● एक त्याग मूर्ती, एक सेवक वृत्ती आणि एक उत्कृष्ट भार्या : डॉ. सविता भिमराव आंबेडकर
लेख -
सुनील खोब्रागडे
◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆
विसाव्या शतकातील भारतीय राष्ट्र आणि भारतीय समाज यांच्यावर ज्या महान व्यक्तीमत्वांचा आत्यंतिक प्रभाव पडला आहे त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वोच्च स्थानावर आहे. या महान व्यक्तिमत्वाला आकार देण्यात ज्या काही मोजक्या व्यक्तींनी पराकोटीचा त्याग केला त्यामध्ये बाबासाहेबांची प्रथम पत्नी रमाई आणि रमाईच्या मृत्यू नंतर १३ वर्षांनी बाबासाहेबांच्या आयुष्यात प्रवेश केलेल्या साविता माई यांचे स्थान सर्वात वरचे आहे.
सविता माईनी बाबासाहेबांच्या उतारार्धातील जीवनात सर्वार्थाने बाबासाहेबांची सावली होऊन प्रत्येक प्रसंगात बाबासाहेबांना सावरून धरले. मधुमेह, न्युरायटीस, उच्च रक्तदाब, संधिवात अशा अनेक व्याधींनी ग्रस्त असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी आपल्या वैद्यकीय कौशल्याने पुढील आठ वर्षे प्रज्वलित ठेवले. बाबासाहेबांच्या हळूहळू विझत जाणाऱ्या जीवन ज्योतिची मानसिक ऊर्जा म्हणून त्या अखंड कार्यरत राहिल्या. सविता माईंची प्रेमळ सेवा आणि काळजी पूर्वक केलेली शुश्रुषा यामुळेच आयुष्याच्या शेवटच्या पर्वात बाबासाहेबांची कीर्ती आणि सन्मान अखिल विश्वा मध्ये वाढविणारी महान कार्ये त्यांच्या हातून घडली असे म्हणावे लागेल. मात्र माईंच्या या महान त्यागाची, स्वतःचे आयुष्य पणाला लावून केलेल्या सेवेची कदर करण्याच्या ऐवजी त्यांच्या वाट्याला उपेक्षा आणि टीकाच आली.
खरे तर माई साहेबांचा त्याग एवढ्या उच्च दर्जाचा आहे की - त्या त्यागाचे मोल होऊ शकत नाही. तरी ही स्वतःला आंबेडकरवादी म्हणविणाऱ्या प्रत्येक व्यक्तींनी माई साहेबांचा बावन कशी त्याग समजून घेऊन त्यांचा कायम ऋणी राहिले पाहिजे. बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचा लाभ घेऊन आज सुख-चैन भोगणाऱ्या प्रत्येक स्त्रीने माई साहेबांचे चरित्र वाचून प्रेरणा घेतली पाहिजे.नव्हे प्रत्येक आंबेडकरी स्त्रीने सविता माईंनी स्वतः लिहिलेले ‘ डॉ. आंबेडकरांच्या सहवासात‘ हे आत्म चरित्र वाचलेच पाहिजे.
माई साहेबांच्या संपूर्ण आयुष्यावर एक वर वरची नजर टाकली तरी लक्षात येईल की, त्यांच्या आयुष्याचा एकूणच प्रवास हा एखाद्या सर्व साधारण स्ञी प्रमाणे नाही. सविता माई म्हणजे एक असामान्य, बुध्दीमान, करुणावान, त्यागमयी स्त्री होती. एका सुख वस्तू सारस्वत ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या माईंचे माहेरचे नांव शारदा कृष्णराव कबीर होते. त्यांचे कुटुंब रत्नागिरी जिह्यातील राजापूर तालुक्यातील डोर्ले या गावचे होय. माई साहेबांचा जन्म २७ जानेवारी १९१२ रोजी मुंबईत झाला. त्यांचे वडील कृष्णराव तत्कालीन मुंबई राज्याच्या आरोग्य खात्यात अधीक्षक पदावर पुणे शहरात कार्यरत होते. त्यामुळे सविता माईचे प्राथमिक व इंटर पर्यंतचे शिक्षण पुण्यातच झाले.
इंटर सायन्स परीक्षेत त्या परशुराम भाऊ महाविद्यालयातुन सर्व प्रथम आल्या होत्या. मुंबईच्या ग्रांट मेडिकल कॉलेज मधून १९३७ साली त्या एम.बी.बी.एस. झाल्या. पदवी पूर्ण झाल्या नंतर त्यांनी त्याकाळचे प्रसिद्ध फिजिशियन डॉ. माधवराव मालवणकर यांच्या खाजगी दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत झाल्या. याच काळात त्यांनी एम.डी.ची परीक्षा दिली. पण ऐन प्रॅक्टिकल परिक्षेच्या वेळी त्या टाईफाईड, डिहायड्रेशन, बॉईल्स अशा आजाराने खिळल्या व त्यांना पदव्युत्तर पदवी पूर्ण करता आली नाही. त्यानंतर त्यांनी गुजरात मधील एका मोठ्या सरकारी रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून नोकरी केली. परंतु तेथील हवामान न मानवल्यामुळे त्या नेहमी आजारी पडायला लागल्या. यामुळे शेवटी नोकरीचा राजीनामा देऊन त्या मुंबईला परतल्या व पुन्हा डॉ. मालवणकरांच्या दवाखान्यात ज्युनियर डॉक्टर म्हणून रुजू झाल्या.
माईसाहेब व डॉ.बाबासाहेबांची पहिली भेट मुंबईतील विर्लेपार्ले भागात राहणारे अर्थशास्त्र विषयाचे विद्वान डॉ व्हि. के. राव हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जवळचे मित्र होते. बाबासाहेब मुंबईत आले की आपल्या या मित्राकडे त्यांच्या घरी जात असत. १९४७ च्या मध्यात बाबासाहेब मुंबईत डॉ. राव यांच्या घरी आले होते. त्यावेळी डॉ. राव यांच्या मुलीला (जी सविता माईची मैत्रीण होती) भेटण्यासाठी सविता माई सुद्धा तेथे आली होती. बाबासाहेब त्यावेळी मजूर मंत्री होते.
डॉ. राव यांनी औपचारिकता म्हणून सविता माईंची ओळख बाबासाहेबांशी करून दिली. डॉ. राव यांच्या पत्नीला सुद्धा मधुमेह होता. त्यामुळे त्या डॉ. मालवणकर यांच्याकडे उपचार घेत होत्या. बाबासाहेबांनाही मधुमेह असल्यामुळे डॉ. राव यांनी त्यांना डॉ. मालवणकरांकडून ऊपचार घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर उपचारासाठी डॉ. मालवणकरांच्या ह्युजेस रोड येथील दवाखान्यात गेले. यातूनच सविता माईशी त्यांचा परिचय वाढला.
• डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा व सविता माईंचा विवाह -
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रथम पत्नी रमाई यांचे २७ मे १९३५ रोजी क्षय रोगाने निधन झाले होते. त्यानंतर बाबासाहेबांनी पुन्हा विवाह न करण्याचा निश्चय केला होता. रमाईच्या निधना नंतर अनेक मित्रांनी व सहकाऱ्यांनी बाबासाहेबांना दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला होता. मात्र ते आपल्या निर्धारावर ठाम होते. १९४२ नंतर बाबासाहेबांना मधुमेह व उच्च रक्तदाब याचा आजार गंभीर प्रमाणात जाणवू लागला. यामुळे त्यांनी देखभाल करण्यासाठी व वेळेवर जेवण, पथ्यपाणी याची काळजी घेण्यासाठी एखादी नर्स ठेवावी, असा ही सल्ला त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी व डॉक्टरांनी दिला. मात्र तसे करणे लोक निंदेला कारण ठरेल, म्हणून त्यांनी या सूचनेस नकार दिला. पुढे १९४६ - १९४७ मध्ये त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब याच्या बरोबरच संधिवाताचा ही प्रचंड त्रास जाणवू लागला. यावेळी दिल्लीतील नामवंत डॉक्टरांनी त्यांना स्पष्टपणे सूचित केले की, त्यांनी वेळेवर वैद्यकीय उपचार, वैद्यकीय सल्ल्यानुसार आहार व पथ्यपाणी केले नाही तर ते फार काळ जगणार नाहीत. याच काळात त्यांनी मधुमेहाच्या व संधीवाताच्या दुखण्यासाठी डॉ. मालवणकर यांच्याकडे उपचार घेणे सुरु केले होते.
येथे सविता माईशी त्यांचा परिचय वाढला होता. त्याच्याशी झालेल्या परिचयातून व चर्चेतून बाबासाहेबांनी २५ जानेवारी १९४८ रोजी सविता माईना पत्र पाठवून लग्नाची मागणी घातली. अशाच प्रकारे त्यांनी त्यांचे जवळचे सहकारी कमलकांत चित्रे यांना २० फेब्रुवारी १९४८ रोजी, दौलतराव गुणाजी जाधव यांना २१ फेब्रुवारी १९४८ रोजी व भाऊराव गायकवाड यांना १६ मार्च १९४८ रोजी पत्र पाठवून आपल्या निर्णया संदर्भात माहिती दिली. सविता माईंचा होकार मिळाल्या नंतर शेवटी सर्व सहकार्यांशी विचार विनिमय करून त्यांनी सविता माईशी १५ एप्रिल १९४८ रोजी दिल्लीत नोंदणी पद्धतीने विवाह केला.
बाबासाहेब व माई साहेब यांच्या विवाहा मागील पार्श्वभूमी व या संदर्भात त्यांचा उपलब्ध असलेला पत्र व्यवहार पाहिला तर एक गोष्ट स्पष्ट होते की, सविता माईं मध्ये असीम करुणा, सर्वोच्च त्याग करण्याची वृत्ती आणि स्वतंत्रपणे उचित निर्णय घेण्याची क्षमता हे गुण ओतप्रोत भरलेले होते. सविता माईंनी बाबासाहेबांशी विवाह करताना जात, वयातील अंतर, आजारपण यापैकी काहीही पाहिले नाही. विवाहाच्या वेळी बाबासाहेबांचे वय ५६ वर्षे व साविता माईंचे वय ३६ वर्षाचे होते.
सविता माईंना हे ठाऊक होते की - अनेक व्याधींनी ग्रस्त असलेल्या डॉ. आंबेडकरांना कधी काय होईल यांचा नेम नाही. त्यांच्या कडून अपत्य प्राप्तीची अपेक्षा नाही. तरीही त्यांनी जाणून बुजून बाबासाहेबांशी विवाहाच्या प्रस्तावास मान्यता दिली. अशा प्रकारचा धीरोदात्तपणाचा निर्णय केवळ एक असामान्य स्त्रीच घेऊ शकते. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर "त्यांच्या बद्दल माझ्या मनात आत्यंतिक सहानुभूती निर्माण झाली. तत्क्षणी माझ्यातील डॉक्टर जागा झाला आणि मी विचार केला की - ही एक अशी गरजू व्यक्ती आहे की, जिला वैद्यकीय मदतीची अत्यंत जरुरी आहे. वैद्यकीय सल्ला, मार्गदर्शन, पथ्य पाणी व नियमित उपचार जर त्वरित दिले तर या व्यक्तीचे आयुष्य निश्चितच वाढणार आहे. माणुसकीच्या व डॉक्टरांच्या निती धर्माशी इमान राखण्याच्या विचाराने मी मनोमन निश्चय केला की, या व्यक्तीसाठी आपण निश्चितच काही तरी केले पाहिजे.” (डॉ. आंबेडकरांच्या सहवासात- डॉ. सविता आंबेडकर पृष्ठ ५१)
• भीमराव नावाच्या हिऱ्याचे कोंदण -
विवाहानंतर माई साहेब म्हणजे भीमराव नावाच्या प्रखर तेजाने तळपणाऱ्या हिऱ्याचे जणू कोंदण बनल्या. एक डॉक्टर म्हणून त्यांनी बाबासाहेबांच्या प्रकुतीची आपले सर्व वैद्यकीय कौशल्य पणाला लावून सर्वतोपरी काळजी घेतली. बाबासाहेबांनी हाती घेतलेल्या सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमां मध्ये माईसाहेब बाबासाहेबांची सावली म्हणून वावरत असत.
सविता माईंशी विवाह झाल्या नंतर बाबासाहेबांच्या हातून अत्यंत महत्वपूर्ण आणि त्यांना जागतिक स्तरावर कीर्ती, मान सन्मान मिळवून देणारे कार्य घडले हे नाकारता येणार नाही. या ८ - ९ वर्षाच्या काळात त्यांनी राज्य घटनेचा मसूदा तयार करणे, राज्य घटनेतील कलमांवर उपस्थित केलेल्या आक्षेपांना व चर्चांना कायदा मंत्री म्हणून उत्तरे देणे, हिंदू कोड बिल तयार करणे, श्रीलंका व नेपाल येथे भरलेल्या जागतिक बौध्द परिषदांमध्ये सहभागी होऊन धम्माचा प्रचार प्रसार याविषयीचा आराखडा मांडणे, मिलिंद कॉलेजची स्थापना व इमारतींचे बांधकाम, फिलॉसॉफी ऑफ हिन्दुइजम, रिडल्स इन हिन्दुइज्म, रीव्होलुशन अँड कॉऊंटर रीव्होलुशन इन इंडिया, बुध्द की कार्ल मार्क्स, दि बुद्धा अँड हिज गोस्पेल, पाली व्याकरण, दि बुद्धा अँड हिज धम्म इत्यादी अत्यंत महत्वपूर्ण ग्रंथ लिखाण याच काळात बाबासाहेबांच्या हातून घडले.
भंडारा येथील पोट निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर खिन्न आणि उदास झालेल्या बाबासाहेबांना त्यांच्या धर्मांतराच्या प्रतिज्ञेची आठवण करून देऊन त्यांनी बौध्द धम्मात सामुहिक धर्मांतर करण्यास प्रोत्साहित केले. धर्मांतर सोहळ्यात अत्यंत मोलाची भूमिका त्यांनी बजावली. बाबासाहेबांच्या मृत्यू नंतर काही स्वार्थ प्रेरित लोकांनी माईंच्या विरोधात षड्यंत्र पूर्वक बदनामीची मोहीम उघडली. तरी त्यांनी या सर्व मोहिमेला धीरोदात्तपणे तोंड देऊन आपले कार्य सुरु ठेवले.
माईंच्या पाठ पुराव्यामुळेच दिल्ली येथील डॉ. आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ सोशल जस्टीस आणि डॉ. आंबेडकर नेशनल मेमोरियल कमिटी या दोन संस्थांची स्थापना १९६२ साली झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अप्रकाशित साहित्य व ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी त्यांनी स्वत:हून पिपल्स एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष डी. जी. जाधव यांच्याशी १९६५ साली पत्र व्यवहार करून त्यांची संमती मिळविली व तसे महाराष्ट्र शासनास कळविले.सन १९८१ साली स्वतःच्या ताब्यातील हस्त लिखिते डॉ. आंबेडकर लिखाण व भाषणे प्रकाशन समितीच्या सुपूर्द केली व वारस म्हणून त्वरित संमती दिली. गुजराततील आरक्षण विरोधी आंदोलनाच्या वेळी आरक्षण समर्थनार्थ अनेक सभा संमेलनात त्या सहभागी झाल्या.
दलित पँथर चळवळीत त्या सक्रीय होत्या. याशिवाय देशभरात अनेक विद्यापीठात, संसदेत आणि अन्यत्र वेळोवेळी हजर राहून त्यांनी बाबासाहेबांचे जीवन व कार्य या विषयावर विद्वत्ता पूर्ण मार्गदर्शन केले. पुणे स्थित सिम्बाँयसिस संस्थेत माई साहेबांच्या प्रयत्नाने व संस्थेचे प्रमुख डॉ. मुजुमदार यांच्या सहकार्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ऊभे राहिले. माई साहेबांच्या प्रयत्नां मुळेच महू येथील जन्म स्थळाची जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी होऊ शकली.
भारत सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मरणोत्तर `भारतरत्न' किताबाने गौरव केला, त्यावेळी डॉ. बाबासाहेबांच्या पत्नी म्हणून माई साहेबांनी हा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला. आयुष्याच्या अखेरी पर्यंत त्या विविध कार्यात मग्न राहिल्या. अशा या त्याग मूर्तीचे वार्धक्यामुळे दिनांक २९ मे २००३ ला निधन झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मालवती ज्योत प्रज्वलित करणाऱ्या या त्याग मुर्तीची समाजाकडून अत्यंत ऊपेक्षा आणी अवहेलना झाली. मात्र माई साहेबांनी आपल्या कृतीतून एक आदर्श निर्माण केला. त्या आदर्शाची आणि त्यागाची जाणीव प्रत्येक आंबेडकरी अनुयायांनी ठेवली पाहिजे.
◆◆◆
आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
सुनील खोब्रागडे (संपादक)
"दैनिक जनतेचा महानायक, मुंबई"
❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖
प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"
═══════════════════════
एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA
• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU
• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/Y.M.JADHAV123
• मातृ संघटनेत सहभागी होण्या करिता
Www.SSDIndia.Org
◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆
• YATIN JADHAV :
9967065953 Or 7738971042
(Use Only One WhatsApp Number)
सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा
धन्यवाद ।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा