेऊन त्यांचे टक्के करण्याचा चंद्रभानजीने तडाका चालू केला. त्याची प्रकृतीही ढासळत गेली. अखेर विपत्तीची विषारी नजर गोठ्यातल्या गोधाकडे वळली.

  •  डेबूजीचे गोधनावरचे प्रेमअध्याय

डेबुजीडीच्या चरित्राचा श्रीगणेशाच गोधनाच्या संगतीत नि गोसेवेच्या संगीतात झाल्यामुळे, ज्याचे बैल उत्तम त्याची शेती उत्तम हे तत्त्व त्याच्या मनावर खोल कोरले गेलेले होते. गोरक्षणाचे मूळ बीजच त्याने हेरले होते. औताच्या बैलांची तर तो स्वतःच्या प्राणापलीकडे निगा ठेवीत असे. गायीला गो-हा झाला का डेबुजी त्या गाईची धार काढायचा नाही. सारे दूध गो-ह्याला पिवू द्यायचा. कोणाला काढूही द्यायचा नाही. लहानपणी गो-ह्यांना भरपूर दूध मिळाले म्हणजे ते पुढे हाडापेराने बळकट ताकदवान बनतात. अशा २-३ खोंडांना भरपूर दूध पाजून त्याने नमुनेदार बैल बनवले होते.

सावकारशाहीच्या पोखरणीचे गिरमिट लागलेल्या चंद्रभानजीने गो-हे विकण्याचा प्रश्न काढताच डेबुजीने जीव देईन पण माझे खोंड विकू देणार नाही, असा खडखडीत प्रतिकार केला. खोंड नाही तर म्हातारा बैल तरी विकला पाहिजे, असा आग्हर पडताच, डेबुजीने करड्या आवाजात आजोबाला नि मामाला बजावले - ``दोनच काय तीनही गो-हे टाका विकून. पण त्या म्हाता-या बैलाला मी विकू देणार नाही. जन्मभर त्याने तुमचे काबाडकष्ट केले. हजारो रुपयांचे धान्य पिकवले. तुमच्या श्रीमंतीचा बडेजाव सांभाळला. पोटच्या पोरासारखा आजवर त्याला पाळला, पोसला नि राखला. आज तो म्हातारा झाला म्हणून काय त्याला कसायाला विकणार तुम्ही? ही काय माणुसकी झाली? म्हाता-या बैलाप्रमाणे उद्य म्हाता-या माणसांचीही अडगळ घरातलं काढायला लोक सवकतील, तर त्यांचे हात कोण धरणार? तो बैल विकाल तर उद्यापासून मी औताला जाणार नाही, मला घरात ठेवा नाहीतर हुसकून द्या. कुठेही चरा घरं भीग मागून पोट भरीन, पण असा कसायीखाना मला परवडणार नाही.’’


मामा, घाबरता कशाला?  
डेबुजीचे म्हणणे कितीही खरे असले तरी त्याने कर्जाचा बिनबुडाचा खळगा थोडाच भरणार होता? चंद्रभानजी तर अगदी टेकीला आला. डेबुजीने त्याला धीर देण्याचा खूप यत्न केला. तो म्हणाला, - ``मामा, आपण उपाशी राहू. अंगावर कपडा घालणार नाही. सणवार करणार नाही. मुलाबाळांसह खूप कष्ट करू आणि आपल्या मायपोट शेतीच्या पिकांवर या सावकारी पाशातून मोकळे होऊ. पण यापुढे त्या सावकार यमाची पायरी चढणार नाही अशी शपथ घ्या. खोटेनाटे हिशोब ठेवून त्यानं तुम्हाला सपशेल फसवलंय. चांगल्या हिशेबी माणसाकडून त्याचे हिशेब तपासून घ्या नि खोट्यानाट्याची सरकारात फिर्याद लावा. बाकीचे मी पाहून घेतो.’’


झालंय कधी असं?
फिर्याद? कुळाने सवाकरावर लावायची? खोट्या हिशेबाबद्दल? झालंय कधी असं? शेतक-याचे म्हणणे कितीही खरे असले, तरी न्यायमंदिरात कागदाची जबानी खरी ठरत असते. आणि कागदांवरच्या आकड्यातच सावकारी कोलदांड्याची सारी शहामत सामावलेली असते. सावकारी आकडेमोडीमुळे चांगले शिकले सवरलेले शहाणे कोर्टात गाढव ठरतात. तिथे जन्माचे अडाणी नि नाक्षर अशा नांगरड्यांचा काय पाड?

कर्जफेडीसाठी शेती उमाप पिकवण्याचा डेबुजीचा अट्टहास चालू असतानाच, चंद्रभानजी ताप घेऊन झुरणीला लागला आणि थोड्याच दिवसांत मरण पावला. हंबीररावचे घरच बसले. घरात विधवा सून नि एक लहान नातू बळिराम. सगळा भार डेबुजीवर पडला.

  •  शेतकरी छोटा ना मोठा

आकाश कोसळून पडले तरी डगमगायचे नाही. खोट्यानाट्याचा मुलाहिजा राखायचा नाही. हा डेबुजीच्या स्वभावातला एक महान गुणधर्म आजही त्याच्या चारित्र्याचा एक तेजस्वी पैलू म्हणून सांगता येतो. आता शेतावर सखुबाई, मामी, आजा, आजी, बळिराम आणि कुंताबाई सगळेच जातीने काम करू लागले. कपाशी वेचायला, ज्वारी कापायला, काय वाटेल ते काम करायलासगळे घर एकजुटीने लागल्यामुळे, डेबुजी  वट्टीची शेती दापुरे पंचक्रोशीत नमुनेदार म्हणून सगळ्यांच्या नजरेत भरण्यासारखी पिकायची. आजवर गडी नोकरांकडून शेती करवी. आता आपण स्वतः कसे राबायचे? असला किंतू आजा आजी मामी आईच्या मनात डोकावू लागताच, डेबुजी म्हणाला - ``शेतकरी कधी मोठा नसतो नि छोटा पण नसतो. तो फक्त शेतकरीच असतो. शेतीच्या मातीत कष्ट करावे नि मातीतून सोने काढावे, एवढेच त्याचे काम, तोच त्याचा धर्म नि जमीन त्याचा देव. बाकीचे सारे देव धर्माचे चोचले थोतांडी. श्रीमंती गरिबीचे काय घेऊन बसलात? ढगाची साळवटं ती. येतात नी जातात. श्रीमंतीची मिजास कशाला नी गरिबीची लाज कशाला? मनगटं घासून कामं करावी. मिळेल तो ओला कोरडा घास अभिमानाने खावा आणि जगात मान वर करून वागावे. पूर्वी आपण कसे होतो नि आज कसे झालो, हव्यात कशाला शेतक-याला त्या भानगडी?’’


मेहनती दिलगी, चोरटे हुशार
सालोसाल शेती पिकवावी आणि सावकाराने कर्जाय्चा पोटी कापूस-धान्यांचे पर्वत डोळ्यादेखत उचलून न्यावे. वर्षभर काबाडकष्टकरून अखेर पदरात काय तर खळ्याच्या मातीत पुरलेले नि उरलेले धान्याचे दाणे टिपावे, नदीत नेऊन धुवावे आणि पोटासाठी घरी आणावे. करडीचे मातेरे स्वच्छ करून त्याचे घरीच तेल काढावे. धड दिवठाणाला पुरायचे नाही ते, तर खायला कुठचे? म्हातारा हंबीरराव खचत चालला ही अवस्था पाहून. डेबुजी  त्याची समजूत घालायचा. ``हे पहा आबाजी, आधी पण सावकाराच्य पेचातून मोकळे होऊ या. मग तेल तूप काय वाटेल ते खाऊ. पण जोवर ही कर्जाची अवदसा आपल्या मानेवर आहे तोवर अमृत खाल्ले तरी आंगी लागणार नाही.’’

जगात मोठा साधू कोण?

घरात मनस्वी कष्ट असतानाही डेबुजी  बैलांच्या दाणावैरणीचे हाल चुकूनसुद्धा होऊ द्यायचा नाही. आपण उपाशी रहावे पण ज्यांच्या मेहनतीवर आपली शेती पिकते, त्या मुक्या जनावरांचा घास तोडू नये, हा सिद्धांत त्याने कसोशीने पाळला. बैलांना तो जगातले खरे संत साधू म्हणून पूज्य मानायचा. त्यांना धुवून पुसून गोंजारल्यावर तो त्यांना दोन हात जोडून पूज्य भावाने नमस्कार करायचा. शेती किंवा शेतकरी यांच्यापेक्षा जगावर बैलांचे उपकार फार मोठे आहेत. रात्रंदिवस कष्ट करून जो जगाला अन्न देतो, सुख देतो, तोच खरा साधू. हा डेबुजीच्या मनीचा भाव जही त्याच्या चारित्र्यात अपरंपार उफाळलेला दिसून येतो.

  •  बाप दाखव, नाहीतर

डेबुजी नाक्षर खरा, पण त्याची व्यवहारी नजर मोठी चोख आणि करडी, पीक काढले किती, सावकाराने नेले किती, त्याची चालू भावाने किंमत किती,याचा बिनचूक अंदाज बांधून, त्याने तिडके सावकाराची भेट घेतली आणि हिशेब दाखवा आणि पावती करा, असा आग्रह केला. त्याने अनेक वेळा थापा दिल्या, होय होय म्हटले, सबबी सांगितल्या, पण हिशेबाचा किंवा पावतीचा थांग लागू दिला नाही. मामाचे सर्व कर्ज व्याजासकट फिटून उलट तुमच्याकडेच आमची बाकी निघते, असा डेबुजीने उलटा पेच मारला. पुष्कळ दिवस अशी माथेफोड केल्यावर, एक दिवस डेबुजीने त्याला सरळ हटकले. ``हिसेब दाखवून फेडीची पावती देत नसशील, तर यापुढे तुला एक दाणा देणार नाही. शेतावर आलास तर तंगडी छाटून लंबा करीन. याद राख. गाठ या डेबुजीशी आहे. भोलसट चंद्रभानजी मामाशी नाही.’’


आलाच अखेर तो प्रसंग
सावकाराने हिशेबाच्या आकड्यांची उलटापालट करून सगळी शेती गिळंकृत करणारा कर्जाचा आकडा डेबुजीपुढे टाकला. हा खोटा आहे, मी मानीत नाही, असा त्याने करडा जबाब दिली. उद्या आणतो तुझ्या सा-या शेत जमिनीवर टाच, असा सावकराने दम भरला. ठीक आहे, आणून तर पहा. असा सडेतोड जबाब देऊन डेबुजी परतला. वाटेत पूर्णानदीच्या काठच्या त्या जमिनीजवळ येताच त्याला ब्रह्मांड आठवले. `ही माझी जमीन. माझी लक्ष्मी. इतक्या वरसं सेवा केली हिची आम्ही सगळ्यांनी. घामाबरोबर चरबी गाळली आणि उद्या तो सावकार कायदेबाजीने हिसकावून घेणार काय आमच्या हातातनं? पहातो कसा घेतो ते.’

सगळी जमीन सावकाराच्या घरात जाणार, ही बातमी कळताच हंबीररावाच्या घरात रडारड झाली. डेबुजीने धीर देण्याचा खूप यत्न केला. मूळचा जरी तो नाक्षर तरी व्यवहाराच्या टक्क्याटोणप्यांनी त्याला मिळाले व्यवहाराचे ज्ञान पढिक पंडितांच्या शहाणपणापेक्षा अधिक कसदार होते. `माझी बाजू सत्याची नि न्यायाची आहे. सावकारशाही नि कायदेबाजी कितीही धूर्त नि चाणाक्ष असली तरीही मी त्यांना पुरून उरेन. अन्यायाचा प्रतिकार काय नुसत्या कोर्टबाजीनेच करता येतो? शेताची माती कसण्यात कसदार बनलेल्या माझ्या पीळदार मनगटाचा काहीच का उपयोग होणार नाही? पैसेवाल्यांनी कोर्ट कचे-यांच्या पाय-या चढाव्या आणि गोरगरिबांनी ठोशांनी न्यायाचा ठाव घ्यावा’ इतक्या कडेलोटावर त्याची विचारसरणी गरगरू लागली.


पांचशे कोसात सावकाराचा दरारा
सोनाजी राऊत नावाच्या वजनदार शेजा-याने डेबुजीला समजावण्याची वजनदार खटपट केली. तो म्हणाला - ``डेबुजी, ही भल्याची दुनिया नाही रे बाबा. सतीच्या घरी बत्ती नि शिंदळीच्या दारी झुले हत्ती. वाघाच्या तडाक्यातनं माणूस एकाद वेळ शीरसलामत वाचेल, पण सावकारी कचाट्यातनं? छे! नाव काढू नकोस. तशात हा सावकार म्हणजे महा कर्दनकाळ. पांचशे कोसात याचा दरारा. गाभणी गाभ टाकते.’’

डेबुजी – अरे मोठा वाघ का असे ना तो. चौदा वरसं शेत आमच्या वहिवाटीत आहे. मी नाही त्याला कबजा घेऊ देणार. वेळच पडली तर अस्तन्या वर सारून करीन काय वाटेल ते.

सोनाजी – डेबुजी, हा आततायीपणा काही कामाला येणार नाही. अरे, खैरी गावचे नि आपल्या इथले जाठ लोक म्हणजे वाघाची जात. त्यांच्या डोळ्याला डोळा भिडवायची प्राज्ञा नाही कुणाची. पण या सावकारानं त्यांचीही हड्डी पिळून मळून त्यांना गोगलगाय करून टाकलंय. पहातोस ना? मग तुझा एकट्याचा रे काय पाड? तुझ्यामागं आहे कोण? येणार कोण? या भानगडीत तू पडू नये हे बरं.

म्हाता-या हंबीररावनेही सोनाजीच्या उपदेशाला पाठिंबा दिला. ``पोरा, काय चालवलंयस हे तू. शेताचा कबजा घ्यायला सावकार उद्या आला तर येऊ दे. काय वाटंल ते करू दे. त्याला आडवा जाऊ नकोस. शपथ हे माझ्या गळ्याची, या गावात आपल्या बाजूचे कुणी नाही. घरात दातावर मारायला तांब्याचा दमडा नाही. कशाला घेतोस बाबा समर्थाशी होड? व्हायचं असंल ते होऊ दे. आपण बोलून चालून परीट. जिकडं भरला दरा तो गाव बरा समजून हवं तिथं जाऊ, कुठंही दोन कपडं धुवून पोट भरू. पण या सावकाराला आडवा जाऊ नको रे बाबा.’’

  •  धरा त्याला... काढा बाहेर

डेबुजी वट्टीच्या शेतात सावकार आज नांगर घालून कबजा घेणार, या बातमीने आसपासचा सारा शेतकरी त्या शेताच्या आजूबाजूला जमा झाला. डेबुजी मोठ्या पहाटेलाच शेतावर गेला. मागोमाग हंबीरराव, सखूबाई वगैरे मंडळी धावली. इतक्यात ८च्या सुमाराला महाशय तिडके सावकार घोड्यावर स्वार होऊन दाखल झाले. ७-८ औत, बैल, नांग-ये, ९-१० तगडे कजाखी नोकर बरोबर होते. जुंपा रे आपले बैल, घाला शेतात नांगर आणि  तो कोण नांगरतो आहे तिथे, त्याला गचांडी मारून बाहेर काढा.  सावकाराने आरोळी दिली. आजूबाजूच्या या भानगडीकडे मुळीच लक्ष न देता, डेबुजी आपला नांगर खाली मान घालून चालवीत होता. अरे पाहता काय. घाला त्याच्या कंबरेत लाथ नि द्या फेकून हद्दीबाहेर. सावकार पुन्हा गरजला. हंबीरराव व सखुबाईने रडकुंडी येऊन डेबुजीला बाहेर काढण्याचा खूप त्रागा केला. पण हूं का चूं न करता तो नांगर चालवीतच राहिला. धरा त्याला, काढा बाहेर, डेबुजी या सावकाराच्या आरोळ्या चालल्याच होत्या. अखेर त्याने हनमंत्या महाराला ``हनमंत्या, हो पुढे. हिसकावून तो औत. मार त्या चोराला गचांडी नि काढ शेताबाहेर.’’ असा निर्वाणीचा हुकूम केला.


जा गुमान मागं, नाहीतर -
हनमंत्या पुढे सरसावला. डेबुजीने त्याच्या डोळ्याला डोळा भइडवला. आगीच्या ठिणग्या पडत होत्या त्या इंगळी लाल डोळ्यांतून, ``हनमंत्या’’ डेबुजी गरजला. ``तुझ्या जिवाची तुला पर्वा नसंल, पोराबाळांची आशा नसंल, तरच पाऊल टाक पुढं. मी झालोय आताजिवावर उदार. काळाची मुंडी पिरगाळून टाकीन, तुझी रे कथा काय? एक पाऊल सरकलं पुढं का मेलास समज तू. तुझ्यामागं तुझ्या पोराबाळांना देईल का रे हा जुलमी सावकार शेरभर धान्य? जा गुमान मागं, नाहीतर गाठ माझ्याशी आहे.’’ हनमंत्या कचकला नि जागच्याजागी थबकून उभा राहिला.

सावकाराच्या संतापाचा पारा भडकला. त्याने दोन तगडे जाठ डेबुजीच्या अंगावर सोडले. दोनी बगला एकदम पकडून त्यांनी डेबुजीचा नांगर खाली पाडला. हंबीरराव सखुबाईने रड्याचा आकांत केला. डेबुजीने एका हिसड्यात एका जाठाला कोपरखळीच्या ताख्याने पचकन खाली विव्हळत बसवले आणि दुस-याच्या पोटात लाथेची ठोकर मारून जमिनीवर पालथा लोळवला. झटकन त्याने नांगराचा तुत्या (साडेतीन हात लांबीची लोखंडाची कांब) हातात घेऊन थेट सावकारावर चाल केली. आज मी मरेन किंवा तुझ्या नरडीचा घोट घेऊन. कसा घरीजिवंत जातोस ते पहातो आता मी, अशी भयंकर गर्जना करून डेबुजी धावला. सावकार भेदरला. घोड्याचा लगाम खेचून तो परतायला वळतो न वळतो तोच डेबुजीच्या तुत्याचा तडाखा तडाड बसला घोड्याच्या पुठ्ठ्यावर. घोडा उधळला. सावकाराचे पागोटे गेले गडगडत गरगरत शेताच्या मातीत. मालक महाराज जीव घेऊन पसार झालेले पाहताच, बरोबरचे सारे नांगरे गडी नि जाठ सुद्धा भेदरले. जाता की नाही इथनं सारे? जीव घेऊन एकेकाचा. सोडणार नाही. डेबुजीचा त्या वेळचा रुद्रावतार पाहून बघ्यांचीही तिरपीट उडाली. माझ्या शेतात पाऊल टाकण्यापूर्वी घरच्या बायकांची कुंकवं पुसून या मर्दांनो, ही शेवटची गर्जना ऐकताच एकजात सगळ्यांनी भराभर पोबारा केला. डेबुजीने नांगर घेतला नि जसे काही कुठे झालेच नाही असा वृत्तीने नांगरणी पुढे चालू केली.

  • अजि म्यां ब्रह्म पाहिले

यमाचा काळदण्ड सावित्रीने आपल्या स्वयंभू तेजाने जसा अचानक परतवला, तसलाच प्रकार हंबीररावच्या डेबुजी नातवाने केलेला पाहताच सावकारशाही वचकाचा शेकडो वर्षांचा फुगाच फुटला. अरेच्चा, सावकाराला असा आडवून तुडवताही येतो म्हणायचे? हा नवाच पायंडा डेबुजीने व-हाडच्या शेतकरी जनतेला प्रथमच शिकवला. बिचारा तिडके सावकारही सपशेल पाणथळला. डेबुजीचे उदाहरण उद्या बाकीच्या शेतकरी कुळांनी गिरवले तर आपले काय होणार?
या भीतीने त्याच्या तोंडचे पाणी पळाले. डेबुजीला आवरा म्हणून उपदेश करणारी मंडळीच आता त्याची पाठ थोपटायला हंबीररावाकडे धावली. माणसातला कर्दनकाळ म्हणून पिढ्यानपिढ्या गाजलेला सावकाराचा दरारा डेबुजीने एकाच थपडीत मातीमोल केल्यामुळे, पुढे तडजोडीचा मार्ग बंद झाला. दापुरी गावात यायलाही त्याला तोंड राहिले नाही.

काही दिवस गेल्यावर, तिडके सावकाराने मध्यस्थांची परवड घालून डेबुजीशी तडजोड करण्याची खूप तंगडझाड केली. ``ज्याचा दाम खोटा असेल त्याने सावकाराच्या कोर्टकचेरीच्या दरडावणीला भ्यावे. माझा हिशेब उघडा नि चोख आहे. वसूल घेतो नि पावती देत नाही? पटवीत नाही? आणि गुमान येतो जमीन कबजा घ्यायला? त्या जमिनीचे मामानी रोख पैसे दिले तरी खरेदीखत केले नाही. काय, कायद्याला डोळे आहेत का फुटले? कायदा काय असा चोरांना पाठीशी घालतो होय. जा म्हणावं तुलाकाय करायचं असंल ते करून घे. आम्ही त्याची एक दिडकी लागत नाही.’’ डेबुजीच्या या बोलण्याला कोणालाही खोटे पाडता येई ना.

अखेर मूळ मालक म्हातारा हंबीरराव याला कसाबसा मथवून, सावकाराने गहाण जमिनीपैकी १५ एकर जमीन परत देऊन, आता काहीही देणे राहिले नाही, अशी दुकानपावती देऊन वांधा मिटवला. हंबीरराव, सखुबाईला आनंद झाला, पण ``तुमचे तुम्ही मालक आहात. मी एक तसूभरसुद्धा तुकडा त्याला दिला नसता.’’ हे डेबुजीचे तुणतुणे कायम राहिले.

उपाशी रहा पण कर्ज काढून सावकाराच्या जाळ्यात अडकू नकारे बाबानो, ही गाडगेबाबांची प्रत्येक कीर्तनातली आरोळी लक्षावधि लोकांनी आजवर ऐकली नि रोज ऐकतात. तिच्यामागे हा जुना इतिहास आहे, हे त्यांना आता तरी नीट उमजावे म्हणून या कथेचा किंचित विस्तार करून सांगितली.
डेबूजीचा देवीसिंग झाला.

सावकार-सापाचे नरडे दाबून सर्वस्वाचा मणि त्याच्या मस्तकातून खेचून काढण्याच्या अपूर्व यशाने दापुरी पंचक्रोशीत डेबुजीला गावकरी नि शेतकरी मोठा मान देऊ लागले. ते आता त्याला देवीसिंग या बहुमानवाचक नावाने संबोधू लागले. एक वर्षातच हंबीररावच्या घराण्याची कळा बदलली. कपाशी, ज्वारी, गहू, जवसी, करडी, तुरीचे पीकही महामूर आले. अंदाजे एक हजार रुपयांची लक्ष्मी घरात आली. आंगणात धान्यांचे कणगे उभे राहिले. धनधान्य कपडालत्ता, दूधदुभते यांची चंगळ उडाली. गावकीच्या हरएक भानगडीत लोक डेबुजीला सल्लामसलतीसाठी मानाने बोलवायचे. या बदलामुळे डेबुजी गर्वाने ताठून न जाता, उलट पहिल्यापेक्षा अधिकाधिक विनम्र होत गेला. सहज नुसती कोणी हाक मारली तरी नमस्कार करून `काय आपली आज्ञा आहे’ अशी लीनतेने तो वागायचा. गावात येणा-या भिका-या दुका-यांची, संत गोसाव्यांची, भजन कीर्तनकारांची विचारपूस करून त्यांच्या सर्व गरजा भागवायचा. आपण जे श्रम करून कमावतो त्यात गोरगरिबांचा नि गरजू लोकांचा भाग असतोच असतो. आपण घास घेण्यापूर्वी घरचा दारचे ढोर, कुत्रे-मांजरसुद्धा उपाशी राहता कामा नये. आधी दारचे अतिथी अभ्यागत यांची सोय नि मग आपम. देवाला नैवेद्य दाखवायचा तो असाच दाखवला पाहिजे. ही त्याच्या मनीची भावना असे. सुबत्ता आली म्हणून त्याच्या शेतीच्या कष्टात हयगय झाली नाही. उलट, आजा, आजी, मामी, आई यांसह कामाचा जोर वाढवला. आताही हा शेतीसाठी नोकर का ठेवीत नाही, याचेच लोकांना नवल वाटायचे.

अन्यायाची चीड

गावात नामसप्ताह व्हायचे. आंधळे पांगळे आणि अस्पृश्य टोळ्यांच्या टोळ्या अन्नसाठी गावागावाहून धावायच्या. नेहमीचा प्रघात काय, तर सगळ्यांची जेवणे झाल्यावर उरलेले खरकटे उष्टे त्या अन्नार्थी गरिबांवर दुरून झुगारायचे. डेबुजीला हा किळसवाणा बेमाणुसकीचा प्रकार सहन झाला नाही. देवाचा महाप्रसाद नीटनेटका, स्वच्छ असा आपणच गावक-यांनी तेवढा खावा आणि त्या गोरगरिबांच्या नशिबी काय खरकटे उष्टे असावे? ती काय माणसे नव्हत? चांगलं गोडधोड आपल्याला मिळावं असं त्यांना वाटत नाही होय? त्यांना खरकटे चारण्याचा काय अधिकार आहे आपल्याला? ते काही चालणार नाही. गावकीचा महाप्रसाद त्यांना नीट पंगतीला बसवून तुम्ही खावू घालीत नसाल तर मी तुमच्यात भाग घेणार नाही. माझ्या घरी निराळा सैपाक करून मी त्यांची हवी तशी सोय लावीन आणि स्वतः त्यांच्या पंगतीला बसून प्रसाद भक्षण करीन असा सडेतोड खुलासा करताच गावक-यांचे डोळे उघडले. लोकांची कांकूं पाहताच डेबुजीने आपल्या घरी ताबडतोब चांगल्या पक्वान्नांचा बेत करू सर्व जमलेल्या अंध, पंगू, महारोगी आणि अस्पृश्य बांधवांना घरच्या अंगणात पंक्तीने बसवून पोटभर जेवू घातले. विचारवंत म्हातारेकोतारे म्हणू लागले, ``अरे हा डेबुजी आपल्यातला एकनाथ आहे रे एकनाथ’’

  • आता काय? मटण दारूची चंगळ!

डेबुजीचे साधुतुल्य चरित्र आणि चारित्र्य पंचक्रोशीत गाजत वाजत असतानाच सौ. कुंताबाई बाळंत होऊन तिला मुलगी झाली. सखुबाईला पृथ्वीवर स्वर्गच आल्यासारखे वाटले. मुलाच्या बाजूने नाही तरी मुलीच्या बाजूने पणतंडवाचे तोंड पाहिले म्हणून म्हातारा हंबीरराव नि रायजाबाई आंदाने नाचू लागले. डेबुजीला मुलगी झाल्याची बातमी पंचक्रोशीत फैलावताच, गोतावळ्या जमातवाल्यांच्या तोंडाला पाणी सुटले. आता काय! बाशाच्या दिवशी डेबुजीकडे मटण दारूचे पाट वाहणार! या आशेने जो तो आमंत्रणाची वाट पाहू लागला.


परटाच्या आयुष्यात तीन बळी.
ही एक म्हणच प्रचारात होती. गरीब असो वा कोणी असो, जन्म, लग्न नि मरतिकीच्या प्रसंगी बोकडाची कंदुरी आणि मनमुराद दारू जातगोतवाल्यांना दिल्याशिवाय चालत नसे. मोठ्ठा जातधर्मच होता तो. कर्ज काढून, भीक मागून हे देवकार्य करावेच लागे. न करील तो पडलाच वाळीत.

रूढीप्रमाणे हंबीररावाने बोकडाची कंदुरी नि दारूचा बेत ठरवला. त्याचा घरात खल सुरू होताना सखुबाई कुरकुरू लागली. तिला आपल्या नव-याचे मरणकालचे ते शब्द आठवू लागले. त्या सगळ्या दुर्दैवी घटनांचा चित्रपट तिच्या डोळ्यांपुढे भराभर सरकू लागला. डेबुजीच्या कानावर हा बेत जाताच त्याने तडाड नकार दिला. ``आजवर आपल्या घरात चुकूनसुद्धा जे आपण कधी केलं नाही, ते काय आज करणार? भले जातगोतवाले रागावले तर. प्रसंगाला आले का कुणी धावून आमच्या? आमचे आम्हालाच निपटावे लागले ना? बारशाला मटण दारू द्यावी, असं कुठच्या धर्मात सांगितलंय? जगावेगळा धर्म आहे हा. मला नाही तो पसंत. आपल्या घरात मटण दारू बंद. कायमची बंद. काही चांगलं गोडधोड करून घालू गोतावळ्यांना मेजवानी.’’


जातकुळीला बट्टा लावलात तुम्ही.
गोतावळी मंडळी जमली. पाने वाढली. पण दारूचा वास तर कुठेच येत नाही? हे काय? पानावर पाहतात तो बुंदीचे लाडू वाढलेले! एक पुढारी गरजले - ``काय हो हंबीरराव, हा काय जगावेगळा प्रकार? बारशाला बुंदीचे लाडू? मटण दारू नाही? जातगोताची रूढी मोडता? आम्हाला नाही परवडणार असला अधर्म. जातकुळीला बट्टा लावलात तुम्ही. चला उठा रे. कोण असले जेवण जेवतो?’’ बिचारा हंबीरराव तर सर्दच पडला. डेबुजी पुढे सरसावला. पुढारी हुज्जत घालायला उठले त्याच्याशी. सगळेजण रागाने तापले होते. त्यांचा आवाज चढला होता. दारू मटणाच्या आशेने आलेल्या लोकांची निराशा भयंकर असते. खेडूतांत असा प्रसंगी खूनही पडतात. अगदी शांतपणाने पण निश्चयाने डेबुजी एकेक शब्द बोलू लागला. ``बापहो, नीट ऐकून घ्या. तुम्ही म्हणता ती मटण दारूची रूढी धर्माची नाही. आपल्या अडाणीपणाची नि जिभलीच्या चोचल्याची आहे. आपले धर्मगुरू बामण. ते कधी मारतात का बकरा? पितात का दारू? बारशा लग्नाला नि मरतिकीच्या तेराव्यालासुद्धा ते गोडधोड पक्वान्नांच्याच जेवणावळी घालतात. त्यांना धर्म माहीत नाही, असं का म्हणणं आहे तुमचं?’’

पुढारी – बोकड मारला नाही, दारू पाजली नाही, तर मुले जगत नाहीत.

डेबुजी – कुणी सांगितलं राव तुम्हाला हे? तुमचं तुम्ही मनचंच ठरवलंय सगळं. मारवाडी, गुजराथी किती श्रीमंत असतात! खंडी दोखंडी बकरी मारण्याच्या ऐपतीचे असतात. त्यांनी कधी बोकडाची कंदुरी केली नाही. दारू पाजली नाही. म्हणून काय त्यांची मुलेबाळे जगली नाहीत? त्यांचा काय निर्वंश झाला? उलट कंदुरी दारूचे पाट वाहवणारे आपण पहा. काय आहे तुमची सगळ्यांची दशा? शेताच्या मातीत मर मर मरता, पण सकाळ गेली, संध्याकाळची पंचीत. या मटण दारूच्या पायी घरेदारे, शेतीवाड्या सावकरांच्या घरात नेऊन घातल्यात, तरी डोळे उघडत नाहीत. विचार करा मायबाप. भलभलत्या फंदाला धर्म समजून गरीब प्राण्यांची हत्या करू नका. जीव जन्माला आला का दुस-या एका जीवाची हत्या आणि कुणी मेला तरीही पुन्हा हत्याच! हा काय धर्म समजता? चला बसा पानांवर, चांगले गोडधोड पोटभर खा, आनंद करा नि घरोघर जा. मटण-दारूच्या व्यसनाने जमातीचे आजवर झाले तेवढे वाटोळे पुरे झाले. आता जरा माणसात येऊन माणुसकीने वागू या सगळे.

या शांत पण कट्टर निस्चयी बोलण्चा परिणाम चांगलाच झाला. एकालाही त्याचे म्हणणे खोडून काढता येई ना. सगळे गातोवळे मुकाट्याने जेवले. मुलीच्या बारशाची ही बुंदीच्या लाडूंची मेजवानी दापुरीच्या पंचक्रोशीत काय, पण हां हां म्हणता सगळीकडे फैलावली. वेळ प्रसंग पाहून लोकांच्या आचार विचारांना धक्का देण्याच्या कुशलतेतच समाज-सुधारकाची खरी शहामत असते. गाडगेबाबांच्या चरित्रातला हा पैलू आजही प्रखरतेने जनतेला दिसत असतो.

  •  लोकसेवेचा प्रारंभ

 शेतीवाडी धनत्तर पिकत आहे, गुराढोरांनी गोठा गजबजलेला आहे, चंद्रभानजीचा मुलगा आता वयात येऊन तोही हाताशी काम करीत आहे, भरपूरपैसा घरात येत आहे, समाजात मान्यता वाढती आहे, असा स्थितीतही डेबुजी लोकहिताची कामे स्वयंसेवकी वृत्तीने करू लागला. नदीकाठचे रस्ते पावसाळ्यात नादुरुस्त झाले का ते खणून कुदळून नीट करायला कुदळ पावडे घेऊन डेबुजी स्वतः काम करीत रहायचा. लोकांना प्रथम आश्चर्य वाटले. पण अखेर लाज वाटून तेही कामाला लागायचे. सार्वजनिक हिताची कामे सर्व जनांनी एकवटून केली पाहिजेत, हा धडा मिटल्या तोंडी त्याने गावक-यांना शिकवला. कोठे घाण-कचरा साचला का त्याने स्वतः जाऊन तो काढावा. कोणतेही काम करताना गाजावाजा नाही, लेक्चरबाजी नाही, काही नाही. वाईट दिसेल तेथे आपणहून चांगले करावे. त्यासाठी पदरमोडही करावी. हा खाक्या. कोणाचे काही अडले नडले का स्वतः जाऊन ते सावरावे. डेबुजीच्या या वृत्तीमुळे सारे लोक त्याला हा कुणीतरी देवाचा अवतार आहे असू मानू लागले.


डेबुजीची आत्यंतिक भूतदया
वाटेने जाताना जरा कुठे कुणी संकटात अडचणीत पडलेले दिसले का डेबुजी धावलाच त्याच्या मदतीला. म्हाता-या माणसाला लाकडाची गाठ फुटत नसली का याने ती फोडून द्यावी. ओझ्याखाली वाकलेल्या पोरवाल्या बाईचे ओझे आपल्य डोक्यावर घेऊन घरपोच न्यावे. चिखलात गाडी रुतली का ती जाऊन बाहेर काढावी. ना गर्व ना ताठा. व-हाडात गाडीच्या बैलांना पराण्या चोटण्याचा प्रघात फार असे. डेबुजीने ते पाहिले का कळवळत त्या शेतक-याला हटकायचा, ``बाप्पा हे काय चालवलंयस? त्या मुक्या जनावराला ना बोलता येत ना रडता ना बोंबलता. तुला कुणी ही अरी भोसकली तर कसे रे वाटंल तुला? मुक्या जनावरांचा असला छळ देवाघरी पाप आहे.’’ वारंवार प्रत्येक ठिकाणी डेबुजीने अशी कानउघडणी केल्यामुळे, त्या पराणीच्या प्रघाताला आळा बसत गेला.

बैल किंवा गाय म्हातारी झाल्यावर निरुपयोगी जनावर म्हणून खुशाल उघड्या बाजारात कसायाला विकण्याचा धंदा फार चाले. ``ज्या गोमातेने जन्मभर दूध देऊन तुमची नि तुमच्या पोराबाळांची पोटं भरली, तुमची हाडं सकस बलवान केली, शेतीला तगडे बैल दिले, शेणखत दिले, ती आता म्हातारी झाली म्हणून तुम्हाला पोसवत नाही काय? तिला कसायाला विकता आणि तिच्या हाडामासाचे टक्के घरात आणून पोटात घालता? काय तुम्ही माणसं का भुतं? तुम्हाला कुणी म्हातारपणी असंच विकलं अथवा घरातली नसती अडगळ म्हणून दिलं उकीरड्यावर टाकून, तर कसं बरं वाटंल मनाला?’’ असा उपदेश करून तो त्या गोविक्रीला आडवायचा. सामोपचाराने कुणी ऐकले नाही तर आपल्या सवंगड्याच्या मदतीने थेट बाजारात जावून सौदा मोडायचा.
जनावरांना रोग झालाका अडाणी शेतकरी औषधोपचाराऐवजी ठराविक भगताला बोलावून देव खेळवायचे. तो भगत चिक्कार दारू ढोसून अंगारे धुपारे करीत त्या ढोराभोवती आरोळ्या मारमारून धिंगाणा घालायचा. ढोर बचावले तर भगताचा देव खरा. मेले तर आपले नशीब. `लई विलाज केला’ म्हणत हळहळणा-यांना डेबुजी धिःक्काराने म्हणायचा - ``अरे रोग म्हंजे रोग. तो हा देवघुमव्या भगत काय कपाळ बरा करणार? तो काय ढोराचा डाक्टर आहे? तालुक्यात जावं, सरकारी डाक्टरांचं औषध आणावं. तसाच बिकट प्रसंग आला तर ढोराला गाडीत घालून तिथं न्यावं. म्हणजे रीतसर विलाज होईल. या देव धुपार नि दारूच्या बाटलीने काय होणार? झालंय का कधी जगात कुणाचं बरं यानी? ढोराबरोबर तुमचंही वाटोळं होईल असल्या फंदानं.’’


संसारातून समाजाकडे
पहिली मुलगी अलोका नंतर २-२- वर्षांच्या अंतराने कलावती मुलगी आणि मुद्गल नावाचा एक मुलगा झाला. मुलगा थोड्याच दिवसात वारला. घरातल्या या भानगडी आई सखुबाई निपटायची. डेबुजी तिकडे ढुंकूनही पहायचा नाही. शेती नि लोकसेवा यात तो अखंड गढलेला. जसजसे दिवस जात गेले तसतसा त्याच्या आचारविचारांना एक निराळाच गंभीरपणा येत चालला. संसार नि व्यवहाराचा गाडा चालवीत असतानाच, तो एका विशेष दृष्टिकोणातून सभोवारच्या समाज-जीवनाची सूक्ष्म पाहणी करण्यात गुंग झालेला दिसे.
संसाराचा हा मामुली गाडा हयातभर असाच हाकत राहायचे काय? जन्माला आल्यासारखे मला आणखी काही करता येण्यासारखे नाही काय? `आणखी काही’ म्हणजे तरी काय  त्याचे त्यालाही उमगे ना. माझे सर्व काही ठाकठीक चालले असले म्हणजे आजूबाजूला ही सब कुठ आल्बेल है असे थोडेच? जिकडे नजर टाकावी तिकडे दैन्य, दारिद्र्य, अज्ञान, सावकारांच्या तिजो-या फुगवून कष्टकरी, शेतकरी स्वतः अन्नवस्त्राला महाग. अन्याय, लाचलुचपत, पैसासाठी इमान विकणारे बाया बाप्ये, टीचभर स्वार्थासाठी दुस-याचे गळे कापणारे महाजन! अन्यायाला, खोट्यानाट्याला प्रतिकार करायचीही हिंमत कोणात नाही. अनेक घाणेरड्या रूढी, देवकार्यातले अत्याचार, गांजा-दारूचा भरंसाट फैलावा, देवधर्माच्या नावावर हज्जारो पशूंची हत्या गावोगाव राजरोस चाललेली. कोणीच या पापांच्या परवडीला थोपवीत नाही. मला काही करता येईल का? एकटा तडफडणारा जीव मी! पायात संसाराची बेडी भक्कम खळाळत आहे. काहीतरी केलं पाहिजे खरं. हरकत नाही तेवढ्यासाठी जिवाची हवी ती किंमत द्यावी लागली तरी. प्राण खर्ची घालावे, उघड्या डोळ्यांनी संसाराला आग लावावी, पण समाजातली ही शेकडो पातके खरचटून नाहीशी करावी. साधेल मला हे? कोण मला मार्ग दाखवील? या नि असल्या विचारांनी डेबुजी रात्रंदिवस बहरलेला असे.

  •  कोण बरे ती विचित्र विभूती?

मार्गशीर्षाचा महिना, खरीब नि रब्बीची पिके भरघोस डुलत होती. पाखरे हुसकावण्यासाठी डेबुजी मचाणीवर उभा राहून जोरदार हारळ्या मारीत असताना, भर दोन प्रहरच्या रखरखीत उन्हात दूर समोरून एक विचित्र व्यक्ती खैरी गावाच्या बाजूने हळूहळू चालत येताना त्याला दिसली. धिप्पाड बांधा, दणकट देहयष्टी. चमकती अंगकांती, दाढीमिशा जटाभार वाढलेला. अंगावर लक्तराची फक्त एक लंगोटी. अनवाणी चालत शेतातली ज्वारीची कच्ची कणसे खातखात स्वारी आपल्याच तंद्रीत रंगलेली आस्तेआस्ते जवळ येताना दिसली. साधूसंतांचा डेबुजीला आधीच मोठा आपुलकीचा कळवळा.
ती विभूती माचीजवळ येत आहेशी दिसताच डेबुजीने खाली उडी मारली. दोन हात जोडून सामोरा गेला नि साष्टांग प्रणिपात घातला. त्या विभूतीने दोन हात उंचावून आशीर्वाद दिला. दोघांची नजरानजर झाली. डोळ्यांना डोळे भिडले. तेवढ्यातच परस्परांच्या हृत्भावनेची काय गूढ देवघेव झाली, सांगता येत नाही आणि गाडगेबाबाही आज सांगत नाहीत. ``महाराज, आपल्याला काय हवे?’’ असे डेबुजीने विचारताच त्या विभूतीने हासण्याचा खोकाट केला नि म्हटले - ``कछभी नही. हमारे पास सब कुछ है. तू क्या मंगता है? मै दे सकता हूं. मंगता है कुछ? चल हमारे साथ. आता है?’’
मंत्रमुग्धाप्रमाणे डेबुजी त्याच्यामागे यंत्रासारखा आपोआप जाऊ लागला. नदीच्या काठावर गेल्यावर, महाराजांनी थोडे भोजन करावे, अशी डेबुजीने प्रार्थना केली. ``ठीक, ठीक, तेरी इच्छा हो तो लाव, लाव सामान.’’ डेबुजी धावतच खैरी गावात गेला. कणिक, गूळ, साखर, तिकट, मीठ, तेल, तूप आणि एक कढई घेऊन आला. त्या विभूतीने ते सर्व पदार्थ एकत्र कालवून तो गोळा तेलात तळून काढला. ``जा आता, ही भांडी ज्याची त्याला नेऊन दे.’’ म्हणून सांगितले. डेबुजी गेला. परत आल्यावर विभूती भोजन उरकून त्याची वाट पहातच होती. थोडा प्रसाद ठेवला होता तो डेबुजीने ग्रहण केला. नंतर दोघे दापुरी स्मशानातल्या शिवलिंगाच्या ओट्यावर जाऊन बसले. सबंध रात्रभर तेथेच राहिले. काय भाषणे झाली, कसले हृद्गत चर्चिले, याचा थांगपत्ता लागत नाही. बाबाही तो आज लागू देत नाहीत. कोणी खोचून विचारले तर ``छे, असी कोणी विभूती मला भेटलीच नाही’’ असे धडकावून सांगून मोकळे होतात.


डेबीदास कहां है?
सबंध रात्र त्या विभूतीच्या सानिध्यात काढून दुसरे दिवशी १२ वाजता डेबुजी घरी परत आला. जेवण होताच जरूरीचे काम निघाले. म्हणून बैलगाडी जोडून तसाच दर्यापूरला निघून गेला. त्याच दिवशी मध्यरात्रीच्या सुमाराला सारे दापुरी गाव डाराडूर झोपी गेले असताना, तो साधू ``डेबीदास... डेबीदास...डेबीदास’’ अशा मोठमोठ्याने हाका मारीत गावात फिरू लागला. लोक घाबरून बाहेर आले. पहातात तो एक जटाधारी नंगा दांडगा गोसावी नुसता डेबीदास... डेबीदास आरोळ्या मारीत आहे. पाटील आले. चौकशी केली. ``कहां है डेबीदास?’’ तो गोसावी विचारू लागला. आपल्या गावात कोण कुठचा डेबीदास? सगळे ढोंग आहे हे. हा दरोडेखोरांचा सोंगाड्या सुगावेदार असावा. द्या हुसकावून चोराला. पाटलाने महार जागल्यांना बोलावून त्याला सीमापार हुसकावून दिले.


बाबानो, काय केलंत हे?
दुस-या दिवशी सकाळी डेबुजी दर्यापुराहून परत येताच त्याला आदले रात्रीची ही हकिकत समजली. तो मटकन खाली बसला नि फुंदफुंदून रडू लागला. सखूबाईने आजा आजीने खूप खोदखोदून विचारले. शेजारापाजारी जमा झाले. बराच वेळ तो बोले ना. अखेर, ``बाबानो, डेबीदास तो मीच. माझाच शोध करीत तो आला होता. हुसकावलात त्याला? काय केलंत हे?’’ असा त्याने खुलासा करताच सगळ्यांनाच वाईट वाटले.
डेबुजी तसा उठला. स्मशानाजवळच्या महादेवाच्या ओट्यावर नि आसपास खूप तपास केला. खैरी गावात शोध घेतला. आजूबाजूची पाच पन्नास गावे तो सारखा आठवडाभर विचारपूस करीत भटकला. असा कुणी माणूस इकडे आला नाही नि आम्ही कोणी पाहिलाही नाही, असेच जो तो सांगे.

  • गाडीचा सांधा बदलला.

या घटनेनंतर डेबुजीच्या राहणीत नि वृत्तीत एकदम बदल झाला. रोजची ठरावीक कामे यंत्रासारखी करीत असताना तो कसल्या तरी गूढ चिंतनात गुंगलेला असायचा. पौषाचा महिना. दर रविवारी ऋणमोचन येथे या महिन्यात एक छोटीशी यात्रा भरत असे. दरसालच्या हंबीररावच्या घराण्याच्या रिवाजाप्रमाणे पौष व. ८ शके १८२७ रविवार (ता. २९ जानेवारी सन १९०५ रोजी) डेबुजी सहकुटुंब सहपरिवार ऋणमोचनला गेला.
यानंतर त्याची मुग्धावस्था वाढतच गेली. भावी आचाराची काहीतरी निश्चित रूपरेषा त्याने मनोमन आखली. चर्येवर गंभीर महासागराची शांती आणि नजरेत कठोर निश्चयाची चमक झळकू लागली. एकदम घडलेल्या या फरकाने घरातली मंडळी चरकली खरी, पण खुलासा काढण्याचे धैर्य कोणालाही होई ना.


चालू काळचा सिद्धार्थ
बुधवात ता. १ फेब्रुवारी सन १९०५, पौष व. १२ प्रदोष शके १८२७ पहाटे ३ वाजता डेबुजीच्या त्यालोकोत्तर जीवन-क्रांतीचा क्षण आला. रात्रभर बिछान्यात तो तळमळत जागाच होता. निश्चयाच्या उसाळीने एकदम तो उठला. मातोश्री सखूबाई निजली होती तेथे हळूच गेला. डोळे भरून त्या जन्मदात्या देवतेचे दर्शन घेतले. तिच्या पायांजवळ जमिनीला डोके टेकून नमस्कार केला. बाहेर येऊन आंगावरचे सर्व कपडे काढून ठेवले. नेसूचे एक फाटके धोतर पांघरून तो आंगणात आला. तेथे पडलेले एक फुटके मडके नि तोडलेल्या झाडाची एक वेडीवाकडी काठी हातात घेऊन, मागे न पाहता, सर्वस्वाचा त्याग करून झपाट्याने पार कोठच्या कोठे निघून गेला. पहाटेच्या साखरझोपेच्या गुंगीतच सगळेजण असल्यामुळे, त्याच्या या क्रांतिकारक प्रयाणाचा घरातल्या दारातल्या कोणालाही थांगपत्ता लागला नाही.
आजवर अनेकांनी संसारत्याग केलेला आहे. त्याची कारणे अठराविश्वे दारिद्र्य, कर्जाचा बुजबुजाट, मुलाबाळांचे मृत्यू, कर्कशा किंवा बेमान पत्नीशी पडलेली गाठ, कुटुंबात नि समाजात नित्य होणारी हेळणा, तिटकारा, बेकारी यांपैकी एक दोन हमखास असतात. पण डेबुजीच्या बाबतीत यातले कही कारण नव्हते. प्रामाणिक कष्ट मेहनत करून आजोबाची शेतीवाडी कर्जाच्या पाशातून मुक्त करून त्याने सुधारली होती. घरात धनधान्य, दूधदुभत्याचा सुकाळ होता. चारचौघात प्रतिष्ठा होती. घरात आज्ञाधारक पत्नी, दोन गोजीरवाण्या खेळत्या बागडत्या मुली. नातवंडांचे कौतुक करणारे आई, आजा, आजी हयात. गाई-बैल-वासरांनी गोठा गजबजलेला. मायेचा हात पाठीवर फिरवणारी आई पाठीशी सदानकदा उभी.
असा भरभराटीच्या संसाराचा डेबुजीने केलेला त्याग म्हणजे कपिलवस्तू येथील सिद्धार्थ राजपुत्राने निर्वाणाचा शोध लावण्यासाठी केलेल्या प्राचीन राजवैभवाच्या त्यागाच्या अजरामर इतिहासाची पुनरावृत्तीच म्हटली पाहिजे.
घरात रडारड झाली. गावकरी शोधासाठी दाहीदिशांना गेले. काही तपास लागत नाही बुवा. सगळ्यांचा एकच जबाब आला.

  •  नव मानव-धर्माच्या शोधात

संसारत्यागाच्या मागे काय होते?

मामुली साधू संत मोक्षासाठी संसारत्यागासाठी भगतगणांना शिकवण देतात. डेबूजीला हे मोक्ष मुक्तीचे आणि हरिनाम – स्मरणाने भवसागर तरून जाण्याचे आध्यात्मिक खूळ कधीच पटले नाही. जिवंत असता उपाशी मरा नि स्वर्गातल्या अमृतासाठी जवळ असेल नसेल ते दान करा, ही संताळी विचारसरणीही त्याने जुमानली नाही. आजही जुमानीत नाही. मग तो संसाराचा त्याग करून बाहेर का पडला? केवळ स्वतःच्या उद्धारासाठी तळमळत नव्हता. स्वतःच्या चिमुकल्या टीचभर संसारातल्या आधीव्याधींची कोडी त्याला सोडवायची नव्हती. ज्या मागासलेल्या खेडूती समाजात त्याचा जन्म झाला, त्यांच्या देवधर्माच्या भावनांवर नि कल्पनांवर त्याचा विश्वास नव्हता. धर्माच्या नावाखाली रूढ असलेल्या अनेक दुष्ट आणि व्यसनी चालीरितींच्या विरुद्ध त्याने बंडे केली होती आणि जातगोतवाल्यांचा रोषही पत्करला होता. देवाच्या नुसत्या नामस्मरणापेक्षा किंवा आराधानेपेक्षा मनगट घासून कष्टमेहनत केल्यानेच शेतीच्या मातीतून सोने काढता येते आणि शुद्ध आचारविचारांनी निर्मळ राहिल्यानेच व्यवहारातल्या दुष्ट नि लोभी माणसांच्या कारस्थानांना चाणाक्षपणे नि धीटपणाने पायबंध  ठोकता येतो, हे त्याने स्वानुभवाने इतरांना पटवूनही दिले होते. भजनाचा त्याला नाद होता आणि ईश्वरावर त्याचा भरवसाही होता. तरीही त्याची भक्ति आंधळी नव्हती. डोळस होती. वयाच्या २८ वर्षेपर्यंत जूबाजूच्य सर्व थरातील समाजांच्या सामिक नि धार्मिक जिण्याचे त्याने सूक्ष्म निरीक्षण केलेले होते. शेतकरी कामकरी वगैरे मागासलेले समाज, हाडमोडी कष्ट करूनसुद्धा कमालीच्या दारिद्र्यात किड्यामंग्यांच्या जिण्याने जगत आहेत. सावकारादि वरच्या थरातले वरचढ लोक त्यांना यंत्रासारखे कामाला जुंपून, त्यांच्या श्रमाची फळे आपण मटकावीत आहेत. श्रमजीवी लोकांना तर त्यांच्या भिकार जीवनाची ना चिळस ना लाज. वरचढांच्या लाथा खाव्या, मरे मरेतो कष्ट करून त्यांच्या तिजो-या भराव्या, आपल्या संसाराच्या मातीने त्यांची घरेदारे नि वाडे लिंपावे-शृंगारावे, हाच आपला धर्म, हेच आपले जिणे, यापेक्षा आणखी ज्ञान त्यांना काही नाही. केवळ पशुवृत्ती! वरच्या खालच्या एकंदर समाजाची दैनंदिन स्थिति पाहिली तर माणसेच माणुसकीला पारखी झालेली. धर्माचे आचरण पाहिले तर तेथेही भूतदयेला थारा नाही. देवाला दारू, माणसांना दारू, रेडे बोकडांच्या कंदुरीशिवाय देवाची शांति नाही आणि धर्माची भूक भागत नाही. भजनकीर्तनाचा थाट केवळ मनाच्या विरंगुळ्यासाठी. संतांचे बोल वतनदारीसाठी. संगीत सुराने वरच्यावर भिरकवायचे. अंतःकरणाचा नि त्यांचा जणू काय संबंधच नाही. सहानुभूती सहकार नि सेवा या भावनाच हद्दपार झालेल्या. ज्याला जिथे मऊ लागेल तिथे कोपराने खणावे नि स्वार्थ साधावा. आजवरच्या साधूसंतांनी माणसांना माणुसकी शिकवण्यासाठी जान जान पछाडली. कोटिकोटि अभंगरचना केली. पंढरीच्या वा-यांचा परिपाठ चालवला. विठ्ठलभक्तीचे लोण आब्राह्मण चांडाळांच्या झोपडी झोपडीपर्यंत नेऊन भिडवले. टाळ माळ चाळ एवढा वरवरचा देखावा झुगारता आला नाही. या परिस्थितीला आरपार पालटण्यासाठी काय केले पाहिजे? मला काय करता येईल? या मुद्याचाच डेबूजी आपल्या मनाशी बरीच वर्षे खल करीत होता.


षड्रिपूंचे दमन कसे केले?
सन १९०५ साली घरातून बाहेर पडल्यापासून तो सन १९१७ या बारा वर्षांच्या साधकावस्थेत डेबूजीने आपल्या देहमनाचा चोळामोळा करून काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षड्रिपूंचे गाळीव वस्त्रगाळ पीठ कसकसे केले. त्याच्या हजारावर गोष्टी सांगता येतील. या संक्षिप्त कथानकात केवळ त्रोटक संदर्भावरच भागवणे जरूर आहे.

घरातून बाहेर पडल्यावर डेबूजी २-३दिवस सारखा चालतच होता. कोठे जायचे नि काय करायचे याचा काही विधनिषेध नसल्यामुळे, पाय नेतील तिकडे, एवढाच कार्यक्रम. दापुरीपासून ४०-४५ मैलावरच्या एका गावी सायंकाळी गावाबाहेरच्या मारुतीच्या देवळात विसाव्यासाठी जाऊन बसतो न बसतो तोच हा कुणीतरी दरोडेखारंचा टेहळ्या असावा, अशा समजुतीने गावक-यानी नि पाटलानी उपाशीतापाशी गावाबाहेर हुसकावून दिला.

पौषाचा महिना. व-हाडातली थंडी, माणूस जागच्या जागी हातपाय काकडून कोलमडून पडायचे. किर्र अंधारी रात्र. काट्याकुट्यातून पाय नेतील तसा बिचारा डेबूजी वाट काटीत चालला. वाटेत त्याला एक खळखळणारा ओढा लागला. त्याने हात, पाय, तोंड धुतले. रिकाम्या पोटात अन्नाच्या ऐवजी पाणी रिचवले. थोडी हुशारी येताच शेजारच्या शेतातली ज्वारीची चार पाच कणसे तशीच कच्ची खाऊन वर पाणी प्याला. विसाव्यासाठी ओढ्याच्या काठीच – मातीवर झोपेसाठी अंग टाकले. किर्र जंगल. आजूबाजूला श्वापदांचा सुळसुळाट. पण काही नाही. खुशाल तो डाराडूर तिथे झोपी गेला.

झुंजुमुंजू होताच उठावे. दिवसा आढळतील त्या दहा पाच गावी भ्रमण करावे, एकाद्या घरी भाकरी तुकडा मागावा, मिळाल्यास खावा, नकार दिल्यास आणखी काही तरी मागावे, लोकांनी रागवावे, शिव्या द्याव्या, मारायलाही उठावे. हुसकावून द्यावे. यांच्या शांत वृत्तीवर लवभरसुद्धा परिणाम व्हायचा नाही. हुसकावले का पुढे जावे. या रीतीने गावांमागे गावे नि खेड्यांमागे खेडी धुंडाळीत डेबूजी कोठेकोठे भटकंती करीत जाई त्याचा त्यालाच ठावठिकाणा उमजे ना.

दिवसामागून दिवस गेले. दाढीचे नि डोक्याचे केस वाढले. जटा झाल्या त्यांच्या. अंगावर चिंध्या बाजल्या. नदी ओढा लागला का तेथे आंघोळ करावी नि त्याच धुतलेल्या चिंध्या ओल्याच अंगावर पांघरून पुढे चालू लागावे. अशा विचित्र थाटाने ही स्वारी एकाद्या गावात घुसली का गावची ओढाळ कुतरडी भुंकभुकून आधी त्याचे स्वागत करायची. मग गावची उनाड पोरे त्याच्या मागे ``वेडा आला रे वेडा आला’’ असा कल्होळ करीत मागे लागायची. दगड मारायची. हा सर्व उपसर्ग शांत चित्ताने हासतमुखाने तो सहन करायचा. त्याचे पाय सारखे चालतच असायचे. विसाव्यासाठी गावात त्याला कोणी थाराच द्यायचे नाहीत. अर्थात विसाव्यासाठी सदानकदा किर्र निर्जन अरण्याचाच आसरा घ्यावा लागे.

  •  वनवासातही लोकसेवा

पाय नेतील तिकडे जायचे. हव्या त्या घरी भाकर मागायची. मिळेल तर कायची. नाहीतर पुढे जायचे. असल्या क्रमात जागोजाग कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला पण होऊन मदत करायला धावायचे. हा एक धर्म डेबूजी कसोशीने पाळीत असे. सामानाने लादलेला  खटारा चिखलात रुतून पडलेला दिसला का डेबूजी तेथे धावत जाऊन तो बाहेर काढायला गाडीवानाला मदत करायचा. त्याने कोण, कुठचा, काय पाहिजे विचारले तर नुसते हसावे, दोन हातांनी त्याला नमस्कार करावा आणि मुकाटतोंडी आल्या वाटेला लागावे. हा खाक्या. आश्चर्याने तो गाडीवान पहातच रहायचा. देवच माझ्या धावण्याला पावला अशा समजुतीने तोही गाडी हाकीत निघून जायचा.

व-हाडचा सूर्य माध्यान्हीला माथ्यावर कडाडला आहे. पाय पोळताहेत. एकादी मजूर बाई पाठीला पोर बांधून डोईवर लाकडाचा किंवा कडब्याचा मानमोड्या बोजा घेऊन चाललेली दिसली का डेबूजी तिच्याजवळ जायचा. दोन हात जोडून म्हणायचा : ``माय माझी. दे तुझं ओझं माझ्या डोक्यावर. चल मी तुझ्या मुकामावर नेऊन पोचवतो.’’

विचित्र वेषाचा हा असामी पाहून ती बाई प्रथम भेदरायची. पण डेबूजी ओझ्याला हात घालायचा, स्वतःच्या डोक्यावर घेऊन घेऊन चालू लागायचा आणि तिला मुकामावर पोचवून, एक शब्द न बोलता आपल्या वाटेने निघून जायचा. ती बाई आचंब्यात पहातच रहायची. आजूबाजूचे गावकरीसुद्धा म्हणायचे, ``कोण असावा हा माणूस? आपल्या झिंगरीचे ओझे मैलभर वाहून आणतो आणि भाकरी तुकडाही न मागता खुशाल आपल्या वाटेने जातो ? कुणी देवमाणूस किंवा साधू असावा हा!’’

खेडेगावातल्या सार्वजनिक विहिरी म्हणजे घाणीची आगरे. आजूबाजूला घाण पाण्याचे ओघळ वहायचे आणि ढोरे तेच पाणी प्यायची. डेबूजीने हे पाहिले म्हणजे तो कळवळायचा. ``मला पोहरा दोरी द्या हो मायबाप. मी पाणी काढून ढोरांना पाजतो.’’ अशी त्याने विनंती करून पोहरा दोरा मिळवावा आणि विहिरीतून स्वच्छ पाणी काढून त्याने सगळ्या ढोरांना पाजावे. विहिरीभवतालची घाणेरडी जागा फावडे घेऊन स्वच्छ करावी. पोहरा, दोरा, फावडे ज्याच्या त्याच्या घरी पावते करावे आणि आपण पोटभर पाणी पिऊन पार दूर निघून जावे. लोक आचंब्यात पडायचे. हा कोण चिंध्याबुवा आला, त्याने जागा स्वच्छ करून ढोरांना पाणी काय पाजले नि मुकाट्याने निघूनही गेला. कोण असावा हा?

ज्वारी-कापणीचा हंगाम चालू. स्वारी अशा शेतांजवळून चालली असताना थांबायची. मालकाजवळ `एक पाचुंदा द्या हो बाप्पा’ म्हणायची. ``तुझ्या बापाने ठेवलाय पाचुंदा.’’ मालक गुरगुरायचा. (पाचुंदा म्हणजे पाच पेंढ्या) `बरं तर दोन पाचुंदे द्या.’ मालक रागवायचा. चल चालता हो म्हणून धमकावयाचा. कैक वेळा मारायला अंगावरही धावायचा. जसे कोठे काही झालेच नाही अशा चर्येने डेबूजी  तेथेच बसून रहायचा. मजूर कापणीत गुंगलेले. काम जोरात चालू. एकादी बाई किंवा बुवा घामाघूम थकलेली पाहून, डेबूजी त्याच्याजवळ विळा मागायचा. खुषीने दिला तर ठीक, नाहीतर घ्यायचा हिसकावून. ``माजी माय, जरा विसावा घे. मी करतो तुझं काम. रागावतेस कशाला?’’ असे म्हणून खसाखस कापणी करीत सुटायचा. इतर मजुरांच्या पुढे जाऊन त्यांच्यापेक्षा थोड्या वेळात दुप्पट तिप्पट कापणी करताना पाहून मजूर नि मालक डेबूजीकडे पहातच रहायचे. सारे मजूर दुपारच्या जेवणासाठी थांबले तरी याच्या कापणीचा सपाटा तडाखेबंद चालूच. या उप-या प्रवाशी पाहुण्याने भलताच हात चालवून सगळ्यांपेक्षा कापणीत तो पार पुढे गेलेला पहाताच मजूर नि मालक त्याला भाकरी खायला बोलावीत. ठरवलेले काम रेटले का डेबूजी ज्याचा विळा त्याला परत देऊन, मिटल्या तोंडी पार निघून जायचा. सारेजण त्या विचित्र माणसाच्या विलक्षण करणीचे कौतुक करीत त्याच्या वाटेकडे पहातच रहायचे. इथे आला काय, झपाटेबंद कापणी केली काय आणि भाकर देत असता ती नाकारून निघून गेला काय! हा काय कुणी साधू असावा का देवच असावा? एकाद्याने पाच पेंढ्या दिल्याच तर त्या घ्यायच्या आणि वाटेत कुठे थकले भागलेले किंना उपाशी पडलेले ढोर आढळले तर त्याला एक पेंढी खायला घालायची, त्याला गोंजारायचे नि पुढे जायचे. ज्वारी वहाण्याचे काम कुठे चालू असले का डेबूजीने असेच आपण मजुरात घुसून पेंढ्या गोळा करण्याचे आणि गाडीवर त्या बांधण्याचे काम करीत सुटावे. कोठे औत चालू असतील तर तेथे जावे आणि तास दोन तास स्वतः औत चालवून, घाम पुशीत पुशीत शेतक-याला नमस्कार करून निघून जावे. कोण कुठला प्रश्नाला जबाबच द्यायचा नाही. काम करावयाचे नि पसार व्हायचे. मनात आले तर दिली भाकर खायची, नाहीतर देत असतानाही पाठ फिरवून वाट धरायची. जागोजाग हे प्रकार होत असल्याच्या वार्ता खेड्यापाड्यांतून पसल्या आणि पुण्यावानाच्या शेतात देव येऊन कापणी मळणी करतो. असल्या भुमका सगळीकडे ऐकू येऊ लागल्या. ज्यांना अनुभव आले होते. त्यांनी तिखटमीठ लावून त्या कथा सांगितल्यामुळे तर त्या विचित्र देवाच्या येण्याजाण्यावर लोक डोळ्यात तेल घालून वाट पाहू लागले.


अचाट निर्भयतेची कमावणी.
एकदा स्वारी अशीच आपल्या तंद्रीत रंगलेली वाटचाल करीत असता एकदम मेघांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, तुफानी वा-याचा सोसाटा चालू झाला. रात्रीची वेळ. जिकडे पहावे तिकडे गुडुप अंधार. इतक्यात मुसळधार पाऊस कोसळू लागला. वाटेत गुडघा गुडघा पाणी वाहू लागले. ओढे नाले खळखळू लागले. नदीचाही प्रवाह नि वेग वाढला, पुढे पाऊल टाकायची सोय नाही. कुठे जायचे आता? फिरस्ता डेबूजी तसाच बिनदिक्कत चालत होता. अखेर वारा नि पाऊस यांच्या झुंबडीत टिकाव लागणार नाही, अशा समजुतीने नदीकाठच्या एका जुनाट निंबाच्या झाडाखाली निवा-यासाठी थांबला. कसचे काय नि कसचे काय! वा-याचा जो एक तडाक्याचा झोत आला, त्यासरशी ते प्रचंड झाड कडाडले आणि मुळासकट धाडदिशी जमिनीवर कोसळले. डेबूजी चटकन बाजूला सरला म्हणऊन ठीक झाले. ज्याचा आसरा घ्यायला तो गेला, तोच कोसळून जमीनदोस्त झाला. आता पुढे काय? कडाडणा-या विजांच्या प्रकाशात तसाच मार्ग काढीत काढीत तो एका टेकडीवर गेला. वारा नि पाऊस यांची झुंज चालूच होती. मध्यरात्रीच्या सुमाराला ते तुफान थंडावले. डेबूजी नखशिखांत चिंब भिजला. टेकडीवरच्या एका मोठ्या धोंड्यावर बसून त्याने सारी रात्र जागून काढली. अंगावरच्या भिजलेल्या चिंध्या अंगावरच वाळल्या. पहाट होताच स्वारीचे पाऊल पायपिटीसाठी लागले चालायला. बारा वर्षांच्या साधनावस्थेत गाडगे बाबांनी असले शेकडो प्रसंग अनुभवलेले आहेत. थंडी, वारा, पाऊस, कडाक्याचे ऊन्ह, तुफान वावटळी, रानातल्या वणव्यांची आग, एकूणेक प्रसंगांत त्यांनी देहाची आसक्ती कसोटीच्या सहाणेवर घासून बोथट पाडली. मनाची शांती अचल राखली. काम त्यांनी जाळलाच होता. पण क्रोध, लोभ, मोह, मत्सर, मदादि विकारांचेही त्यांचे दमनकार्य अखंड चालूच होते. इतकेच काय पण नेहमीच अरण्यात वसतीचे प्रसंग असल्यामुळे, सर्प, विंचू, इंगळ्या, वाघ, कोल्ही, लांडगे या क्रूर श्वापदांचेही भय त्यांनी गिळून टाकले होते. निर्जन रानावनात मन मानेल तेथे तो गाढ झोपी जाई. आसपास जंगली श्वापदे येवोत जावोत ओरडोत वेढा देऊन बसोत, काय वाटेल ते करोत, त्यांची त्याला पर्वा कशी ती कधी वाटलीच नाही. रातबेरात सुद्धा तो जंगलांतून प्रवास करीत असे. हव्या त्या ओसाड जागेत विसावा घेई. थंडीच्या दिवसांत स्मशानात पेटलेल्या सरणाजवळ बसूनही शेक घेई. खाण्यापिण्याची तर पर्वाच नसे. मिळेल ते शिळेपाके कच्चे-पक्के खुशाल चवीने खाई नि ते त्याला पचतही असे. अनवाणी चालण्याने पायतळांना भोके पडली तरी त्याचीही खिसगणती त्याला नसे.

  •  थोडे घरात डोकावू या.

करता सवरता डेबूजी परागंदा झाल्यावर बळिरामजीने सगळ्या कामांचा उरक पत्करला, तरी आजा, आजी, आई दुःखात झुरतच होती. नातावळ्या गोतावळ्यांनी यावे, दोन दिवस रहावे, समाधान करावे नि जावे. अखेर हंबीरराव आणि पाठोपाठ २-३ महिन्यांनी रायजाबाई देवलोकी गेली. आता मात्र सखुबाईला आकाश फाटल्यासारखे झाले. निराशेच्या काळ्या ढगारालाही आशेची चंदेरी शलाका असते म्हणतात. डेबूजी गेला तेव्हा सौ. कुंताबाई ३ महिन्यांची गरोदर होती. रायजाबाईच्या मृत्यूनंतर थोड्याच दिवसांनी बाळंत होऊन तिला मुलगा झाला. आईबापाचा मृत्यू आणि पाठोपाठ नातवाचा जन्म. जन्म-मृत्यूची ही पाठशिवणी सखुबाईच्या चांगलीच परिचयाची होती. मुलाचे नाव गोविंद ठेवून, सखुबाईने जवळचे काही गोतावळे जमवून त्याचे बारसे केले.


अखेर तपास लागला.
एक दिवस मूर्तिजापूरला कामाला गेलेला बळिरामजी घरी आला आणि टांगा न सोडताच एकदम मोठ्याने ओरडला, ``आत्या, डेबूदादाचा तपास लागला. तो साधू झालाय नि माहूर भागात फिरताना त्याला आपल्या एका वट्टीने पाहिले.’’ चला, पत्ता लागला आता शोध करून त्याला घरी परत आणायची खटपटच तेवढी करायची. माहूर भागातल्या जातगोतवाल्यांना इषा-याचे निरोप रवाना झाले. वार्षिक ऋणमोचनाची पौषी यात्राही जवळ आली. डेबूजी कुठेही असला तरी ही यात्रा चुकवणार नाही ही सगळ्यांची खात्री.


ऋणमोचनचा रविवा-या शंकर.
दापुरीपासून ऋणमोचन अवघ्या ३ मैलांवर. पौष महिन्यातल्या दर रविवारी तेथे यात्रा जमत असे. पूर्वी ती लहान असे. उगाच १०-१२ खेडूतांचे खटारे यायचे. गाडगेबाबांच्या माहात्म्याने मात्र गेली अनेक वर्षे त्या यात्रेला महात्सवाचे रूप आलेले आहे. एखाद्या पौषात ५ रविवार आले का त्या शेवटच्या रविवाराच्या देवदर्शनाचा महिमा मोठा. शंकराचा आवडता वार सोमवार. पण या ऋणमोचनच्या मुद्गलेश्वर महादेवाची यात्रा मात्र रविवाची. हे काय त्रांगडे आहे समजत नाही.

बहुतेक यात्रेकरू सर्व जमातीचे. रविवारी यात्रेला आले का प्रत्येकाने पूर्णा नदीत बुचकळी मारायची आणि ओलेत्याने शंकराला बेलपत्री वहायची, असा रिवाज. या शंकराचे नाव मुद्गलेश्वर. म्हणूनच डेबूजीच्या अल्पायु मुलाचे नाव त्याने मुद्गल असे ठेवले होते.


चुकणार नाही, येईलच तो.
पौष उजाडला नि रविवारही आला. सखुबाई बळिरामजी वगैरे मंडळी मोठ्या पहाटेलाच ऋणमोचनला येऊन बसली. पण डेबूजी कोठेच आढळे ना! पूर्णा ऊर्फ पयोष्णा नदीचे पात्र ऋणमोचनजवळ फार रुंद नि खोल. काठच्या जमिनीचा चढाव तीन पुरुष उंचीचा. मोठा कठीण नि निसरड्या चिकण्या मातीचा. स्नान करून ओलेत्याने वर येणारी मंडळी हटकून पाय घसरून पडायची. दरसालची ही कटकट.

पण यंदा नवल वर्तले. कोणीतरी एक चिंध्याधारी जटाधारी माणूस फावडे, टोपली घेऊन ओल्या मातीवर सुकी माती भराभर टाकीत सकाळपासून सारखा झगडतोय. लोकांच्या वर्दळीने चढावाचा काठ भिजला का पडलीच याची सु्क्या मातीची टोपली त्यावर. कोण बुवा यंदा हा महात्मा आला ऋणमोचनला?

निरखून पाहतात तो कोण? अहो, हा आपला डेबूजी वट्टी! जटा-दाढी-मिशांचे जंगल अमाप वाढलेले, अंगावर फाटक्या चिंध्या, घामाच्या धारा निथळताहेत. आणि आजूबाजूला किंचितही न पाहता. टोपल्या भरभरून सुकी माती आणून टाकण्याच्या कामात एकतान रंगला आहे. पिल्लू हरवलेल्या वाघिणीच्या उसाळीने सखुबाईने ``डेsबू..... माझा डेsबू’’... अशी किंकाळी मारून त्याच्याकडे झाप टाकली.


ऐन कसोटीचा प्रसंग हाच.
कोणालाही नकळत घरदार सोडून देशोधडीला निघून जाण्याने संसाराचा मोहपाश तोडला जातोच, असे थोडेच आहे? मोहपाशापासून लांब दूर असे तोवर ही भावना किंवा कल्पना ठीक असते. निर्जन अरण्यातल्या वस्तीत ब्रह्मचर्याची शेखी कोणीही मिरवावी. पण सौंदर्यवान तरुणींच्या मेळाव्यात खेळीमेळीने राहून ब्रह्मचर्य टिकवील. त्याचीच खरी शहामत आणि तोच अखेर कसोटीला उतरणार.

देह-मनाची मुंडी मुरगाळून कामक्रोधादि षड्रिपूंचे दमन करण्याच डेबूजीने एक वर्ष वनवासात घालवले. पण या घडीला त्याच्याभोवती जन्मदाती आई, शेजेची बायको, लडिवाळपणे हाताखांद्यावर खेळवलेल्या दोन गोंडस लहान मुली आणि गृहत्यागानंतर झालेला वंशाचा आधार असा तो छोटा पुत्र गोविंद, शिवाय गावोगावचे सारे जिवाभावाचे सवंगडी यांचा लोखंडी साखळदंडासारखा वेढा पडलेला. आई रडत ओरडत आहे. बायकोच्या डोळ्यांतून आसवांचे पाट वहात आहेत. मामी, मामेभाऊ, स्नेही-सोबती यांच्या विनवण्या चालू आहेत. डेबूजी निश्चल वृत्तीने सगळ्यांकडे निर्विकार मुद्रेने पहात आहे. फत्तरावर घणाचा घाव घातला तर एकादी कपरी तरी उडते. पण येथे काही नाही!

  •  मी मेलो असतो, तर तू काय केले असतेस?

एवढेच आईला बोलून डेबूजी उठला. आता तो जाणार निघून, असे पहाताच सखुबाईने हंबरडा फोडला. ``अग, एवढी ओरडतेस कशाला? मी काही आताच जात नाही कुठे. हा पौष महिना इथेच आहे.’’ असे सांगून डेबूजी गेला निघून दुसरीकडे.


"डेबूजी वट्टी आला रे आला’’
ही हाक यात्रेकरूंत फैलावल्यामुळे, सगळे गणगोत नि लंगोटी मित्र त्याला पहायला धावले. दरसाल नदीच्या निसरड्याचा अनुभव सगळ्यांना होता, पण ओल्याचिंब मातीवर सुकी माती टाकून लोकांचे हाल कमी करण्याची कल्पना नि योजना आजवर एकाही शहाण्याच्या डोक्यात आली नव्हती. आणि आज? परागंदा झालेला आपला डेबूजी या विचित्र वेषाने यात्रेला येतो काय आणि यादवजी पाटलाकडून टिकाव, फावडे, टोपली घेऊन एकटाच ते काम करतो काय!

लोकहितासाठी असली कामे कोणी ना कोणी केलीच पाहिजेत, ही कल्पनाच ज्या खेडुतांना नाही नि नव्हती, त्यांना डेबूजीचा हा खटाटोप पाहून काय समजावे हेच समजे ना. कोणी म्हणे ``बिचारा वेडा झाला.’’ कोणी आई, बायको-मुलांकडे पाहून कळवळत. दुसरा विशेष शहाणा शेरा मारी की ``अहो पहिल्यापासूनच याला देवाधर्माची आवड, म्हणून झाला आता तो बैरागी साधू.’’ तिसरा तुंकाराने सांगे, ``अहो कसला देव नि कसला धर्म! याने आपल्या कुळदैवत खंडोबा नि आसराईचे बोकड दारू बंद करून विठोबा रखमाई करू लागला, वाडवडलांची चाल मोडली. फिरले डोके नि झाला असा वेडा पिसा.’’ ज्याला जसे सुचले तसे तो लोकांच्या जमावात येऊन शेरे मारी नि निघून जाई.


खराट्याचा नवा धर्म
सगळ्या यात्रेकरूंची स्नाने आटोपल्यावर, डेबूजीने स्वतः स्नान केले, अंगावरच्या चिंध्या धुतल्या नि तशाच पुन्हा पांघरल्या. देवळात जाऊन महादेवाला बिल्वपत्रे वाहिली. फराळाला बसलेल्या अनोळखी यात्रेकरूकडून चतकोर तुकडा भाकर, चटणी, कालवण मागितली आणि मडक्यात घेऊन नदीकाठी तो खात बसला. आईने त्याचयापुढे फराळांचे जिन्नस ठेवले, तिकडे त्याने पाहिलेही नाही. भाकर संपताच तो उठला आणि गेला निघून दूर कोठेतरी.

संध्याकाळी लोक पहातात तो डेबूजी हातात खराटा घेऊन यात्रेतली सारी घाण झाडून साफ करीत आहे. कागद पानांची भेंडोळी, खरकट्याचे तुकडे, फार काय पण जागोजाग लोकांनी केलेली मलमूत्रविसर्जनाची खातेरी, पार सगळे स्वच्छ झाडून साफ करण्याचा झपाटा चाललेला. सकाळी याने दरडीवर माती टाकून लोकांची स्नाने सोयीची केली. वाटेत दिसलेला दगड धोंडा गोटा दूर नेऊन टाकला. आता तर यात्रेतला सारा घाण, केरकचरा स्वतः भंग्याप्रमाणे साफ करीत आहे. हा काय वेडा आहे होय? येथल्या घाणीमुळे ऋणमोचनला कसली ना कसली रोगरायी होतेच. आपण कधी लक्षच दिले नाही. दरसाल असे होतेच, एवढ्यावरच आपली अक्कल ठेचाळायची. पण त्या रोगरायीला ही घाणच कारण, हे आज आपल्याला या डेबूजीने शिकवले. याला वेडा म्हणणारेच वेडे. बरे, याला साधू म्हणावे, तर आजवरचे साधू असली कामे करताना कोणी पाहिलेच नव्हते.

सारे लोक मंदिरातल्या दगडी शिवलिंगाच्या आरत्या धुपारत्यांत गुंतलेले, तर हा यात्रेकरूंच्या सुखसोयीसाठी आणि आरोग्यासाठी बाहेरची घाण काढण्यात हाडे मोडून घाम गाळीत आहे. गाभा-यातला तो दगडी देव श्रेष्ठ का देवळाबाहेरचा हा झाडूवाला श्रेष्ठ? विचारी होते ते हा विचार उघड बोलू लागला. डेबूजीकडे ते विशेष कौतुकाने नि आदराने पाहू लागले. ``अरे वेडा कसचा हा! हाच खरा महात्मा. सकाळपासनं तो तुमची सेवा करीत आहे. आता तर तुमची सारी घाण निपटून यात्रेचे ठिकाण स्वच्छ करीत आहे. ही लोकसेवा म्हणजेच खरी देवाची सेवा. उगाच टाळ मृदंग कुटून भजनाचा टाहो फोडून काय होणार आहे.’’ असे बरेच लोक बोलू लागले.

  •  माणुसकीचा संदेश

सगळी घाण निपटल्यावर डेबूजी सखुबाई बसली होती तेथे आपण होऊन आला. नमस्कार केला सगळ्या लहान थोरांना आणि मुकाट्याने बसला. सखुबाईने अंगावरून हात फिरवला. ती सारखी रडत होती. सभोवार जमलेल्या सगळ्यांनी घरी परत येण्याविषयी आग्रह केला. ``मी तुझ्याबरोबर आलो नि उद्या परवा मेलो, तर तू काय करशील? आजोबा, आजी, मामा गेले, त्यावेळी काय केलंस तू आणि करणार तरी कोण काय? स्वतःपुरते सगळेच पहातात. पण शिलकी आयुष्य गरजवंत लोकांच्या सेवेत झिजवले, तर तीच खरी देवाची सेवा. देवळातल्या दगडी देवाचे हातपाय रगडून काय होणार? सभोवार पसरलेली ही माणसांची दुनिया, हे खरे ईश्वराचे रूप. त्या हजारो लाखो देवांची पडेल त्या रीतीने केलेली सेवाच देवाघरी रुजू होते. सुवासिक फुले, पत्री आणून देवाच्या दगडी मूर्तीवर वाहण्यापेक्षा, सभोवार पसलेल्या हालत्या,  बोलत्या, चालत्या दुनियेच्या सेवेसाठी हाडे झिजवली, भुकेल्यांच्या तोंडात भाकरीचा घास घातला, तरच जन्माचे सार्थक होईल. त्या पत्रीफुलांपेक्षा माझा खराटा झाडूच श्रेष्ठ आहे. उमचायचे नाही तुम्हाला ते आज.’’ इतके बोलून डेबूजी उठला नि गेला निघून.
``मी तुह्या संग आलो अन् सकाळय परवा मेलो त तु काय करशीन? आबा, आजी, मामा मेले त्या वाकती त्वा काय केलं अन् कोन काय करनार? आपल्या पुर्त सर्वेच पाह्यतत पन् उरलं हुए आयुष्य अळल्या नळल्या गरजी लोकाईची सेवा क-याले खरसलं तर तेच खरी देवाची सेवा आहे. देवळाईतल्या दगळ गोठ्याच्या देवाचे हात पाय दाबून काही होत नाही. भोवताली पसरलेली ही माणसांची दुनिया हेच खरं देवाचं रूप आहे. त्या हजारो लाखो देवांची करता येईल त्या मार्गानं सेवाच करनं देवाच्या घरी रुजु होईन. वासाचे फूलं वेल आनून देवाच्या गोट्याच्या मूर्तीवर वाह्यल्यापक्षे भवतालच्या चालत्या बोलत्या लोकांच्या सेवेत आयुष्य खरसलं, भुकेल्या हुया लोकांच्या तोंडात भाकरीचा घास घातला, तरच जलमाचं सार्थीक होईन. त्या फुलपत्रापक्षे माझा खराटा अन् झाळनंच मुद्याचं आहे. आज काही तुम्हाले ते समजनार नाही.’’


यात्रा संपली, डेबूजी पसार
कोठे सटकला त्याचा थांग ना पत्ता. पुन्हा पायपिटी नि वनवास. दररोज १५ ते २५ मैलांची दौड सारखी चालू. रात्र नाही. दिवस नाही. ऊन्ह, थंडी, पाऊस नाही. तुफाने, वादळे, झंजावात नाही. त्याचे पाय सारखे चालतच रहायचे. जाताजाता शेतातली कणसे, कांदे, मिरच्या, शेंगा, गाजरे काय मिळेल ते खायचे आणि विसाव्यासाठी मनाला येईल तेथे अंग टाकायचे. कोणत्याही गावात एक दिवस किंवा एक रात्र यापेक्षा अधिक काळ रहायचे नाही. भूक लागली का हव्या त्या दारी जायचे आणि मायबाप चटणी भाकर द्या ही आरोळी मारायची. कोणी द्यायचे, कोणी हुसकवायचे. शिळी पाकी कशी का असे ना, भाकर, चटणी, कालवण मडक्याच्या टवकळात घ्यायचे आणि दूर नदीकाठी अथवा गावाबाहेरच्या विहिरीजवळ बसून ती खाल्ली का झाली स्वारी पसार दुसरीकडे.
कित्येक वेळा पोलीस नि पोलीसपाटील डेबूजीला चौकीत बंदीवानही करायचे. काही ठिकाणी तर चोर समजून पोलिसांनी त्याला उपाशी ठेवावे, कबुलीसाठी रात्री खूप मार द्यावा. याचे काही नाही, मार खात असतानाही हा हसायचा. पक्का बेरड आहे लेकाचा म्हणून आणखी छळायचे. डोईवर जडजड पेटारे देऊन पाचपाच मैल दुस-या गावी चौकीवर चालत न्यायचे. तेथे आणखी तपास व्हायचा. कोणी सज्जन गावकरी भेटावा नि त्याने ``अहो हा वेडा आहे. असाच गावोगाव भटकत असतो.’’ असे पोलिसांना सांगितले म्हणजे सुटका व्हायची. लगेच स्वारी आपल्या तंद्रीत हास हासत पुढे रवाना व्हायची. कोणी निंदा, वंदा वा अटकेत करा बंदा, कशाची काही दिक्कत खंत वाटायचीच नाही. शारीरिक, मानसिक, वैचारिक अवस्था एकतान, निर्लेप, निर्विकार नि स्थितप्रज्ञ. पुष्कळ वेळा तो मुद्दामच लोकांचा राग आपणावर ओढून घ्यायचा. षड्रिपूंचे दमन किती झाले आहे, याची क्षणोक्षणी पदोपदी तो कसोटी लावून पहायचा. कसोटी लावून पहायचा! लिहा बोलायला शब्द फार सोपे आहेत. वाचायलाही काही कठीण जात नाहीत. पण तसल्या एकाद्या प्रसंगाची नुसती कल्पना करून पहा, म्हणजे डेबूजीच्या साधकावस्थेतील तपश्चर्येची कदर किती भयंकर होती, याची थोडी फार कल्पना झाली तर होईल.

  •  विक्षिप्तपणाचे काही नमुने

(१) कोणी जेवत बसले असता एकदम जवळ जाऊन भाकरी मागायची. चतकोर तुकडा देऊ केला का याने अर्धी भाकर मागायची. बरं अर्धी घे म्हटले तर सगळी द्या मागायची. तीही पुढे केली का सगळ्या भाक-या मागायच्या. तुला सगळ्या दिल्यावर आम्ही रे काय करायचे? तुम्ही उपाशी रहा, मला फार भूक लागली आहे. अशा जबाबाने प्रकरण शिव्यागाळी हुसकावणीवर यायचे. तसे ते आले का स्वारी निमूटपणे पुढे चालू लागायची.
(२) एकाद्या गाडीच्या मागेमागे चालायचे. दोनतीन मैल हा कोण चिंध्याधारी गाडीमागे चालतोय, याची गाडीवानाला शंका येऊन तो विचारायचा. मला गाडीत बसू द्या. कुठं जायचं आहे तुला? तुम्ही जाता त्याच गावाला. बरं बस गाडीत. तुम्ही खाली ुतरा मग बसतो मी, बैलांना दोघांचे ओझे होईल. अखेर काय? शिव्या निंदा नि टवाळी. तेवढी पूजा घेतली का स्वारीने पायांचा मोर्चा वळवलाच दुसरीकडे.
(३) दोन प्रहरी एखादी बाी शेतावर नव-यासाठी भाकरीचे गाठोडे नेत असताना, स्वारीने तिला हाक मारून थांबवावे आणि भाकरी मागावी. माय, भूक लागलीय, दे ते भाकरीचं गठोडं मला. औतक-याला मग कायरे देऊ? राहील तो उपाशी, मला काय त्याचे? उस्तळून ती बाई कडकडून शिव्या देऊ लागली का स्वारी निघून जायची.
(४) एखाद्या शहरात हमाल लोक दिवसाच्या मजुरीच्या पैशांची वाटणी करीत बसलेले पाहिले का स्वारी जवळ जायची. भिकारी समजून ते एखादा पैसा देऊ लागायचे, पैसा नको, मला रुपाया हवा. रुपाया? तुझ्या बापाने ठेवलाय, चल हो चालता इथून, प्रकरण धक्काबुक्कीवर आले का पोबारा करायचा.
(५) मोळी विकणारे भेटले का त्यांच्याजवळ लाकडे मागायची. तुला रे लाकडे काय करायची? सैपाक करीन सैपाक करीन बाप्पा. सैपाक? कशावर करणार? धोतरावर करीन. सगळे हसायचे. खांदाडावर डोकं दिसतं पण ते मडकं रे मडकं! धुडकावणी झाली का स्वारीला समाधान.
(६) तीनप्रहरी एखाद्या घराशी जावे नि भाकरी मागावी. भाकरी शिल्लक नाही म्हटले तर शेवया द्या, मला शेवया फार आवडतात. तुझ्या बापाने ठेवल्यात म्हटले तर दूध द्या गाडगेभर अशी मागणी करायची. दूध नाही तर दोन शेर गूळ दे माय. खाऊन पाणी पिईन. घरवाला बाहेर यायचा नि स्वारीला दण्डा दाखवून हुसकावून द्यायचा.
(७) गावच्या विहिरीवर हात पाय सोडून बसायचे. मालक दिसला का त्याला विचारायचे ``काय हो, महारांची विहीर कोणती?’’ डेबूजीला महार समजून तो आईमाईवरून शिव्या देऊ लागायचा. ``पण मालक, मी नुसता बसलो आहे, पाणी नाही प्यालो अजून, आता पितो.’’ मालकाने दगडधोंडे मारून स्वारीला हुसकवायचे.
(८) एकदा एका देवळात पुराण चालले होते. खेडूतांची गर्दी. वेदान्ताचा एक मुद्दा पुराणिकबुवा मोठ्या अवसानाने श्रोत्यांना ओरडून ओरडून सांगत होते. सारेजण मोक्षाच्या विमानात बसल्यासारखे देहभान विसरून रंगले होते. एकदम डेबूजी आरोळी मारतो ``भाकर द्याहो मायबाप. लइ भूक लागलिया पाया पडतो. बापहो, भाकर द्या.’’ या आरोळीमुळे पुराणात एकदम खंड पडला आणि मोक्षाच्या आध्यात्मिक विमानात तरंगत असलेले सारे श्रोते धाडकन बसल्याजागी जमिनीवर असल्याच्या भानावर आले. पुराणिकबुवा संतापले.

पुरा. – काय रे ए गाढवा, मनुष्य आहेस का कोण आहेस?
डेबूजी – मी कोण ते आपण सांगितलंच.

पुरा. – पुराण चाललंय दिसत नाही तुला?
डेबूजी – पुराण चाललंय, दिसतंय मला मायबाप. पण भाकरी मागायला भिकारी आला तर पुराण चालताना ती त्याला देऊ नये, असं कोणत्या पुराणात लिवलंय दादा.

पुरा. – फार शहाणा दिसतोय लेकाचा. पुराणाच्या जागी भीक आणतात का कुणी? चल चालता हो. नाही तर...

डेबूजी –इथं नसलं तर आणवून द्या कुठूनतरी. फार भूक लागलिया बाप्पा.

पुरा. –  पुराण बंद करून तुला भाकर आणून द्यायला, कोण असा तू मोठा साधू लागलास? कोण आहेस तू? महार का मांग?

डेबूजी -  मी माणूस आहे महाराज.

पुरा. – ते कळतंय आम्हाला. जात कोणती तुझी?

डेबूजी – जात? माणसाची.

पुरा. – हे विचित्र सोंग कशाला घेतलंस?

डेबूजी – साधू होण्यासाठी मायबाप.

पुरा. – अरे अकलेच्या कांद्या, हलक्या जातीचे लोक कधी साधू झालेत का आजवर? त्यांना देव तरी कसा भेटणार?

डेबूजी – बरं तर. साधू होण्याचा फंद देतो टाकून. पण मला फार भूक लागलीय. भाकर द्या. लवकर द्या. जीव कासावीस झाला.

``द्यारे हुसकावून द्या या गाढवाला. नसती पीडा शिंची.’’ असे पुराणिकबुवा कमाण्डरच्या अवसानात लोकांना ओरडून सांगत आहेत आणि लोक मात्र जागच्या जागी बसून एकमेकांच्या तोंडाकडे टकमक पहात आहेत, असा देखावा तयार होतो.

पुरा. –  (चिडून) खूप धंदा शोधू काढलाय गाढवानं. तरणा बांड असून भिक्षा मागतोस. लाज वाटायला पाहिजे तुला.

डेबूजी – लाज असती तर भिक्षा कशाला मागितली असती महाराज.

पुरा. – पहा पहा कसा चुरचूर एखाद्या पंडितासारखा बोलतोय तो. आजकाल ताळतंत्रच राहिले नाही. जातीचा हा हलका आणि म्हणे साधू होऊ इच्छितो. साधू व्हायला आमच्यासारख्या श्रेष्ठ जातीतले सारे लोक मेले का काय? म्हणून या चिंध्या मडके-धा-यावर ती पाळी आली. सज्जनहो, पहा, ऐका, खालच्या वर्गातले लोक अशी आपली पायरी  विसरून वरिष्ठांची पायमल्ली करू लागल्यामुळेच पाऊसपाणी गेले, शेती बुडाली आणि हे असले भिकार दिवस आले.
इतके वादळ उठले तरी डेबूजी शांत मुद्रेने जागच्या जागी उभाच. ओरडून ओरडून पुराणिकबुवांचा घसा खरचटला. ते किंचित थांबले का दिलीच त्याने पुन्हा जोराची आरोळी भाकर वाढा हो मायबापांनो. अखेर मंडळीतून कोणीतरी उठले आणि त्याला बगोटे धरून लांब दूर नेऊन घालवला.

  •  कुटाळांच्या अड्ड्यावर

हरएक गावात कुटाळ लोकांची टोळकी असायचीच. चावडीवर किंवा गावाबाहेरच्या पिंपळाच्या प्रशस्त पारावरत्यांची बैठक. नदीवर पाण्याला जाणा-या बायका पोरींची नि इतरांची टिंगल टवाळी करायचा त्यांचा धंदा अजूनही चाललेला दिसतो. डेबूजी असल्या वाटेने जाऊ लागला का ते टोळके त्याला हाका मारायचे. तो मुक्या बहि-यासारखा पुढेच चालत असायचा. मग टोळीतला कोणीतरी त्याला आडवा जायचा.
-   काय रे, हाका मारल्या त्या ऐकू नाहीत का आल्या? चर फिर माघारा.
-   मला पुढं जायचं आहे.
-   अरे हो मोठा पुढं जाणारा. मागं फिर. पाटील बोलवताहेत तुला.
-   मला काय पाटलाशी करायचं बाप्पा?
-   पाटलांचा कचका माहीत नाही वाटतं. येतोस, का नेऊ खेचीत.
-   खेचीत न्या.
धकांड्या मारीत स्वारीला चावडीपुढे किंवा पाराजवळ आणायचे.

पाटील – कुठून आलास रे?

डेबूजी – इकडून आलो.

पाटील – इकडून? इकडून म्हंजे कुठून?

डेबूजी – इकडून म्हंजे तिकडून.

पाटील – चाललास कुठं?

डेबूजी – पाय नेतील तिकडं.

पाटील – कोण आहेस तू?

डेबूजी – बाप्पा, मी आहे भयाणा.

पाटील – घरदार बायकापोरं काही आहेत का?

डेबूजी – आठवत नाही.

पाटील – आईबाप तरी होते का?

एक टवाळ – का आकाशातनं पडलास?

डेबूजी – हो, अगदी तसंच.

टवाळ – तरणा तगडा दिसतोस. बायको नाही का केलीस?

डेबूजी – केली होतीसे वाटतं.

पाटील – मग घराबाहेर कशाला पळालास?

डेबूजी – बायकोनं दिलं हुसकून म्हणून.

पाटील – बायकोनं हुसकलं नि तू बाहेर पडलास? शहाणाच आहेस.

डेबूजी – शहाणा नाही बाप्पा. भयाणा आहे मी भयाणा. असली कसली तरी भरमसाट उत्तरे देऊन तो आपली
मनसोक्त टिंगलटवाळी निंदा करून घ्यायचा. क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सरादि षड्रिपूंची खरचटून झाडणी करण्यासाठी डेबूजीने साधकावस्थेच्या केलेल्या या विलक्षण तपश्चर्येला `असामान्य’ हे विशेषण सुद्धा अपुरे पडेल.


ऋणमोचनचे ऋण फेडले
सन १९०७ साली डेबूजी बिनचूक ऋणमोचनच्या यात्रेला आला. या वर्षी त्याने नामसप्ताह आणि भंडा-याची योजना जमातीपुढे मांडली. लगोलग चार पाचशे रुपये जमा झाले. पक्वान्नांची भांडी चुलीवर चढली. तिकडे ओल्या दरडीवर सुकी माती घालण्याचा डेबूजीचा कार्यक्रम चालू झाला. संध्याकाळी ५ वाजल्यावर सरळ ओळीत पद्धतशीर पंगती मांडल्या. सगळ्या स्त्री-पुरुषांना नि मुलांना हातपाय धुवून पानांवर बसवले. वाढणीसाठी स्वयंसेवकांची योजना केली. काही बायकाही तयार झाल्या. प्रत्येक पानापुढे उदबत्त्या लावल्या आणि सर्व सिद्ध झाल्यावर पुण्डलीक वरदा हाsरी विठ्ठलच्या जयघोषात भोजनाला प्रारंभ झाला. परीट जमातीचा हा शिस्तवार भंडारा पहायला गावोगावचे लोक धावून आले. पंगती चालू असताना डेबूजीने एकतारीवर सुस्वर अभंगांचे गायन करून, त्यातूनही आत्मोद्धाराचे नि समाजोन्नतीचे ज्ञान श्रोत्यांना दिले. डेबूजीच्या संघटन-चातुर्याची जो तो मनमुराद वाहवा करू लागला. मागासलेली नि अडाणी नाक्षर परीट जात. पण तिला हे नवीन शिस्तीचे नि संघटनेचे वळण डेबूजीने लावलेले पाहून, त्या जमातीत त्याचा मोठा आदर होऊ लागला. एवढा मोठा मिष्टान्नाचा भंडारा झाला. हजार बाराशे पान झाले. मोठा सोहळा झाला. डेबूजीने अभंग गाऊन पंगतीची करमणूक केली. अखेर खरकटी काढली. भांडी घासली. जागा साफ केली आणि स्वतः मात्र चटकन कोठेतरी जाऊन मिळवलेल्या शिळ्यापाक्या भाकरी चटणीवर नदीकाठी जाऊन आपले नेहमीचे जेवण केलेले पहाताच हजारो स्त्री-पुरुषांच्या डोळ्यांत कौतुकाचे, कृतज्ञतेचे आणि आदराचे अश्रुबिंदू चमकले.


  •  अखेर दगडी घाट झाले

डेबूजीच्या खटपटीमुळे ऋणमोचनच्या पौषी यात्रेला सालोसाल वाढते महत्त्व येऊ लागले. दरसाल यात्रा जमावी. स्नानासाठी नदीकाठच्या घसरणीवर लोकांची घसरगुंडी चालूच रहावी आणि तेथे डेबूजीने सुकी माती टाकायचे हाडमोडे काम करीत रहावे, हे काही ठीक दिसत नाही. हा विचार लोकांच्या मनात घोळू लागला. नदीला फरसबंदी घाट बांधला पाहिजे. एवढी डेबूजीच्या तोंडून अस्पष्ट सूचना निघायची थातड, भराभर जागच्या जागी वर्गण्यांचे आकडे आणि रोख रकमा जमू लागल्या. सांगवी दुर्गडे येथील डेबूजीशी जमिनीबाबत तंटा केलेल्या सावकारांनी – बनाजी प्रीथमजी तिडके आणि त्यांचे बंधु तुकाराम प्रीथमजी तिडके यांनी पुढाकार घेऊन वर्गणीचे ठोक रकमेचे आकडे प्रथम टाकले. सन १९०८ साली पूर्णानदीचा पहिला घाट बांधून तयार झाला. जमलेल्या रु. ७५०० पैकी घाटाचे काम होऊन रकम शिल्लक उरली, तेव्हा वर्गणीदारांच्या इच्छेप्रमाणे घाटाशेजारीच श्री लक्ष्मी-नारायणाचे देऊळ बांधण्यात आले. यानंतर सालोसाल अनेक लोकांनी देणग्या देऊन नदीच्या दोनी तीरांवर योग्य ठिकाणी आणखी चार घाट बांधले. ४-५ वर्षांनंतर डेबूजीने परीट समाजात ऋणमोचन यात्रेच्या निमित्ताने एकेका नवा समाज-संघटनाचा प्रघात चालू करावा. भंडा-याच्या जोडीने त्याने नाम-सप्ताहाची प्रथा चालू केली. मांसभक्षण नि दारूबाजी. या व्यसनांच्या हकालपट्टीची निकराने चळवळ केली. देवीच्या नावाने जागोजाग होणा-या पशुपक्ष्यांच्या हत्या महापाप ठरवून बंद पाडल्या. भंडारा करून उरलेल्या पैशानी मोठमोठी भांडी खरेदी करवली. सन १९१४ साली पत्र्याची धर्मशाळा बांधून ती पंचांच्या ताब्यात दिली. लोकहिताच्या असल्या अनेक खटपटी कराव्या. त्या लोकांच्या हवाली व्यवस्थेसाठी सोपवाव्या आणि आपण मात्र झटकून नामानिराळे रहावे. फार काय, पण पार दूर कोठेतरी निघून जावे, असा त्याच्या जीवनाचा ओघ चालू झाला. `` डेबूजी आमच्या परीट जातीचा पाणीदार मोती आहे,’’ असे एकाने सहज म्हणताक्षणीच, ``नाही हो बाप्पा, मी एक फुटके खापर आहे. मोत्यासारखा कुणाच्या छातीवर हारात रुळत राहण्यापेक्षा, मोत्याच्या थेंबासारखा दवाचा कण म्हणून तान्हेल्या चिमणीच्या घशात नेमका पडावं, ही तर माझी सारी खटपट आहे.’’ असा जबाब द्यायचा.
ऋणमोचनप्रमाणेच मार्की (ता. अमरावती), पिंजर (ता. अकोला) आणि माहूर (निजाम प्रदेश) येथील यात्रांतून डेबूजीने भंडारे, नामसप्ताह आणि धर्मशाळा चालू करून, स्वतः त्या कोठल्याही उद्योगाच्या मोहात नाममात्रही राहिला नाही.


डेबूजी पुढे, कीर्ति मागे.
ठिकठिकाणच्या या कार्यामुळे डेबूजीचे नाव लांबवर फैलावले. कोण हा असावा, तो पाहिला पाहिजे एकदा, असे जिकडे तिकडे लोक बोलू लागले. वाट फुटेल तिकडे जाण्याच्या नित्य क्रमात तो कोठेही गेला, कोणालाही भेटला, तरी त्याने आपले नाव चुकूनही कधी कोणाला सांगितले नाही आणि आजही सांगत नाहीत. तोच हा लोकसेवक डेबूजी असे लोकांनाही पटायचे नाही .एवढी मोठमोठी संघटनेची कामे करणारा आणि परिटांसारख्या मागासलेल्या समाजात जागृतीचे अमृतसिंचन करणारा असा वेडाविद्रा, रकटी चिंध्या पांघरणारा, मडके गळ्यातबांधून फिरणारा, दिगंबर असेलच कसा? याला तरी लोक पुढारी मानतील कसे नि याचे ऐकतील कसे? दरसाल हजारगावे पायपिटीत पालथी घातली, लाखो ब-यावाईट लोकांशी संबंध आला, पण कोणालाही डेबूजीच्या नावागावाचा थांगपत्ता लागला नाही.

डेबूजीची कीर्ती व-हाड, खानदेश, नागपुरापर्यंतच्या मागासलेल्या समाजात फैलावत गेली. स्वतःच्या संसारावर पाणी सोडून इतर हजारो अडाणी नाक्षर म्हणूनच स्वाभिमानाला मुकलेल्या श्रमजीवी कष्टाळू जनांचे संसार ठाकठीक सावरण्याची अक्कल शिकवणारा हा नवीन साधू पहाण्यासाठी ठिकठिकाणचे लोक उत्कंठित झालेले असत. काही दिवसांनी कोणी सगेसोयरे आले, त्यांनी डेबूजीच्या वेषाची, वृत्तीची नि ग्रामसेवेची माहिती दिली म्हणजे ``अरे हो रे हो. परवाच तो आमच्या गावी येऊन गेला. आम्ही समजलो का असेल कोणी वेडापीर. त्याने चावडी सारवून साफ केली. विहिरीचा पाणवठा खराटा घेऊन स्वच्छ केला. ढोरांना पाणी पाडले. त्या सोनबा पाटलाच्या सुनेचे कडब्याचे ओझे डोक्यावर नी तिचे पोर खाकोटीला घेऊन त्याने तिला ७ मैल सोबत केली नि घरी आणून घातली. बाबा, काय भाकर बिकर खातोस का म्हणून विचारले तर काहीही न बोलता नुसता हसला नि नमस्कार करून धावत पळत गेला निघून. अरेरे, दापुरी ऋणमोचनचा तोच का डेबूजी? किती अभागी लोक आम्ही. आम्ही त्याला ओळखले सुद्धा नाही हो. छे छे छे. फारवाईट गोष्ट झाली.’’ असे तडफडायचे.


  • रेल्वे आमची मायबाप


भटकंतीमध्ये रेल्वेचाही प्रवास यायचा. उतारूंच्या गर्दीत स्वारी खुशाल घुसून आगगाडीत जाऊन बसायची. मनात येईल तेथे आणि फास्ट गाडी असल्यास ती थांबेल तेथे उतरायचे. हा क्रम. तपासणीत तिकीट कलेक्टराला हा बिनतिकिटाचा उतारू आढळला का त्याने शिव्यागाळी करून, धक्के मारून बाहेर काढायचा. झडती घेऊन कफल्लक आढळल्यामुळे, एकदोन चपराका लगावून स्टेशनबाहेर हुसकून द्यायचा. दुसरी गाडी आली का स्वारी घुसलीच आत नि चालली पुढे. हे साधले नाही तर खुशाल पुढची एक दोन स्टेशने पायी चालत जायचे आणि तेथे एकादी गाडी पकडून पुढे चालते व्हायचे.
काशी प्रयाग यात्रेचा प्रवास – डेबूजीने असाच केला. परत येताना इटारसी स्टेशनवर एका गो-या इन्स्पेक्टरने त्याला तिकिटाशिवाय नि कफल्लक प्रवास करताना पाहिले मात्र, हाणली ढुंगणावर बुटाची लाथ नि दिला भिरकावून फलाटफार्मावर. त्या डब्यात एक मुसलमान गृहस्थ बसला होता. त्याच्या डोळ्यांना टचकन पाणी फुटले. तीन चार गटांगळ्या खाऊन, डेबूजी उठला नि तो गोरा अधिकारी दूर गेल्याचे पाहून पुन्हा डब्यात घुसला.
मुसलमान – अरे बाबा, का एवढा हाणमार सोसतोस? जवळ पैसे नसले तर पायी प्रवास करावा. तिकिटाशिवाय का बरं घुसावं नि जागोजाग असली मारपीट खावी?
गाडी चालू झाली होती. डेबूजी हात जोडून त्याला म्हणाला - ``हे पहा जनाबसाहेब, गो-या साहेबाची एक लाथ खाल्ली तर १०० मैल सुखाने पुढे आलो ना मी? पायाने चालतो तर ऊन्ह आहे, थंडी आहे, पाऊस आहे, किती तरी त्रास असतो चालताना. त्यापेक्षा दर जंक्शनवर एक बुटाची ठोकर काय वाईट? एक लाथ बसली का चालला १०० मैल पुढे.’’

त्या सज्जन मुसलमान गृहस्थाने डेबूजीची अवस्था पाहून दहा रुपयांची नोट पुढे केली. ``साधूजी, ए लेव. ऐसी मारपीट मै नही देख सकता.’’ डेबूजीने त्याला हात जोडून विनयाने म्हटले - ``जनाब साहेब, पैसा मला काय करायचा? ही काठी, हे मडक्याचे टवकळ नि अंगावरच्या या चिंध्या, एवढीच माझी धनदौलत नि संपत. आपण दिलदार आहात.’’ डेबूजीची ती निरिच्छ वृत्ती पाहताच त्या गृहस्थाचे डोळे पाण्याने डबडबा भरून आले. ``तुम बडे अवलिया हो’’ असे म्हणून तो डेबूजीचे पाय धरणार तोच तो चटकन बाजूला सरला. ``जनाब, नमस्कार देवाला – अल्ला करावा. माणसाचे पाय धरू नये.’’


घार फिरे आकाशी -
परि चित्त तिचे पिल्लांपाशी. बारा वर्षांच्या वनवासात दापुरी किंवा तेथले घर यांचे दर्शन डेबूजीने कटाक्षाने टाळले होते. चुकून एकदाही तिकडे कधी तो फिरकला नाही. तरीसुद्धा समाजहिताच्या चालू केलेल्या नानाविध कार्यांवर त्याचे लक्ष बिनचूक लागलेले असे. परीट जातीत आणि मागासलेल्या इतर समाजांत ज्या ज्या राक्षसी नि घाणेरड्या रूढींच्या उच्चाटनाची आपण खटपट केली, त्या खरचटून नाहीशा झाल्या का या ना त्या आडपडद्याने तसाच चालू आहेत, याचा तो वरचेवर कानोसा घेत असे. त्याचे एकनिष्ठ मित्र नि अनुयायी त्याला कोठेतरी गाठून भेटून सल्लामसलत घेत असत.


हुण्डा-देज-निषेधाचा तडाखा.
लग्नकार्यात वरपक्षाने किंवा वधूपक्षाने हुंडा किंवा देज देता घेता कामा नये, असा प्रचार त्याने केलेला होता. जो कोणी हे पाप करील, त्याच्या लग्नाला कोणी जाऊ नये, बहिष्कार घालावा. हुंड्याच्या नि देजाच्या प्रघाताने दोन्हीही कुटुंबे कर्जबाजारी होतात. हातच्या शेतीला गुराढोरांना मुकून सावकाराचे दास बनतात. नवविवाहित जोडप्याचा नवा संसार कर्जाच्या उकीरड्यावर चालू करणे महापाप आहे, आत्मघात आहे. लग्नासाठी सावकाराचे कर्ज काढून गावजेवणावळीचा, आरसपरस आहेरांचा नकली श्रीमंतीचा खोटा थाट करण्यापेक्षा, गरिबाला साजेशोभेशा झुणकाभाकरीने तो साजरा करावा, असा त्याचा प्रचार कीर्तनांतून नेहमीच होत असे. आजही तो चालूच आहे.
एका ठरलेल्या लग्नात व-हाडमंडळ जमून नवरानवरीला हळद लागल्यावर, वरपित्याने हुंड्याची मागणी केली. वधूपिता गांगरला. ठरावाची भाषा बदलली तरी हळद लागल्यावर लग्न मोडायचे कसे? हुंड्याची अट पुरी केलीच पाहिजे. सावकाराकडे कर्जासाठी जाणा-या वधूपित्याला डेबूजीच्या स्थआनिक मित्रांनी थोपवून धरले आणि चारी दिशांना हेर पाठवून डेबूजीला तेथे बोलावून आणले. त्याने वरपित्याची समजूत घालण्याचा खूप प्रयास केला. पण तो आपला हट्ट सोडी ना. `हे लग्न मोडले’ असा पुकारा करून डेबूजी जवळच्या एका गावी गेला आणि तेथे एका तरुणाला लग्नासाठी उभा करून त्या मुलीचे त्याच्याशी झुणकाभाकरीच्या मेजवानीने थाटात लग्न करून दिले. नवलाची गोष्ट, त्या हुंडेबाज तरुणाला पुढे कोणीही आपली मुलगी द्यायला धजला नाही आणि तो जन्मभर अविवाहितच राहिला.

  • एकतारीवरची भजने

भटकंती चालू असताना डेबूजीने शिंदीची एक हातभर फाटकी हातरी आणि एक एकतारी या दोन वस्तुंची आपल्या इस्टेटीत भर घातली. नागपुराकडे हातरीला चापरी म्हणतात. म्हणून त्या प्रदेशात त्याचे नाव चापरेबुवा असे पडले आहे. एकतारी कुठून मिळाली? कोणी दिली? कधी दिली? याविषयी मी स्वतः बाबांना विचारले असता ``मले काय आठवत नाय आता.’’ असे उत्तर मिळाले. ``ओसाड अरण्यात फिरत असता माझी नि एका जख्खड म्हाता-याची गाठ अवचित पडली. तो एकतारीवर भजने गात असे. मलाही भजनाचा नाद. मी पण बसलो त्याच्या शेजारी भजने गात. कधी तो एकतारी वाजवायचा, कधी मी वाजवायचा. दोघांचे काही दिवस छान जमले होते. मी बाळगलेली एकतारी मला कोणी दिली का त्या म्हाता-या बाबाजीनी दिली, आज काही आठवत नाही.’’ हा त्यांनी आणखी खुलासा केला.
आधीच डेबूजीला भजनाचा नाद मोठा. `रामकृष्ण हरि जय रामकृष्ण हरि जय, गोविंद राधे गोविंद राधे’ हेच नि एवढेच हरिनाम स्मरण करीत तासनतास तो एकांतात निमग्न गात बसायचा. भजनाच्या सरावामुळे आधीच आवाज गोड झारदार, तशात जातिवंत तल्लीनतेने हरिनामाचे गायन, त्यामुळे कोठेही तो गात बसला तरी आजूबाजूचे लोक हां हा म्हणता सभोवार जमून त्याचे भजन मुकाट्याने ऐकत बसायचे. ``अरेच्चा, हा वेडा बुवा भजने छान म्हणतो!’’ ही आवायी आसपासच्या खेडेगावात जायची आणि तो गावात आला म्हणजे, ``बुवाजी, गा थोडे भजन गा’’ असा लोक आग्रह करायचे. गा म्हटल्यावर गाता तर मग तो डेबूजी कसला? लोक म्हणतील त्याच्या काहीतरी उलट करायचे, त्यांना राग आणायचा, त्यांच्या शिव्या खायच्या, चिडून ते मारायला उठले का त्यातच परमानंद मानायचा, हा खाक्या. लोकांनी ``म्हण की लेका एकादा अभंग’’ असा अट्टाहास चालवायचा आणि ``मले कायबि येत नाय दादा’’ असे यांनी म्हणायचे. ``मग झक मारायला ती एकतारी कशाला जवळ बाळगलीस? टाक फोडून’’ असे म्हटल्यावर ``मी कशाला फोडू बाप्पा. तुम्हाला वाटले तर टाका फोडून’’ या उत्तरावर कोण काय जबाब देणार?
कधीकधी भजनासाठी लोक हट्ट धरायचे. स्वारीने एकतारी बेसूर लावायची आणि भसाड्या आवाजात भजनाला प्रारंभ करायचा. मग मंडळी `आता बंद कर बाबा तुझं हे भजन’ असा ओरडा करून निघून जायची.
स्वारी लहरीत असली नि कोणी ``बुवा, भजन करता का?’’ असे विचारले तर ``हो हो. रात्री गावाबाहेर करीन देवाचे कीर्तन. गावक-यांना निमंत्रणे द्या, बत्त्यांची सोय करा, म्हणजे थाट होईल.’’ चिंध्या-मडकेधारी फटिंगाची ही थाटामाटाची भाषा ऐकून लोक नि पोरेटोरे खदखदा हसायची. कोण जातो एवढी कीर्तनाची सरबरायी करायला?
झाले. रात्री १० वाजले. डेबूजीने आपली एकतारी सुरात लावली. रामकृष्ण हरि जय भजनाला सुरुवात केली. गावाबाहेरचा उकीरडा. आजूबाजूला काजळी अंधार. एकतान एकसुरी भजनाचा तो भरघोस गोड आवाजाचा सूर कानी पडताच, ``कोण रे कोठे गात आहे? फार छान भजन चालले आहे. चला चला, जाऊ या तिकडे.’’ म्हणत एक धावला. दुसरा धावला. तिसरा. चवथा, पाचवा. बायकापोरे, बाप्ये, म्हातारेकोतारे सारे गाव जायचे डेबूजीभोवती त्या अंधारात. ``अरे एकादा दिवा तर आणा कुणी.’’ असे कोणी म्हटल्यावर एकादे टमरेल यायचा कुणीतरी घेऊन. लोकानी काहीही केले तरी स्वारी आपल्य ाएकतारीच्या भजनात बेभान तल्लीन. बरेच लोक जमले म्हणजे स्वारीने भजन करायचे बंद. मग लोक ओरडायचे, ``बुवाजी काही तरी सांगा. सांगायचे नसेल तर निदान भजन तरी आणखी वेळ चालू द्या.’’
लहर असली तर हरिनामाचे महत्त्व, समाजावर संतांचे उपकार, या मुद्द्यांचा मुखडा घेऊन, शेतकरी कामकरी समाजातील कित्येक वाईट रूढी, जनावरांची हत्या, शिक्षणाचे माहात्म्य, व्यसनांचा दुष्टपणा, स्वच्छतेची जरूरी, या नि असल्या विषयांवर डेबूजी असे काही चित्तवेधक प्रवचन करायचा का आबालवृद्ध सारे श्रोते अगदी गहिवरून जायचे. `हा म्हणतो ते सारे खरे आहे रे खरे आहे. हा काही वेडा नाही. आपल्या खेडूत समाजाची याची पहाणी फार बारीक आहे. हा साधू आहे. ठेवून घेऊ याला आणखी दोन दिवस आणि करू या याची कीर्तने चांगला बत्त्यांचा झगझगाट करून.’ गावक-यांचा इकडे हा बेत चाललाय तर तिकडे डेबूजी पहाटेलाच उठून गाव सोडून पसार.


दापुरीत काय घडले?
९-१० वर्षे गेली. आता घरच्या सगळ्यांची खात्री पटली का डेबूजी पुनश्च संसारात बसणे अशक्य म्हणून बळिरामजीने थोरली मुलगी अलोकाबाईचे लग्न ठरवले. डेबूजीने आशीर्वाद पाठवला पण लग्नाला आला नाही. मातोश्री सखूबाईचेही प्रपंचावरून चित्त उडाले. रात्रंदिवस ती हरिनामभजन करू लागली. या अपेक्षित क्रांतीची खबर लागताच डेबूजीने ऋणमोचनजवळच्या एका ओसाड खेड्यात एक काट्याकुट्याची झोपडी बांधली. आई, बायको, मुले यांना तेथे रहायला सांगितेल. झोपडीत सारा संसार मडक्यांचा. सखुबाई नि कुंताबाई मोलमजुरी करून कसाबसा निर्वाह करीत तेथे राहिल्या. डेबूजी चुकूनही कधी तिथे वस्तीला किंवा अन्नग्रहणाला रहायचा नाही. कधीमधी फेरा आलाच तर वाजवीपेक्षा अधिक गाडगे मडके आढळल्यास ते कोणाला तरी देऊन टाकायचे. निर्वाहापेक्षा अधिक धान्य दिसल्यास गोरगरिबांना ते वाटायचे आणि जय जय रामकृष्ण हरि गर्जना करीत भटकंतीला निसटून जायचे असा खाक्या चालू झाला.
या चंद्रमौळी झोपडीनेही व-हाड, मुंबई, पुणे वगैरे अनेक ठिकाणी प्रवास केलेला आहे. गाडगे बाबा केव्हा येतील आणि चला उठा म्हणतील, याचा नेम नसायचा. असेल ती झोपडी मोडायची आणि भलत्याच ठिकाणी दुसरी थातरमातर उभारून तिथे आई, बायको-मुलांना सांगायचे रहा म्हणून. ऋणमोचन, आमले, झिंगले, मूर्तिजापूर, पुन्हा आमले, नंतर शेगाव, फाटफ, मुंबई किंग सर्कल. नारायण शेटची वाडी माटुंगा, पुणे, आळंदी, पुन्हा मूर्तिजापूर, परत पुणे, शिवाजीपार्क दादर, वांद्रा अशा अनेक ठिकाणी त्या काट्याकुट्याच्या झोपडीचे स्थलांतर झाले, त्याची याद कोठवर द्यावी? प्रत्येक ठिकाणी नुसती झोपडी कशीबशी उभी राहायची, कोणी चांगली जागा देऊ केली तर ती कटाक्षाने नाकारायची. आणि पोट भरण्याची सोय काय? तर जे मी करतो तेच करा तुम्ही, हा जबाब. गाडगेबुवांचे कुटुंब म्हणून कोणी भक्त काही अन्न धान्य देऊ म्हणेल तर तेही परवडायचे नाही. भटकंतीचा फेरा आला नि झोपडीत काही कापडचोपड धान्य आढळले का निघालेच ते बाहेर आणि झाली त्याची गोरगरिबांना खैरात, हा प्रकार अजूनही चालूच आहे.

याविषयी बाबांचे एका काळचे एक निकटवर्ती अनुयायी मूर्खानंद यांची एक आठवण येथेच वानगीदाखल दिलेली बरी.
``पुण्याला सोमवार पेठेत बाबांची एक धर्मशाळा. तिच्या शेजारी एका लहानशा झोपडीत सौ. कुंताबाई रहात होत्या. आमच्यापैकी काहींनी आणि इतर बाबांविषयी आदर असलेल्यांनी आईंना काही बाही आणू द्यावे. त्यांनी लोभाविष्ट दृष्टीने त्याकडे पहात म्हणावे, ``काह्याले आनलं बाप्पा? साधुबाबा (बाबा) येतीनं, तर राहू देतीन् म्हनतां काय? अईमाय्! त्याहिच्या हातावर तर जसा कर्नराजा (कर्ण) येऊन बसला!’’ बाबांना असे भले बुरे म्हणत आईंनी ती वस्तु घ्यावी आणि आपल्या झोपडीत लपवून ठेवावी.
केव्हातरी बाबा पुण्याला यावेत. आईंनी घाईघाईने धर्मशाळेत येऊन बाबांना म्हणावे, ``तुमाले ममईले जाव् लागते ना?’’ बाबांना ही त्यांची युक्ति माहीत. त्यांनी आपल्या पत्नीशी म्हातारपणाचा विनोद करावा, ``बाप्पा! जेव्यागिव्याले घालीत नाहीस काय मले?’’ आणि त्यांनी आईंच्या झोपडीकडे चालू लागावे.

झाले! झोपडीत मोठ्या युक्तिबाजपणे आईंनी लपवून ठेलेल्या सामानाची लागली वाट! आईंनी घाईघाईने बाबांच्या मागोमाग निघावे. कुणाला ठाऊक? भांडाभांडी करून कदाचित् या वेळी तरी त्यांतली एखादी वस्तु ठेवून घेता येईल!
पण बाबा सरळ झोपडीत शिरायचे! मग मला सर्वहुत यज्ञ करणा-या ऋषींची आठवण व्हावी! बिचा-या आईंजवळ बाबांच्या तीक्ष्ण दृष्टीपासून वस्तू लपवून ठेवण्याची चातुरी कुठून आसणार? बाबा झोपडीत लपलेल्या एकेक चिजा बाहेर काढायचे. कुठे कुणी दिलेली चादर, घोंगडी, लुगडे, तांब्या, परात, पळी, पार सगळ्या वस्तुंचा बाहेर ढीग पडायचा. फारतर काय, आईंनी घर म्हणून ठेवलेले धान्यही बाबा राहू द्यायचे नाहीत!
आणि शेवटी वकिली करूनही बाबांच्यापुढे टिकाव लागला नाही, की आईंनी जणू एखाद्या प्रिय जनाची प्रेतयात्रा निघावी, तशी मुद्रा करून सतृष्ण दृष्टीने त्या वस्तुंकडे पहात कपाळावर हात देऊन बसावे!
बाबांनी कष्टकरी मंडळीस हांका मारून ते सगळे सामान वाटून टाकावे आणि आईस म्हणावे, ``आता कशी झ्याक् झाली तुही (तुझी) झोपडी? बसली काय तथीसा? जेव्याले नाही देत काय?’’
आईंनी तावातावाने म्हणावे, ``आता कुकून (कुणीकडून) घालू जेव्याले? तुमचा हात फिरला अशीन (असेल) सगळा (सगळ्या) झोपडीवर! आतां हाडयाले (कावळ्याला) तुकडा घाल्यापुरतंही पीठ कशाला ठेवलं असन् तुम्ही?’’
बाबांनी मोठमोठ्याने हसत धर्मशाळेकडे निघावे!
आणि हा असा क्रम अनेक वर्षे सुरू होता!’’

  •  लोकजागृतीची पार्श्वभूमी

सन १९०५ ते १९१७च्या बारा वर्षांच्या साधकावस्थेत मनसोक्त देशपर्यटन, प्रत्यक्ष जनसंपर्काने नि संघर्षाने षड्रिपूंचे दमन, एकतारीचे कीर्तन आणि जागोजाग कट्टर निरिच्छतेने चालवलेली मानवसेवा नि पशुसेवा या गोष्टींच्या साधनाबरोबरच लोकस्थितीचे सूक्ष्म निरीक्षण हा डेबूजीच्या चरित्रातील महत्त्वाचा गाभा आहे. आजवरच्या साधुसंतांचा लोकसंग्रह आणि डेबूजीचा लोकसंग्रह यात जमीन अस्मानाचा भेद आहे. हा भेद नीट लक्षात येण्यासाठी या लोकहितवादी कर्मयोगी संताने बृहन्महाराष्ट्रात सिद्ध केलेल्या लोकजागृतीची आणि लोकोपयोगी मोठमोठ्या संस्थांच्या माहात्म्याची पार्श्वभूमी त्याशिवाय नीटशी नजरेत भरणार नाही.
महाराष्ट्राची संत-परंपरा प्राचीन आणि असंख्य आहे.ची आणि लोकोपयोगी मोठमोठ्या संस्थांच्या माहात्म्याची पार्श्वभूमी त्याशिवाय नीटशी नजरेत भरणार नाही.
ट्रात सिद्ध केले त्यांचा लोकसंग्रहही अफाट नि विशाळ आहे आणि त्यातून उद्भवलेले पंथ आणि संप्रदाय यांचीही संखया अगणित आहे. बहुतेक सगळ्या संतसंप्रदायांचा अट्टहास पारलौकीक सौख्य नि मोक्ष यांवरच खिळलेला. पृथ्वीवरील प्राप्त जिण्याची, संसाराची आणि व्यवहाराची प्रत्येक संताने कडकडीत शब्दांत निर्भर्त्सना करून आपल्या शिष्यादि अनुयायांना परलोकच्या अमृतासमान (?) काल्पनिक जीवनासाठी सर्वस्वाला झिजविण्याचाच उपदेश केलेला आहे. संत-परंपरेच्या या महिम्यामुळे महाराष्ट्रात बुवाबाजीचे भरमसाट पीक सारखे पिकत आलेले आहे आणि लक्षावधि स्त्री-पुरुष जागोजागच्या मठस्थ पीठस्थ बुवा-महाराजांच्या भजनी लागून, वाजवी व्यवहाराच्या नि विहित कर्तव्याच्या क्षेत्रांत भ्याड, पराङमुख नि दुबळे होऊन बसले आहेत. जरा कुठे एकादा विचित्र किंवा विक्षिप्त माणूस पारलौकीक मोक्षसाधनेची स्पष्ट वा अस्पष्ट बडबड करताना दिसला, लोकव्यवहारापेक्षा भलतेच वेडेचार करताना आढळला का हां हां म्हणता लोक त्याला बुवा किंवा महाराज बनवतात. त्याला मठ बांधून देतात. देवासारखी त्याची पूजाअर्चा, भजने-आरत्या करतात. बुवाच्या लोकोत्तर नि लोकविलक्षण चमत्कारांच्या गप्पा स्वानुभवाच्या साक्षी-पुराव्याने चोहीकडे फैलावण्यात येतात. मोठमोठे पैसेवाले, निपुत्रिक, पदवीधर, शिकलेले, संसारांत पिकलेले आणि बेकर्तबगार म्हणून दैववादाला विकलेले उल्लू त्या बुवाच्या साधूपणाचा नि अवतारीपणाचा एकच डांगोरा पिटतात. त्याच्या लोकविलक्षण भलभलत्या कुकर्मांवर नि बदकर्मांवरही गूढ अध्यात्माची जरतारी शालजोडी पांघरतात. जिवंतपणी यात्रांचा थाट आणि मेल्यावर समाधीची देवस्थाने निर्माण होतात. त्या बुवा महाराजांचा एक ठराविक संप्रदाय चालू होतो. शिष्यसमुदाय आजूबाजूला तयार झालेलाच असतो. मग बुवांच्या मागे पट्टशिष्य म्हणून गादीवर कोण बसणार या भानगडीचे तंटे लागतात. कारस्थाने चालतात, मारामा-या होतात, मठात जमलेल्या द्रव्यनिधीचे, मठ, समाधि, शेतवाड्या, इमारतींच्या हक्कांचे वाद आणि तंटे-कोर्टकचे-यांच्या पाय-या खतवू लागतात.
काही वकील शिष्य या बाजूला, काही त्या बाजूला असा देखावा उभा राहतो. म्हणजे बुवांचे खरेखोटे आध्यात्म जातेबुवांच्याबरोबर समाधीत आणि मठ समाधिच्या संसाराचे त्रांगडे लागते शिष्य-प्रशिष्यांच्या मागे. या सगळ्या उद्व्यावापात नि मोक्षसाधनाच्या हलकल्होळात देशाची अवस्था काय आहे? मागासलेल्या श्रमजीवी जनतेच्या जिण्याची स्थिती कशी आहे? किती लोक एक वेळा जेमतेम खातात आणि किती उपासमारीने मरत आहेत? भिकारी लोकांची, लंगड्या पांगळ्या वेड्या लोकांची संख्या का वाढत आहे? त्यांच्या जगण्यामरण्याची कोणी विचारपूस करतात का नाही? वर्षभर शेतात राबूनही शेतकरी भिकेला का लागला? शेकडो जमातींची दिनचर्या अनेक घाणेरड्या रूढींनी कशी पाशवी अवस्थेला पोचली आहे? व्यसनातिरेकांनी कुटुंबेच्या कुटंबे उकीरड्यावर कशी झुगारली जात आहेत? सावकारांचा नि सत्ताधा-यांचा जुलूम गावोगाव कसा होत आहे? इत्यादि प्रश्नांची त्या मठ-पीठ-पूजक अध्यात्मवादी गबरूंना चिंता पर्वा दिक्कत लवमात्र नसते. तू तो राम सुमर, जग लढवा दे, हा एकच त्यांचा खाक्या! बुवाबाजीच्या जाळ्यात अडकलेल्या हरएक बाई-बुवाची विवंचना स्वर्गलोकच्या साधनासाठी. तेवढ्यासाठी मारे कथा, कीर्तने, पुराणे नि भजनांचा आटोकाट अट्टहास अखंड चालू.

  •  कथा कीर्तनांनी केले काय?

कथा, कीर्तने, पुराणे आणि भजने या संस्था ब-याच जुन्या आहेत. लोकांत धर्मजागृति केल्याची पुण्याई त्यांच्या पदरी बांधण्याचा एक संभावित शिरस्ता आहे. ती धर्मजागृति कोणती? कथा, कीर्तन, पुराण भजन, वाटेल ते ऐका, त्यात प्रवचनाचा मुख्य ओढा गूढ अशा अध्यात्माच्या काथ्याकूटाकडे. ते अध्यात्म खुद्द कथाकाराला नि पुराणकारालाही उमजलेले नसायचे. फक्त पोथीतल्या जडबंबाळ शब्दांची ते नुसती पोपटपंची करतात. आत्मा, परमात्मा, योग, सिद्धी, समाधी, गुरूपदेश, सदेही विदेही मोक्ष इत्यादि शब्दांची भरमसाट पेरणी केली का चढला कथा-पुराणांना रंग. सारे श्रोते मोक्षानंदात डुलत रहायचे. कथा-पुराण संपून उठले का झाडलेल्या उपरण्याच्या फटका-यातच ते सारे ब्रह्मज्ञान झटकून जायचे. कोरडा पाषाण श्रोता घरी आल्यावर विचारले का, `काय आज कशा कशी काय झाली?’ तर उत्तर काय? `वा वा वा! बुवा मोठे विद्वान. बहुश्रुत. अधिकारी. संगीताची साथ पण छानदार. खूप रंग भरला, खूप रंग भरला.’
कथा पुराणांनी गेल्या दोन तीनशे वर्षांत खरोखरच काही धर्मजागृति केली असती तर हिंदु जनतेला आजची हीन, दीन, लीन, क्षीण अवस्था आलीच नसती. भजनांनी मागासलेल्या समाजात धर्मजागृति केली म्हणावी तर तेथेही हाच परिणाम दिसून येतो. कथा पुराण भजनांनी लोकांत देवभोळेपणा, भिक्षुक बडवे बामणांचा वरचढपणा, भलभलत्या दान-दक्षणांचे घाणेरडे प्रघात, इहलोकाविषयी नि स्वतःविषयी तिटकारा आणि परलोकाच्या प्राप्तीसाठी काळीजतोड विवंचना, बायका-मुले संसार व्यवहाराचा पातकीपणा, तीर्थयात्रांचे दान-पिंडांचे भिक्षुक-भोजनांचे गोदानांचे फाजील स्तोम, धातू दगडधोंड्यांच्या मूर्तिपूजनांचा अट्टाहास, उपासाचा बडेजाव, अशा हजार भिकारड्या भानगडी फैलावण्याचे कर्म मात्र केलेले आहे.
तीनही लोकी श्रेष्ठ असलेल्या (?) ब्राह्मण कथा-पुराणकारांनीच असले भलभलते प्रचार कथापुराणांतून फैलावल्यावर, अनाडी लोकांनी जाखाई, जोखाई, मरीआई, म्हसोबा, बहिरोबा, खंडोबा वगैरे शेकडो गावठी दैवतांची पैदास करून त्यांनाही कोंबड्या-बक-यांचे बळी देऊन संतुष्ट करण्याचा कारखाना खेडोपाडी धूमधडाक्याने चालवला, तर त्यात नवल कशाचे? नाक्यानाक्यावरील ओसाड जागेत एकेक गावदेव ठाण मांडून बसला आणि आवस-पुनवेला कोंबडी बकरी दारूचा नैवेद्य हबकू लागला. माणसांच्या अंगातही तो घुमू लागला. असल्या घुम्यांचा एक पंथच निर्माण झाला. घरात तापसरायी येवो अथवा गावात पटकीचा आजार फैलावो, औषधोपचाराऐवजी सगळ्या गावक-यांची भिस्त देव-खेळव्या घुम्या भगतावर. भटाभिक्षुकांप्रमाणे घुम्या भगत सांगेल ती पूर्व. त्याचा हुकूम व्हायची थातड का गावदेव नि गावदेवीपुढे धडाधड झाल्याच चालू कोंबड्या बक-यांच्या कंदु-या आणि दारूचे पाट. पावसाचे अवर्षण पडले, खेळवा दे. गावकीचे तंटे पडले, लावा देवाला कळी आणि घ्या त्याचा निकाल. घरात मूल जन्माला आले, एकाद्याचे लग्न निघाले किंवा कोणी मेला, तरी दगड्याधोंड्या गावदेवाला कोंबडे, बकरे नि दारू दिलीच पाहिजे. सारा गाव मग झिंगून तर्र! आणि हे सारे कशासाठी? तर देवाधर्माच्या सांगतेसाठी. दस-याला रेड्याचे बलिदान हवेच. नाहीतर रोगरायीच्या तडाक्यात गावाची मसणवटी व्हायची. शिवाय, त्या रेड्याच्या बलिदानात गावमहारांचा नि गावपाटलांचा मोठ्ठा मान असायचा. पटकीचा रोग आला आणि सगळीकडे दुष्काळ असला तरी भीक मागून खंडीवरी तांदळाच्या भाताचे गाडे भरायचे, त्यावर गुलाल शेंदूर उधळायचा, जागोजाग कोंबडी, बकरी कापीत, रक्ताचे सडे पाडीत पाडीत, मरिआईच्या गाड्याचीमिरवणूक गावाबाहेरच्या वेशीवर नेऊन सोडायची. याचा अर्थ, एका गावाची इडापीडा दुस-या गावाच्या वेशीवर नेऊन टाकायची असा असल्यामुळे, त्या गावचे लोक काठ्या, बडगे, भाले-बरच्या घेऊन मरिआईच्या गाड्याला विरोध करायला अस्तन्या सरसावून उभे असतात. आमच्या गावाच्या वेशीवर गाडा आणू नका, दुसरीकडे न्या, आणाल तर याद राखा, डोकी फुटतील. या धमक्यांच्या हाका आरोळ्या चालू होतात. गाडा कोणीकडेही नेला, तरी कोणत्या ना कोणत्या गावाची वेस असणारच तेथे. हरएक वेशीवर गावगुंड तयारच असतात मग काय? कचाकचीची मारमारी होते आणि प्रकरणे जातात फौजदारी कचेरीत. तालुक्याच्या वकिलांची पोळी पिकते. जखमी लोकांनी दवाखाने फुलतात. कधीकधी मारामारी टाळण्यासाठी मरिआईचा शेंदूर गुलालानी माखलेल्या खंडीभर भाताचा गाडा तेथेच वेशीवर टाकून बैलांसकट गावकरी माघारी पळतात, कुत्री कावळे सुद्धा तो भात खात नाहीत. कुजून जातो तसाच उकीरड्यावर.
देवाधर्माच्या नावावर शहरांत नि खेड्यांत शेकडो वर्षे चालू असलेल्या असल्या प्रकारांची यादी फार मोठी नि लांब आहे. कथापुराणकार शहरी शहाण्याना मोक्षाच्या नादी लावून लुटीत असतात आणि खेड्यापाड्यातल्या अडाणी म्हणूनच मूर्ख रयतेला गावजोशी, कुलकर्णी, तलाठी, पाटील आणि देवभगत शेकडो फंदांत नादाला लावून हवे तसे पिळीत छळीत असतात.
काही फिरते भजनी संत खेड्यापाड्यांत गेले आणि त्यांच्या कीर्तन-भजनांचा धुमाकूळ चालू झाला, का त्यांच्याही शिकवणीत संसार असार आहे, माणसाचे जीवन पाण्याचा बुडबुडा आहे, कधी फटकन फुटेल त्याचा नेम नाही, बायका पोरे, धनदौलत, घरदार, शेतीवाडी सगळे इथच्या इथे राहणार, बरोबर काही येणार नाही, अखेर चला लंगोटा छोड ही अवस्था. तेव्हा या सगळ्यांचा त्याग करून पंढरीच्या वा-या करा. तो पंढरीनाथ तुमचे तारण करील. रात्रंदिवस विठ्ठल नामाची गर्जना करा. एकादशीचे कडकडीत उपास करा. आषाढी कार्तिकी पंढरपूरची वारी पायी करा. असल्या उपदेशाचा तडाका चालू व्हायचा. हजारो खेडूत त्या बुवांच्या नादाला लागतात. घरदार धुवून त्यांच्या झोळ्या भरतात. रोजगार व्यवहाराकडे पाठ फिरवून बेकार भणंग होतात. ``तू तो राम सुमर, जग लढवा दे’’ असल्या बेफिकिरीने पंढरीचे वारकरी बनतात. तेथेही त्यांना लुटणारे आणि कुटून काढणारे बडवे आणि भजनी टाळकुटे तयारच असतात. उपाशी तापाशी बेभान टाळ कुटीत नाचणा-या असल्या कंगाल वारक-यांची `अहाहा, केवढी ही विठ्ठलभक्ती आणि केवढा हा नामाचा महिमा’ असे म्हणून वाहवा करणारे लफंगे लोक आजूबाजूला उभेच असतात. त्यांच्या चिथावणीने त्या पोकळडोक्या वारक-यांना आणखीच चेव येतो आणि मोक्षाचे सारे गाठोडे या कंगाल वारकरी जीवनातच आहे, अशा समजुतीने तो त्याच भिकारड्या निष्क्रिय भीकमाग्या आयुष्याचा अभिमानी बनतो. महाराष्ट्रातले लक्षावधी धट्टेकट्टे पुरुष आणि बाया या वारकरी फंदात सापडून स्वार्थाला नि परमार्थाला सफाचट मुकलेले दृष्टीस पडतात.वारकरी पंथाने धर्म जगवला म्हणतात तो हा असा!  संसारात, व्यवहारात कायमच्या नालायक ठरलेल्या आणि देशाला जडभार झालेल्या लक्षावधी नादान बायाबुवांचा वेडपट समुदाय म्हणजेच वारकरी पंथ, अशी व्याख्या करावी लागते. खेडूत मूळचेच नाक्षर, अडाणी म्हणून अविचारी. केवळ मेंढराची जात. दाढीवाल्या बोकडाच्या मागे मुंड्या खाली घालून सगळे जाणारे. तो त्यांना चरायला कुरणात  नेतो का मरायला सरणात नेतो याची चौकशी ते करीत नाहीत. असले अनाडी लोक देहाच्या सार्थकासाठी (म्हणजे कशाच्या? तेही त्यांना अवगत नसतेच.) वारकरी कळपात घुसले, तर त्यांना फारसा दोष देता येणार नाही.
पण आश्चर्याची गोष्ट अशी की अलीकडे गेल्या ५०-७५ वर्षांत कित्येक पांढरपेशा पदवीधर भटा-बामणांनी टाळमाळधारी वारक-यांचे सोंग घेऊन शिंगे मोडून वासरांत घुसण्याचा एक जंगी व्यापार चालू केला आहे. एडिटरकी, मास्तरकी किंवा प्रोफेसरकीच्या उद्योगापेक्षा हा विठ्ठले माझे आई भजनाच आणि ज्ञानदेव तुकाराम संकीर्तनाचा धंदा त्या लोकांना चांगला किफायतशीर झालेला आहे. आधीच भटाची जात सुशिक्षित. कथा, पुराण, प्रवचने सांगण्यात पिढ्यानपिढ्या जिभली सरावलेली आणि सवकलेली. तशात पाश्चिमात्य इंग्रेजी ज्ञानाची भर. कोणताही अध्यात्माचा मुद्दा उलट सुलट झकास विधानांनी रंगवून सांगण्याची सफाई. शहरी शहाण्यात मानकरी, म्हणून खेडुतांनाही त्यांच्या पांडित्याचा मोठा वचक, दरारा नि आदर. असलेही लोक जेव्हा हरिनामाशिवाय मोक्ष नाही, संसार असार आहे, बायका, पोरे वैरी आहेत, अंतकाळी आपले आपण, देहाचे सार्थक करण्यासाठी या मायामोहातून बाजूला झालेच पाहिजे, असा उपदेशाचा तडाका चालू करतात, तेव्हा अडाणी खेडुतांनाही ते हडसून खडसून पटते आणि ते त्यांच्या भजनी लागतात. गुरुदेव म्हणून त्यांच्या पाया पडतात, पायांचे तीर्थ घेतात, त्यांच्या मठासाठी घरेदारे धुतात, काय वाटेल ते करतात. भिक्षुकाचा धंदा बसला. ज्योतिषावरही पोट भरण्याची पंचाईत पडू लागली. मास्तरकी, कारकुनीतही आता काही दम राहिला नाही. म्हणून डोकेबाज भटजी वारकरी बनले. येथे मात्र त्यांना अनुयायी भगतांची उणीव केव्हाच पडत नाही. संसार असार आहे, एक हरिनाम सत्य आहे, हे बडबडत असताना, या वारकरी सोंगाच्या भटा-बामणांचे संसार मात्र आपोआप सोन्या चांदीच्या मुलाम्याने चमकत असतात. विठ्ठलनामाचा केवढा बरे हा प्रताप!
शिवपूर्वकाली आणि कदाचित शिवकाली, मुसलमानांच्या धार्मिक आक्रमणाला तोंड देण्यासाठी, विठ्ठलनाम संकीर्तनाने आणि पंढरपूरच्या वारकरी संप्रदायाने, हिंदु संघटनेचे काही कार्य केले असले, (मला तर शंकाच येते,) तरी त्यानंतर या संप्रदायाने हरएक म-हाठी हिंदूला माणसातून उठवण्याची आणि व्यवहारी कर्तृत्वाला मुकवण्याची दुष्ट कामगिरीच केलेली आहे. पाच पन्नास लाख लोक पिढ्यानपिढ्या संसार-व्यवहाराला रामराम ठोकून, देहसार्थकाच्या सबबीखाली आणि मोक्षाच्या आशेने गळ्यात माळा घालून टाळ कुटीत जगण्याचा धंदा करीत आढळावे, ही महाराष्ट्राच्या भवितव्यतेवरची मोठी भयंकर आपत्ती आहे.

  •  देव वादाचा फैलावा

देवधर्माच्या या टाळाकुटी फिसाटाच्या जोडीनेच दुसरे एक महापाप लोकांच्या बोकांडी बसलेले आहे. ते म्हणजे दैववादाचे. जो पहावा तो दैव दैव करीत कपाळाला हात लावीत असतो. सर्व होणे जाणे तुझ्या हाती  ही देवापुढची कबुली. माणूस म्हणजे कोणी नाही. हवेत उडालेला क्षुद्र पाचोळा. त्याच्या नशिबाची वावडी देवकृपेच्या वा-यावर उडणारी. त्याला स्वतःला काही कर्तृत्व नाही, दैवाच्या अनुकूळतेशिवाय त्याच्या हातून काही घडणारे नाही. दैवाचे प्रतिकूळ वारे अथवा वादळ टाळण्यासाठी देवाच्या आराधनेशिवाय दुसरा मार्गच नाही. देवभक्तीचा आटारेटा करूनही स्वतःचे नि संसाराचे वाटोळे झाले तरी दैवरेषेपुढे कोणाचे काय चालणार? या समजुतीचे समाधान मानायलाही त्याची तयारी. शहरी शहाणा घ्या अथवा खेडूत अडाणी घ्या, सारे दैव-दैव-वादाच्या जंजाळात गुरफाटलेले. माणुसकीचीही चाड कोणात उरलेली नाही. मग भूतदयेची शुद्ध राहतेच आहे कुणाला? ``ज्या देशात भविष्यवादी ज्योतिषांचा धंदा भरपूर चालतो, तो देश हव्या त्या आक्रमकांनी मन मानेल तेव्हा पायदळी तुडवून गुलाम करावा,’’ हाएका पाश्चात्त्य तत्त्वज्ञाचा इषारा भारताच्या इतिहासाला अगदी फिट लागू पडतो.
देव-दैव-वादाच्या भ्रमाने आमची मनेच साफ मारून टाकली आहेत. कोणी कितीही शिकलेला असो, भविष्य पाहिल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. या एकाच नाजूक भावनेचा पुरेपूर फायदा धंदेबाज ज्योतिषी आणि अलिकडे वृत्तपत्रकार घेतात आणि पोटे भरतात. म्हणजे दैववादाने आमच्या लाज-शरमेचेही वाटोळे केले, असे म्हणायला हरकत नाही. खेडेगावांत ग्रामजोशाचा थाट दर्जा नि अधिकार सांगायलाच नको. पाळण्यापासून सरणापर्यंत, फार काय सरणावर जळून खाक झाल्यानंतरही, त्याच्या पंचांगातील मुहूर्तावर ग्रहमानावर आणि सल्ल्यावर खेडुताचे जीवन चालले. त्याने साडेसाती वर्तवली का मारुतीच्या तेल शेंदरासाठी आणि शनवारच्या एकादशणीसाठी, लागलीच जोशीबुवांची कातरणी खेडुताच्या फाटक्या खिशाला.
देवांचे नवस हा सुद्धा दैववादाच्या पोटी जन्मलेल्या व्यसनांचा एक भाग आहे. अमूक झाले तर सत्यनारायण करीन. कोंबडे बकरे देईन. भट-भाजन घालीन. असल्या नवसांनी आपण देवाशी व्यापारी बहाणा करतो, याचे आजही कोणाला भान असल्याचे दिसत नाही. नवस केला का काम फत्ते, हीच ज्याची त्याची समजूत. मुलांसाठी नवस. जुगारीसाठी नवस, नोकरीसाठी नवस, बायको मिळण्यासाठी आणि मिळालेली पळाल्यास परत येण्यासाठी नवस, परीक्षेत पास होण्यासाठी नवस, खटला जिंकण्यासाठी नवस, आजारातून बरे होण्यासाठी नवस, अशा नवसांच्या परवडी सांगाव्या तेवढ्या थोड्या.
या नवसांची एक मजेदार गोष्ट ऐका. पुणे शहरात मारुती नि म्हसोबा यांची गचडी फार. त्यांची नावेही चमत्कारिक नि कित्येक तर अश्लील असतात. कचकावून नवसाला पावणारा म्हसोबा पुण्याला जसा आहे, तसा एक शेण्या मारुतीशनिवार पेठेत आहे. परीक्षेची पोरे त्याला नवस करतात. ``देवा बाप्पा मारुतीराया, मी पास झालो तर तुला शेंदूर पेढे वाहीन.’’ मारुतीचा आणि परीक्षेचा संबंधच काय? काही पोरटी पास होतात, ती मारुतीला शेंदूर फासून लालेलाल करतात. मागाहून नापास झालेली पोरटी येतात आणि त्या शेंदरावर शेण थापून मारुतीला माखतात. पासवाल्यांचा शेंदूर आणि नापासवाल्यांची कचकावून शेणथापणी अशा दुहेरी रंगरंगोटीने त्या मारुतीच्या मूर्तीचे हालहाल होतात.
देववादाच्या पाठपुराव्यासाठी निपजलेल्या दैववादाने हिंदु लाकांची अतोनात अवनति केलेली आहे.दगड-माती-धातूचे देव-देवी आणि त्यांच्यासाठी देवळांची पैदास भरमसाट झाल्यामुळे, माणूस स्वतःशी तर बेमान झालाच, पण माणुसकीची किंवा भूतदयेतीही त्याला कसली पर्वा अथवा संवेदना राहिलेली नाही. हिंदुस्थानातले हिंदुधर्मी लोक हव्या त्या जुलुमाला अन्यायाला नि गुलामगिरीला मिटल्या तोंडी सहन कसे नि का करतात? याचे कोडे विचारवंत चिकित्सक पाश्चात्त्यांना बरेच वर्षे सुटत नव्हते. सत्याची चाड नाही, असत्याची अन्यायाची चीड नाही, हवा तो आक्रमक येतो आणि बेलाशक त्यांना तुडवून शिरजोर होतो. पण हे लोक हूं का चूं काही करीत नाहीत! आजवरच्या परक्यांच्या सर्व भारतीय आक्रमणांचे गूढ हिंदूंच्या या दैववादी पिण्ड प्रकृतीतच सापडते. एवढे मोठे शुर पराक्रमी रजपूत राजे. मोगलांच्या किल्ल्याला वेढा पडला, त्यांची बाणाबाणी गोळागोळी चालू झाली, तरी ज्योतिषाला बोलावून प्रतिकाराचे तोंड कधि नी कोणत्या मुहूर्तावर द्यायचे याचा त्याला सल्ला विचारीत असत. असल्या नादान दैववादी राजवटीची मोगलांनी चकणाचूर केला नसता तरच ते एक मोठे आश्चर्य झाले असते. कर्तबगारी थंड पडली का माणूस कुंडल्यांतल्या शनि-मंगळादि ग्रहांची चौकशी करु लागतो. या एकाच रोगाने महाराष्ट्र सध्या पुरा पझाडलेला असल्याने, हरएक क्षेत्रात त्याची पिछेहाट होत चालली आहे. ”निवडणूकीत यशस्वी होईन का?” याचे ग्रहमान पाहून उत्तरासाठी १० रुपयांची मनिऑर्डर पाठवा, अशी एका पुण्याच्या ज्योतिषाची केसरितील जाहिरात पाहील्यावर हा दैववादाचा रोग किती भडकलेला आहे, याची खात्री पटली.

  • देवळांचा सुळसुळाट

धर्माची देवळे नि देवळांचा धर्म हे एक हिंदु धर्माचे आणि समाजस्वास्थ्याचे महाभयंकर पाप होऊन बसले आहे. हिंदुस्थान दरिद्री झाला, मातीतून सोन काढणारा शेतकरी वर्ग भिकेला लागला, देशी धंदे ठार मेले, मध्यमवर्ग नामशेष झाला, शिक्षित पदवीधारांची बेकारी बोकाळली , असला आरडाओरडा करण्यातच राजकारणी अकलेच्या कवायती करणार्‍या ब्रम्हांडपंडिताना हिंदूच्या देवळांत किती अपार संपत्ति निष्कारण अडकून पडली आहे आणि तिचा उपयोग गोरगरिबांच्या उध्दारासाठी न होता, लुच्चा लफंग्या चोर जार ऎदी हलकटांच्या चैनीसाठी कसा होत आहे, याची दखल घेण्याची अक्कल अजूनहि सुचलेली नाही. दुष्काळाने कोट्यावधि लोक अन्न अन्न करुन मेले तरी देवाना शिरा केशरि भाताचा नैवेद्यी अखंड चालूच आहे. लाखो श्रमजीवी कर्तबगार तरुण उदरभरणासाठी भयाभया करीत फिरत असले, तरी अब्जावधि रुपयांचे जडजवाहीर आणि सोन्यामोत्यांचे दागिने देवळी देवांच्या अंगावर चढलेले आहेतच. देशाला शेतकरि आणि कामकरी कळणा कोंड्याच्या आणि घोंगडीच्या ठिगळाला महाग होऊन देशोधडीला लागला तरी देवळांतल्या पुजारी आणि सेवेकरी नि बडवे भटसेनेच्या पोटाच्या चढत्या कमानीला तिळएवढाही खळगा आजवर कधी पडला नाही. ”विद्येची चार अक्षरे शिकवा हो शिकवा” असा शेकडा ९६ जीवांचा गेली शंभर वर्षे सारखा कंठशोष चालला असंताहि देवळांतल्या घुमटांखाली लाखो महामुर्ख भट गोसावडे गंजड भंजड नि ट्गे गंध भस्म रुद्राक्ष्यांच्या पुण्याईवर पोट फुटून वांति होई तो परार्धावरी पल्ले धान्यांचे बिनबोभाट फडसे पाडीत असतात. देवळांच्या छ्परांखाली ब्रम्हचार्‍यांचे वंश किती वाढतात, पति नसतानाही किती विधवा पुत्रवती होतात, किती गोसावडे सावकारी करतात, किती गुरुमहाराज मठ गोकुळातल्या चिखलात कटीबंध बुडतात आणि किती पळपुट्या छंगीभंगी ट्ग्यांचे थर तेथे खुशालचेण्डुप्रमाणे निर्घोर जिवन कंठीत असतात याची, स्वताच्या किंवा पूर्वजांच्या स्मारकांसाठी देवळे बांधणारांनी आणि देवळे म्हणजे धर्मस्थाने समजून आंधळेपणानी त्यांची जोपासना करणारानी दखल घ्यायला नको काय? आज देव देवळांच्या निमित्ताने अब्जावधि रुपयांची संपत्ति हिंदुस्थानात निष्कारण अडकून पडली आहे. आणि ईकडे आमच्या भारत राष्ट्राचा पाय आंतरराष्ट्रीय कर्जाच्या बिनबुडाच्या कर्जात खोल खोल जात आहे. या परिस्थितीचा एकाहि मुत्सद्याने किंवा संताने विचार केलेला दिसत नाही. अनाथ बालकाश्रम , अनाथ विधवाश्रम , गोरक्षण कॄष्ठरोगी लंगडे पांगळे यांचे आश्रम , मागासलेल्या समाजांतील मुलांमुलींचे शिक्षण , कितीतरी समाजजीवनाच्या जगण्यामरण्याचे प्रश्न आहेत. ते सोडवणाराना प्रश्न आहेत. ते सोडवणाराचा घरोघर दारोदार भीक मागावी लागते आणि देव आणि देवळांच्या दगडी प्रतिष्ठेसाठी करोडे रुपयांची संपत्ति शतकान- शतके तळ्घरात गाडलेली राहते, या नाजुक मुद्याचा आजवर एकालाही घाम फुटलेला नाही.
देश-देव - धर्माच्या या असल्या विलक्षण आणि माणूसघाण्या परिस्थितीच्या पार्श्वभागावर उभे राहून डेबूजी गाडगे बाबांच्या सेवा- धर्माची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. मोठमोठ्या शहरांपासून तो ५-१० झोपड्यांच्या कोनाकोपर्‍यांतल्या खेड्यापर्यंत सर्वत्र भट्कंती करीत असताना त्यांची समाज-जीवनाची बारीक सूक्ष्म टेहळणी सारखी चाललेली होती. अत्यंत मागासलेल्या शेतकरी खेडूती समाजात त्यांचा जन्म , त्या समाजाच्या मानसिक शारिरिक आर्थिक सर्व हालापेष्टांचा त्याना पुरा अनुभव . रक्त थिजून -हाडे पिचेपर्य्अन्त शेताची माती तिंबवली तरी सुखाचा घास तोंडात पडत नाहि. वरिष्ठ वर्गाची गुलामगिरी पिढ्यानपिढ्या अखंड चालूच . देवाधर्माच्या आणि रुढीच्या नावावर जागोजाग पशु पक्ष्यांची हत्या बेगुमान चाललेली, गरिबानी मरावे नि श्रीमंतानी मनमुराद चरावे हा समाजव्यवस्थेचा द्ण्डक, गरिबाना गरिबीची लाज नाही. खंत नाही. जीवन सुधारण्याची महत्त्वाकांक्षाही नाही. नाक्षर अडाणी म्हणून आस्ति-नास्ति विचार करण्याची अकलेला सवय नाही. ”ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ति असो द्यावे समाधान.” महार मांगादि जमातीनी इतरांपासून दुर खोर्‍यांतच का रहावे? कुष्ठरोगी वेडे लुळेपांगळे यांची समाजाने कसलिही दाद का घेऊ नये? देव देवळांचा जागोजाग एवढा ऎश्वर्याचा बडीवार चालला असतांहि , गोरगरिबांच्या तोंडांत वर्षातून एकदाहि कोणी साखरेची चिमूट, गुळाचा खडा किंवा तुपाचा थेंब कां घालू नये? यात्रेच्या ठिकाणी भिक्षुक बडव्यांच्या मनस्वी त्रास जाच सोसून लाखो लोक मेण्ढरांसारखे कां जातात? तेथे त्यांच्यापासून पैसे उकळून काढले जातात, पण अन्नपाणी आसर्‍याची निवर्‍याची सोय कां करीत नाहीत? अशा शेकडो प्रश्नांचे डेबूजी आपल्या मनाशी चिंतन करीत असे.तीक्ष्ण निरीक्षणांचे सिध्दांत.

देवधर्माच्या या टाळाकुटी फिसाटाच्या जोडीनेच दुसरे एक महापाप लोकांच्या बोकांडी बसलेले आहे. ते म्हणजे दैववादाचे. जो पहावा तो दैव दैव करीत कपाळाला हात लावीत असतो. सर्व होणे जाणे तुझ्या हाती  ही देवापुढची कबुली. माणूस म्हणजे कोणी नाही. हवेत उडालेला क्षुद्र पाचोळा. त्याच्या नशिबाची वावडी देवकृपेच्या वा-यावर उडणारी. त्याला स्वतःला काही कर्तृत्व नाही, दैवाच्या अनुकूळतेशिवाय त्याच्या हातून काही घडणारे नाही. दैवाचे प्रतिकूळ वारे अथवा वादळ टाळण्यासाठी देवाच्या आराधनेशिवाय दुसरा मार्गच नाही. देवभक्तीचा आटारेटा करूनही स्वतःचे नि संसाराचे वाटोळे झाले तरी दैवरेषेपुढे कोणाचे काय चालणार? या समजुतीचे समाधान मानायलाही त्याची तयारी. शहरी शहाणा घ्या अथवा खेडूत अडाणी घ्या, सारे दैव-दैव-वादाच्या जंजाळात गुरफाटलेले. माणुसकीचीही चाड कोणात उरलेली नाही. मग भूतदयेची शुद्ध राहतेच आहे कुणाला? ``ज्या देशात भविष्यवादी ज्योतिषांचा धंदा भरपूर चालतो, तो देश हव्या त्या आक्रमकांनी मन मानेल तेव्हा पायदळी तुडवून गुलाम करावा,’’ हाएका पाश्चात्त्य तत्त्वज्ञाचा इषारा भारताच्या इतिहासाला अगदी फिट लागू पडतो.

देव-दैव-वादाच्या भ्रमाने आमची मनेच साफ मारून टाकली आहेत. कोणी कितीही शिकलेला असो, भविष्य पाहिल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. या एकाच नाजूक भावनेचा पुरेपूर फायदा धंदेबाज ज्योतिषी आणि अलिकडे वृत्तपत्रकार घेतात आणि पोटे भरतात. म्हणजे दैववादाने आमच्या लाज-शरमेचेही वाटोळे केले, असे म्हणायला हरकत नाही. खेडेगावांत ग्रामजोशाचा थाट दर्जा नि अधिकार सांगायलाच नको. पाळण्यापासून सरणापर्यंत, फार काय सरणावर जळून खाक झाल्यानंतरही, त्याच्या पंचांगातील मुहूर्तावर ग्रहमानावर आणि सल्ल्यावर खेडुताचे जीवन चालले. त्याने साडेसाती वर्तवली का मारुतीच्या तेल शेंदरासाठी आणि शनवारच्या एकादशणीसाठी, लागलीच जोशीबुवांची कातरणी खेडुताच्या फाटक्या खिशाला.
देवांचे नवस हा सुद्धा दैववादाच्या पोटी जन्मलेल्या व्यसनांचा एक भाग आहे. अमूक झाले तर सत्यनारायण करीन. कोंबडे बकरे देईन. भट-भाजन घालीन. असल्या नवसांनी आपण देवाशी व्यापारी बहाणा करतो, याचे आजही कोणाला भान असल्याचे दिसत नाही. नवस केला का काम फत्ते, हीच ज्याची त्याची समजूत. मुलांसाठी नवस. जुगारीसाठी नवस, नोकरीसाठी नवस, बायको मिळण्यासाठी आणि मिळालेली पळाल्यास परत येण्यासाठी नवस, परीक्षेत पास होण्यासाठी नवस, खटला जिंकण्यासाठी नवस, आजारातून बरे होण्यासाठी नवस, अशा नवसांच्या परवडी सांगाव्या तेवढ्या थोड्या.

 या नवसांची एक मजेदार गोष्ट ऐका. पुणे शहरात मारुती नि म्हसोबा यांची गचडी फार. त्यांची नावेही चमत्कारिक नि कित्येक तर अश्लील असतात. कचकावून नवसाला पावणारा म्हसोबा पुण्याला जसा आहे, तसा एक शेण्या मारुतीशनिवार पेठेत आहे. परीक्षेची पोरे त्याला नवस करतात. ``देवा बाप्पा मारुतीराया, मी पास झालो तर तुला शेंदूर पेढे वाहीन.’’ मारुतीचा आणि परीक्षेचा संबंधच काय? काही पोरटी पास होतात, ती मारुतीला शेंदूर फासून लालेलाल करतात. मागाहून नापास झालेली पोरटी येतात आणि त्या शेंदरावर शेण थापून मारुतीला माखतात. पासवाल्यांचा शेंदूर आणि नापासवाल्यांची कचकावून शेणथापणी अशा दुहेरी रंगरंगोटीने त्या मारुतीच्या मूर्तीचे हालहाल होतात.
देववादाच्या पाठपुराव्यासाठी निपजलेल्या दैववादाने हिंदु लाकांची अतोनात अवनति केलेली आहे.दगड-माती-धातूचे देव-देवी आणि त्यांच्यासाठी देवळांची पैदास भरमसाट झाल्यामुळे, माणूस स्वतःशी तर बेमान झालाच, पण माणुसकीची किंवा भूतदयेतीही त्याला कसली पर्वा अथवा संवेदना राहिलेली नाही. हिंदुस्थानातले हिंदुधर्मी लोक हव्या त्या जुलुमाला अन्यायाला नि गुलामगिरीला मिटल्या तोंडी सहन कसे नि का करतात? याचे कोडे विचारवंत चिकित्सक पाश्चात्त्यांना बरेच वर्षे सुटत नव्हते. सत्याची चाड नाही, असत्याची अन्यायाची चीड नाही, हवा तो आक्रमक येतो आणि बेलाशक त्यांना तुडवून शिरजोर होतो. पण हे लोक हूं का चूं काही करीत नाहीत! आजवरच्या परक्यांच्या सर्व भारतीय आक्रमणांचे गूढ हिंदूंच्या या दैववादी पिण्ड प्रकृतीतच सापडते. एवढे मोठे शुर पराक्रमी रजपूत राजे. मोगलांच्या किल्ल्याला वेढा पडला, त्यांची बाणाबाणी गोळागोळी चालू झाली, तरी ज्योतिषाला बोलावून प्रतिकाराचे तोंड कधि नी कोणत्या मुहूर्तावर द्यायचे याचा त्याला सल्ला विचारीत असत. असल्या नादान दैववादी राजवटीची मोगलांनी चकणाचूर केला नसता तरच ते एक मोठे आश्चर्य झाले असते. कर्तबगारी थंड पडली का माणूस कुंडल्यांतल्या शनि-मंगळादि ग्रहांची चौकशी करु लागतो. या एकाच रोगाने महाराष्ट्र सध्या पुरा पझाडलेला असल्याने, हरएक क्षेत्रात त्याची पिछेहाट होत चालली आहे. ”निवडणूकीत यशस्वी होईन का?” याचे ग्रहमान पाहून उत्तरासाठी १० रुपयांची मनिऑर्डर पाठवा, अशी एका पुण्याच्या ज्योतिषाची केसरितील जाहिरात पाहील्यावर हा दैववादाचा रोग किती भडकलेला आहे, याची खात्री पटली.

  • खबरदार, पायांना हात लावाल तर.

कीर्तनकार पुराणिक काय किंवा अध्यात्माच्या आवरणाने बनलेले साधू, संत, महंत काय, त्यांच्या पायांचे दर्शन आणि तीर्थ घ्यायला लोक नेहमीच धाधावले आढळतात. आणि तेही पठ्ठे, समाजाच्या मनोभावनांचा अंदाज घेऊन डोई टेकून नमस्कारासाठी आपापले पाय पुढे करतात. कित्येक संत नमस्काराला आलेल्या भगतांच्या डोक्यावरच आपले पाय ठेवतात. असे झाले म्हणजे झालो बुवा, पावन झालो, भवसागरातून मुक्त झालो, जन्म-मरणाचा फेरा चुकला, जीवन धन्य झाले, अशा समजुतीने भगत हुरळतात. डेबूजी गाडगे बाबांनी या अंधश्रद्धेच्या प्रघाताला पहिल्यापासूनच अगदी निकराने विरोध केलेला आहे. भेटेल त्याला ते स्वतः दोन हात जोडून मस्तक वाकवून दुरून प्रणाम करतात. पण कोणालाही आपल्या पायांना हात लावू देत नाहीत. माणसांनी माणसांच्या पायांवर का म्हणून डोके ठेवावे? आदर काय दुरून दाखवता येत नाही? अशी त्यांची आचार-विचारसरणी आहे.


ना बुक्का, ना माळ, ना मिठ्या
कीर्तन संपल्यावर कथेकरी बुवाच्या पायांवर लोळण घालण्याचा आणि आरतीत दिडक्या पैसे टाकल्यानंतर बुवांना आलिंगन द्यायचा एक जुना हरदासी प्रघात आहे. गाडगेबाबांनी कीर्तनात ना बुक्का, ना माळ, ना मिठ्या. तरीसुद्धा बाबांच्या कीर्तनातल्या हृदयस्पर्शी प्रवचनाना भारावलेल्या नि थरारलेल्या श्रोत्यांना त्यांच्या पदस्पर्शाची अपेक्षा नेहमीच मोठी ती टाळावी म्हणून कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी गाडगेबाबा जवळपास एखादी गुपचूप दडून बसण्याची जागा आधीच हेरून ठेवतात. अखेरचा हरिनामाचा कल्होळ चालू करून दिला का सटकन निसटून त्या जागी दडून बसतात. पुंडलीक वरदा हारि विठ्ठल होऊन लोक पाहतात तो काय? गाडगेबाबा गडप, गुप्त, अदृश्य! भराभर लोक त्यांना शोधायला सैरावैरा धावायचे. कित्येक वेळा त्यांच्या दडणीच्या जागेवरूनही जायचे. अखेर, बुवा देवावतारी. झाले. गुप्तच झाले. अशा कण्ड्या पिकायच्या नि भोळसट त्या ख-या मानायचे. अनेक वेळा `कीर्तन आटोपल्यावर मला तुझे कांबळे दे बरं का पांघरायला थोडा वेळ’ असे कुणाला तरी आधीच सांगून ठेवायचे आणि दडायची वेळ आली का ते कांबळे पांघरून घुंगट मारून तिथेच कुठेतरी काळोखात बसून रहायचे. कांबळे काळे नि काळोखही काळाच. इकडे बुवा गुप्त झाले म्हणून लोकांची उगाच धावपळ. अशा वेळी त्यांना विनोदाचीही हुक्की यायची. `अहो तो गोधड्याबुवा कुठं लपलाय ते मी दाखवतो चला.’ असे कांबळ्याच्या घुंगटातूनच काही लोकांना ते स्वतः सांगत. त्यांना वाटायचे का हा कुणीतरी असेल खेडूत श्रोत्यांपैकी एखादा घोंगड्या शेतकरी. लोक म्हणायचे-होय तर. तो लागलाय असा सहज सापडायला. देवरूपी तो. गेला पार कुठच्या कुठं पारव्यासारखा उडून. मग बुवाजी हळूच कांबळे बाजूला सारून प्रगट व्हायचे नि म्हणायचे, ``अहो, बाप्पानो, माणूस कधी एकदम असा गुप्त होईल काय? बोल बोलता तो काय हवेत विरून जाईल? बामणांची पुराणं ऐकून ऐकून भलभलत्या फिसाटावर विश्वास ठेवण्याची लोकांची खोड कधी सुटणार कोण जाणे.’’


अनेकनामी साधू
डेबूजीच्या या प्रांतोप्रांतीच्या भटकंतीत ठिकठिकाणचे लोक त्याला निरनिराळ्या नावांनी ओळखू लागले. व-हाडात त्याला डेबूजीबुवा किंवा वट्टीसाधू म्हणतात. नागपुराकडे चापरेबुवा म्हणतात. मद्रास नि कोकण विभागातगोधडेमहाराज. सातारा जिल्ह्याकडे लोटके महाराज. गोकर्णाकडे चिंधेबुवा. खानदेश, पुणे, बडोदे, कराची मोंगलाईत गाडगे महाराज इत्यादी अनेक नावांनी ते ओळखले जातात. सहवासातील नि निकट परिचयातील मंडळी त्यांना श्रीबाबा किंवा नुसते बाबा म्हणतात.


डेबूजीच्या कीर्तनातली नवी जादू
सर्व प्राणी भवसागरात जेहत्ते पडले आहेत. असा हरदासाने गंभीर ध्वनि काढून कथेला प्रारंभ करताच, हा एकटा हरदासच तेवढा काठावर धडधाकट उभा नि बाकीचे सगळे जग समुद्रास्तृप्यन्तु झाले असे कोणीही शहाणा कधी मानीत नाही. कथा-कीर्तन-पुराणकारांची ब्रह्ममायेची नि समाधिमोक्षाची बडबड सुद्धा – एक ठराविक संप्रदाय म्हणूनच एका कानाने ऐकतात नि दुस-याने बाहेर  सोडतात. त्यात त्यांना ना कसले आकर्षण, न आवड, ना काही राम. जुलमाचा रामरामच असतो तो! त्याच पौराणिक कथा नि तीच आख्याने आणि तेच बिनकाळजाचे पोपटपंची निरूपण. डेबूजीच्या कीर्तनातल्या आख्यान-व्याख्यांनांची त-हाच न्यारी. भूतकाळाच्या अंधारात चाचपडण्यापेक्षा, वर्तमानकाळाच्या गचांडीलाच त्याचा नेमका हात. हरिश्चंद्राचा नि नळ-दमयंतीचा वनवास कशाला? खरं खोटा, तो झाला गेला, कालोदरात गडपला. समोर कीर्तनाला बसलेल्या हजारो शेतकरी कष्टक-यांच्या वनवासावर नि उपासमारीवर त्याचा कटाक्ष. अडाणीपणामुळे डोकेबाज सावकारशाही त्यांना कसकशी फसवून लुटते. अनाक्षरतेमुळे गहाण-फरोक्ताचा भेद कसा उमगत नाही. आपली बाजू खरी न्यायाची असूनही खेडूत लोक कोर्टकचेरीच्या पाय-या चढायला कसे घाबरतात नि सावकार म्हणेल ते मेंढरासारखी मान डोलावून कबूल करतात. गोडगोड बालून रोजंदारीचा ठरलेला १२ आणे दाम हातावर ८ आणे टिकवून तो कसा फसवतो. अखेर स्वतःच्या मालकीच्या शेतीवर शेतक-याला आपला गुलाम बनवून कसा राबवतो आणि धान्याच्या भरल्या राशीपुढे उपाशी कसा मारतो, या अवस्थेचे शब्दचित्र आपल्या बाळबोध गावंढळ भाषेत तळमळीने रंगवू लागला का हजारो खेडूतांच्या डोळ्यांतून ढळढळा आसवांचे पाट वाहू लागायचे. ``तुम्ही निरक्षर राहिलात ते बस्स झाले. पण आता आपल्या मुलांमुलींना शिक्षण देऊन हुशार करा. गावात शाळा काढा.’’ हा त्याचा उपदेश श्रोत्यांच्या थेट काळजाला जाऊन भिडायचा.

  • कीर्तनातले तत्त्वज्ञान

परंपरेच्या ठराविक चाकोरीबाहेरचे नव्या विचारांचे तत्त्वज्ञान बहुजनसमाजाच्या गळी उतरवणे फार मोठे कठीण काम. मोठमोठ्या धर्म-पंथ-संस्थापकांनी हात टेकले आहेत. सत्यशोधनाचा नवा वळसा दिसला रे दिसला का बहुजनसमाज सटकलाच लांब दूर. पण डेबूजी गाडगे बाबांची शहामत मोठी! ते आपल्या तत्त्वचिंतनातले सत्यशोधक विचार बेडरपणाने बेधडक लोकांच्यापुढे कीर्तनांतून मांडतात आणि लोकांना ते पत्करावे लागतात. पट्टीच्या शहरी पंडितांना आजवर जे साधले नाही ते गाडगे बाबांनी करून दाखवले आहे आणि महाराष्ट्रभर आपल्या सत्यनिष्ठ अनुयायांची पेरणी केलेली आहे. टाळकुट्या भोळसट वारक-यांपासून तो कट्टर शहरी नास्तिकापर्यंत सगळ्या दर्जाच्या नि थरातल्या आबालवृद्ध स्त्रीपुरुषांनी गाडगे बाबा ३-४ तास आपल्या रसाळ कीर्तनाच्या रंगात कसे गुंगवून टाकतात, याचे शब्दचित्र काढणे माझ्या ताकदीबाहेरचे आहे. तो अनुभव ज्याचा त्यानंच स्वतः घेतला पाहिजे. तेव्हा, दुधाची तहान ताकावर भागवण्यासाठी त्यांच्या कीर्तनातले काही ठळक मुद्दे या ठिकाणी नमूद करतो.


(१) देवासाठी आटापिटी
बरं आता, देव म्हणजे काय? हे सांगणं कठीण आहे बाप्पा. शास्त्र पुराणं वेद यांचं हे काम. माझ्यासारख्या अनाडी खेडवळाला कसं बर ते सांगता येणार? पण माझ्या इवल्याशा बुद्धीप्रमाणे सांगतो. पटतं का ते पहा. हे सगळं जग निर्माण करणारी आणि ते यंत्रासारखे सुरळीत ठेवणारी आणि अखेर ते लयालाही नेणारी एखादी महाशक्ती असावी. तिला आपापल्या कुवतीप्रमाणे प्रत्येक धर्माने काहीतरी नाव नि रूप दिलेले आहे. नावरूपाशिवाय माणसाची समजूत पडत नाही. बरं आता देव कुठं आहे? संतशिरोमणि तुकोबाराय म्हणतात,
देव आहे तुझ्यापाशी । परि तू जागा चुकलाशी ।।
माझे भक्त गाती जेथे । नारदा मी उभा तिथे ।।
अशी एक कथा आहे की देवाचा महान भक्त नारद याने देवाचा ठावठिकाणा पत्ता विचारला. त्यावर देव सांगतात का मी वैकुंठात नाही, कैलासात नाही, कुठंही नाही. मग पत्ता? तर देव सरळ पत्ता देतात हे नारदा, माझे भक्त माझे गुणगान कीर्तन करीत असतील, तेथे द्वारपाळाची नोकरी करीत मी उभा आहे. मला दुसरीकडं कुठं हुडकण्याची नि पहाण्याची खटपट नको. देवाची जागा आपल्याला मालूम असताना आपण भुरळलो. भलभलत्या फंदाच्या नादी लागून भटकत आहोतत. इस्लाम धर्मात एक पुरावा आहे.
बंदे! तूं क्यूं फिरता है ख्वाब में, मैं हूं तेरे पास.
आपण हे सारं टाकलं आणि देवासाठी जत्रा यात्रा तीर्थक्षेत्रे धुंडाळू लागलो. यावर संतांचे इषारे काय आहेत पहा.
जत्रामे फत्तर बिठाया । तीरथ बनाया पाणी ।
दुनिया भई दिवाणी । पैसेकी धुळधाणी ।।
काशी गया प्राग त्रिवेणी । तेथे धोंडा पाषाण पाणी ।।
तीर्थवासी गेले आणि दाढीमिशा बोडून आले।।
पाप अंतरातले नाही गेले । दाढी मिशीने काय केले ।।
भुललो रे भुललो. आपण सारे भलतेच करू लागलो. तुकोबाराय म्हणतात.
शेंदून माखोनिया धोंडा । पाया पडती पोरे रांडा ।।
देव दगडाचा केला । गवंडी त्याचा बाप झाला ।।
देव सोन्याचा घडविला । सोनार त्याचा बाप झाला ।।
सोडोनिया ख-या देवा । करी म्हसोबाची सेवा ।।
दगडाला चार दोन आण्याचा शेंदूर फासून बायका मुलं घेऊन त्याच्या पाया पडता, तोंडात राख घालता, ही कायरे बाप्पा तुमची अक्कल? देवमूर्ती घडवणारे पाथरवट आणि सोनार हे तुमच्या देवाचे बाप का होऊ नयेत? चुकला. आपला रस्ता साफ चुकला. आपण खड्ड्याकडं चाललो आहोत. म्हसोबा मरीआईपुढं बचक बचक राख तोंडात टाकणारे धनी कधी हुशार सावध होतील देवच जाणे. आता आपलं सगळंच कसं फसत चाललंय ते पहा.

सवाल – जगात देव किती आहेत?

जबाब – (श्रोत्यांचा) – एक.

सवाल – देव एकच आहे, हे जर खरं तर आता खोटं बोलायचं नाही हो बाप्पा. आपल्या गावी खंडोबा आहे का नाही? (आहे.) मग आता देव किती झालं? (दोन.) आपल्या गावी भैरोबा आहे काय? (आहे.) आता देव किती झालं? (तीन.) आपल्या गावी मराई आहे का नाही? (होय, आहे.) आता देव किती झालं? (चार.)? आपल्या गावी म्हसोबा आहे का नाही? (आहे.) आता देव किती झालं? (पाच) पहिलं म्हणत होता देव एकच आहे म्हणून. मग हा कारखाना कुठं सापडला? आणि याची वाढ कुठवर लांबणार? अशा लोकांना तुकोबा म्हणतात, ``वेडं लागलं जगाला देव म्हणती धोंड्याला’’ मेंढे आहोत आपण. काही ज्ञान नाही.

एका तोंडाने म्हणायचे का देवाने आपणा सगळ्यांना आणि जगाला निर्माण केलं आणि गावोगाव पहावं तर दगडांना शेंदूर फासून हजारो लाखो देव तयार करण्याचा कारखाना आम्ही चालू ठेवलाय. अहो, बाप्पानो, दगड धोंड्यांना नुसता शेंदूर फासून जर त्याचा देव होत असेल आणि तो नवसालाही पावत असेल, तर मग एक चांगला मोठा डोंगर पाहून सपाटेबाज शेंदूर फासून त्याचा टप्पोरेबाज भला मोठा देव बनवता येईल आणि तो आपले मोठमोठाले नवस पण फडशा पाडीत जाईल. मग काय? शेती नको, कष्ट मेहनत नको, गुरंढोरं नको, त्या देवापुढं ऊद धुपाचा एक डोंगर धुपाटला का आपोआप शेती पिकून तयार. जमंल का हे असं केलं तर? (नाही, नाही, नाही.)  तर मग हा धंदा लबाडीचा आहे.



गाडगेबाबा - लोकांना उदेशून..... देव पहिला का देव ???

लोक - पहिला जी !!!!

गाडगेबाबा - कमाल आहे ... तुम्ही देव पहिला ...तुमचा देव कोठे राहतो....?????

लोक - आमचा देव देवळात राहतो तो रंगाने सावळां आहे , आमचा विठल विटेवर
उभा आहे , त्याच्या बाजूलारुखमाई आहे .

गाडगेबाबा - कमाल आहे तुमचा देव देवळात राहतो ... माझा देव मनात राहतो !!!

गाडगेबाबा - तुमचा देव आंघोळ करतो की नाही ????

लोक - करतो तर !!!

गाडगेबाबा - तुमच्या देवाले आंघोळ कोण घालते????

लोक - आम्हीच घालतो जी !!!!

गाडगेबाबा - अरे तुमच्या देवाले स्वतः ची आंघोळ स्वतःकरता येत नाही तो
तुम्हाले तुमच्या भाग्याची आंघोळ रे काय घालणार !!!!

गाडगेबाबा - तुमचा देव धोतर नेसतो की नाही ????

लोक- नेसते तर !!!

गाडगेबाबा - तुमच्या देवाले धोतर कोण नेसवते???

लोक - आम्हीच जी !!!

गाडगेबाबा - अरे...रे तुमच्या देवाले स्वतःचे धोतर स्वतः नेसता येत नाही
तो तुम्हाले तुमच्या भाग्याचं वस्त्र रे काय देणार !!!!

गाडगेबाबा - तुम्ही देवाले नैवैद्य दाखवता कीनाही ???

लोक - दाखवतो जी !!!

गाडगेबाबा - नैवैद्य दाखवून काय करता ???

लोक- नैवैद्याच्या बाजुलेकाठी घेऊन बसतो !!!!

गाडगेबाबा - कशाला ???

लोक - देवाला वाढलेले नैवैद्य खायला कावळा... कुत्रा आला तर त्याला
काठीने हाकलायला !!!

गाडगेबाबा - अरे ...रे ...जर तुमच्या देवाले स्वतःसाठीवाढलेल्या
नैवैद्द्याचे स्वतः रक्षणकरता
येत नाही तो तुमच्या आयुष्याचे रक्षण रे काय करणार ???

गाडगेबाबा - जीता-जागता देव कुणी पहिला आहे का?????????

लोक - मग लोक कावरया... बावऱ्या नजरेने एकमेकांकडे बघायचे आणि
गाडगेबाबांना नाही उत्तर द्यायचे ...

"गाडगेबाबांच्या बाजूला नेहमी एक माणुस उभा असायचा , रापलेला चेहरा ....
जाढे-भरढे खादीचे कपडे ... पांढरी शुभ्र दाढी ...पाय अनवाणी गाडगेबाबा
त्या माणसाकडे बोट दाखवत लोकांना सांगायचे

अरे....हे भाऊराव पाटील बघा हे गरीबाच्या....महारा-मांगाच्या पोरांना शिकवायचे
काम करते त्याला देव म्हणा .....

अरे.....ते बाबासाहेब आंबेडकर बघा देशासाठी मर-मर मारते त्याला देव म्हणा ....!!!!

अरे अडाण्याला शिक्षण द्यावं ...

बेघरांना घर द्यावं....

रंजल्या - गांजल्याची सेवा करावी ..

मुक्या प्राण्यावर दया करावी ...

बापहो देव यांच्यात राहतो, बापहो देव देवळात राहत नाही, देव आपल्या मनात राहतो.

देवळात फक्त पुजाऱ्याचे पोट राहते !!

  • साकार निराकाराचा वांझोटा वाद

अखिल विश्व निर्माण करणारा आणि ते सुयंत्र चालवणारा कुणीतरी असावा. त्याला देव म्हणा, परमेश्वर म्हणा, काय वाटेल ते नाव द्या. पण तो चार हातांचा आहे, आठ हातांचा आहे, भक्तांना स्वप्नांत दर्शन देतो, मोठा प्रकाश पाडतो, भक्तांना साक्षात्कार होतात, या गोष्टी थोतांड आहेत, असा बाबा सिद्धांत सांगतात. `स्वतःची बुवाबाजी माजविण्यासाठी या थोतांडाचा मतलबी लोक मोठा व्यापार करतात. त्यापासून शहाण्याने सावध असावे.’
``माणूस देवाचे चित्र काढतो, मूर्ती बनवतो आणि आपलेच चित्र उभे करतो आणि त्याला देव समजून लोटांगणे घालतो. माणसासारखाच देव असता, तर देवाला साधले ते माणसानाही साधले असते. देव सगळ्यांना सारखा पाहणारा. किडी मुंगीपासून सगळ्यांवर त्याची दया सारखी. मग अमक्याला दर्शन दिले नि तमक्याला द्यायचे नाही, असला भेदाव त्याच्यापाशी का असावा? माझी खात्री झाली आहे की देव साकार नाही आणि निराकारही नाही. तो कुणाला दर्शन देत नाही. व्हायचंच नाही ते. दर्शनाची, स्वप्नाची, साक्षात्काराची नि प्रकाश दिल्याची सारी सोंगेढोंगे आहेत.’’
``देव दिसणारच कसा? तो कसा आहे, हेच मुळी आजवर कुणाला उमगलेले नाही मोठेमोठे ऋषि मुनि होऊन गेले. `आम्हाला हे देवाचे गूढ समजले नाही हो नाही.’ हे त्यांनी चक्क कबूल केले. तरीही या देवदर्शनाच्या नि साक्षात्काराच्या गप्पा चालूच आहेत. खोट्या आहेत त्या सा-या.’’


(३) अंगात येणारे देव
तुमच्याकडं देव अंगात येतात का? (होय. येतात) आजवर देव कुणाच्या अंगात आला नाही, येत नाही आणि येणार पण नाही. तुम्हा आम्हाला देवाच्या रंगरूपाचा नाही ठावठिकाणा, असा तो देव माणसाच्या अंगात येईलच कसा? अंगात देव आल्याचे सोंग करणा-या घुमा-यांना नि अंगारे देणा-यांना चांगले फैलावर घ्यायचे सोडून, आपण त्यांच्यापुढं नाकदु-या काढतो. देवा असं कर, तसं कर म्हणतो. कसला हा अडाणीपणा? देव अंगात आणण्याच्या कामी पहिला नंबर बायांचा. दोघी चौघी जमल्या, एक ऊदकाडी पेटवली, नाकात थोडं धुपट गेलं का झाली नाचा उडायला नि घुमायला सुरुवात. ज्या बाईच्या अंगात येतं तिचा नवरा हवा चांगला खमक्या मर्दाना. पण हा असतो मसाड्या. बाई नाचायला, उडायला लागली तर हा धुपाटण्यात ऊद घालून तिच्यापुढं नमस्कार घालतो. मग त्या बाईला येतो डबल जोर. ती जोरजोरात नाचायला लागते. याला औषध फार सोपं आहे. पण त्या बाईचा नवरा खरा मर्दाना पाहिजे. आपली बायको लाजलज्जा गुंडाळून नाचायला लागली का एका बाजूने जाऊन त्याने तिच्या अश्शी सज्जड थोबाडीत भडकावून द्यावी, एका थपडीत तिचा घुमारा बंद. शकून सांगणारे, अंगारे धुपारे देणारे, ताईत गण्डेदोरे बांधणारे आणि हे घुमारे यांच्या सावलीतसुद्धा जाता कामा नये. यांच्या नादी लागला त्याचे झालेच वाटोळे समजा.
या अंगातल्या देवांची मजा पहा. मुंबईला डोंगरीहून देव घुमत निघाला चौपाटीकडे. आता देवाची हुशारी पहा. रस्ता मोकळा असेल तर देव मेनरोडच्या अगदी मधोमध नाचत उ़डत घुमत जातो. जर का समोरून एकादी मोटार टों टों करीत आली का देव झटकन फूटपाथच्या बाजूला धाव घेत जातो. मोटार गेलीसे दिसले का पुन्हा सगळे ते मांग डफलेवाले मंजिरीवाले नि त्या २-३ बाया लागल्या पुन्हा मेनरोडच्या मधोमध येऊन टपांग डांग चिन् वाजवीत नाचायला, घुमायला. अशा ढोंगधत्तु-यारा बाबांनो तुम्ही काय देव समजता? असल्या देवांची चांगली सटक जाईपावतर झणझणीत पूजा केली पाहिजे काठी खराट्याने. पण आपण पडलो मेंढ्याचे मावसभाऊ!

(अंगात देव आणणा-या बायांची नि त्यांच्या ढोलकी तुणतुणेवाल्यांची हुबेहूब नक्कल करताना गाडगे बाबा इतके विनोदी रंगात येतात की लोकांची हासता हासता मुरकुंडी वळून, शरमेने ते माना खाली घालतात.)


(४)आणि तो सत्यनारायण
(सार्वजनिक सत्यनारायणाच्या महापूजेचे व्यसन सगळीकडे फार बोकाळलेले आहे. पुष्कळ वेळा एकाद्या ठिकाणी असल्या सत्यनारायणाच्या महापूजेचा बेत ठरवून, पाठोपाठ गाडगे बाबांच्या कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात येतो. ठरल्या वेळी बाबा येतात ते थेट कीर्तनाच्या जागेवर जाऊन उभे राहतात. सत्यनारायणाच्या थाटाकडे ते पाहतही नाहीत. नमस्कारही करायचे नाहीत आणि तीर्थप्रसादही घ्यावयाचे नाहीत. मग कशाला करतील ते स्पर्श त्या तुपाळ शि-याच्या प्रसादाला? कीर्तनात हरिनामाच्या गजर चोलू होऊन प्रवचनाला रंग चढला का मग बाबांचा हल्ला सत्यनारायणावर कसा चढतो ते थोडक्यात पहा.

``आता हा सत्यनारायण देव लोकांनी तयार केला आहे. चांगला सोयिस्कर देव आहे बरं का हा. सव्वा रुपयात हवा तो नवस पुरा पाडतो. सव्वा रुपयात हल्ली मजूर नाही कामाला मिळत. आणि मिळाला तरी चोख काम करील तर हराम. पण हा देव तसा नाही. केला नवस बिनचूक पार पाडतो. मघाशी तुम्ही त्याची पोथी ऐकलीच असेल. त्या कलावति का लीलावतीच्या साधुवाण्याची बोट समुद्रात बुडाली. पार गेली रसातळाला. त्या बाईनं सत्यनारायणाचा प्रसाद खाताच. झटकन ती बोट आली सुकीठाक ठणठणीत पाण्यावर काय? आहे का नाही या देवाचा चमत्कार? गेल्या दोन महायुद्धांत इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, अमेरिकेच्या शेकडो मोठमोठ्या बोटी महासागरात बुडाल्या आहेत. त्या बाहेर काढण्याची ही सत्यनारायणाची सोपी युगत अजून त्यांना कोणी सांगितली नाही कशी, कोण जाणे? बंदरावर एक मोठा सत्यनारायण केला, त्याचा प्रसाद सगळ्यांनी खाल्ला का भरभर बुडालेल्या बोटी बाहेर येतील. येतील का नाही, सांगा तुम्ही? ही लांबची विलायतची भानगड राहू द्या. आपल्या जवळच्या मुंबई बंदरातच ती रामदास बोट बुडाली आहे. बापहो, माझी पैज आहे. एक कोट रुपये रोख देतो. कोणीही सत्यनारायणाच्या भगतान अपोलो बंदरावर सत्यनारायणाची महापूजा करून, ती बोट वर आणून दाखवावी असं झालं नाही, तर हा सुद्धा, बाबांनो, भोळसटांना ठकवून पैसे काढण्याचा एक लबाडीचा धंदा आहे. त्यांच्या नादी लागू नका.’’

  • देवापुढे पैसे फळे ठेवू नका

देवापुढे पैसा अडका, फळफळावळ ठेवली म्हणजे आपण मोठे पुण्य केलं अशा समजाचे  लोक पुष्कळ आहेत. ही त्यांची चूक आहे, बाप्पांनो, चूक आहे. भूल आहे. देव मोठा का आपण मोठे? (देव मोठा.) सर्व काही देवाने आपल्याला द्यायचे का आपण देवाला? (देवाने द्यायचे) देव आपणाला देतो तर मग देवापुढे पैसे का ठेवता? हा देवाचा अपमान आहे. देवापुढे पैसे ठेवणारे लोक मोठे डोकेबाज नि हुशार असतात हां. देवाच्या पाया पडायला जातो नि नमस्कार करून पुढे काय ठेवतो? तर एक भोकाची दिडकी! आपल्या खिशात शंभर दहा पांच रुपयांच्या नोटा असलेल्या देवाला काय माहीत नसतात का हो? सगळा अस्सल माल आला नि रद्दी तेवढी देवाची. हा न्याय कुठला हो बाबांनो? जरा विचार करू याआपण. देव त्या भोकाच्या दिडकीने खूष होईल का? उलट त्या अपमानामुळे आपल्यावर तो रुष्टच होईल. अहो, कसल्या तरी क्षुल्लक चुकीसाठी पोलिसाने आपल्याला पकडले, तर सुटकेसाठी तो सुद्धा भोकाच्या दिडकीने खूष होतो काय? त्याला लागते हिरवी नोट. दिली नाही का बसलाच त्याचा दण्डा आपल्या पाठीवर. हे पहा बाप्पांनो, पैशा अडक्यानं नि फळफळावळींनी देवाशी चाललेला आपला हा व्यापार मूर्खपणाचा आहे. पैसा, फळे देवापुढे ठेवून जरा मुकाट्याने खिडकीतून गुपचूप पहा. पैसे लावील पुजारी आपल्या कडोसरीला नि फळांवर पडेल त्याच्या मुलामुलींची धाड. देवाला आपण काय द्यायचे? देव भाव भक्तिशिवाय कशाचाही भुकेला नाही.

``देव भावाचा भुकेला..... धरा बळकट भाव, आपोआप भेटे भाव.’’ भक्तिभावाने केलेल्या एका नमस्कारातच देव खूष असतो. राजी असतो. म्हणून सांगतो हात जोडून का बाबांनो देवापुढं पैसा अडका, फळफळावळ ठेवू नका. देवाला नवस करू नका. केले असतील तर देऊ नका. देव कुणाच्या नवसाला आजवर पावला नाही, आज पावत नाही, पुढे पावणार नाही. देवाला नवस देणारेघेणारे व्यापारी, सावकार तुम्ही बनू नका. प्रपंच करून शिवाय वर मोठेपणा मिळावा यासाठी धूर्त लोकांनी तर्कातर्कांनी भोळ्या भाविकांना पद्धतशीर जाळ्यात अडकवण्यासाठी ही अनेक देवदेवतांची लफडी निर्माण केली आहेत. ती देव दैवते नसून पुजा-यांची अल्प-भांडवली दुकाने आहेत. या दुकानांवर देवाणीचा नव्हे तर फक्त घेवाणीचाच सवदा होत असतो. असल्या फंदांचा सर्व संतांनी कडकडीत निषेध केलेला आहे. एकनाथ महाराज म्हणतात –
म्हणती देव मोठे मोठे । पूजताती दगड गोटे ।।
कष्ट नेणती भोगती । वहा दगडाते म्हणती ।।
जीव जीव करूनी वध । दगडा दाविती नैवेद्य ।।
रांडा पोरे मेळ झाला । एक म्हणती देव आला ।।
नाक घासूनी गव्हार । देवा म्हणती गुन्हेगार ।।
एका जनार्दनी म्हणे । जन भुलले मूर्खपणे ।।


(६) नवसाने पोरे होतात ?
कामंधामं आटपल्यावर संध्याकाळी भोळ्या बाया नि त्यांचे मालकसुद्धा शिळोप्याच्या गप्पा मारायला गावच्या देवळात जमतात. दर्शन घेतल्यावर मालक थोडा वेळ बाहेर थांबतात. हो, कारण ज्ञानोबाराय सांगतात ना की,
देवाचियाद्वारी उभा क्षणभरी ।
तेणें मुक्ती चारी साधियेल्या ।।
दररोज या चारी मुक्ति साधण्याचा लाभ टाळायचा कसा? मालक गेले का बायांची पार्लमेण्ट भरते. तिथं कसकसल्या भरताड गप्पा निघतील त्याचा नेम नाही. एकादी भागूबाई गंगूबाईला सांगते, ``बगा बया, मला पदर आला तवापून  चार वरसं झाली, सा वरसं झाली, पुन मुलाचा पत्या नाय. त्या भीमाआजीनं सांगितलं का आपला वंश खंडोबापासनं वाढला. जा त्या देवाकडं नि करा त्याला नवस. फुकाट दीस कशाला घालवता? दुस-याच दिशी कारभारी नि मी खंडोबाकडं गेलू, नवस केला, आनं तवापासनं हा ना-या, गंप्या, चिंगी नि बनी झाल्या पगा बायांनो. देवाच्या दरबारात बसलूया समदी आपन. खोटं कशाला बोलायचं? त्ये पहा समूरच कारभारी बसल्याति. इचारा त्येना हवं तर. खरं का न्हाय वो कारभारी!’’ कारभारी पडला नंदीबैलाचा मावसभाऊ. तो सरळ होकाराची मान हालवतो. आता विचार करा माझ्या मायबापानो, खंडोबापासनं जर पोरं होतात, तर नवरा चांगला, नवरी चांगली, मुहूर्त पहा, कपडे आणा, मांडव घाला, जेवणावळी द्या, बेण्डबाजा लावा, वरात काढा, नवराबायकोचा जोडा खोलीत घाला, या खटपटी कशाला हो हव्यात? कुण्याही बाईनं उठावं, देवळात जावं, देवाला सांगून चार पोरं आणि दोन पोरी घेऊन यावं. सोपा कारखाना. जमंल का हे? (नाही नाही) नाही ना? मग नवसानं पोरं झाली नि होतात, असं म्हणणारांची माथी कशी पोकळ आहेत बरं? तुकाराममहाराज म्हणतात –
नवसे कन्या पुत्र होती । मग का कारणे लागे पति ।
देवांच्या नवसांच्या सबबीवर अशा शेकडो मूर्खपणाच्या गोष्टी आपण करीत असतो. त्या चुका आपण सुधारल्या पाहिजेत बाबांनो. तीर्थक्षेत्रे, जत्रा यात्रा ही सारी भोळ्या भाबड्या लोकांना लुबाडण्याची लफंग्यांनी तयार केलेली भुलभुलय्याची दुकाने आहेत. सापळे आहेत ते. तिथे देव नसतो, देवभक्ति नसते, काही नसते. तीर्थक्षेत्री गेले आणि दाढीमिशा बोडून आले, तरी अडाणीपणा जाणार नाही आणि कर्माच्या कटकटी मिटणार नाहीत. म्हणून बाबांनो, सावध व्हा.
(७) जादूटोणे आणि चमत्कार
यावर विश्वास ठेवणारांची विनोदपूर्ण कोटिक्रमांनी कीर्तनात बाबा टर उडवू लागले का हास्याचे खोकाट उडतात. ``जादूटोणे करून अथवा मूठ मारून हवा त्याचा धुव्वा माणसाला उडवता येता तर मग तो देवापेक्षाही मोठा म्हटला पाहिजे. लढायात असले आठ दहा मूठ मारणारे सोडले का काम भागले. कशाला हव्यात बंदुका, तोफा नि ते आटम बांब? मंत्रेच वैरी मरे । तरी कां बांधावी कट्यारे।।’’

``चमत्कार! अमका माणूस म्हणे एकदम गुप्त झाला. एकाच वेळी चार दूरदूरच्या गावात लोकांना दिसला. असं कधी होतं का बाप्पा. खोटं आहे हे सारं. मुळीच विश्वास टाकू नका असल्या गटारगप्पांवर. देवाला घाम फुटला. मारुतीच्या बेंबीत म्हणे कोणाला टिळक दिसले. का बाबांनो आमच्या टिळकांची नि त्या मारुतीच्या मूर्तीची अशी हकनाहक बदनामी करता?’’

``सगळ्या पोथ्या पुराणांत हे असले चमत्कार रगड लिहिले आहेत. पण खरं खोटं आपण उमजून घेतलं पाहिजे. उगाच मेंढ्यामागे मेंढ्यासारखं जाण्यात काय हशील?’’

``माणूस हाच एक मोठा चमत्कार आहे. त्यातल्या त्यात कष्ट मेहनत करून जमिनीतून अन्नाचे सोने काढणारा शेतकरी उपाशी मरतोच कसा? हा एक मला मोठा चमत्कार वाटतो. या चमत्काराचे मूळ शोधायचे, त्यातले खूळ टाकायचे, का अमका गुप्त झाला नि तमका दहा ठिकाणी एकदम दिसला, असल्या चमत्कारांच्या गप्पा मारीत बसायचे? याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे बाबांनो.’’

  • ना मंत्र ना गुरूपदेश

शिष्यांच्या कानात मंत्रोपदेश देणे, ठराविक संप्रदायाची माळ गळ्यात घालणे किंवा एकादा विशेष पेहराव वापरायला लावणे, या मामुली संताळी चाळ्यांना गाडगे बाबांनी केव्हाही थारा दिला नाही नि मुलाजाही राखला नाही. ``ज्यांना लोक-सेवेची ही कष्टाची कामगिरी आवडत असेल, त्यांनी कडकडीत निर्लोभी वृत्तीने ती करावी. परवडली नाही, संसाराचा मोह मनात डोकावू लागला रे लागला का झटदिशी हा मार्ग सोडून खुशाल प्रपंचाला लागावे.’’ हा त्यांचा इषारा वरचेवर ते अनुयायांना देत असतात. आधी प्रपंच करा नि मग परमार्थाला लागा, हे प्रत्येक नवागताला बाबा अट्टहासाने सांगतात. अविवाहिताला  सुद्धा ``लग्न करूनही बायकोसकट लोकसेवेच्या मार्गाला लागलास तरी हरकत नाही. पण दांभिक ब्रह्मचर्य नको.’’ असा खडखडीत इषारा देतात. शिष्य म्हणून मिरवणारांना अनुलक्षून कीर्तनात ते कटाक्षाने जाहीर सांगत असतात की –

``मला कुणी शिष्य नाही, मी कुणाचा गुरू नाही. स्वयंप्रेरणेने प्रपंचाचा मोह टाकून जे जे कोणी निरिच्छतेने आणि निर्लोभी वृत्तीने दीनोद्धाराच्या आणि अडाणी जनतेला देवधर्म विषयाचे खरे ज्ञान देऊन त्यांना कर्तबगार बनवण्याच्या कामात तल्लीनतेने झतटत झगडत अजून माझ्या मागे टिकून राहिलेले आहेत, ते सारे माझ्या अनंत जन्माचे गुरूच आहेत.’’ परवा एका गावी कीर्तन करीत असताना आपल्या एका अनुयायाचा बाबानी गुरुबंधू म्हणून उल्लेख करताच, सभोवारचा हजारो श्रोतृगण चमकला. शिष्याला बाबा `गुरुबंधू’ म्हणतात हे काय गूढ असावे, हाच प्रत्येकाला प्रश्न पडला. खुलासा विचारला असता बाबा हासत हासत म्हणाले - ``बाप्पा, तुकारामबुवा आमचे समद्याहीचे (सगळ्यांचे) गुरू. त्याहीचे (त्यांचे) आमी सगयेच (सगळे) शिष्य न हो काय?’’ या छोट्याशा उत्तरातच बाबांच्या सांप्रदायिक निषेधाचे सारे ब्रह्माण्ड आढळते.


कीर्तन-सप्ताह आणि भंडारे
बाबांचा लोकसंग्रह शतरंगी आहे. त्यांच्या आसपासच्या कार्यकर्त्यांत ब्राह्मणांपासून तो थेट महार मांगापर्यंत सर्व जमातीचे कीर्तनकार भजनी लोकसेवक आणि त्यागी संचारी प्रचारक यांचा सरमिसळ भरणा झालेला आहे. कोण कोठचा नि कोणत्या जातीचा हा भेदच उमगायचा नाही. भेदातीत बंधुभावाचे इतके कौतुकास्पद उदाहरण उभ्या भारतखंडात एकाहि संघटनेत आढळणार नाही.

`कीर्तनाला जा’ असा बाबांचा हुकूम सुटला आणि नवशिक्याने कुठे जाऊ या? असा सवाल टाकला म्हणजे बाबा सांगतात - ``हवा तिथे हवेसारखा जा. पाय नेतील तिकडे जावे. हरिनामाचा गजर करावा, कीर्तन करावे आणि पुढे चालते व्हावे, सारा देश आपल्याला मोकळा आहे.’’

बाबांच्या कीर्तनाची मोहिनी महाराष्ट्राच्या कोनाकोप-यात संचारल्यावर, जागोजाग लोक त्यांना सप्ताहाचा आग्रह करू लागले.  जा त्या गावी, लावा विणा, असा हुकूम सुटला का अनुयायांपैकी कोणीतरी तेथे जाऊन सप्ताहाचा प्रारंभ करायचा. सातव्या दिवशी फक्त कीर्तनाला बाबा हजर. गाडगेबाबांचे कीर्तन होणार ही आवाई गेली का आसपासच्या १०-१० नि १५-१५ कोसांवरून स्त्री-पुरुष-मुलांचे घोळकेच्या घोळके पायी, घोड्यांवर नि गाड्यांतून जमा व्हायचे. त्या चिमुकल्या खेड्यात किंवा तालुक्याच्या गावात एकाकी मोठे लष्कर उतरल्यासारखा गाडीतळ पडायचा. माणसांची तर दाटीवाटीची यात्राच जमायची.


प्रसादाच्या भंडा-याची योजना
बाबांच्या कीर्तनासाठी गावोगावचे हजारो लोक आस्थेने यायचे. मावळतीला परक्या गावी आल्यावर त्यांच्या जेवण्याखाण्याची सोय काय? कीर्तन रात्री ९च्या पुढे चालू व्हायचे नि मध्यरात्री १-२ वाजता पुरे व्हायचे. म्हणजे रात्रभर मुक्काम करावाच लागे. सुखवस्तू आपापल्यापुरते फराळाचे आणीत. पण केवळ बाबांच्या रसाळ कीर्तनाच्या रंगात रंगण्यासाठी अन्नपाण्याची पर्वा न करता आलेल्या इतर असंख्य जनांची सोय काय? त्यांनी काय उपाशी पोटी कीर्तन ऐकावे?

थोडे तरी फार, तुका म्हणे परोपकार, या तुकोक्तीच्या संदर्भाने बाबांनी लोकमताचा कल भंडा-याकडे मोठ्या कुशलतेने वळवून, सप्ताहाच्या दिवशी भंडा-याचा महाप्रसाद करविण्याचा प्रघात सर्वत्र रूढ केला. ``गोरगरिबांसाठी थोडेबहुत अन्नदान कराल तर ठीक होईल. आपल्याला दूध द्यायची सक्ती नसेल तर ताक तरी द्यावे. तेहि नसेल तर पोटभर पाणी पाजावे `आईये बैठीये पीजे थोडा पाणी, यह दो बातोंको नलगे पैसा और आणि.’ आपल्याकडे येणा-यांचा प्रेमाने आदर करणे हा मोठा गृहस्थ-धर्म आहे.’’ अशा अर्थाचे बाबांचे उद्गार बाहेर पडताच मग काय हो! सारे गावकरी कंबर कसून भंडा-यासाठी साहित्याची भराभर जमवाजमव करायचे. ज्वारी – गव्हाच्या पिठांची पोती, साखरेच्या गोणी, गुळाच्या ढेपी, भराभर थप्प्या लागायच्या. चुली पेटायच्या. पुरुष बायका मुले कामाला लागायची. सैपाक तयार झाला का पुढचा थाट पहा कसा व्हायचा तो.

बाबांनी नि अनुयायांनी हातात खराटा घेऊन भोजनासाठी जागा अशी स्वच्छ नि चोख झाडायची का सारे गावकरी आश्चर्याने बघतच रहायचे. ज्वारीच्या पिठाने रांगोळ्या घालायच्या पत्रावळी मांडायच्या. ``बाबा आम्ही आहोत, तुम्ही नुसते पहा.’’ असे कुणी सांगितलेले परवडायचे नाही. कामाचा झपाटा सारखा चालू. पंगतीसुद्धा नीट सरळ ओळीत रांगेने आखायच्या. वेडेवाकडे जड बोजड थातर मातर खपायचे नाही. पंगतीच्या मांडणीचा थाट पाहून शहरी इंजेनरही तोंडात बोट घातले पाहिजे आणि खेडुतांनाही शिस्तीच्या वळणाचा धडा घेता आला पाहिजे, असे धोरण. वेळ झाली का सगळे भोजनार्थी पाहुणे, जात कुळी, धर्म, स्पृश्य-अस्पृश्य कसलाही भेद न जुमानता, सरळ एकाजवळ एक एका पंगतीत बसून पुण्डलीक वरदा हारि विठ्ठल गर्जनेत जेवायचे. जेवणे आटोपल्यावर खरकटी काढायला, जागा झाडून सारवून स्वच्छ करायला, इतरांच्या बरोबरीने गाडगे बाबा सगळ्यांच्या पुढे हजर.  सहस्रभोजन आटोपताच कीर्तनासाठी रंगणाची व्यवस्थाही तेच करायचे. इकडे दिवाबत्ती लागत आहे तोच चटकन बाबा कोठेतरी निघून जायचे. एवढे प्रचंड मिष्टान्नांचे भोजन व्हायचे, पण बाबांनी आजवर चुकून कधी त्यातला एक घास तोंडात घातलेला नाही. ते जवळपासच्या कोठेतरी एकाद्या झोपडीसमोर हारळी देऊन मिळेल ती कांदा चटणी मडक्यात खाऊन, बिनचूक वेळेला कीर्तनासाठी समाराधनेच्या जागेवर हजर. मात्र असल्या मिष्टान्न समाराधनेतच जर कोणी भाकर, भाजी , झुणका, आमची आणून त्यांच्या मडक्यात दिली तर पंगतीत दाटीवाटीने बसून आनंदाने खातील. मिष्ठान्न अपंग गोरगरिबांना. आपण स्वतः इतरांना भरपूर वाढायला सांगतील. त्यांचे खरकटे काढतील. पण एक घास चुकूनही कधी चाखणार नाहीत. हा निर्धार आजपर्यंत अखंड पाळलेला आहे. या समाराधनेत अनाथ अपंगांना कपडे वाटण्याचेही कार्यक्रम नेहमी होत असतात.

  • अंधू पंगू कुष्ट्यांना मिष्टान्न-भोजने

आत्यंतिक निरिच्छता हा गाडगे बाबांच्या चारित्र्याचा आत्मा. त्याच्यापुढे मोठमोठ्या धनवंतांनी हात टेकले नि उदारधींच्या उदारतेने मान वाकवली. चिंध्या-मडकेधारी ही त्यागी विभूति कंठशोष करून जनतेला नवा माणुसकीचा धर्म शिकवते, दररोज पाच-पंचवीस मैलांची पायपिटी करीत गावेच्या गावे नि शहरेच्या शहरे पायदळी घालते कोणी काही मिष्टान्न पक्वान्न, कपडालत्ता दिला तर त्याचाही अव्हेर करून निघून जात, अडल्या नाडल्याच्या अडवणुकीत सोडवणुकीला धावते, कसे या साधुपुरुषाचे पांग फेडावे? या प्रश्नाने गावोगावचे लोक विव्हळ व्हायचे. ``बाबा, तुमच्यासाठी आम्ही काय करावे सांगा?’’ ``माझ्यासाठी? मला कशाचीच गरज नाही. काही करायचेच असेल तर तुमच्यासाठी तुम्ही करा, मी सांगतो. अन्नदानासारखा जगात दुसरा मोठा धर्म नाही. तुम्ही भाग्यवंत लोक नेहमी आणि सणासुदीला गोडधोड करून खाता. बाबांनो, जरा सभोवार नजर टाका. शेकडो हजारो लाखो आंधळे, पांगळे, लुळे, लंगडे महारोगी गावोगाव मुंग्याच्या वारुळासारखे वळवळाताहेत. उष्ट्यामाष्ट्यावर कशी तरी पोटाची खाच भरताहेत. तुमच्या कमायतीत नाही काहो बाबांनो, त्यांचा काही हक्क? त्या आपल्या अभागी भावाबहिणींना सन्माने पाचारून वर्षातून एकदा तरी, एकाद्या यात्रेजत्रेच्या प्रसंगी, गोडधोडाचे पोटभर जेवण घालण्याची वहिवाट ठेवाल तर देवाला तोच खरा निवेद. तीच त्याची खरी भक्ति नि ती खरी त्याची महापूजा.’’

सप्ताहाच्या भंडा-याप्रमाणेच अनेक वेळा केवळ अनाथ अपंगांसाठी मिष्टान्नांची भोजने आणि त्यांना वस्त्रदान, हे समारंभ महाराष्ट्रात हजारो ठिकाणी आजवर साजरे केले आहेत आणि साध्यही होत आहेत.


झंजावाती संचाराती फलश्रुति
गाडगे बाबांचा संचार म्हणजे एक तुफानी झंजावाताचा सोसाटा म्हटले तरी चालेल. कोणत्याही ठिकाणी एक दिवसापेक्षा अधिक ते कधी रहायचेच नाहीत. आज मुंबईला दिसले तर उद्या व-हाडात वर्ध्याला, परवा औरंगाबादला नि तेरवा थेट गोव्याच्या सरहद्दीवरील एकाद्या गावी. त्यांची गाठभेट बिनचूक घेणे आजवर त्यांच्या निकटवर्ति अनुयायांनाही साधत नाही, तेथे इतरांचा पाड काय? या झंजावाती संचारात त्यांनी व-हाड ते गोमांतकापर्यंत लोकांच्या रहाणीचे फार सूक्ष्म निरीक्षण केलेले आहे. यात्रा जत्रांच्या तीर्थक्षेत्रांत गोरगरिबांच्या अन्नपाणी, निवा-याचे किती भयंकर हाल होतात, ते त्यांनी पाहिले होते. ही अडचण दूर करण्याचा त्यांनी निश्चय केला आणि जागोजाग धर्मशाळा, सदावर्ते, पाणपोया आणि मागासलेल्या जनतेच्या उमलत्या पिढीसाठी शाळा नि बोर्डिंगे स्थापन करण्याची अनन्यसामान्य कामगिरी केलेली आहे.

सन १९०८ साली ऋणमोचनच्या नदीला घाट, परीट जमातीची धर्मशाळा – गावक-यांच्या इच्छेसाठी लक्ष्मीनारायणाचे मंदिर वगैरे गाडगेबाबांना लोकांकडून करवून घेतल्याचे मागे सांगितलेच आहे. त्यानंतर सालोसालच्या वार्षिक मुद्गलेश्वराच्या पौषी यात्रेला बाबा गेले का एकेका नवीन कार्याचा पाय घालीत आणि भटकंतीला जात. ऋणमोचनाला आता एकचसा काय, पण सोयीस्कर जागी नदीला चार प्रचंड घाट बांधण्यात आले आहेत व पांचव्या घाटासाठी जनतेची ५ हजारांची वर्गणी तयार आहे.

बाबांचे ते फुटक्या गाडग्याचे टवकळ जशी त्यांची कामधेनू, तशी आत्यंतिक निरिच्छतेने आणि कमाल निस्पृहतेने झळकणारी त्यांची वाणी जागोजाग कल्पवृक्षाप्रमाणे मोठमोठ्या धर्मशाळा अन्नसत्रे गोरक्षण संस्था आणि शिक्षणाच्या शाळा जादूप्रमाणे निर्माण करीत चालली आहे. तोंडातून शब्द निघायची थातड, मोठमोठे श्रीमंत स्त्री पुरुष तो झेलायला आजूबाजूला हात जोडून उभेच असतात. गाडगे बाबांनी केवळ इच्छामात्रे करून महाराष्ट्रभर उभारलेल्या असल्या लोकोपयोगी इमारतींचे नि संस्थांचे जाळे फार विशाळ आहे. त्यांची तपशीलवार माहिती आणि देणगीदारांची यादी एका १०० पानी सचित्र ग्रंथातच छापलेली मिळते. वानगीदाखल काही ठळक संस्थांची नावे मात्र येथे देणे शक्य आहे.
(१)   ऋणमोचन घाट. मंदिर. सन १९०८. खर्च रु. २५ हजार. आणखी ३ घाटांचा हिशेब निराळाच.

(२)   मूर्तिजापूर गोरक्षण संस्था, धर्मशाळा, सन १९०८, खर्च १ लाख रुपये

(३)   पंढरपूर चोखामेळा धर्मशाळा, सन १९२०, खर्च १ लाख

(४)   पंढरपूर मराठाशाळा, सन १९२०, खर्च २लाख

(५)   पंढरपूर परीट धर्मशाळा, सन १९२५, खर्च २५ हजार

(६)    नाशिक धर्मशाळा, सन १९३०, खर्च ३ लाख

(७)    आळंदी धर्मशाळा, सन १९३०, खर्च १ लाख

(८)    आळंदी परीट धर्मशाळा, सन १९३०, खर्च ० हजार

(९)     देहू धर्मशाळा, सन १९३०, खर्च २५ हजार

(१०)    त्र्यंबकेश्वर कलईवाला धर्मशाळा, सन १९४८, खर्च २५ हजार

(११)    पुणे आकुल धर्मशाळा, सन १९४०, खर्च दीड लाख

(१२)    त्र्यंबकेश्वर परीट धर्मशाळा, सन १९४०, खर्च १० हजार

याशिवाय आणखी पाच पन्नास संस्था आहेत, त्यांची नावनिशीवार यादी कोठवर द्यावी? पंढरपूरची हरिजन धर्मशाळा पुढे चालण्यासाठी नुकतीच डॉ. आंबेडकर यांच्या स्वाधीन करण्यात आली.

  • विचार करण्यासारखा मुद्दा

या संस्थांच्या टोलेजंग इमारती बाबांनी मनोमन आखाव्या, स्वयंस्फूर्त धनिकांनी ‘घ्या घ्या’ म्हणून पैशांच्या पाशी बाबांपुढे ओतून त्या प्रत्यक्षात आणाव्या आणि पायाभरणीच्या क्षणालाच त्या सर्व इमारतींचे ट्रस्ट-डीड करून त्या जबाबदार विश्वस्तांच्या हवाली कारभारासाठी द्याव्या. प्रत्येक ठिकाणी त्यात एक मुख्य अट ठळकपणे प्रथमच असायची. ती ही `या संस्थेत खुद्द गाडगे बाबा, त्यांचे वारस वंशीय नातेगोतेवाले यांचा सुतळीच्या तोड्यावरही कसला काही हक्क नाही. कोणी तसा कधी सांगू लागल्यास त्याला हुसकावून द्यावे. सदावर्तातही त्यांना अन्न घेण्याचा अथवा येथे वसति करण्याचा हक्क नाही.’ या कठोर निरिच्छतेला नि कमाल निस्पृहतेला हिंदुस्थानच्याच काय, पण जगाच्या इतिहासतही जोड सापडणार नाही.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा. बाबांनी कोठेही एकादे देऊळ बांधलेले नाही किंवा स्वतःसाठी मठ उभारलेला नाही.तीर्थाच्या ठिकाणी देवांची मोठमोठी ख्यातनाम देवळे आहेत. पण तेथल्या त्या दगडी देवांचे दर्शनही बाबा कधी घेत नाहीत, आजवर घेतलेले नाही. देव देवळात असतो, ही कल्पनाच त्यांनी कधी मानलेली नाही आणि इतरांनीही ती मानू नये, असा त्यांचा वाजवी अट्टाहास असतो.

मात्र कोठे एकादे देऊळ असल्यास त्याचा अनादर ते करायचे नाहीत. नाशिकच्या ओसाड टेकडीवर धर्मशाळा बांधताना मधेच एक मारुतीचे लहानसे देऊळ आढळले. बाबांनी ते नीट मोठे बांधून घेतले. एका मजल्यावर मारुतीची बैठक आणि देवळाचा घुमट वरच्या मजल्यावर, अशी ती धर्मशाळेच्या इमारतीच्या पोटातच केलेली युक्तिबाज बांधणी प्रेक्षकाला अचंब्यात पाडते.


निर्वासित मारुतीचा उद्धार
याच टेकडीवर ९ फूट लांब, ३ फूट रुंद नि दीड फूट जाडीची एक दुसरी मारुतीची मूर्ती टेकडीत गाडलेली बाहेर निघाली. बाबांनी बरेच दिवस ती एका बाजूला काढून ठेवली. ‘‘असू द्या मारुतीराय सध्या इथेच. लावीन त्यांची सोय कुठेतरी.’’ काही वर्षांनी बाबा व-हाडात गेले असताना मूर्तिजापूर धर्मशाळेत येणा-या लोकांनी सांगितले, ‘‘बाबा मूर्तिजापूर शहर मोठे. तेथे पुष्कळ देवळे आहेत. पण या धर्मशाळेत देव नाही, देऊळ नाही. म्हणून तेथे लग्न लावलेल्या नवरानवरीला दर्शनासाठी लांब दूरच्या देवळात जावे लागते.’’ देव देवळांबद्दल बाबांचा अभिप्राय काहीही असला तरी या किंवा दुस-या कोणत्याही बाबतीत अडाणी जनतेचा बुद्धिभेद ते करीत नाहीत. ते मुलांच्या बोलीने बोलतात नि चालीने चालतात. त्यांनी नाशिकला तार दिली की ‘‘बाजूला काढून ठेवलेला तो मारुती ताबडतोब पहिल्या गाडीने घेऊन यावे.’’ ती प्रचंड जाडजूड मारुतीची मूर्ती नि आगगाडीने न्यायची तरी कशी? कारभारी नि शिष्ट विचारात पडले. अखेर सहा बैलांच्या खटा-यातून मारुतीरायांना स्टेशनवर आणले. गाडगे बाबांचे नाव ऐकताच रेलवेचे सारे अधिकारी नि हमाल धावले. त्यांनी मूर्ती मेलगाडीत चढवली. स्टेशनला तार दिली का गाडगे बाबांचा मारुती मेलने येत आहे, उतरून घ्या. मूर्ती उतरून घ्यायला शेकडो लोक आधीच तयार उभे होते. बाबांनी धर्मशाळेनजीक योग्य जागेवर मारुतीची स्थापना केली आणि गावक-यांना सांगितले, ‘‘देव पाहिजे होता ना? हा घ्या देव. आता मात्र त्याच्यासारखे शूर आणि पराक्रमी बनले पाहिजे तुम्ही सगळ्यांनी.’’ नाशिकच्या उकीरड्यातल्या मारुतीचा अखेर व-हाडात निर्वासितोद्धार झाला.


कशाला हा एवढा भुईला भार?
देवळे नि त्यातले देव याविषया बाबांच्या मताची मूर्खानंदजी एक मजेदार आठवण सांगतात. गाव नेमके आठवत नाही. पण त्या गावी नदीकाठी खूप देवळे होती. बहुतेक सारी शिवालये. त्या गावी कोणीतरी केलेल्या सप्ताहाचे शेवटी बाबांचे कीर्तन झाले. दुसरे दिवशी सकाळी बाबा म्हणाले, ``रात्री कीर्तनाला जेवढे लोक होते. तितकीच देवळे आहेत इथं.’’ आम्ही या अतिशयोक्तीबद्दल हासलो.

‘‘हासता कशाला बाप्पा? तुम्हीच पहा ना. सगळी नदीची दरड या देवळांनीच भरली आहे. पण व्यवस्था पाहिलीत का त्यांची? कोण्या देवळात नंदी नाही तर कोण्या ठिकाणी देवाचाच पत्ता नाही. मग तो लेक काय फिरायला गेला म्हणावं? कशासाठी बांधली असतील एवढी देवळं?’’

‘‘धर्मश्रद्धा, बाबा.’’ मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला.

‘‘संस्किरत (संस्कृत) भाषेत नको काही सांगू. असं सांगा का भोळा भाव. पण या देवळांची ही अशी परवड होईल असं स्वप्न त्यांना पडलं असतं तर? तो पहा, तो पहा, एक कुत्रा बेधडक देवावर लघवी करून चालला.’’
कुत्र्याला मारण्यासाठी मी दगड उचलला. मला अडवून बाबा म्हणाले - ‘‘कोणाला मारता? कुत्र्याला? का बाप्पा? तुम्हाला रागच आला असेल, तर तो ही देवळं बांधणारांचा आला पाहिजे. कशाला इतकी देवळं बांधली? एकच बांधायचं होतं नि त्यातल्या देवाला म्हणायचं होतं रहा बाप्पा इथं येऊन. भुईला भार करून ठेवला उगीच. तीर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनीं ।। असंच म्हणतात ना आपलं तुकोबाराय ?’’

  • सत्यशोधक समाजाच्या ध्येय-उद्दिष्टांची अंमलबजावणी

सत्यशोधक समाजाच्या चळवळीला बाल्यावस्थेतच नख लावण्याच्या उद्देशाने ब्राह्मणांनी सत्यशोधक समाजाविरुध्द प्रचार करण्यास प्रारंभ केला.
''ब्राह्मणांनी घाबरवून सोडलेले हे गरीब व अज्ञानी लोक ज्योतिरावांकडे येऊन त्यांना विचारीत, 'अहो मराठीत केलेली प्रार्थना देवाला कशी ऐकू जाईल?' ज्योतिरावा त्यांना समजावून सांगत की, 'मराठी, गुजराती, तेलगू किंवा बंगाली भाषेत परमेश्वराची प्रार्थना केली तर ती परमेश्वराला पोहोचत नाही किंवा रूजू होत नाही, असे मानणे ही चुकीची गोष्ट आहे. विधाता हरएक मनुष्याचे मन जाणतो. त्याची आंतरिक इच्छा, प्रार्थना त्याला कळतात. लॅटिन, इंग्रजी आणि फ्रेंच या भाषेतून केलेल्या प्रार्थना देवाला ऐकू गेल्या नाहीत काय? तुकाराम, नामदेव, चोखामेळा, सावता माळी यांच्या प्रार्थना देवाच्या कानी गेल्या नाहीत काय?''
सत्यशोधक समाजाचे कोणी सभासद होऊ नये असा प्रचार ब्राह्मण लोक खेडयापाडयात करीत आणि त्याबरोबर धाकही दाखवीत. सत्यशोधक समाजाचे जे सभासद होत त्यांचा छळ केला जाई. सरकारी नोकरीत ब्राह्मण अधिकाऱ्याच्या हाताखाली सत्यशोधक समाजाचे सभासद असलेल्या व्यक्ती नोकरीत असल्या तर त्यांना छळ सोसावा लागे. केव्हा केव्हा त्यांना नोकरीसही मुकावे लागे.
''नारायणराव कडलक हे सरकारी नोकरीत असून सत्यशोधक समाजाचे कार्यवाह होते. त्यांची बदली हेतुत: पुण्याहून महाबळेश्वरला करण्यात आली. जर ब्राह्मणांच्या उपस्थितीशिवाय कोणताही धार्मिक विधी केला किंवा संस्कार केले तर तसे संस्कार करणाऱ्या कुटुंबावर परमेश्वराचा कोप होईल किंवा ब्राह्मण आणि देव यांच्या शापामुळे त्यांचे नि:संतान होईल, अशी त्यांना ब्राह्मण भीती दाखवीत असत.''

सत्यशोधक समाजाच्या स्थापनेनंतर त्याच्या ध्येय-उद्दिष्टांच्या अंमलबजावणीस प्रारंभ झाला. 1848-73 या काळात फुले यांनी या उद्दिष्टांच्या संदर्भात बरेच कार्य केले होते. 1873 नंतर त्या कार्याला संस्थात्मक स्वरूप प्राप्त झाले.
''सत्यशोधक समाजाचा लढा हा मुख्यत: धर्मसंस्थेशी व विशेषत: भिक्षुकशाहीशी होता. नामधारी ब्राह्मण धर्मविधी करताना जे मंत्र व मंगलाष्टके म्हणत त्यांचा अर्थ आमच्या लोकास समजत नाही, म्हणून सत्यशोधक समाजाकडून विवाह व इतर कार्यासंबंधीचे धर्मविधीची पुस्तिका लोकहितार्थ मराठीत तयार केली व त्या पुस्तिकेच्या प्रथम आवृत्तीच्या 2000 प्रती छापल्या होत्या.''

फुले यांनी सत्यशोधक विवाहपध्दती या नावाची एक अभिनव सामाजिक व धार्मिक क्षेत्रात मूलभूत परिवर्तन करणारी क्रांतिकारी पध्दत अमलात आणली. स्वत: ज्योतिरावांनी ब्राह्मणांच्या गैरहजेरीत सत्यशोधक विवाहपध्दतीने लग्ने लावली.
''ज्योतिरावांचा एक दूरचा नातलग त्यांच्या दुकानात नोकर होता. त्याने सत्यशोधक विवाहपध्दतीने लग्न करण्यास होकार दिला. ब्राह्मणांनी मुलीच्या बापाला विरोधात उठविले; परंतु त्या मुलीची आई सावित्रीबाई फुले यांची मैत्रीण असल्यामुळे ती या निर्धारापासून ढळली नाही. हा नियोजित विवाह 25 डिसेंबर 1873 साली झाला. पानसुपारीचा जो काही खर्च आला तेवढाच. वधू-वरांनी एकमेकांशी निष्ठेने वागण्याविषयीच्या फुलेरचित शपथा सर्वांच्या देखत घेतल्या. सत्यशोधक समाजाचे सभासद बहुसंख्येने या विवाहसमारंभास हजर होते. लग्न समारंभ सुरक्षितपणे पार पडला.''
ब्राह्मण भिक्षुकांशिवाय हिंदू विवाह! खरोखरच ही एक मोठी आश्चर्यकारक घटना घडली. ब्राह्मणांच्या दृष्टीने ज्योतिरावांकडून घडलेला हा पहिलाच गुन्हा असल्यामुळे माफ करण्यात आला; परंतु सत्यशोधक विवाह पध्दतीने दुसरा विवाह ज्योतिरावांनी करण्याचे ठरविताच त्यांचे प्रयत्न हाणून पाडण्याचे ब्राह्मण भिक्षुकांनी ठरविले.
''ज्ञानोबा ससाने या विधुराचा विवाह ब्राह्मण व स्वकीयांचा कट्टर विरोध असतानाही फुले यांनी स्वत:च्या घरी 7 मे 1874 रोजी लावला.''
''1884 मध्ये ओतूर गावच्या गावच्या माळी, साळी, तेली जातीच्या लोकांनी सत्यशोधक विवाह पध्दतीने लग्ने लावली. या विवाह पध्दतीत वधूच्या गावी वर आल्यास गावातील महाराणीने हातात दीपताट घेऊन ओवाळावे, अशी योजना होती. तत्कालीन वर्णव्यवस्था व जातीव्यवस्थेला ते एक आव्हानच होते. लग्नविधीत मंगलाष्टके म्हणण्याचे काम स्वत: वधूवराने करावे. लग्नविधीनंतर सर्व मानव बंधूतील पोरक्या मुला-मुलीस व अंध पंगूस दानधर्म करावा. श्रीमंत लोकांनी शिक्षण फंडास मदत करावी, असे या विवाहाचे स्वरूप होते. लग्नविधी, वास्तुशांती व दशपिंडविधी या तिन्ही विधीत फुले यांनी ब्राह्मणांचे अस्तित्व नाकारले होते. सत्यशोधक विवाह हा साधा व अल्प खर्चातील होता. फुले यांच्या अनेक अनुयायांची लग्ने या पध्दतीनुसार झाली.''
सत्यशोधक समाजाच्या स्थापनेपूर्वीच फुले यांनी स्त्रिया व अस्पृश्यांच्या शिक्षणाचे मोठे काम हाती घेतले होते. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेनंतर त्याला आणखी गती मिळाली.

''सत्यशोधक समाजाच्या वतीने शूद्रातिशूद्रांच्या मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यासाठी अर्ज मागवून घेतले व दहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली.''
पुण्यातील सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागात शिक्षणाचे लोन पोहोचविण्यास सुरुवात केली.
''पुण्याजवळ हडपसरजवळ एक शाळा काढली. हडपसर हे सत्यशोधक समाजाचे एक मोठे केंद्र बनले. शूद्र लोकांस विद्येची अभिरुची नसल्याने त्यांच्या मुलांना दररोज शाळेत येण्याची सवय लागावी म्हणून सत्यशोधक समाजाच्या वतीने एक पट्टेवाला ठेवला होता.''
सत्यशोधक समाजाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी वत्तृफ्त्व व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
''1875 च्या काळात सत्यशोधक समाजाने एक निबंध स्पर्धा जाहीर केली. त्यासाठी दोन बक्षिसे ठेवण्यात आली. 'हिंदी शेतकीची सुधारणा कशी करता येईल' हा निबंधाचा विषय होता.''
''1876 सालच्या मे महिन्यात एक खास वत्तृफ्त्व स्पर्धा ठेवण्यात आली. त्यासाठी दोन विषय ठेवण्यात आले. 'मूर्तीपूजा उपयुक्त आहे किंवा कसे?' आणि दुसरा विषय 'जातीभेद आवश्यक आहे किंवा कसे?' यशस्वी उमेदवारांना बक्षिसे देण्यात आली.''

ज्योतिराव जसे सार्वजनिक ठिकाणी उपदेशपर भाषणे करीत, त्याचबरोबर शाळेतील शिक्षकांना आदर्श पाठ देऊन शिक्षकांनी मुलांच्या हिताच्या दृष्टीने योग्य ती साधने व उपकरणे वापरावी, म्हणून शिक्षकांनाही उत्तेजन देत असत.
''स्थापत्यशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे सत्यशोधक समाजाने एक अर्ज केला. त्या महाविद्यालयामध्ये काही प्रमाणात गरीब ब्राह्मणेत्तर विद्यार्थ्यांना नि:शुल्क शिक्षण द्यावे, अशी प्रार्थना केली होती. त्या अर्जाचा हेतू सफल झाला.''
''कनिष्ठ वर्गातील पाच टक्के विद्यार्थ्यांना नि:शुल्क शिक्षण द्यावे, असे शिक्षण खात्याचे संचालक येरफिल्ड यांनी सरकारी शाळांना जे आज्ञापत्रक काढले होते, त्याविषयी त्यांचे आभार मानले. सत्यशोधक समाजाच्या कार्याविषयी आपुलकी दाखवून त्या कार्याला प्रसिध्दी देणाऱ्या 'सत्यदिपिका, 'सुबोधपत्रिका' आणि 'ज्ञानप्रकाश'ला धन्यवाद देण्यात आले. सत्यशोधक समाजाने चालविलेल्या शिक्षणकार्याच्या प्रचारासाठी हरि रावजी चिपळूणकर यांनी जे मोठे साहाय्य केले, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देण्यात आले.''
सत्यशोधक समाजाने या काळात नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सहकार्य केल्याचे दिसून येते.
''सप्टेबर 1875 मध्ये अहमदाबादेत जो प्रचंड जलप्रलय झाला होता तेव्हा पुण्या-मुंबईतील सत्यशोधक समाजाच्या सभासदांनी रुपये 325- दिल्याचा उल्लेख समाजाच्या तिसऱ्या वार्षिक अधिवेशनात आहे.''
शूदातिशूद्रात विद्येचा प्रसार व्हावा यासाठी वसतिगृह काढण्याचा विचार सत्यशोधक समाजाने प्रारंभीच केला होता. या विचाराला फुले यांचे जवळचे स्नेही कृष्णराव भालेकर यांनी मूर्त स्वरूप दिले.

''भालेकरांनी 18 नोव्हेंबर 1884 रोजी पुण्यात कसबा पेठेत सुशिक्षणगृह स्थापन केले. लहान-मोठया खेडयातील पाटील, देशमुख, इनामदार आणि नोकरीच्या निमित्ताने सतत बाहेर असणारे लोक आपल्या मुलाची पुरेपूर काळजी घेऊन त्यांना विद्यार्जनास प्रोत्साहित करू शकत नाहीत, हे लक्षात घेऊन हे गृह स्थापन केले. तेथे प्रामुख्याने कुणबी, मराठा, माळी अशा जातीची दहा वर्षांखालील मुले दरमहा रु. बारा घेऊन ठेवली जात. या सुशिक्षणगृहातील मुलांची व्यवस्था पाहण्याच्या कामी डॉ. विश्राम घोले व गंगाराम भाऊ म्हस्के यांनी मदत केली.''
सत्यशोधक समाजाच्या समकालीन असलेल्या ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज इत्यादींचे कार्य शहरापुरते व उच्चवर्णीयांपुरते मर्यादित होते. त्यांची भाषा, आचार हे सर्वसामान्य माणसांपेक्षा वेगळया पातळीवरचे होते. सत्यशोधक समाज हा बहुजन, शूद्रातिशूद्र लोकांशी निगडित असला तरी इतर जातीधर्माचे लोकही यात सामील होते.
''ब्राह्मण, महार, मांग, ज्यू आणि मुसलमान या जातीधर्माचे लोक या समाजाचे प्रारंभीच्या काळात सभासद होते. सत्यशोधक समाजाच्या वतीने अनेक सहभोजनाचे कार्यक्रम पार पाडले जात. सत्यशोधक समाजाच्या शाखा अनेक ठिकाणी स्थापन करण्यात आल्या होत्या. त्यांच्या सभा आठवडयातून एकदा होत असत.''
सत्यशोधक समाजाचा कार्यकर्ता कसा होता, याविषयी कुलकर्णी म्हणतात,
''साधासुधा, प्रामाणिक, शेतकरी, कामगार हा सत्यशोधक समाजाचा कार्यकर्ता होता, सभासद होता. त्याचे तत्त्वज्ञान साधेच होते. त्याचे ध्येयही साधे, सरळच होते. हृदयातील प्रेरणा ही त्याची कार्यशक्ती होती. त्याची भाषा ही त्याची रोजचीच होती. साधी सोपी सर्वांना समजणारी! आणि त्याची प्रार्थना ती अन् त्याचा देव यांना कोणतीही जागा चालत होती. त्यांच्या सभा, बैठका आणि प्रचार यांना कोणतीही जागा चाले. अगदी एखाद्या शेतकऱ्यांच्या शेतातील मळणीची जागाही त्यासाठी चालत होती.''
''सत्यशोधक समाजाच्या प्रचारकांचा पोशाखदेखील सर्वसामान्य कनिष्ठ वर्गातील माणसासारखाच असे. कमरेला धोतर नेसलेले, खांद्यावर एक घोंगडी घेतलेली अन् डोक्याला पागोटे गुंडाळलेले असे. ते प्रचारक हाती डफ घेऊन प्रचाराला जात. त्यांची प्रचारातील भाषणे म्हणजे शिष्टसंमत सभेतील भाषणासारखी आखीव, रेखीव, विद्वत्तादर्शक, गहन, जड अशी अजिबात नसत तर ते जणू आपल्या श्रोत्यांशी गप्पाच मारत असत.!''
ज्योतिरावांना कार्याच्या तळमळीने प्रभावित झालेले अने कार्यकर्ते मिळाले. त्या कार्यामुळे या समाजाच्या ध्येय-उद्दिष्टांचा फैलाव सर्वत्र झाला.
''मुंबईत व्यंकू बाळोजी काळेवार, जाया कराळी लिंगू, व्यंकय्या अय्यावारू; पुण्यातील धनाढय गृहस्थ रामशेठ बप्पूशेठ उरवणे, डॉ. अण्णासाहेब नवले, मारुतराव नवले, डॉ. विश्राम घोले, पुढे बडोद्याचे दिवाण झालेले रामचंद्रराव धामणकर, कामगार चळवळीचे जनक नारायण मेधाजी लोखंडे, डॉ. संतूजी लाड, ज्योतिरावांचे स्नेही सदाशिवराव गोवंडे आणि सखाराम परांजपे हे सत्यशोधक समाजाचे आरंभीचे सदस्य होते. तुकाराम तात्या पडवळ व विनायकराव भांडारकर हे समाजाचे सभासद नि वर्गणीदार होते. गणपतराव सखाराम पाटील, बंडोबा मल्हारराव तरवडे, वासुदेवराव लिंगोजी बिर्जे, डॉ. सदोबा गावंडे, देवराव कृष्णाजी ठोसर, विठ्ठलराव हिरवे, लक्ष्मणराव घोरपडे, सीताराम रघुनाथ तारकंडू, हरिश्चंद्र नाराययण नवलकर, रामजी संतूजी आवटे, सरदार बहादूर दर्याजीराव थोरात, धोंडीराम रोडे, पं. धोंडीराम नामदेव कुंभार, गणपतराव मल्हार बोकड, भाऊ कोंडाजी पाटील - डुंबरे, गोविंदराव काळे, भीमराव महामुनी, माधवराव धारवळ, दाजीसाहेब यादव पाटील पौळ, सयाजीराव मेराळ कदम, राजकोळी, धनश्याम भाऊ भोसले व भाऊ पाटील शेलार हे सत्यशोधक समाजाचे प्रमुख कार्यकर्ते होते.''
1874 साली सत्यशोधक समाजाचा पहिला वार्षिक समारंभ मोठया थाटाने आणि उत्साहाने साजरा करण्यात आला.
''वार्षिक सभेमध्ये कार्यकारी मंडळामध्ये थोडा फेरफार करण्यात आला. नारायण तुकाराम नगरकर यांची कार्यवाह म्हणून निवड झाली तर भालेकर आणि रामशेठ उरवणे यांची कार्यकारी मंडळावर निवड झाली.''
1875 साली सत्यशोधक समाजाचा दुसरा वार्षिक समारंभ साजरा करण्यात आला.
''ज्योतिरावांनी समाजाच्या अध्यक्षपदी धुरा समाजाचे एक प्रभावी तरुण नेते डॉ. विश्राम रामजी घोले यांच्या खांद्यावर दिली. कोषाध्यक्षपद रामशेठ उरवणे यांना दिले. त्या वर्षी इलैया सालोमन नावाच्या एका ज्यूला कार्यकारी मंडळाचा सभासद करून घेतले.''
सत्यशोधक समाजाच्या दुसऱ्या वार्षिक अहवालात हा समाज कसा सक्रिय होता, ध्येय-उद्दिष्टांची अंमलबजावणी कशी होत होती, याचे दाखले मिळतात.
''गोविंद भिलारे पाटील या सातारा जिल्ह्यातील व्यक्तीने ब्राह्मणाच्या मदतीवाचून दोन वर्षात 11 लग्ने लावली होती. ग्यानू झगडे यांने ब्राह्मणाशिवाय एक पुनर्विवाह घडवून आणला. गणपत आल्हाट याने आपल्या आजीचे पिंडदान ब्राह्मणाशिवाय केले. नारायणराव नगरकरांच्या वडील बंधुंनी आपल्या भावजयीचे उत्तरकार्य ब्राह्मणाशिवाय केले.''
''व्यंकू काळभोर यांनी अंश्र, अपंग लोकांना वस्त्रे दिल्याचा व हरी चिपळूणकरांनी घनश्याम किराड या गरीब विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती दिल्याचा उल्लेख आहे.''
सत्यशोधक समाजाची प्रारंभीची तीन वर्षाची वाटचाल खूपच सक्रिय होती. प्रत्येक सत्यशोधक झपाटल्यासारखे कार्य करीत होता. सर्वच कार्यकर्त्यांना फुले यांनी एका ध्येयवादाच्या प्रवाहात खेचून आणले. फुले यांचे नेतृत्व सर्वांनीच मान्य केले होते. आरंभीच्या काळात सत्यशोधक समाजाच्या बैठका नियमित होत. देणगी व खर्चाचे हिशेब व वर्षभराच्या कार्याचे अहवाल सादर केले जात व पुढे या कामात सातत्य राहिले नाही. याबद्दल भालेकर आपली नाराजी व्यक्त करतात,
''सत्यशोधक समाज म्हणून ज्योतिराव फुले यांनी पुण्यास एक पंथ काढला होता. त्यातही शिरून मी काही वर्ष राहून पाहिले; परंतु सुतार, लोहार, सोनार, कासार इ. पांचाळ हिंदू लोकांप्रमाणे सत्यशोधकांनी फक्त ब्राह्मणास बाजूस सारून हिंदू रिवाज म्हणजेच मूर्तीपूजा, जातीभेद वगैरे सर्व प्रकारच्या घातक रूढी जशास तशा चालविल्या आहेत. दुसरे असे की, सत्यशोधकास कोठेच मुख्य स्थळे नाहीत. समाजात अध्यक्ष, उपाध्यक्ष, चिटणीस वगैरे सर्वानुमते निवडलेले नाही. वार्षिक रिपोर्ट कधी प्रसिध्द होत नाही. फंडाचे हिशोब नाही वगैरे तेथून सर्व गोंधळ.''


3.2 सत्यशोधक समाजाची मूलभूत तत्त्वे
सत्यशोधक समाजाच्या स्थापनेनंतर त्याच्या शाखा अनेक ठिकाणी काढण्यात आल्या होत्या. त्या ठिकाणी दर आठवडयास सभा होत असत. पुण्यातील सोमवार पेठेतील डॉ. गावंडे यांच्या घरी दर आठवडयाला सभा भरत असे. अशा सभेत सत्यशोधक समाजाच्या खालील तत्त्वांवर चर्चा होऊन कार्याची आखणी केली जात असे.
''सर्व मुला-मुलींना शिक्षण सक्तीचे करावे, दारूबंदीचा प्रसार व्हावा, स्वदेशी वस्तू वापरण्यास प्रोत्साहन द्यावे, धार्मिक क्षेत्रातील ब्राह्मणांनी पौरोहित्य करण्याची मिरासदारी झुगारून द्यावी, लग्ने कमीत कमी खर्चात करण्याची व्यवस्था करावी, लोकांमध्ये असलेली ज्योतिष, भूतेखेते, समंध इ. ची भीती नाहीशी करावी, अशा विषयासंबंधीच्या चर्चा त्यामध्ये होत असत. जातीभेद, मूर्तीपूजा यांच्याविरुध्द मुख्य प्रचार असे. परमेश्वराचे जनकत्व आणि मनुष्याचे बंधुत्व या तत्त्वांवर भर दिलेला असे.''
''सत्यशोधक समाज देव एकच आहे, असे मानीत असे. त्याचे मत मूर्तीपूजा करू नये, असे होते. केवळ दर आठवडयास भरणाऱ्या सभेच्या बहुदा शेवटी सांघिक प्रार्थना होई. धार्मिक बाबतीत मध्यस्थ, पुरोहित किंवा गुरुची आवश्यकता नाही. त्यांच्या आधाराविना किंवा मध्यस्थीविना कोणत्याही व्यक्तीला देवाची प्रार्थना आणि धार्मिक विधी करता येतात, अशी सत्यशोधक समाजाची शिकवण होती. त्यांचे मूळ आधारभूत तत्त्व ब्रह्मा किंवा मोक्ष नसून 'सत्य' हे होते. वेद हे ईश्वरनिर्मित ग्रंथ नसून मानवनिर्मितच आहेत, अशी ज्योतिबांची ठाम धारणा होती. त्याचप्रमाणे बायबल किंवा कुराण यासारखे धर्मग्रंथसुध्दा वेदांप्रमाणेच ईश्वरनिर्मित नाहीत असे ज्योतिबा मानत आणि तसे लोकांना समजावून सांगत.''

सत्यशोधक समाजाच्या तत्त्वांचा प्रचारक कसा होता, याविषयी कीर लिहितात,
''सत्यशोधक समाजाला फार मोठया बुध्दिवाद्यांचा पाठिंबा होता असे नाही. त्याचा तत्त्वज्ञानी पुरुष हा साधा प्रामाणिक शेतकरी होता. तो सामान्य शेतकरी असला तरी त्याला आंगीक प्रेरणा आणि बुध्दिप्रामाण्याची देणगी निसर्गत:च लाभली होती. सत्यशोधक समाजाच्या कार्याच्या प्रेरणेचे स्थान हृदय होते. त्याची भाषा जनतेची होती. त्याच्या प्रचाराची स्थळे, सभा बैठका व शेतावरील मळणीचे स्थान. सत्यशोधक प्रचारकांचा पोशाख म्हणजे एक घोंगडी, पागोटे व धोतर आणि हातात एक डफ. आपल्या भाषणात ते शेतकऱ्यांच्या कर्जाचा उल्लेख करीत. धर्मविधी व संस्कार यांच्या जाचाखाली शेतकऱ्यांचे कसे नुकसान होते व जो काही त्यांच्या गाठी पैसा असतो तो धूर्त ब्राह्मण भिक्षुक कसा लुबाडतो याकडे ते शेतकऱ्यांचे आणि सामान्य माणसांचे लक्ष वेधीत असत. आपल्या मुलाला त्यांनी शिक्षण दिले पाहिजे, असे ते सांगत. तसे केले म्हणजे त्यांना चांगले काय नि वाईट काय, कायदा, धर्म व देव म्हणजे काय हे समजेल, असा त्यांना उपदेश करीत. सत्यशोधक समाजाचे हे प्रचारक शेतकरी कुटुंबातील होते. त्यामुळे त्यांच्या कार्यात आणि प्रचारात पांडित्य व बुध्दिमत्ता यांचे तेज दिसून येत नसे, तथापि त्यांची कार्यशक्ती आणि तळमळ ही फार मोठी होती.''


3.2.1 तत्त्वाच्या प्रचार व प्रसारार्थ फुले यांच्या सहकाऱ्यांचे कार्य
म. फुले यांच्या काळात त्यांना प्रामाणिक सहकारी लाभल्यामुळे सत्यशोधक चळवळीच्या तत्त्वांचा प्रचार व प्रसार झपाटयाने झाला. सुरुवातीच्या काळातील त्यांच्या काही सहकाऱ्यांचे कार्य सत्यशोधक तत्त्वांच्या संदर्भात उल्लेखनीय आहे. त्याचा थोडक्यात आढावा या ठिकाणी घेण्यात आला आहे.


3.2.1.1 कृष्णराव भालेकर (1850-1910)
भालेकरांचा जन्म 1850 साली पुण्यात भांबुर्डे (शिवाजीनगर) येथे झाला. त्यांचे आजोबा राणोजी गावात प्रतिष्ठित मानले जात. राणोजीच्या धाकटया भावाची मुलगी म्हणजे सावित्रीबाई फुले होय. कृष्णरावाचे वडील जिल्हा सत्र न्यायालयात कारकून होते. भालेकरांच्या वडीलांच्या मृत्यूच्या वेळी फुले यांनी 'सत्पुरुषाचा आत्मा' या विषयावर प्रभावी भाषण दिले होते. 1864-68 या काळात भालेकर पुण्याच्या रविवार पेठेतील मिशन स्कूलमध्ये शिक्षण घेत होते. 1868 ला त्यांनी गरीबीमुळे शिक्षण सोडून दिले. मुंबईचे गुत्तेदार दादाभाई दुवाझा यांचे खेड जि. पुणे येथील कामावर देखरेख करण्याची नोकरी करताना धर्मभोळा, अज्ञानी व दरिद्री समाज त्यांनी जवळून पाहिला. ही परिस्थिती ज्या कारणांमुळे निर्माण झाली, त्यांचाही त्यांनी अभ्यास केला. शेतकरी, शेतमजूर यांच्या सभा घेऊन सत्यशोधक समाजाचे तत्त्वज्ञान ते लोकांना समजावून सांगू लागले. धर्मातील अनिष्ट व खोटया रूढींची ते माहिती देत; पण आपल्या कार्यास तेथे मर्यादा आहे, हे ओळखून त्यांनी राजीनामा दिला व ते भांबुडर्यास परत आले.
''फुले - भालेकर यांची भेट मुठेच्या काठी रोकडोबांच्या मंदिरात मे 1872 ला झाली. या मंदिरात भालेकरांनी 'अज्ञानराव भोळे देशमुख' व 'श्रीसत्यनारायण पुराणिक' हे दोन उपहासगर्भ वग सादर केले होते. अज्ञानराव भोळे देशमुख या वगात जहागीरदार, इनामदार, देशमुख असे वैभवयुक्त लोक अज्ञानात असल्यामुळे त्यांच्या हाताखालचे कारभारी त्यांना कसे लुटतात, फसवितात, हे दाखविले. श्री सत्यनारायण पुराणिक या वगातील वेंधळया ब्राह्मणाचे काम मोरेश्वर कावडे हे करीत.''
सत्यशोधक जलशाचे मूळ या भालेकरांच्या वगात सापडते. आज हे वग उपलब्ध नाहीत; परंतु सामाजिक प्रश्नावरील पथनाटयाचे उद्गाते म्हणून भालेकरांचा उल्लेख करावाच लागेल. हे वग सादर केल्याची बातमी समजल्यामुळे पुफ्ले भालेकरांना भेटावयास आले. फुले यांच्यापेक्षा भालेकरांची भूमिका वास्तववादी होती.
''निराश्रित हिंदू हे आपले देशबांधव व धर्मबांधव आहेत, असे समजून त्यांना ब्राह्मणांनी ज्ञान द्यावे, असा आग्रह धरतात.''
''अज्ञानी व निराश्रित हिंदू शहाणे झाले तर ते भटाभिक्षुकास देव मानणार नाहीत, सावकार व व्यापारी यांच्याकडून फसविले जाणार नाहीत, सरकारच्या दुराचारी नोकरांना घाबरणार नाहीत.''77
भालेकरांचे विचार फुले यांच्या विचारांशी अनुकूल होते. शिक्षणाने परिवर्तन होईल, अशी त्यांना खात्री होती. आपला ब्राह्मणांवर राग का आहे, याची कारणे ते खालीलप्रमाणे देतात.
1) मानवी हक्क ब्राह्मणांनी अन्य हिंदूस कळू दिले नाहीत.

2)  ब्राह्मणांनी इतरांकडून स्वत:ची पूजा करून घेऊन सर्वशक्तीमान परमेश्वराचा अपमान केला.

3)  इतर लोकांना ब्राह्मणांनी धर्मग्रंथ वाचू दिले नाहीत.

4)  परमेश्वराची आराधना ज्या पवित्र देवालयात होते तेथे सर्व हिंदूंना ब्राह्मणांनी प्रवेश दिला नाही.

5)  ब्राह्मणांनी आपले धर्मशास्त्र व कायदे इतर हिंदूंवर लादले.

6)    श्राध्दाच्या निमित्ताने त्यांनी मृतात्म्यांचा उपमर्द केला.''
भालेकरांचा रोष जसा ब्राह्मणांवर आहे तसाच संस्थानिकांवरही आहे. ते म्हणतात,
''संस्थानिक क्षत्रिय हे निराश्रित हिंदूंच्या चळवळींना हातभार न लावता ब्राह्मणांच्या कलेने चालतात. संस्थानिकांच्या खजिन्यातील पैसा हा फक्त त्यांचे नातेवाईक, जातभाई, ब्राह्मण, नायकिणी व तमासगीर यांनाच उपभोगण्यास मिळतो.''
भालेकरांनी माळी शिक्षण परिषद घेऊन फुले यांच्या कार्याची री ओढली.
''31 ऑक्टोबर 1909 रोजी भालेकरांचे 'माळी शिक्षण परिषदेची आवश्यकता' या विषयावर मुंबईत व्याख्यान झाले. दुसरे व्याख्यान पुणे शहरात झाले. प्रस्तुत परिषद पुणे किंवा मुंबई येथे भरवावी म्हणून लोकांना त्यांनी विनंती केली. नगर येथे जाऊनही हाच प्रश्न लोकांसमोर ठेवला. त्यांच्या या प्रयत्नामुळे 2 जानेवारी 1910 ला पुणे येथे पहिली माळी शिक्षण परिषद भरली.''
भालेकरांनी आपल्या कृतीयुक्त उपक्रमांनी चळवळीवर एक वेगळा प्रभाव पाडलेला दिसतो. ते स्वत: एक वेगळी चूल मांडीत होते; परंतु कार्याचा सार मात्र एकच होता.
''भालेकरांनी मे 1884 मध्ये दीनबंधू सार्वजनिक सभेची स्थापना केली. याकामी त्यांना विठ्ठलराव वंडेकर, रघुनाथ तारकुंडे, हरी चिपळूणकर, हरिश्चंद्र नवलकर, घोरपडे बंधू यांनी सहकार्य केले. लोकांच्या अडचणी सरकारपुढे मांडल्या. सरकारला कायदे करण्यापूर्वी जनतेची खरी स्थिती व मते याबाबत निवेदन सादर करणे, ब्राह्मणेत्तरांतील वाईट चालीरिती बंद करणे यासाठी या सभेची स्थापना करण्यात आली. शिक्षण हे सक्तीचे मोफत असावे, असा आग्रह या सभेने सतत चार वर्षे धरला. त्यासाठी भालेकरांनी एक लक्ष लोकांच्या सह्यांचा अर्ज ब्रिटिश पार्लमेंटला पाठविला. त्यांनी भांबुडर्यास 10,000 लोकांची सभा घेऊन दोन ठराव पास केले.''
प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत असावे व काँग्रेस ही सर्व जातीच्या लोकांची सभा नाही, मूठभर उच्चवर्णीयांतल्या शिकलेल्या लोकांची ती सभा आहे. तिच्या मागण्याला आमची संमती नाही, ही भूमिका भालेकरांनी घेतली होती. भालेकर हे सत्यशोधक चळवळीतील निर्भीड कार्यकर्ते होते.
''1885 च्या गुढीपाडव्याच्या दिवशी भालेकरांनी सत्यशोधक समाजाच्या झेंडयाची मिरवणूक पुण्यातील प्रमुख रस्त्यावरून काढली. या मिरवणुकीत मुंबईचे रामय्या अय्यावारू, रामचंद्र हेजीब, पुण्यातील डॉ. भांडारकर, न्या. रानडे, सदोबा गावंडे, एल. के. घोरपडे, एच. एल. नवलकर इ. मंडळी सामील झाली होती. मिरवणुकीत फुले, रानडे, अय्यावारू यांची भाषणे झाली.''
''1885 ला दयानंद सरस्वती पुण्यात आले असता सनातनी ब्राह्मणांनी त्यांची मिरवणूक उधळून लावली. स्वामी दयानंदांची मिरवणूक उधळून लावल्यानंतर भालेकरांनी त्यांना भांबुडर्यास नेले व त्यांचा सत्कार करून तेथील धर्मशाळेत त्यांचे भाषण घडवून आणले.''
कृष्णराव भालेकर व म. फुले यांच्या विचारात साम्य होते.
''भालेकरांनी भिक्षुकशाही व ब्राह्मणी ग्रंथ इत्यादींवर टीका करून शूद्रांच्या स्थितीचे वर्णन केले आहे.''84
''सावकारशाही, भटशाही व कुलकर्णी वतन यावर हल्ला करून शेतकरी व कारागीर हेच देशाचे आधारस्तंभ आहेत, असे त्यांनी म्हटले.''
''कष्टकरी, शूद्र व शेतकरी यांच्याविषयी त्यांच्या मनात असलेली तळमळ व भटजी, सावकार, कुलकर्णी यांच्याविषयीची चीड त्यांच्या लिखाणातून स्पष्ट होते.''
भालेकरांनी कंत्राट घेण्याच्या निमित्ताने वऱ्हाड व मध्यप्रांतात जाऊन सत्यशोधक चळवळ त्या भागात रुजविली.








संपादक - यतिन जाधव.
https://www.facebook.com/uatinjadhav789456123