मंगळवार, १० ऑक्टोबर, २०१७

● विविध देशातील लेण्या, पंथ आणि वास्तविकता

● विविध देशातील लेण्या, पंथ आणि वास्तविकता

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

पर्वत श्रेणीत खडक खोदून तयार केलेली गुहागृहे वा प्रस्तरालये. नाशिक जवळच्या पांडव लेण्यातील लेखात ‘लेण’ हा शब्द प्रथम आलेला दिसतो. ‘एतच लेण महादेवी महाराज माता महाराज पतामही ददाति. ‘लेण’ हा शब्द संस्कृत ‘लयन’ म्हणजे ‘गृह’ या शब्दावरून आला आहे.

लेण्यांना गुहा, गुंफा, शैलगृहे, शिला मंदिरे, प्रस्तरालये अशी अन्य नावे ही आहेत. गुहांची ठिकाणे डोंगर कपारीत नैसर्गिक रीत्या तयार झालेली असतात किंवा मानवाने डोंगर खोदून ती तयार केलेली असतात. लेणी ही संज्ञा सामान्यपणे मानव निर्मित गुहांना वापरली जाते. अश्मयुगीन मानवाचे वास्तव्य बऱ्याच वेळा नैसर्गिक रीत्या पुढे आलेल्या प्रस्तराच्या आडोशानेच होत असे. अशां पैकी काही निवडक गुहा स्थानां मधल्या खडकांच्या भिंतींवर आदि मानवाने चित्रे खोदून आपल्या उत्कृष्ट चित्रकलेचे नमुने मागे ठेवलेले आहेत. प्रारंभीच्या काळात खोदलेली लेणी ही त्या त्या डोंगरांच्या पायथ्याशी असून ती साधी, लहान व ओबड धोबड अशी होती. नंतरच्या काळातील लेणी पर्वत श्रेणीच्या वरच्या भागांत क्रमशः आढळतात व अखेरच्या टप्यातील लेणी तर माथ्यावर कोरलेली आहेत. उत्तर अश्मयुगातील चित्रयुक्त गुहा अल्तामिरा (स्पेन); एल्‌ कॅस्तिल्लो, ऑदुबर्त, लॅस्को, लेझेझी (फ्रान्स); निऑ (इटली); तुनह्वांग (चीन) इ. ठिकाणी आढळल्या.

तुनह्‌वांग लेणी अजिंठ्या प्रमाणेच बौद्ध भिंती लेप चित्रांकरिता (इ. स. पाचवे - तेरावे शतक) प्रसिद्ध आहेत. या लेण्यांमध्ये इंग्रज पुरातत्ववेत्ते सर ऑरेल स्टाइन यांना सुमारे १५,००० हस्त लिखितांच्या संग्रहाचा शोध लागला. त्यांत हीरक सूत्र (इ. स. ८६८) या आद्य मुद्रित पुस्तकाचा अंतर्भाव आहे. अफगाणिस्तान मधील बामियान येथे अनेक शैलगृहे असून, तेथे बुद्धाच्या भव्य मूर्ती आढळतात. लेझेझी व निऑ या गुहा मग्डेलेनिअन काळातील (इ. स. पूर्व सुमारे दहा हजार वर्षे) असून लेझेझी गुहेतील चित्रात बायसनच्या (गवा) हनुवटी खालील गोंडा आणि त्याची मदार यांतून त्याची खास वैशिष्ट्ये स्पष्ट होतात. फ्रान्सच्या पिरेनीज पर्वत श्रेणीत आणि दॉर्‌दॉन्यू खोऱ्यात अशाच काही चित्रयुक्त गुहा आढळल्या आहेत.

मध्य भारतातील सिंगनपूर, आदमगढ, चक्रधरपूर, मिर्झापूर, हुशंगाबाद, लिखुनिया, भलदरिया, विजयगढ, पंचमढी इत्यादी ठिकाणी गुहा असून त्यांतून भिंती चित्रे आढळतात; तथापि या गुहांचा अद्यापि म्हणावा तितका सखोल अभ्यास झालेला नाही. या व्यतिरिक्त भीम बेटका येथे अति प्राचीन प्रस्तर गुहा १९५५ मध्ये उत्खनन संशोधनात वि. श्री. वाकणकर यांना प्रथम आढळल्या. यशोधर मठपाल या तज्ञाच्या मते येथील चित्र शैली चार प्रकारांत खडू (क्रेऑन), ओली पारदर्शक, ओली अपारदर्शक आणि तुषार रंग (स्प्रे कलर) अशी विभागलेली असून, त्यांपैकी खडू रंगाची चित्र शैली भारतात क्वचितच आढळते. चित्र शैली, तंत्र आणि अध्यारोपण या आधारांवर वाकणकर यांनी येथील चित्रांचे सात कालखंड कल्पिलेले आहेत. त्यानुसार त्यांचा काळ इ. स. पूर्व सुमारे २५००० इतका मागे जातो. अशाच तऱ्हेचे अश्मयुगीन गुहा समूह भारतात आंध्र प्रदेशातील कुर्नूल जवळ बिल्ल सुर्गम येथे सापडले आहेत. ईजिप्त, जॉर्डन इत्यादी देशांत ही अशा प्रकारची लेणी आढळतात. 

प्राचीन लेण्यांत विशेषतः प्रागैतिहासिक लेण्यांत प्रामुख्याने प्राण्यांची चित्रे असून ती शिकार या तत्कालीन प्रमुख जीवन व्यवसायाशी निगडित असावीत; कारण यूरोपातील गुहांतून रानगवे, रानबैल, हरिणे, रेनडिअर, अस्वल या प्राण्यांचे व त्यांच्या शिकारींचे चित्रण प्रामुख्याने दिसते. उत्तर काळात मातृका देवी, सुफलता व प्रजनन यांची ही प्रतीकात्मक चित्रे, तसेच गर्भवती, संतती पालक स्त्रिया यांची रेखाटने आढळतात. त्यांतील स्त्री चित्रणात लठ्‌ठ बांधा, अवाजवी स्तन, विशाल नितंब आणि जघन प्रदेशाला उठाव दिलेला आढळतो. त्याचा संबंध सुफलता विधीशी संलग्न अशा कर्मकांडाशी असावा, असे दिसते. [आदिम कला; प्रागैतिहासिक कला].

भारतात खडकांतून कोरलेली सुमारे १,२०० लेणी आहेत. त्यांतील हजाराहून थोडी जास्त लेणी महाराष्ट्रात आढळतात. भारता मधील लेणी जैन, बौद्ध आणि वैदिक (हिंदू) अशा विविध धर्म पंथीयांनी कोरलेली आहेत. त्यांत बौद्ध धर्मीयांच्या लेण्यांची संख्या सर्वाधिक आहे. ही लेणी कोणत्याही धर्म पंथाची असली, तरी लेण्यांचे ऐहिक व धार्मिक असे प्रमुख दोन प्रकार आहेत. ऐहिक लेणी फारच थोडी आहेत. धार्मिक प्रसार - प्रचार हाच प्रमुख हेतू सामान्यतः बहुतेक लेण्यांतून दिसून येतो. या लेण्यांचा सर्वसाधारण काळ इ. स. पूर्व तिसरे शतक ते इ. स. नववे शतक असा मानला जातो. गिरि शिल्पांची ही परंपरा आठव्या - नवव्या, कदाचित दहाव्या शतकापर्यंत ही चालू होती. भारतात मौर्य काळात प्रामुख्याने सम्राट अशोकाच्या कारकीर्दीत (इ. स. पूर्व २७३ - २३२) बौद्ध लेणी खोदण्यास प्रारंभ झाला असावा, असे त्या लेण्यांतील कोरी लेखांवरून ज्ञात झाले आहे. खुद्द अशोकाने प्राचीन मगध देशात (बिहार राज्य) बराबर टेकड्यांत व त्याचा नातू दशरथ याने नागार्जुनी टेकड्यांत आजीविक पंथाच्या भिक्षूंकरिता लेणी कोरविली होती. याच सुमारास भारताच्या इतर भागांत विशेषतः ओरिसात उदयगिरी आणि खंडगिरी येथे; तमिळनाडूत महाबलीपूर व गुजरात काठेवाडात जुनागढ, ढांक इत्यादी ठिकाणी विशाल खडकांतून लेणी खोदलेली आढळतात. भारतात पूर्णतः हिंदू धर्माशी संबद्ध असा एखादाच लेणी समूह आढळतो. वेरूळ सारख्या ठिकाणी तर बौद्ध, जैन व हिंदू असे गुफांचे तीन स्वतंत्र समूह आढळतात. बौद्ध लेण्यांत चैत्य आणि विहार असे दोन प्रकार आढळतात. जैन लेण्यांमध्ये चैत्यगृह नाही आणि वैदिक लेण्यांत चैत्यगृह आणि विहार ही दोन्ही नाहीत. त्यामुळे वैदिक लेणी बहुतांशी उत्कीर्ण देवालय प्रासादाच्या स्वरूपाचीच आहेत.

भारतात खोदलेल्या लेण्या मध्ये बौद्ध लेण्यां इतकी वैदिक वा हिंदू लेणी प्राचीन नाहीत. जी आहेत ती प्रामुख्याने वेरूळ, जोगेश्वरी, मंडेश्वर, पाताळेश्वर, आंबेजोगाई, घारापुरी (महाराष्ट्र); बादामी (कर्नाटक); महाबलीपुर (तमिळनाडू); उदयगिरी (मध्य प्रदेश) इत्यादी ठिकाणी आढळतात. या सर्वांत कलात्मकतेच्या दृष्टीने वेरूळ येथील लेणी विशेष लक्षणीय आहेत. त्यांतील काही लेणी बौद्ध विहाराच्या धर्तीवर कोरलेली असल्याचे दिसते. यांत शैव, वैष्णव पंथांशी संबंधित अनेक शिल्पे आहेत. रावण की खाई, रामेश्वर, दशावतार, सीतेची कहाणी ही वेरूळ येथील उल्लेखनीय हिंदू लेणी होत. वेरूळ येथील कैलास लेण्याचा अद्वितीय सुरेख शैल मंदिर म्हणून उल्लेख करतात. हे शिव मंदिर अखंड खडकातून सभोवतालच्या ओवऱ्यांसह खोदून काढलेले आहे. शैल मंदिर या शिल्प प्रकाराचे हे लेणे ही सर्वांत परिणत अवस्था होय. मध्य प्रदेशातील भिलसा शहरा जवळ उदयगिरी येथे एकूण वीस लेणी आहेत. त्यांपैकी दोन जैन गुंफा ओत. उर्वरित लेणी हिंदू धर्माशी संबद्ध असून गुहा क्रमांक पाच तेथील वराहावताराच्या शिल्पासाठी प्रसिद्ध आहे. वराहाची मूर्ती सुमारे तीन मीटर उंच असून त्याच्या दंताग्रावर स्त्री रूप धारिणी पृथ्वी आहे. वराहाचे शरीर भक्कम असून त्याच्या अंग प्रत्यंगातून सामर्थ्य व चैतन्य ओसंडत आहे, असे वाटते. त्याच्या जवळच ब्रम्हा, शिव, यक्ष, किन्नर इत्यादींच्या सुबक मूर्ती असून त्या पृथ्वी उद्धारा बद्दल आनंद व्यक्त करताना दर्शविलेल्या आहेत. हे गुप्त कालीन कलेचे एक अप्रतिम शिल्प आहे. गुहा क्रमांक सहात विष्णूच्या उभ्या दोन मूर्ती आहेत. त्यांत त्याची आयुधे स्पष्ट दर्शविलेली असून विष्णूने कौस्तुभमणिहार, वैजयंती इत्यादी माला घातलेल्या असून अन्य अलंकार ही मूर्तिकाराने सूक्ष्म रीत्या कोरलेले आहेत. यांशिवाय या गुहेत दोन ओबड धोबड गणेश मूर्ती आहेत. अशाच गणेशाच्या सुबक मूर्ती गुहा क्रमांक तीन व सतरा यांत आढळतात. गणपतीच्या मूर्ति शिल्पास गुप्त काळात येथूनच प्रारंभ झाला असावा, असे बहुतेक कला समीक्षक मानतात. सहाव्या गुहेच्या प्रवेश द्वारातील द्वारपाल ही आकर्षक वाटतात.

कर्नाटकातील बादामी (विजापूर जिल्हा) जवळच्या डोंगरात चार लेणी आहेत. चालुक्यांनी ती इ. स. सहाव्या शतकात खोदली असून त्यांपैकी प्रत्येकी एक शैव व जैन आहे. उर्वरित दोन लेणी वैष्णव आहेत. येथील वैष्णव लेणी मंगलेश चालुक्य राजाच्या काळी इ. स. ५७८ च्या सुमारास खोदली, असे तेथील शिला लेखावरून ज्ञात होते. त्यात शैव संप्रदायाच्या मूर्ती आढळतात. दक्षिण भारतात सातव्या - आठव्या शतकांत प्रस्तरातून मंदिरे, मंडप व रथ खोदून काढण्याची वास्तु पद्धती प्रचलित होती. गुंतूर व त्रिचना पल्ली या जिल्ह्यांत काही मंडप आढळतात. मंडप म्हणजे डोंगराच्या दर्शनी भागात कोरलेली वास्तू आणि रथ म्हणजे स्वतंत्र पाषाणात कोरलेले एक पाषाणी मंदिर. तमिळनाडूतील महाबलीपुर येथील वराह, महिषा सुर मर्दिनी, धर्मराज मंडप, कृष्ण मंडप, पंच पांडव मंडप या पाच गुहांत पल्लवांच्या अभिजात व परिणत शिल्प शैलीचा आविष्कार आढळतो. यात मंडप रथ ही संकल्पना पूर्ण अवस्थेत पोहोचलेली दिसते. येथील शैलोत्कीर्ण रथ प्रख्यात आहेत. त्यांपैकी काही दोन वा तीन मजली ही भासतात. महिषासुर मर्दिनी लेण्यातील स्तंभ वैशिष्ट्यपूर्ण असून या गुहेतील हंसांच्या रांगांचे अलंकरण लक्षणीय आहे. या लेण्यातील शेषशायी विष्णू व महिषा सुर मर्दिनी ही शिल्पे कलात्मक आहेत. या शिल्पांचे रथ हे नाव सार्थ वाटते, कारण पाहणाऱ्याला त्यांची गतिमानता प्रत्ययाला येते. तेथूनच जवळ २९.२६ मी. लांब व सुमारे १३.१० मी. रुंद असा विस्तीर्ण शिल्प पट्ट असून तो विशेष उल्लेखनीय आहे. त्याच्या फटीत नाग नागीण यांची अपोत्थित शिल्पे कोरलेली असून, एका बाजूला एक जटाधारी पुरुष तप करीत असलेला दाखविलेला आहे. ती अर्जुनाची प्रतिमा आहे, असे काही तज्ञ मानतात, तर गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी भगीरथाने केलेल्या तपश्चर्येची ती मूर्ती (गंगावतरण) आहे, असे इतरांचे म्हणणे आहे. त्या खडकावर हत्ती, वाघ, सिंह, यक्ष, सूर्य, गंधर्व, चंद्र, अप्सरा इत्यादींच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. या गुहांतून पल्लवांच्या इ. स. सहाव्या सातव्या शतकांतील द्राविड शिल्प शैलीचे सुंदर मिश्रण या रथ शिल्पात झालेले आढळते. महाराष्ट्रात वेरूळ व्यतिरिक्त मुंबई जवळ जोगेश्वरी व घारापुरी येथे हिंदू गुंफा आहेत. त्यांपैकी घारापुरी येथे पाच लेण्यांचा समूह असून ही लेणी राष्ट्र कूटांच्या वेळी इ. स. आठव्या - नवव्या शतकांत खोदली असावीत, असा तज्ञांचा कयास आहे. या लेण्यांतील बहुतेक सर्व शिल्पे शिवाच्या जीवनाशी निगडित असून ही शैव लेणी रचना सौंदर्यात सीतेची नहाणी या वेरूळच्या लेण्या सारखीच आहेत. तेथील त्रिमूर्ती शिल्प आणि कल्याण सुंदर मूर्ती या विलोभनीय असून कलेतिहासात त्यांना आगळे स्थान प्राप्त झाले आहे.

हिंदू लेण्या प्रमाणेच जैन लेण्यांचे प्रमाण भारतात कमी आहे. ही लेणी प्रामुख्याने ओरिसातील भुवनेश्वर जवळ उदयगिरी खंडगिरी येथे, तसेच कर्नाटकातील ऐहोळे व बादामी (विजापूर जिल्हा) आणि महाराष्ट्रातील चांदवड, अंकाई - टंकाई (नाशिक जिल्हा), आंबेजोगाई, धाराशिव (उस्मानाबाद जिल्हा), वेरूळ (औरंगाबाद जिल्हा) इत्यादी आढळतात. उदयगिरी येथे कलिंग देशातील पाचशे मुनी मोक्षाला गेले, असा जैन पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे हे जैनांचे पवित्र तीर्थस्थान (अतिशय क्षेत्र) म्हणून प्रसिद्ध आहे. महावीराने ही या स्थानाला भेट दिली होती, असा समज आहे. या पर्वत श्रेणींच्या परिसरात साठांवर मौर्य कालीन गुंफा आहेत. उदयगिरी वरच सुमारे पचतीस लेणी आहेत. येथील काही लेणी अनेक मजल्यांची असून त्यांमध्ये पुष्कळ शिल्पे आहेत. लेण्यांतील स्तंभ आणि तत्संलग्न शिल्पे उत्कृष्ट आहेत. अलगपुरी, जय - विजय, राणी, गणेश, स्वर्ग, मध्य पाताळ इत्यादी प्रसिद्ध गुंफा आहेत. गणेश गुहेच्या बाहेर दोन अजस्त्र हत्ती आहेत. येथील हाथी गुंफेत कलिंगचा राजा खारवेल याचा सुप्रसिद्ध शिलालेख आहे. या सर्व गुहांत मूर्ती कोरलेल्या आहेत. उदयगिरी जवळच खंडगिरी असून तिथे वर व  खाली पाच गुहा आहेत. शिखरावर जैन मंदिर आहे. जवळच इंद्रकेसरी गुंफा असून तिच्या मागील एका गुहेत चोवीस तीर्थंकरांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. ऐहोळे येथे मेगुती टेकडीवर मेनाबस्ती नावाचे लेणे खोदलेले असून त्यात विशेष उल्लेखनीय मूर्तिकाम नाही. फक्त पार्श्वनाथाचे, त्याच्या शासन देवतांसह (धरणेंद्र, पद्मावती) अपोत्थित शिल्प आहे. बादामी येथे वैष्णव गुहे जवळच उंच जागी उत्तराभिमुख जैन लेणे असून त्यातील सिंहासनाधिष्ठित महावीराची मूर्ती लक्षवेधक आहे. भिंती वर गोमटेश्वर व पार्श्वनाथ आणि त्यांचे सेवक तसेच काही तीर्थंकर यांच्या मूर्ती आहेत. अंकाई - टंकाई व चांदवड येथे जैन लेणी असून त्यांत कोरीव काम केलेले आहे; ही लेणी सध्या भग्नावस्थेत आहेत. मराठावाड्यातील आंबेजोगाई व धाराशिव येथे हिंदू - जैन लेणी असून यांपैकी हिंदू लेणी उस्मानाबाद शहराजवळ सुमारे ५ किमी. वर असून ती ‘चांभार लेणी’ या नावाने प्रसिद्ध आहेत. त्याच्या पुढे सु. १८ किमी. वर डोंगरात असलेली उत्तराभिमुख चार व ईशान्याभिमुख तीन अशी सात जैन लेणी धाराशिवची लेणी म्हणून प्रसिद्ध आहेत. ती करकण्ड चरिउ या अपभ्रंश आणि बृहत्कथा कोष या संस्कृत ग्रंथांनुसार, तसेच जेम्स बर्जेस यांच्या मते जैन धर्माची म्हणून वर्णिली आहेत. त्यांचा काल इ. स. ५० ते ५०० असा पुरातत्वज्ञ मानतात. येथील पार्श्वनाथ तीर्थंकरांच्या भव्य प्रतिमा प्रसिद्ध आहेत. अलीकडे म. के. ढवळीकरांसारखे काही तज्ञ धाराशिवची लेणी ही बौद्ध संप्रदायाची असावीत, असे मत मांडतात; तथापि वा. वि. मिराशी व अन्य संशोधकांनी तेथील वास्तुशिल्पादी पुराव्यांवरून ती जैनच असल्याचे प्रतिपादन केले आहे. वेरूळ येथील आठव्या - नवव्या शतकांतील जैन लेणी नावाजण्या सारखी आहेत. त्यांपैकी इंद्र सभा व जगन्नाथ सभा नामक लेणी स्थापत्य व शिल्प दृष्ट्या प्रेक्षणीय आहेत. तेथील स्तंभांचे प्रकार, त्यांवरील कला कुसर आणि रेखीव शिल्पकाम डोळ्यात भरण्या सारखे आहे.

बौद्ध लेणी हीनयान आणि महायान या दोन्ही पंथांची असून त्यांच्यातील वेगळेपणा स्पष्टपणे लक्षात येतो. सुरुवातीच्या कालखंडात खोदली गेलेली ढांक, जुनागढ (गुजरात), भाजे, कोंडाणे, पितळखोरे, अजिंठा, बेडसे, कार्ले, नाशिक येथील लेणी हीनयान पंथाची आहेत. काल दृष्ट्या सुद्धा ती याच क्रमाने खोदण्यात आली असावीत, असा पुरातत्वज्ञांचा कयास आहे. बिहारच्या गया जिल्ह्यात बराबर आणि नागार्जुनी टेकड्यांत अशोक व त्याचा नातू दशरथ यांनी आजीविक भिक्षूंसाठी सात लेणी खोदविली. त्यांपैकी सुदामा आणि लोमश ॠषी ही प्रसिद्ध आहेत. त्या दोन्हीं मध्ये तत्कालीन प्रथेनुसार कारागिरांनी लाकडी कोरीव काम केलेले दिसून येते. आतील भिंतींवर घासून घासून चकाकी आणली आहे. लोमश ॠषी लेण्याचे विधान साधे असून त्यांत एक चौकोनी व एक वर्तुळाकार खोली आहे. हे हीनयान पंथाचे सुरुवातीचे लेणे आहे. महायान पंथाचे प्रतिनिधित्व करणारी शिल्पशैली असलेली लेणी बाघ (मध्य प्रदेश), अजिंठा, वेरूळ, औरंगाबाद, कान्हेरी, पन्हाळे-काजी इ. ठिकाणी आहेत. बाघ लेण्यातील विहारात बुद्ध मूर्ती ऐवजी स्तूप असल्याने काही जण ते हीनयान पंथीयांचे असावे, असे मत व्यक्त करतात; तथापि या ठिकाणी या दोन्ही पंथीयांचे वास्तव्य असावे, असे तेथील अवशिष्ट शिल्प शैली वरून निदर्शनास येते. अजिंठ्या खालोखाल येथील भिंती चित्रे प्रसिद्ध आहेत.

महाराष्ट्रात बौद्ध धर्माच्या प्रसारास प्रारंभ झाल्यानंतर तेथील भिक्षूंची संख्या वाढू लागली आणि त्यांच्या राहण्या करिता विहार, धर्मोपदेशाकरिता चैत्यगृहे आणि पूजेसाठी स्तूप पर्वत श्रेणींतून खोदण्यात आले. महाराष्ट्रातील लेणी आणि त्यांतील कोरीव लेख हे या धर्म प्रसाराचे दृश्य दाखले होत. वास्तुशास्त्र दृष्ट्या बौद्ध लेण्यांचे तीन प्रमुख प्रकार पडतात.

(१) स्तूप
(२) विहार
(३) चैत्यगृह

स्तूप म्हणजे पूज्य व्यक्तीच्या अवशेषांवर उभारलेला व दगड, माती, विटा यांनी बांधलेला किंवा खडकात खोदलेला बहिर्गोल वास्तु प्रकार होय. यालाच ‘डागोबा’, धातु गर्भ, चैत्य म्हणतात. हीनयान पंथीय अनुयायांनी उभारलेले स्तूप ओबड धोबड व साधे असून महायान पंथीयांनी चैत्यगृहातील स्तूपाला शिल्पांनी अलंकृत करण्याचा आणि दर्शनी भागावर बुद्धाची मूर्ती कोरण्याचा प्रघात पाडला. स्तूपावर हर्मिका असून तीवर एकावर एक अशी तीन छत्रे उभारलेली असत. अमरावती, नागार्जुन कोंडा, बोधगया, भारहूत, मथुरा, सांची, सारनाथ येथील तोरणे शिल्प पट्टांनी अलंकृत आहेत. यांतील काहींची मोडतोड झाली आहे.

विहार ही बौद्ध भिक्षूंना निवासासाठी बांधलेली वास्तू असून सुरुवातीस तिच्यात एकच अपवारक (खोली) व त्यापुढे व्हरांडा असे. भिक्षूंची संख्या वाढल्यानंतर हळूहळू त्याचा विस्तार होऊन त्यात आणखी दालनांची भर पडली आणि मोठ मोठे मंडप कोरण्यात येऊ लागले; तसेच मंडपाच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींत खोल्या काढण्यात आल्या. मंडपांना आकारमानानुसार छताच्या आधारा करिता काही अंतरावर समांतर असे स्तंभ कोरण्यात येऊ लागले. या स्तंभांना विविध वेल पत्तींनी, स्तंभ शीर्षांनी, शिल्पांनी व चित्रांनी भूषविण्याची पद्धत पडली. कार्ले, नासिक, अजिंठा व वेरूळ येथील मंडपांचे स्तंभ अलंकृत केलेले आहेत. सुरुवातीच्या विहारांत काढलेल्या आकृतींत बोधिवृक्ष, चक्र, पादुका इत्यादी प्रतीकात्मक चिन्हांनी बुद्धाचे अस्तित्व सूचित केले आहे. महायान पंथाच्या उदया नंतर विहारात मूर्ति शिल्पाला महत्त्व प्राप्त झाले आणि जातक कथांतून सांगितलेले बुद्ध चरित्रातील अनेक प्रसंग शिल्पांकित करण्यात आले. यातूनच बुद्धाच्या वज्र पाणी, पद्म पाणी यांसारख्या सुरेख मूर्ती आकारास आल्या.

चैत्यगृहे विहारांच्या जवळपास आणि भिक्षूंना प्रार्थने करिता उपयुक्त होतील अशा पद्धतीने खोदलेली आहेत. त्यांना ‘गंधकुटी’ असे ही म्हणतात. सुरुवातीची चैत्यगृहे चौकोनी, आयताकार असून त्यांच्या प्रवेश द्वारासमोर मागील भिंतीत चैत्य वा स्तूप कोरलेला असे. पुढे या भिंतींना अर्ध वर्तुळाकार देण्यात आला. चैत्यगृहाच्या प्रशस्त आकारानुसार स्तंभांना दोन स्वतंत्र रांगा दोन्ही बाजूंस भिंतींशी समांतर कोरण्यात येऊ लागल्या आणि त्या बरोबरच चैत्य किंवा स्तूप मागील भिंती पासून पुढे आणून प्रदक्षिणा पथाची रचना अस्तित्वात आली. आत कोरलेल्या बुद्ध मूर्तीवर प्रकाश पडावा, म्हणून या वास्तूत दर्शनी भिंतीवर जाळी सहित मोठी खिडकी चैत्य गवाक्ष पाडण्याची प्रथा हळूहळू अस्तित्वात आली. ही अर्ध वर्तुळाकार असल्याने ती घोड्याच्या नालाच्या आकाराची कमान असे. गौतम बुद्धाला अश्वत्थ वृक्षाखाली (बोधिवृक्ष) ज्ञानप्राप्ती झाली, म्हणून या चैत्यगवाक्षाचा आकार वास्तवात अश्वत्थ पानासारखा आहे. विहार व चैत्यगृहांजवळ भिक्षुंकरिता पाण्याची टाकी खोदली जाई. त्यास ‘पोढी’ म्हणत.

हा विहार व चैत्य लेण्यांप्रमाणे ही टाकी सुद्धा भिक्षु संघास अर्पण करण्याची पद्धत होती. तशा आशयाचे अनेक कोरीव लेख उपलब्ध झाले असून अजिंठ्याच्या लेणे क्र. २६ मधील लेखात ‘जोपर्यंत विहार चैत्यादिकांसारखे पुण्यकृत्य या जगात विद्यमान आहे, तोपर्यंत मनुष्य स्वर्ग लोकात आनंदाने राहतो, म्हणून पर्वता मध्ये 'यावत्‌चंद्र दिवाकरौ टिकणारी लेणी कोरावीत,’ असा उल्लेख आहे. बहुधा प्रत्येक बौद्ध लेण्यात ते कोणी कोरले, ह्याचा निर्देश आढळतो. महाराष्ट्रातील भाजे येथील लेण्यातील लेखा वरून ते अशोकाच्या काळातच खोदण्यास सुरुवात झाली होती, हे स्पष्ट दिसते. गुप्त वाकाटक काळात खोदलेल्या कान्हेरी, अजिंठा, वेरूळ इ. लेण्यांत प्राकृत ऐवजी संस्कृत भाषेत लेख कोरण्याचा पुढे प्रघात पडला.

लेणी महाराष्ट्राच्या सर्व भागांत आढळतात. पश्चिम भागात राजपुरीच्या खाडी जवळ कुडा व महाड, पन्हाळे - काजी (रत्नागिरी जिल्हा) आणि ठाण्याजवळ कान्हेरी येथे ती आहेत. मध्य भागात पितळ खोरे, नाशिक, जुन्नर, कोंडाणे, भाजे, बेडसा, कार्ले, कराड इत्यादी ठिकाणी आणि पूर्व भागात अजिंठा, वेरूळ, औरंगाबाद, खरोसे इत्यादी ठिकाणी ही लेणी आढळतात. पितळ खोऱ्याच्या लेण्या समोर प्रचंड आकाराच्या हत्तींची एक रांग कोरलेली आहे. पुढच्या काळातील मंदिर शिल्पांचा अविभाज्य भाग बनलेल्या ‘गजथरा’ चा उगम या रांगेत मिळतो. तसेच पन्हाळे - काजी येथे सापडलेल्या महाचंड रोषणाच्या मूर्ती वरून तेथील तांत्रिक बौद्ध पंथा विषयी माहिती मिळते. हे त्यावेळी कोकणातील एक वज्रयान तांत्रिक धर्माचे केंद्र होते, असे मत पुरातत्त्वखात्याचे माजी महासंचालक म. न. देशपांडे यांनी व्यक्त केले आहे.

भारतात राजे, क्षत्रप, त्यांचे मांडलिक, सरदार वगैरेंनी बौद्ध धर्म प्रसारार्थ अनेक लेणी खोदविल्याचे उल्लेख दानलेखांतून आढळतात. याशिवाय सामान्य जनांनी बौद्ध धर्माचा पुरस्कार केला होता. या विषयी ही अनेक लेण्यांत (कुडा, नाशिक, जुन्नर इ.) त्यांच्या नावांचे उल्लेख येतात. त्यांमध्ये समाजातील सर्व स्तरांतील लोक आहेत व भदंत किंवा भिक्षू, प्रब्राजिक किंवा भिक्षुणी, ब्राम्हण, ब्राम्हणी, यवन, शक, त्यांच्या स्त्रिया, माळी, सुवर्णकार, लोह वणिज (लोखंडाचे व्यापारी), वंशकार (बुरूड), कांस्यकार (तांबट), गृहपती (गृहस्थ), सार्थवाह (व्यापारी), हालिक (शेतकरी), त्यांच्या स्त्रिया, श्रेष्ठी (सावकार), गंधिक इ. अनेक वंशांचे, जातींचे व धंद्यांचे लोक आढळतात. महाराष्ट्रातील पर्वत श्रेणीत लेणी कोरून घेऊन भिक्षु संघास अर्पण करण्याकरिता देशातून दूर वरचे लोक येत. उदाहरण : कान्हेरी येथील स्तूप गौतम बुद्धाचा शिष्य सारिपुत्र याच्या स्मरणार्थ सिंध प्रांतातून आलेल्या बुद्ध रूचीने बांधला होता. तसेच कार्ल्याचे चैत्य लेणे, वैजयंतीचा श्रेष्ठी भूतपाल याने कोरविले होते, असा उल्लेख मिळतो. वैजयंती ही कर्नाटकातील सध्याची वनवासी ही नगरी होय.

या लेण्यांवरून व त्यांतील लेखांवरून भारताच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक परिस्थिती वर प्रकाश पडतो. लेण्यांतील अनेक लेखांत तत्कालीन राजे व त्यांच्या कारकीर्दी यांचे उल्लेख  आहेत. त्यांवरून राजकीय घडामोडी आणि तत्कालीन आर्थिक स्थिती यांची कल्पना येते. पुराणांतून गौतमी पुत्र पुळुमावी, यज्ञश्री सातकर्णी यांची नावे ज्ञात झाली आहेत; पण नहपान, ॠषभ दत्त वगैरे क्षत्रपांची व त्यांच्या कुटुंबियांची नावे लेण्यांतील लेखां द्वारेच ज्ञात झाली. या लेण्यांवरून महाराष्ट्रातील बौद्ध धर्म प्रसाराची कल्पना येते. लेण्यांतील लेखांत अनेक धंद्यांचा व त्यांच्या श्रेणींचा उल्लेख येतो. ह्या लेण्यांवरून प्राचीन काळी भारतात स्थापत्याची उत्क्रांती कशी होत गेली, हे समजते. लेणी उत्खनित करण्याच्या तंत्राची माहिती महाराष्ट्रातील वेरूळ आणि मध्य प्रदेशातील बाघ येथील लेण्यांच्या अभ्यासावरून समजून येते. प्रथम प्रस्तरांचा एकेक भाग छिन्नीने तासल्या सारखा करून घेत. पुढे तो भाग आजू बाजूंच्या प्रस्तरापासून वेगळा करण्यात येई व त्यातून मंदिर कोरण्यात येई. भारतातील प्राचीन मंदिरे व चैत्यगृहे लाकडाची बनविलेली असत. त्यांचे अनुकरण सुरुवातीच्या लेण्यांत केले आहे. सांप्रत हिंदू मंदिरातील गर्भगृह, अंतराळ, सभामंडप व प्रदक्षिणापथ हळूहळू कसे उत्क्रांत होत गेले, हे समजण्यास बौद्ध लेण्यांशिवाय अन्य साधन नाही. स्थापत्या प्रमाणे शिल्प कला व चित्र कला ही सुद्धा कशी उत्क्रांत झाली, हे या लेण्यांतील शिल्पांवरून व चित्रांवरून समजते. या शिल्प - चित्रांमध्ये वस्त्र प्रावरणांचे, अलंकारांचे व केश रचनेचे बहुविध नमुने दृग्गोचर होतात. कालमानानुसार पेहरावात कसे बदल घडले, इत्यादींची कल्पना यांतील शिल्प - चित्रादींतून स्पष्ट जाणवते. महाराष्ट्रातील स्त्रिया कोणती शीरो भूषणे, अलंकार व वस्त्रे वापरीत असत, यांविषयी तपशीलवार माहिती त्यांतून मिळते.

गिरी शिल्पांच्या कल्पनेचा उगम आणि आविष्कार, त्यांचा विकास आणि घडण यांविषयी भिन्न मते पुरातत्वज्ञ व कला समीक्षक यांनी व्यक्त केली आहेत. महाराष्ट्राची भूस्तरीय घडण हे त्याचे एकमेव कारण असावे, असा ही निष्कर्ष काही तज्ञांनी मांडला आहे; तथापि या शिल्प परंपरेच्या विकासाच्या श्रेयात अखिल भारतीय बौद्ध कला परंपरेचा वाटा किती आणि महाराष्ट्रातील कला परंपरेचा वाटा किती, याची सप्रमाण चर्चा झालेली अद्यापि कुठेच आढळत नाही. त्या दृष्टीने अलीकडे लेण्यांचा शास्त्र शुद्ध अभ्यास व संशोधन करण्याचे तंत्र "स्पेलिऑलॉजी' या नावाने विकसित होत असून त्यातून काही नवीन निष्कर्ष हाती येतील, असे वाटते.

संदर्भ -
1) Breuil, H. Four Hundred Centuries of Cave Art, London, 1952.

2) Deheja, Vidya, Early Buddhist Rock -Temples. London, 1981.

3) Fergus son, James; Burgess, James, Cave temples of India, London, 1880.

4) Nagaraju S. Buddhist Architecture of Western India, Delhi, 1981.

5) Neumayer, Erwin, Prehistoric Indian Rock - Paintings, Bombay, 1984.

6) Soundara Rajan, K. V. Cave Temples of the Deccan, New Delhi, 1981. 

7) गुप्ते, जगदीश, प्रागैतिहासिक भारतीय चित्रकला, प्रयाग, १९६४.

8) माटे म. श्री. मराठवाड्यातील शिल्प वैभव, मुंबई, १९६४.

9) मिराशी, वा. वि. संशोधन मुक्तावली, सर दुसरा, नागपूर, १९५७.

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

═══════════════════════

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• YATIN JADHAV :
9967065953, 8767048591
(Use Only One WhatsApp Number)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा

धन्यवाद ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा