● अण्णा : बालपण ते तरूणपणाच्या गोष्टी
तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्य प्रकार ही त्यांनी ताकदीने हाताळले. तमाशा या कलेला लोक नाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिलं जातं. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्य प्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्य पूर्व आणि स्वातंत्र्या नंतरच्या काळात राजकीय प्रश्नां विषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळीं मध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेलं योगदान महत्त्वाचं आहे. श्रेष्ठतेच्या कल्पनेतून हिंदू धर्माचे सुकाणू असलेल्यांनी आपल्याच समाज बांधवांना हजारो वर्षे गावा बाहेर ठेवले. त्यांच्या कडून स्वच्छतेची कामे करून घेताना त्यांना मात्र कायम अज्ञानात आणि अस्वच्छतेत ठेवले. सगळ्याच संधी नाकारलेल्या समाजात जन्मलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी अक्षरशः मिळेल ते काम केले. कुठल्याही शाळेत न जाता ते स्वतःच्या क्षमतेवर शिकले. अनेक कादंबऱ्या, नाटके, कथा लिहिल्या. लहानपणी सांगली जिल्ह्यातील वाटेगावपासून मुंबईपर्यंत चालत आलेल्या अण्णांनी नंतर केवळ कर्तृत्वावर रशियाचा प्रवास केला. दलित समाजाला जागृत करण्याचे मोठे कार्य त्यांनी केले.
◆ बालपण -
वैयक्तिक दु:खांचा विचार न करता; आपले विचार, कार्य व प्रतिभा यांच्या साहाय्याने लोक कलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे लोकशाहीर. शाहीर अण्णाभाऊ साठे म्हणजे जातिभेदांमुळे, जातींच्या उतरंडीमुळे शिक्षणापासून, समग्र विकासा पासून वंचित राहिलेल्या मातंग समाजातील एक समृद्ध व्यक्तिमत्त्व. त्यांच्या जातीवर ब्रिटिशांनी गुन्हेगार जात म्हणून शिक्का मारलेला असल्याने त्यांचं बालपणीचं जीवन हे काही प्रमाणात भटक्या अवस्थेत गेलं. त्या काळातील कुरुंदवाड संस्थानातील १ ऑगस्ट १९२० वाटेगाव ता. वाळवा जि सांगली येथे त्यांचा जन्म झाला. वर्चस्व आणि श्रेष्ठत्वाच्या कल्पनेतून हिंदू धर्माने काही जातींना गावाच्या बाहेर ठेवले होते. अशाच वस्तीतील एका छपरात अण्णांचा जन्म झाला.
अण्णाची आई वालुबाई भाऊराव साठे आणि घरातील मोठे लोक दोर वळण्याच्या कामाला जात. त्यांचे वडील भाऊराव सिद्धोजी साठे पोटा - पाण्यासाठीच मुंबईत राहत असत. त्यामुळे लहान भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी तुकारामांवर (अण्णांचे मूळ नाव) म्हणजेच अण्णाभाऊंवर होती. अण्णांचे वडील भाऊराव सिद्धोजी साठे हे माळी आणि उत्तम शेतीतज्ञ होते. परिसरात कुठे ही दरोडा पडला किंवा चोरी झाली की पोलिस लगचे अन्नाभाऊच्या वस्तीत येऊन लोकांची धर पकड करायचे. अशा वेळी घरातील पुरुष - बायका दिवस दिवस डोंगरात जाऊन लपायचे. खालच्या जातीतील म्हणून गावात कुणाला शिवायचे नाही, हातात हात मिळवायचा नाही, हे अण्णांनी लहानपणीच पाहिले. अनुभवले. अगदी वर्गातही त्या काळी प्रत्येक जातीची मुले वेगवेगळी बसत. त्यामुळे अण्णांनी एक दिवस वडिलांना विचारले - "तुमच्या मुबईत जातीची शिवाशिव आहे का?" वडील म्हणाले, "व्हय. चहाच्या हॉटेल मालकांनी फुटक्या कप - बशा बाहेर ठीवल्या आहेत. त्यातच आपल्या जातीची माणसं बाहेर बसून च्या पेत्यात. तसं बघाय गेलं तर आम्हाला कोनीच वळखत न्हाय, पन ह्यो जुना रिवाज हाय म्हनून आम्ही आपलं बाईर बसून पेतो. उगीच कोनाची खटखट नको म्हनून. इंग्रज सायेबाकडं ही शिवाशिव नसती. मी त्यांच्याकडे माळी काम करायला गेलो म्हंजी ते मला तेंच्याच कपात च्या देत्यात. तेंच्याकडे एकच माणसाची जात. आमची माणसं नस्ती आडगी. म्हनूनच इंग्रज आमच्यावर राज्य करत्याती. अन् आमी एका देशाचं असून आम्ही एकमेकाला शिवून घेत न्हाय.”
वडील भाऊराव मुंबईत माळी काम करून गावाकडे असणाऱ्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत. मुंबईत राहत असल्यामुळे शिक्षणाचे महत्त्व त्यांना समजले होते. त्यामुळे आपल्या मुलांनी शिकावे, असे त्यांना वाटे. त्यांच्या आग्रहामुळेच वयाच्या १४ व्या वर्षी अण्णांनी प्राथमिक शिक्षणाला सुरुवात केली. गावाकडे आल्यावर एके दिवशी त्यांनी अण्णाला शाळेत घातले. त्या वेळी त्यांचे वय थोडे जास्तच होते. शाळेत गेल्यावर दुसऱ्याच दिवशी गुरुजी त्याच्यावर संतापले. ते म्हणाले, कालपासून ही चारच अक्षरे तू गिरवतो आहेस, तरी तुला ती नीट लिहिता येत नाहीत. त्यावर अण्णांनी त्यांना आपण कालच शाळेत आलो असल्याचे आणि मन लावून शिकणार असल्याचे सांगितले. पण गुरुजींनी त्याला मारायचे ठरवले होते. घोड्या एवढा झाला आहेस आणि अक्षर काढता येत नाही, असे म्हणत मास्तरांनी अण्णांची उजव्या हातची बोटे सुजेपर्यंत मारले. दुसऱ्या दिवशी अण्णांनी वर्गात येऊन गुरुजींच्या अंगावर मोठा धोंडा टाकला. त्यामुळे गुरुजी कोलमडले आणि विद्यार्थ्यांना सांगू लागले, पकडा त्या तुक्याला. पण तोपर्यंत अण्णा घरी पोचले होते. दुसऱ्या दिवशी मास्तरांनी गावातील पंतांकडे तक्रार केली.
पंतांनी अण्णा आणि त्यांच्या वडिलांना बोलवून घेतले. बरोबर अण्णांचे मामा फकिरा हे देखील आले होते. पंतांनी अण्णांची सुजलेली बोटे पाहिली. ते म्हणाले - "गुरुजी, तुम्हाला मुलं आहेत की नाही? गरिबाच्या पोराला तुम्ही एवढे मारले. स्वत:च्या पोराला एवढे मारले असते का? अण्णांचे मामा फकिरा म्हणाले - "जर तुम्ही गावातील दुसऱ्या कोणत्या पोराला एवढे मारले असते तर तुम्हाला गावातून पळून जावे लागले असते." गुरुजी त्यावर काही बोलले नाहीत. तेव्हा फकिरा त्यांना म्हणाले - "गुरुजी इंग्रजांनी आम्हाला गुन्हेगार ठरवलं म्हणून तुम्ही ठरवू नका. पोराला नीट शिकवा. नायतर भलतंच व्हईल. "गुरुजी गरिबांच्या मुलांना दूर लोटू नका. उद्या शिकून ह्याच तुक्याचा तुकाराम होईल आणि विमानातून इंग्लंड अमेरिकेला जाईल. तो शिकला पाहिजे.” परंतु तत्कालीन मागास जातींतील मुलांसाठी त्या काळी वेगळ्या शाळा होत्या. अण्णाभाऊ पहिल्यांदा वाटे गावच्या शाळेची पायरी चढले; पण शिक्षकांच्या निर्दयी मारामुळे दोन दिवसांतच त्यांनी शाळेचा धसका घेऊन शाळेकडे कायमचीच पाठ फिरवली. त्या मुलांशी शिक्षकांचे वर्तनही निर्दयीपणाचे होते. वाढलेले वय, सदोष शिक्षण पद्धती यांमुळे अण्णा फार दिवस शाळेत गेलेच नाहीत.
लहानपणापासूनच अण्णाना विविध छंद होते. मैदानी खेळ खेळण्याचा त्यांचा पिढीजात वारसा असल्याने दांडपट्टा चालविण्यात त्यांचा हात धरणारा कोणी नव्हते. अण्णाभाऊंच्या बालपणातल्या घडणी मध्ये त्यांच्या मूलभूत आवडींचा वाटा जास्त आहे. गर्दीपासून दूर असे डोंगर, दर्या, राने, नद्या या ठिकाणी भटकणं त्यांना आवडे. त्यातूनच पक्षिनिरीक्षण, शिकार करणं, मध गोळा करणं हे छंद त्यांना जडले. याशिवाय जंगलात एकटे भटकणे, पोहणे, मासेमारी, शिकार करणे, विविध पक्षांशी मैत्री करणे, जंगलातील पाना - फुलां मधील सूक्ष्म फरक शोधणे असे एक ना अनेक छंद त्यांना होते. या छंदांमध्ये निरागसपणे बागडण्यातच त्यांचे बालपण गेले. मोठे होत असताना त्यांच्या आवडींमध्ये वाढच होत होती. जत्रांमध्ये जाऊन तिथल्या गोष्टींचं निरीक्षण करणंही त्यांच्या आवडीचं एक काम होतं. त्यात नंतर हळूहळू पाठांतराची भर पडत गेली. लोकगीतं, पोवाडे, लावण्या पाठ करणं, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ऐकणं आणि इतरांना सांगणं या त्यांच्या छंदातून त्यांच्या भोवती समवयीन मुलांचा गोतावळा जमत असे. शिवाय मैदानी खेळांचा वारसा मिळाल्यामुळे दांडपट्टा चालवण्यातही ते प्रवीण होते. लोकगीते पाठ करून ती टिपेच्या आवाजात म्हणणे, पोवाडे, लावण्या पाठ करणे, इतरांना त्या आत्मीयतेने म्हणून दाखवणे या छंदांमुळे त्यांच्या भोवती नेहमीच मित्र मंडळी जमलेली असत.
◆ स्वातंत्र्य चळवळीत उतरण्याची प्रेरणा -
रेठ्या या गावाच्या जत्रेत क्रांतिसिंह नाना पाटलांनी भाषण संपवले आणी अचानक या भाषणसभेत ईग्रंज येऊ लागले लोकांना हाकलु लागले आणि क्रांतिसिंह नाना पाटलांना पकडण्यासाठी त्याच्यां मागे पळू लांगली.. क्रांतिसिंह नाना पाटील हे जंगलातुन घोड्या वरुन पळ काढु लांगले. क्रांतिसिंह नाना पाटीलांनी मागे वळूण पाहीले तर एक मुलगा त्याचा पाठलांग करत आहे. क्रांतिसिंह नाना पाटील थांबले त्यांनी त्या मुलांला विचारले - "का रे माझ्या पाठीमागे पळत कां येत आहे." तो धाडसी बालक म्हणाला - "मी पाठलाग नाही तुम्हाला रस्ता दावीत आहे." त्या धाडसी बालकांचे नाव होते "अण्णा भाऊ साठे". रेठर्याच्या जत्रेत अण्णांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे भाषण ऐकले आणि अण्णांभाऊंना स्वातंत्र्य चळवळीत उतरण्याची प्रेरणा देऊन गेलं.
चळवळीत सामील होऊन लोक नाट्यांत छोटी मोठी कामे त्यांनी केली. याच काळात दुष्काळ पडल्याने अण्णांच्या वडिलांनी आपल्या कुटुंबाला मुंबईत न्यायचे ठरविले. एकेका गावात तीन - चार दिवस राहत त्यांच्या हा प्रवास चालू होता. पुण्या पर्यंतचा प्रवास सगळ्या कुटुंबाने चालत केला. मग पुढे खंडाळ्याचा कोळशाचा कंत्राटदार, कल्याणचा कंत्राटदार यांच्याकडे कष्टाची कामे करत सगळे जण रेल्वेने मुंबईला पोहचले. त्याच वेळी अण्णा भाऊंचे बालपण संपले. वाटेगाव ते मुंबई पायी प्रवास करुन ते मुंबईत आले. पण पुढे १९६३ मध्ये अण्णांनी मुंबई ते मास्को हा प्रवास विमानाने केला.
◆ कम्युनिस्ट विचार सरणीचे अनुयायी -
वयाच्या ११ व्या वर्षी अण्णा आपल्या आई - वडिलांबरोबर मुंबईत आले. हे कुटुंब भायखळ्याच्या चांद बीबी चाळीत राहायला गेले. मुंबईतली सुरुवातीची वर्षं ही अण्णाभाऊंसाठी वैचारिक जडण घडणीची ठरली. तिथे चित्रपटापासून विविध राजकीय पक्षांपर्यंतचं मोठं जग त्यांना जवळून पाहायला मिळालं. मुंबईत भायखळ्याला एका चाळीत ते राहू लागले. त्या ठिकाणी अण्णा एका कपडे विकणाऱ्या फेरीवाल्याकडे काम करू लागले. त्याची कपड्याची पेटी डोक्यावर घेऊन अण्णा त्याच्या मागे चालत असत. एकदा त्यांची भेट ज्ञानदेव नावाच्या नातलगाशी झाली. ते उत्तम कलावंत होते. अण्णांनी त्यांच्याशी जवळीक वाढवली आणि ते त्यांच्या वरळीच्या घरी जाऊ लागले. तिथे ते ज्ञानदेवच्या तोंडून रामायण, हरि विजय, पांडव प्रताप हे ग्रंथ ऐकत. फक्त ऐकून त्यांनी हे ग्रंथ तोंडपाठ केले. पुढे आपोआप अक्षर ओळख झाली. या एक वर्षात त्यांनी कोणते ही काम केले नाही.
फक्त एकच ध्येय ठेवले शिकण्याचे. विविध राजकीय संघटनांचे ध्येय ब्रिटिशांना हाकलून देणे हेच होते. परंतु प्रत्येकाची विचार सरणी वेगळी होती. यांपैकी कम्युनिस्ट विचार सरणीचे अण्णा अनुयायी बनले. पक्षाच्या सभांचे आयोजन करणे, वॉल पेंटिंग करणे, हॅण्डबिले वाटणे, मोर्चे काढणे, छोट्या - मोठ्या सभे समोर गोष्टी सांगणे, पोवाडे, लोकगीते म्हणून दाखविणे या सर्व गोष्टींमुळे कम्युनिस्ट वर्तुळात ते सर्वांना एकदम हवेहवेसे झाले. याच वेळी त्यांच्या तुकाराम या नावाचे अण्णा या नावात रूपांतर झाले. गरिबी अनुभवलेल्या अण्णाभाऊंची कम्युनिस्ट विचार प्रणालीशी जवळीक झाली. मुळातच कार्यकर्ता व्यक्तिमत्त्वाचे तरुण अण्णा अंगभूत गुणांमुळे कम्युनिस्ट चळवळीतल्या कार्यकर्त्यां मध्ये सहजपणे मिसळून गेले त्या काळी मुंबईत स्वस्ताई असल्याने सुरुवातीचा काळ सुखाचा गेला. मुंबईत फिरताना दोन गोष्टींकडे ते आकर्षिले गेले, एक म्हणजे विविध राजकीय संघटना आणि दुसरे म्हणजे मूक चित्रपट.
मुंबईत पोटासाठी वन - वन भटकत असताना अण्णांनी हमाल, बूट पॉलीशवाला, घरगडी, हॉटेल बॉय, कोळसे वाहक, हमाली, वेटर, घरगडी, डोअर कीपर, कुत्र्याला सांभाळणारा, मुलांना खेळविणारा, उधारी वसूल करणारा, खाण कामगार, ड्रेसिंगबॉय , मुलांना खेळवणं, अशी नाना प्रकारची कामे केली. यावरून त्यांच्या कष्टमय जीवनाची आपल्याला कल्पना येते. या काळातच त्यांना सिनेमा पाहण्याचा छंद लागला. या छंदानेच त्यांना साक्षर बनविले. चित्रपटांच्या पाट्या, रस्त्यावरील दुकानांच्या बोर्डवरील अक्षरे जुळवित ते साक्षर झाले. या अक्षर ओळखीनंतरच त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली. वयाच्या १७ - १८ व्या वर्षी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अण्णांवर आली होती. वडील थकल्यावर त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी पडली. नंतर ते माटुंग्यातील चिरागनगर एका झोपडीत राहायला आले. अण्णांनी आपले उभे आयुष्य चिराग नगर झोपडपट्टीत काढले. याच झोपडपट्टीत अण्णाभाऊंच्या एकापेक्षा एक श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती झाली. ते म्हणायचे - 'आपण गलिच्छ वस्तीत रहात असलो तरी आपलं मन स्वच्छ असावे'. अण्णाभाऊ साठे यांना लोकांनी एकदा विचारले - ''तुमच्या झोपडीचे दार लहान का?'' यावर अण्णाभाऊ म्हणाले - ''पंडित नेहरू जरी माझ्या झोपडीत आले तरी त्यांना वाकूनच यावे लागेल!'' अण्णाभाऊ कोहिनूर मिल मध्ये काम करू लागले. तिथेच त्याचा कामगार चळवळीशी संबंध आला. सभा, मिरवणुका अशा कार्यक्रमात ते भाग घेऊ लागले. ऐतिहासिक पोवाडे म्हणू लागले. त्यांच्या खणखणीत आवाजाला लोकांकडून ही दाद ही तशीच मिळे. ते जे पाहत ते लगेच आत्मसात करण्याची अनोखी क्षमता त्यांच्यात होती. त्यामुळे ते बासरी वाजवायला शिकले. एक दिवस त्यांनी बुलबुल तरंग नावाचे वाद्य आणले आणि त्याचा त्यांना नादच लागला. हे वाद्य ते उत्तम तऱ्हेने वाजवू लागले. ते भजन गाणी म्हणू लागले. त्यासाठी त्यांनी पेटी आणली आणि ती कशी वाजवायची हे ते काही दिवसातच शिकले. तबला, सारंगी ढोलकी अशी सर्वच वाद्ये ते वाजवत असत. कोहिनूर मिलचा संप झाला. तो सहा महिने चालला आणि गिरणी बंद पडली. परंतु कोहिनूर मिल मधील नोकरी सुटल्याने त्यांच्यावर मोठेच संकट आले. या वेळी पुन्हा साठे कुटुंब वटे गावला आले.
मुंबईतील धकाधकीचे जीवन, मोर्चे, सभा, सत्याग्रह, आंदोलने या सर्व गोष्टी पाहिलेल्या अण्णाभाऊंना वटेगाव मध्ये राहणे शक्य होत नव्हते. अत्यंत अस्वस्थतेत त्यांनी घर सोडले आणि ते बापू साठे या त्यांच्या चुलत भावाच्या तमाशाच्या फडात ते सामील झाले. अण्णाभाऊंचा धारदार आवाज, त्यांचे पाठांतर, पेटी, तबला, ढोलकी, बुलबुल ही वाद्ये वाजवण्याची कला या गुणांमुळे त्यांचे तमाशात स्वागतच झाले. महाराष्ट्राच्या तमाशा या कलेच्या परंपरेत मातंग समाजाने जी वैशिष्ट्यपूर्ण भर घातली ती शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सहभागानेच. महाराष्ट्रातील लोकांना या वारणेच्या वाघाचे दर्शन पहिल्यांदा तमाशातच झाले. तमाशा सारख्या कलेला अधिक प्रसिद्धी, प्रतिष्ठा, व समृद्धी अण्णाभाऊंनीच मिळवून दिली. अण्णाभाऊंना एखाद्या भूमिकेचं आकलन लवकरच आणि चांगलं होत असे. ते ओघवते संवाद उत्तम लिहू शकत. अनेक वाद्यं वाजवण्यात ते तरबेज होते आणि त्यांचं पाठांतरही अतिशय उत्तम होतं. अण्णांचं हे बहुरंगी व्यक्तिमत्त्व तमाशाच्या कलेत खुललं नसतं तरच नवल होतं. त्यांनी तमाशाच्या कलेला लोक नाट्यात रूपांतरित केलं. त्या त्या वेळच्या राजकीय परिस्थिती बद्दल सामान्यां मध्ये जागृती घडवण्याचं मोठं काम पुढे त्यांच्या वग नाट्यांनी केलं.
◆ पहिला विवाह -
अण्णा वाटेगाव मध्ये असताना वडिलांचं निधन झाल्या नंतर लवकरच अण्णाभाऊंनी कोंडाबाई या अशिक्षित मुलीशी विवाह केला. त्यांच्या पासून त्यांना एक मुलगा ही झाला. मात्र, त्यांच्या सोबतच्या संसारात ते स्थिर झाले नाहीत. भारतीय स्वातंत्र्य चळवळीसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीत, तसेच गोवा मुक्ती संग्रामाच्या वेळी ही त्यांनी जन जागृतीचे प्रचंड काम केले. एक कलाकार म्हणून तसेच एक सर्व सामान्य कार्यकर्ता म्हणून ही ते प्रत्येक उपक्रमात, आंदोलनात सहभागी होत असत. चलेजाव चळवळीच्या काळात वटेगावात ही बर्डे गुरुजींच्या नेतृत्वा खाली अनेक घडामोडी सुरू होत्या. अण्णाभाऊ त्यात सामील असल्याने त्यांच्यावर वॉरंट निघाले. परिणामी त्यांनी कायमचे घर सोडले. पुढे त्यांना तत्त्वज्ञानाची, विचारांची एक दिशा मिळत गेली आणि त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ काम करायला सुरुवात केली. पक्ष कार्यासाठी झोकून दिलेले असतानाच १९४४ साली त्यांनी 'लाल बावटा’ या कला पथकाची स्थापना केली. माटुंग्याच्या लेबर कँप मधील मंडळीं विशेषत: नाशिक, सातारा, नगर जिल्ह्यातून येऊन स्थायिक झाले होते. बहुतेक गिरण्यात, गोदीत, नगरपालिकेत नोकरीला होती. इथेच अण्णाभाऊंची नाळ कम्युनिस्ट पक्षाशी जोडली गेली. याच कँपच्या नाक्यावर `लेबर रेस्टॉरंट’ होते. इथेच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा अड्डा होता. या रेस्टॉरंट मध्ये आण्णाभाऊंनी डासावर पोवाडा लिहिला होता. टिटवाळा येथे १९४४ साली झालेल्या शेतकरी परिषदेत लाल बावटा कला पथकाची स्थापना झाली. इथेच शाहीर अमरशेख, अण्णाभाऊ व गव्हाणकर एकत्र आले. या माध्यमातूनच त्यांच्या लिखाणाला सुरुवात झाली. लावण्या, पोवाडे, पथ नाट्ये म्हणजे त्यांच्या ललित साहित्याची पूर्व तयारी होती. त्यांनी एकूण सुमारे १५ वग नाट्ये लिहिली व त्यातूनच त्यांना प्रसिद्धी ही मिळत गेली. याच काळात अण्णाभाऊंनी स्वतंत्रपणे लेखन करण्यास सुरूवात केली. त्यांचा स्तालिन ग्राडचा पोवाडा त्यावेळी कामगारांमध्ये खूपच लोकप्रिय झाला होता. त्यांच्यातला कलाकार बाहेर आणण्यासाठी हे पथक चांगलंच निमित्त ठरलं.
१९४५ च्या दरम्यान मुंबईत अण्णांच्या आयुष्याला काहीशी स्थिरता लाभली. लोकयुद्ध साप्ताहिकात वार्ताहराचे काम करीत असताना त्यांनी अकलेची गोष्ट, खापर्या चोर, माझी मुंबई अशी गाजलेली लोक नाट्ये लिहिली. या काळातच संत साहित्यासह अनेक प्रतिभावंतांच्या अभिजात कलाकृती त्यांनी वाचून काढल्या. वैचारिक आणि कला विषयक वाचनाची समृद्ध लेखक व्हायला त्यांना मदत झाली. अण्णांचे लेखक म्हणून यशाचे रहस्य म्हणजे त्यांनी नेहमी सामान्य वाचकाच्या मनाची व्यथा मांडली. सामान्य वाचकालाच प्रमाण मानल्याने वस्तुनिष्ठ असलेले त्यांचे साहित्य वाचकांच्या गळ्यातील ताईत बनले. १९५० ते १९६२ हा त्यांचा साहित्य क्षेत्रातील सुवर्णकाळ होता. याच काळात त्यांच्या पुस्तकांच्या अनेक आवृत्ती निघाल्या. प्रचंड यशस्वी होत असताना त्यांचे स्वत:चे जीवन मात्र धकाधकीचे होत होते. मुंबई सरकारने ’लाल बावटा’ या कला पथकावर बंदी घातली होती. पुढे तमाशावर ही बंदी आली. तमाशातील कलाकारांचे संसार देशोधडीला लागले. अण्णांनी तमाशाचे लोकनाट्यात रूपांतर करून तमाशा कलेचा उद्धार केला. तमाशाला लोकनाट्याचे वैभव मिळवून दिल्याने सरकारची बंदी कुचकामी ठरली.
◆ दुसरा विवाह -
पक्षाच्या कामासाठी फिरताना अण्णाभाऊंचा पुण्यातल्या जयवंताबाई या तरुण विवाहित महिलेशी परिचय झाला. काही कारणाने जयवंताबाई आपल्या पती बरोबर राहत नसत. पुढे अण्णांनी जयवंताबाईं बरोबर आपला दुसरा विवाह केला. या विवाहामुळे त्यांना बरंच स्थैर्य मिळालं आणि कलानिर्मितीसाठी आवश्यक असलेला कौटुंबिक पाठिंबा ही मिळाला.
शेवटच्या काळात मात्र त्यांच्या जयवंताबाईं बरोबरच्या नात्याला अनपेक्षितरीत्या ओहोटी लागली आणि जयवंताबाई आपल्या कन्येकडे निघून गेल्या. त्यांच्या जाण्याचा अण्णाभाऊंना धक्का बसला आणि त्यांचं मद्यपान प्रमाणा बाहेर वाढू लागले. लौकिक अर्थाने कोणतेही शिक्षण न घेता साहित्य क्षेत्रात जग प्रसिद्ध झालेला हा कलाकार काही दुर्दैवी (वैयक्तिक कौटुंबिक) संघर्षांमुळे खचत गेला. सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांनी कम्युनिस्ट चळवळीत कार्य केले परंतु कम्युनिस्ट लोकांनी शेवटी साथ दिली नाही. शेवटच्या काळात अण्णाभाऊ साठे यांना खाण्यास अन्न देखील मिळत नव्हते. ही किती भयानक बाब म्हणावी लागेल. अण्णाभाऊ साठे यांच्या शेवटच्या काळात महाराष्ट्र सरकारने त्यांना बरेच सहकार्य केले. मनाने खचलेल्या अण्णाभाऊ साठे यांचे वयाच्या एकोण पन्नासाव्या वर्षी १८ जुलै, १९६९ मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या साहित्याच्या व कार्याच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक अन्यायामुळे जो समाज शैक्षणिक, सांस्कृतिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेला आहे, त्या समाजा मध्ये आत्म विश्र्वास व प्रगतीची आस निर्माण केली.
अण्णाभाऊंचं झोपडीवर अतिशय प्रेम होतं. 'जे जगतो तेच मी लिहितो` असं ते सांगत. ४५ कादंबर्या, १५० कथा, तीन नाटके, ११ लोक नाट्ये, ७ चित्रपट कथा व असंख्य लावणी पोवाडे असे त्यांचे साहित्य प्रसिध्द झाले. इथेच त्यांच्या प्रतिभेला बहर आला. कोणतीही ज्ञानाची शिक्षणाची परंपरा इथे त्यांना लाभली नाही. आज त्यांचे साहित्य अनेक देशी - विदेशी संस्थांच्या अभ्यास क्रमाचा भाग बनले आहेत.
◆ अण्णाभाऊचे साहित्य -
अण्णाभाऊंच्या साहित्यात ग्रामीण, दलित, महिला या समाजातल्या शोषित वर्गांचं अनुभवाधिष्ठित चित्रण आढळतं. ना. सी. फडके आणि वि. स. खांडेकर यांचा प्रभाव असणाऱ्या मराठी कादंबरीच्या त्या काळात जेव्हा शहरी आणि उच्च वर्गीयांचंच प्रतिनिधित्व होत होतं, तेव्हा अण्णाभाऊंनी कनिष्ठ आणि ग्रामीण जनतेचं विश्व साहित्यात आणलं. साहस या गुणाचं चित्रण त्यांच्या अनेक कादंबऱ्यांतून आढळतं. ‘फकिरा’ या त्यांच्या सर्वाधिक प्रसिद्ध कादंबरीत त्यांनी आपले खऱ्या आयुष्यातले मामा फकिरा राणोजी मांग यांची साहसी जीवन कथा मांडलेली आहे, फकीरा ही पुढे अतिशय गाजलेली कादंबरी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली. तर ‘वारणेच्या खोऱ्यात' या कादंबरीत स्वातंत्र्यासाठीच्या आंदोलनात हौतात्म्य पत्करणारा तरुण आणि त्याच्या प्रेयसीची कथा आहे.
'कार्यकर्ते लेखक' असं अण्णाभाऊंना म्हटलं गेलं, कारण आपल्या साहित्याला त्यांनी सामाजिक चळवळींशी जोडलं. सामान्य कष्टकरी लोकांशी असलेली त्यांची बांधिलकी त्यांच्या साहित्यातून आणि कार्यातून दिसते. त्यांनी 'वैजयंता' या स्वतःच्या कादंबरीच्या प्रस्तावनेत आपली लेखनभूमिका अण्णाभाऊनी विषद केली आहे, ती अशी - "जो कलावंत जनतेची कदर करतो त्याचीच जनता कदर करते हे मी प्रथम शिकून नंतर लेखन करीत असतो. माझा माझ्या देशावर, जनतेवर आणि तीच्या संघर्षावर अढळ विश्वास आहे. हा देश सुखी, समृद्ध नि सभ्य व्हावा, इथे समानता नांदावी, या महाराष्ट्र भूमीचे नंदनवन व्हावे अशी मला रोज स्वप्ने पडत असतात. ती मंगल स्वप्ने पहात पहात मी लिहीत असतो. केवळ कल्पकतेचे कृत्रिम डोळे लावून जीवनातील सत्य दिसत नसते. ते सत्य ह्रदयानं मिळवावे लागते. डोळ्यांनी सर्वच दिसते. परंतु ते सर्व साहित्यिकाला हात देत नाही. उलट दगा मात्र देते. माझा असा दावा आहे, की ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती दलीतांच्या, शोषितांच्या, कामगारांच्या तळहातावर तरली आहे. त्या शोषितांचे जीवन तितक्याच प्रामाणिक हेतूने नि निष्ठेने मी चित्रित करणार आहे नी करीत आहे."
अण्णांनी वैजयंता, माकडीचा माळ, चिखलातील कमळ, वारणेचा वाघ, फकिरा अशा अनेक कादंबर्या लिहिल्या. ३०० च्या वर कथा लिहिल्या. खुळंवाडी, बरबाह्या कंजारी, कृष्णाकाठच्या कथा असे त्यांचे कथा संग्रह ही प्रसिद्ध आहेत. त्यांनी स्टॉलीनग्राडचा पोवडा, महाराष्ट्राची परंपरा, मुंबईचा कामगार असे पोवाडेही लिहिले. निवडणुकीत घोटाळे, दुष्काळात तेरावा, अकलेची गोष्ट ही त्यांची वग नाट्ये प्रसिद्ध आहेत. दोनशे-अडीचशे गाणी, लावण्या त्यांनी लिहिल्या आहेत. कामगारांमध्ये त्यांची गाणी आणि लावण्या लोकप्रिय आहेत. शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर आणि अण्णाभाऊ साठे या तिघांनी १९४१, १९४२ मुंबई शहरावर अधिराज्य गाजविले. याच काळात बंगालमध्ये दुष्काळ पडला होता. त्यावर अण्णांनी `बंगालची हाक’ हा पोवाडा रचला. संयुक्त महाराष्ट्रलढ्यात त्यांनी कामगार जागा करुन त्यांची एकजूट संघटना निर्माण केली.
◆ पुरोगामित्वाची परंपरा : शिवराय वंदन -
अण्णाभाऊ हे आपल्या कार्यक्रमाची सुरवात एखाद्या देवाचे नाव न घेता छत्रपती शिवरायांच्या नावाने करायचे... तमाशात पारंपारिक श्रीगणेशा.. अण्णांनी तमाशाला नवे रुप दिलं. पहिल्या नमनात मातृभूमी हुतात्मे, राष्ट्रपुरुष यांचा समावेश झाला, गणातील कृष्ण आणि गवळणी त्यांनी काढूनच टाकल्या. लावणी व तमाशा लोक शिक्षणाकडे वळविण्याचे श्रेय अण्णाभाऊं कडेच जाते. गवळण झिडकारून 'मातृभूमिसह' 'शिवरायांना वंदन' करण्याची परंपरा अण्णाभाऊनी रुजवली ती अशी -
"प्रथम मायभूमीच्या चरणा ।
छत्रपती शिवाजी चरणा ।
स्मरोनी गातो कवणा ।।"
अण्णाभाऊंनी आपल्या पुरोगामी - समतावादी, वैज्ञानिक विचारांनी पारंपरिक, पौराणिक तमाशाच्या गण - गवळण ढाच्यात ही (Form) आमूलाग्र परिवर्तन केले. तमाशाच्या प्रारंभी होणाऱ्या गणेश वंदनाला ही त्यांनी फाटा दिला आणि प्रथम वंदू भूचरणा व छत्रपती शिवाजी राजा सारख्या शूर पुरुषाला वंदन केले. थोडक्यात त्यांनी देवा ऐवजी माणसाला वंदन करण्याची नवी प्रथा पाडली. तमाशात गवळणींची जी अश्लील भाषेत टिंगल - टवाळी चालायची तिला ही त्यांनी काट दिला. अण्णाभाऊंनी महात्मा फुल्यांच्या सत्यशोधकी जलसा व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील आंबेडकरी जलसाची जन प्रबोधनाची क्रांतिकारी परंपरा नव्या लोक नाटय़ातून पुढे नेली. त्यांनी मराठी व भारतीय साहित्य - संस्कृतीच्या उच्चभ्रू पांढर पेशी कक्षा रुदावल्या. त्यामुळे अण्णा भाऊंचे साहित्य इंग्रजी, रशियन, फ्रेंच, झेक आदी जागतिक भाषांत ही अनुवादित झाले. मराठीतील ज्येष्ठ साहित्यक व दलित साहित्याचे प्रवर्तक बाबुराव बागूल यांनी अण्णा भाऊंची तुलना सुप्रसिद्ध रशियन साहित्यिक मॅक्झिम गॉर्की यांच्याशी केली आणि 'महाराष्ट्राचा मॅक्झिम गॉर्की' असा गौरव केला.
अण्णांभाऊंनी लिहिलेली ‘मुंबईची लावणी’ ही त्या काळात खूप गाजली. मुंबईचं विविधांगी रूप, त्या शहरातली गरिबी आणि श्रीमंती यांच्यातली विसंगती त्यांनी त्यात टिपली आहे. अण्णांनी मुंबईची लावणी लिहून वास्तववादी भीषण अशा मुंबईच्या विषमतेचे दर्शन घडविले. उदाहरणार्थ -
● मुंबईची लावणी
मुंबईत उंचावरी ।
मलबार हिल इंद्रपुरी ।
कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती ।।धृ।।
परळात राहणारे ।
रात - दिवस राबणारे ।
मिळेत ते खाउनी घाम गाळती ।।१।।
ग्रॅंट रोड, गोखले रोड ।
संडास रोड, विन्सेंट रोड ।
असे किती रोड इथं नाही गणती ।।२।।
गल्ली बोळ किती आत ।
नाक्यांचा नाही अंत ।
अरबी सागराचा वेढा हिच्या भोवती ।।३।।
आगीन गाडी - मोटार गाडी ।
विमान घेतं उंच उडी ।
टांग्यांची घोडी मरती रस्त्यावरती ।।४।।
हात गाडी हमालांची |
भारी गडबड खटाऱ्यांची ।
धडपड इथं वाहतुकीची रीघ लागती ||५||
••••••••••••••••••••••••
फाळणीच्या पार्श्वभूमीवर ते कळवळून अण्णाभाऊ सांगतात -
● करा बंद रक्तपाताला
"द्या फेकून जातीयतेला,
करा बंद रक्तपाताला ।।धृ।।
आवरोनी हात आपुला,
भारतियांनो इज्जत,
तुमची ईषेला पडली ।।१।।
काढा नौका देशाची,
वादळात शिरली ।।२।।
धरा आवरुन एकजुटीने,
दुभंगली दिल्ली ।।३।।
काढा बाहेर राष्ट्रनौका,
ही वादळात गेली ।।४।।
••••••••••••••••••••••••
अण्णाभाऊ साठे याची लोकप्रिय गीत रचना -
● माझी मैना गावावर राहिली
माझी मैना गावावर राहिली ।
माझ्या जिवाची होतिया काहिली ।।धृ।।
ओतीव बांधा रंग गव्हाला,
कोर चंद्राची - उदात्त गुणांची ।
मोठ्या मनाची सीता,
ती माझी रामाची ।।१।।
हसून बोलायची - मंद चालायची,
सुगंध केतकी सतेज कांती ।
घडीव पुतली सोन्याची,
नव्या नवतीची ।
काडी दवन्याची,
रेखीव भुवया ।
कमान जणू इन्द्रधनुची,
हिरकणी हिरयाची ।।२।।
काठी आंधल्याची,
तशी ती माझी गरीबाची ।
मैना रत्नाची खाण,
माझा जिव की प्राण ।
नसे सुखाला वाण तिच्या,
गुणांची छक्कड़ मी गयिली,
माझ्या जिवाची होतिया काहिली ।।३।।
गरिबीने ताटतुट,
केली आम्हा दोघांची ।
झाली तयारी माझी,
मुंबईला जाण्याची ।
वेळ होती ती भल्या पहाटेची,
बांधाबांध झाली भाकर तुकड्याची ।
घालवित निघाली मला,
माझी मैना चांदनी शुक्राची ।।४।।
गाव दरिला येताच कळी,
कोमेजली तिच्या मनाची ।
शिकस्त केली,मी तिला हसवण्याची,
खैरात केली पत्रांची - वचनांची ।
दागिन्यांन मडवुन काडयाची,
बोली केली शिंदेशाही तोड्याची ।।५।।
साज कोल्हापुरी वज्रटिक,
गळ्यात माळ पुतल्याची ।
कानात गोखरे - पायात मासोल्या,
दंडात इळा आणि नाकात नथ सर्जाची ।।६।।
परी उमलली नाही,
कळी तिच्या अंतरीची ।
आणि छातीवर दगड ठेवून,
पाठ धरिली मी मुंबईची ।
मैना खचली मनात,
ती हो रुसली डोळ्यात ।
नाही हसली गालात,
हात उंचावूनी उभी राहिली ।।७।।
या मुंबईत गर्दी बेकरांची,
त्यात भर झाली माझी एकाची ।
मढ़ेवर पडावी मुठभर माती,
तशी गत झाली आमची ।
ही मुंबई यंत्राची - तंत्राची,
जगणाऱ्यांची - मारणाऱ्यांची ।
शेंडीची - दाढ़ीची,
हडसनच्या गाडीची ।।८।।
नायलोनच्या आणि जोर्जेटच्या,
तलम साडीची - बुटांच्या जोडीची ।
पुस्तकांच्या थडीची,
माडीवर माडी, हिरव्या माडीची |
पैदास इथे भलतीच चोरांची, एतखाऊची,
शिर्जोरांची, हरामखोरांची, भांडवलदाराची,
पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची |।९।।
पर्वा केली नाही उन्हाची,
थंडीची, पावसाची ।
पाण्यान भरल खिसे माझ,
वान मला एका छात्रिची ।
त्याच दरम्यान उठली चळवळ,
संयुक्त महाराष्ट्राची ।
बेलगांव - कारवार, निपानी,
गोव्यासह एक भाषिक राज्याची ।।१०।।
चकाकली संगीन अन्यायाची,
फ़ौज उठली बिनिवारची ।
कामगारांची - शेतकऱ्यांची,
मध्यम वर्गियांची ।
उठला मराठी देश,
आला मैदानी त्वेष |
वैरी करण्या नामशेष गोळी,
डमडमची छातीवर सहिली ।।११।।
म्हणे अन्नाभाऊ साठे घर,
बुडाली गर्वाची, मी - तू पणाची ।
जुल्माची - जबरीची, तस्कराची,
निकुंभ लीला कत्तल झाली इन्द्रजिताची |
चौदा चौकड्याच राज्य गेले रावनाचे,
लंका जळाली त्याची तीच गत झाली ।।१२।।
कलीयुगामाजी - मोरारजी,
देसायाची आणि स. का. पाटलाची ।
अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची,
परळच्या प्रळ्याची, लालबागच्या लढायची ।
फौंटनच्या चढ़ाइची, झाल फौंटनला जंग,
तिथे बांधुनी चंग, आला मर्दानी रंग,
धार रक्ताची मर्दानी वाहिली ।।१३।।
महाराष्ट्राने गुढी उभारली विजयाची,
दाखविली रित पाठ भिंतीला लावून लढायची ।
परी तगमग थांबली नाही माझ्या अंतरीची ,
गावाकडे मैना माझी भेट नाही तिची ।
तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची,
बेलगांव, कारवार, डांग, उंबर गावावर ।।१४।।
मालकी दुजांची - धोंड खंडनीची,
कमाल दंडलीची चिड बेकिची ।
गरज एकीची म्हणून विनवणी आहे,
या शिव शाक्तिला शाहिराची ।
आता वळू नका, रणी पळू नका,
कुणी छळू नका बिनी,
मारायची अजुन राहिली ।।१५।।
सादर "माझी मैना गावावर राहिली" हे गाणे ऐकायचे असल्यास लिंक ओपन करा - http://www.youtube.com/watch?v=7yGX2esXLw4
••••••••••••••••••••••••
मराठीतील ग्रामीण, प्रादेशिक, दलित साहित्यावर अण्णाभाऊंचे प्रभुत्व होते. अण्णाभाऊंच्या साहित्याचे हिंदी, सिंधी, गुजराती, उडिया, बंगाली, तमिळ, मल्याळी या भारतीय भाषां बरोबरच रशियन, झेक, पोलीश, इंग्रजी, फ्रेंच अशा जगातील २७ भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. लेखणीचे हत्यार बनवून त्यांनी पुरोगामी, विज्ञान निष्ठ, स्त्रीवादी, लढाऊ अविष्काराचा दीपस्तंभ मराठी साहित्याच्या क्षेत्रात उभा केला. पु. ल. देशपांडे यांनी त्यांचे ‘तीन पैशाचा तमाशा’ हे नाटक अण्णाभाऊंना समर्पित केले होते. एवढ्या मोठ्या कर्तृत्वामुळे त्यांना प्रसिद्धी मिळत होती. अण्णांच्या १२ कथांवर चित्रपट निघाले. एवढे साहित्य प्रसिद्ध झाले तरी त्यांचे दारिद्रय संपले नाही. लक्ष्मी त्यांना प्रसन्न नव्हती. ते मितभाषी असल्याने व्यावहारिक बाबतीत लोकांनी त्यांचा गैरफायदा घेतला. परंतु चित्रपट सृष्टीतील भालजी पेंढारकर, सूर्यकांत मांढरे, जयश्री गडकर, सुलोचना यांसारख्या दिग्गज कलाकारांनी अण्णांवर खूप प्रेम केले. हिंदी चित्रपट सृष्टीतील ही राज कपूर, शंकर, शैलेंद्र, बलराज सहानी, गुरुदत्त, उत्पल दत्त या कलाकारांचे अण्णांवर प्रेम होते. ऑलेग सारखे रशियन कलावंत ही अण्णाभाऊंचे मित्र होते. चौदा लोकनाट्यं, 'वारणेचा वाघ', 'वैजयंता', 'फकिरा', 'चित्रा' इत्यादी प्रचंड गाजलेल्या कादंबर्यांसहित सुमारे बत्तीस कादंबर्या आणि बावीस कथा संग्रह अशी विपुल साहित्य निर्मिती त्यांनी केली. अण्णाच्या अनेक कादंबर्यांनी त्या काळी मराठी चित्रपट सृष्टीला कथांची रसद पुरवली. 'वैजयंता', 'टिळा लावते मी रक्ताचा', 'डोंगरची मैना', 'वारणेचा वाघ', 'फकिरा', आदी प्रसिद्ध चित्रपट त्यांच्या कथा - कादंबऱ्यांवर आधारित आहेत. त्यांच्या लोक नाट्यांमध्ये 'अकलेची गोष्ट', 'कलंत्री', 'बेकायदेशीर', 'शेटजीचं इलेक्शन', 'पुढारी मिळाला', 'मूक मिरवणूक', 'देशभक्त घोटाळे', 'लोकमंत्र्यांचा दौरा' इत्यादींचा समावेश आहे. १९४९ साली अण्णाभाऊंनी `मशाल’ साप्ताहिकात `माझी दिवाळी` नावाची पहिली कथा लिहिली तिथून त्यांचा साहित्य प्रवास सुरु झाला. जगण्यासाठी लढणार्या माणसांच्या अण्णांभाऊंच्या कथा आहेत.असा हा पद दलितांच्या जीवनावर वास्तव लिहणारा साहित्यकार सांगली जिल्ह्यात जन्मला होता.
◆ संयुक्त महाराष्ट्रासाठी योगदान -
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, गीते, लोकनाटये आदींचा समावेश होता. ‘महाराष्ट्राची परंपरा’ (१९५०) ह्या नावाने त्यांनी या चळवळीसाठी पोवाडा लिहिला; त्याचप्रमाणे मुंबई कुणाची? ह्या लोकनाट्याचे महाराष्ट्रभर प्रयोग केले. अकलेची गोष्ट (१९४५), देशभक्त घोटाळे (१९४६), शेटजींचे इलेक्शन (१९४६), बेकायदेशीर (१९४७), पुढारी मिळाला (१९५२), लोकमंत्र्यांचा दौरा (१९५२) ही त्यांची अन्य काही लोक नाट्ये. अण्णाभाऊंनी पारंपरिक तमाशाला आधुनिक लोक नाट्याचे रूप दिले.
२ मार्च १९५८ मध्ये झालेल्या दलित साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. २ मार्च १९५८ उदघाटन पर भाषणातील काही अंश -
"माणूस जगतो का? नि जगण्यासाठी एवढा धडपडतो का? याचा विचार आम्ही करणे जरूर आहे. त्या धडपडणाऱ्या पतिताला आम्ही भित्रा समजतो, तो उंच गगनात गेलेल्या विद्युतमय मनोऱ्यावर उभे राहून विजेच्या तारा जोडतो, खाणीत उभ्या कड्यावर चढून सुरुंगाना पेट देतो किंवा पोलादाच्या रस करणाऱ्या भट्टीवर तो निर्भय वावरतो आणि या सर्व ठिकाणी मृत्यू त्याची वाट पाहत असतो. कधी कधी त्याची व मृत्यूची गाठ पडून हा दलित कष्ट करीत करीत मरण पत्करतो. ही जगण्याची नि मारण्याची आगळी रीत आहे. ती लेखकाने समजून घ्यावी. सुरुंगाना पेट देता देता किंवा पोलादाच्या रसात बुडून मरणे, नाही तर विजेच्या धक्क्याने मरणे, दिवाळे निघाले म्हणून शेअर बाजारात मरणे या मरणातील अंतर लेखकाने मोजून पाहावे नि श्रेष्ठ मरण कोणते ते निश्चित ठरवावे. दलितात ही सर्व भावना इतरांप्रमाणे सदैव जागृत असतात. पण तो इतरांपेक्षा जरा निराळा असतो. कारण तो हाडा - मांसाचा केवळ गोळा नसतो. तो निर्मितीक्षम असतो. तो वास्तव जगात कष्टाचे सागर उपसून दौलतीचे डोंगर रचतो. अशा या महान मानवा वर महाकाव्य रचणारा त्याला हवा असतो.
एका झाडा खाली तीन दगडांची चूल करून मडक्यात अन्न शिजवून दोन मुलं नि बायको यांना जागविणारा हा दलित वर वर कंगाल दिसला तरी त्याची संसार करण्याची इच्छा केव्हा ही पवित्र अशीच असते. कुटुंब संस्थे वरचा त्याचा विश्वास मुळीच ढळलेला नसतो. परंतु त्याची कुटुंब संस्थाच भांडवलदारी जगाने त्या झाडा खाली हाकलून दिलेली असते. त्याचे आम्ही निरीक्षण करावे, याची कारण परंपरा शोधावी आणि मग त्या कंगाल दिसणाऱ्या विषयी लिहावे. जपून लिहावे, कारण या समाजाची घडीन घडी त्या दलिताने व्यापवली आहे. अधिक काव्यमय शब्दात बोलायचे झाले तर असे म्हणता येईल की, "हे जग, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून दलिताच्या तळहातावर तरलेली आहे." अशा या दलिताचे जीवन खडकातून झिरपणाऱ्या पाझरा प्रमाणे असते. ते जवळ जाऊन पाहा. मग लिहा. कारण 'जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे' हे तुकारामाचे म्हणणे खोटे नाही. म्हणून दलिता विषयी लिहिणाऱ्यांनी प्रथम त्याच्याशी एकनिष्ठ असले पाहिजे. तू गुलाम नाहीस, हे जग तुझ्या हातावर आहे, याची जाणीव करून घ्यावी. त्याचे जीवन वरच्या पातळीवर नेण्याची शिकस्त करावी आणि त्यासाठी लेखक हा सदैव आपल्या जनते बरोबर असावा लागतो. कारण जो कलावंत जनते बरोबर असतो त्याच्या बरोबर जनता असते. जनतेकडे पाठ फिरवणाऱ्याकडे साहित्य ही पाठ फिरवीत असते. जगातील श्रेष्ठ कलावंतांनी वाङमय हा जगाचा तिसरा डोळा मानला आहे. आणि तो डोळा सदैव पुढे व जनते बरोबर असणे जरूर आहे.
(लोक शाहीर अण्णाभाऊ साठे : दलित साहित्य - संमेलन २ मार्च १९५८ उदघाटनपर भाषणातून...)
◆ रशिया प्रवास -
१९४८ आणि १९६१ साली त्यांनी रशियास जाण्याचा प्रयत्न केला त्यास यश आले नाही. पण जेव्हा ते रशियाला जाणार हे नक्की झाले तेव्हा आपल्या महाराष्ट्रातून प्रचंड आर्थिक मदत झाली. वाटेगावहून मुंबईत वडिलांच्या बरोबर पायी चालत आलेला अण्णाभाऊ विश्वासाने एकटा विमान प्रवास करुन रशियाला गेले तत्पूर्वीच त्यांनी `चित्रा’ ही कादंबरी रशियन भाषेत प्रकाशित झाली होती. अण्णा रशियात गेले.. तेथे त्यांनी 'शिवचरित्र' पोवाड्यातून सांगितले त्याचे रशियन भाषेत भाषांतर झाले. `सुलतान` ही कथा लोकांना आवडली होती. तर `स्टालिन ग्राडचा पोवाडा` रशियात लोकप्रिय झाला होता. `फकिरा` कादंबरीच्या १६ आवृत्या निघून ती आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त झाली होती. या पार्श्वभूमीवर रशियात गेल्या नंतर त्यांचं प्रचंड स्वागत झालं.
रशियात अण्णांचं चांगलं स्वागत झालं. त्यावर आधारित 'माझा रशियाचा प्रवास' हे प्रवास वर्णन ही त्यांनी लिहिलं. आपल्या कार्यक्रमाची सुरवात शिवरायांच्या नावाने सुरवात करणारे आपले अण्णाभाऊ. शिव चरित्र जगभर पोहचवुन आपले सर्वस्व उपेक्षितांसाठी अर्पणारे मराठी साहित्याचे सर्वोच्च मानबिँदु "लोक शाहीर अण्णाभाऊ साठे" यांचा एक दुर्मिळ फोटो रशिया वरुन परत आल्यावर लोक शाहीर आण्णाभाऊ साठे यांचे विमान तळाच्या बाहेर स्वागत करण्यात आले, तो क्षण. आपल्या कार्यक्रमाची सुरवात शिवरायांच्या नावाने सुरवात करणारे आपले अण्णाभाऊ. शिव चरित्र जगभर पोहचवुन आपले सर्वस्व उपेक्षितांसाठी अर्पणारे मराठी साहित्याचे सर्वोच्च मानबिँदु "लोक शाहीर अण्णाभाऊ साठे" यांचा एक दुर्मिळ फोटो रशिया वरुन परत आल्यावर लोक शाहीर आण्णाभाऊ साठे यांचे विमान तळच्या बाहेर स्वागत करण्यात आले, तो क्षण.
◆ जीवनातील महत्वाच्या घटना-
१६ ऑगस्ट १९४७ ला अण्णाभाऊ साठे यांनी मुंबईत मोर्चा काढला. तथा कथित स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवसी हा या स्वातंत्र्याच्या विरोधातील मोर्चा होता. या मोर्च्याला कम्युनिस्टांनी विरोध केला. या पक्षात अण्णाभाऊ कार्य करीत होते. तरीपण हजारो लोकांच्या उपस्थितीत तो मोर्चा झाला. या मोर्चातील प्रमुख घोषणा होती...
ये आझादी झूठी है ।
देश की जनता भुकी है ।।
१ मार्च १९४८ ला पॅरिसला जागतिक साहित्य परिषद झाली. या परिषदेचे निमंत्रण अण्णाभाऊ साठे यांना मिळाले होते परंतु जाण्यासाठी केवळ पैसे नसल्यामुळे ते या परिषेदेला जाऊ शकले नाहीत. २ मार्च १९७८ रोजी पहिले दलित साहित्य संमेलन झाले. या संमेलनाचे उद्घाटक म्हणून अण्णा भाऊ साठे होते. यात त्यांनी उद्घाटकीय भाषण केले.
◆ कादंबरी वरून निघालेले चित्रपट -
१) वैजयंता :
या कादंबरी वरून निघालेला चित्रपट ‘वैजयंता‘
साल १९६१, कंपनी - रेखा फिल्म्स
२) आवडी :
या कादंबरी वरून ‘टिळा लावते मी रक्ताचा’
साल १९६९, कंपनी - चित्र ज्योत
३) माकडीचा माळ :
या कादंबरी वरून ‘डोंगरची मेना’
साल १९६९, कंपनी - विलास चित्र
४) चिखलातील कमळ :
या कादंबरी वरून ‘मुरली मल्हारी रायाची’
साल १९६९, कंपनी - रसिक चित्र
५) वारणेचा वाघ :
या कादंबरी वरून ‘वारणेचा वाघ’
साल १९७०, कंपनी - नवदिप चित्र
६) अलगूज :
या कादंबरी वरून ‘अशी ही साताऱ्यांची तऱ्हा’
साल १९७४, कंपनी - श्रीपाद चित्र
७) फकिरा :
या कादंबरी वरून ‘फकिरा’
कंपनी – चित्र निकेतन
◆ लिखित कादंबऱ्या-
प्रकाशक -
१) विद्यार्थी गृह प्रकाशन, पुणे
२) चंद्रकांत शेट्ये, कोल्हापूर - २.
आग, आघात, अहंकार, अग्नि दिव्य, कुरूप, चित्रा, फुलपाखरू, वारणेच्या खोऱ्यात, रत्ना, रान बोका, रुपा, संघर्ष, गुलाम, डोळे मोडीत राधा चाले, ठासलेल्या बंदुका, जिवंत काडतूस, चंदन, मूर्ती, मंगला, मथुरा, मास्तर, चिखलातील कमळ, अलगुज, रान गंगा, माकाडीचा माळ, कवड्याचे कणीस, वैयजंता, धुंद रान फुलांचा, आवडी, वारणेचा वाघ, फकिरा, वैर, पाझर, सरसोबत.
◆ लिखित नाटकाची पुस्तके -
प्रकाशक -
विद्यार्थी गृह प्रकाशन, पुणे
बरबाद्या कंजारी, चिरानगरची, निखारा, नवती, पिसाळलेला माणूस, आबी (दुसरी आवृत्ती), फरारी, भानामती, लाडी (दुसरी आवृत्ती), कृष्णा काठच्या कथा, खुळवाडी, गजाआड (पाचवी आवृत्ती), गुऱ्हाळ
◆ शाहिरीचे पुस्तक -
शाहीर (दुसरी आवृत्ती)
१९८५, मनो विकास प्रकाशन, मुंबई
◆ प्रवास वर्णन पुस्तक -
माझा रशियाचा प्रवास :
सुरेश प्रकाशन, पुणे
◆ लिखित वग नाट्ये (तमाश्याची) पुस्तके-
अकलेची गोष्ट, खापऱ्या चोर, कलंत्री, बेकायदेशीर, शेटजीचं इलेक्शन, पुढारी मिळाला, माझी मुंबई, देशभक्त घोटाळे, दुष्काळात तेरावा, निवडणुकीतील घोटाळे, लोकमंत्र्याचा दौरा, पेंद्याचं लगीन, मूक निवडणूक, बिलंदर बुडवे
◆ लिखित प्रसिद्ध पोवाडे -
नानकीन नगरा पुढे, स्टलिन ग्राडचा पोवाडा, बर्लिनचा पोवाडा, बंगालची हाक, पंजाब - दिल्लीचा दंगा, तेलंगणाचा संग्राम, महाराष्ट्राची परंपरा, अमरनेरचे अमर हुतात्मे, मुंबईचा कामगार, काळ्या बाजाराचा पोवाडा
◆ डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रती प्रेम निष्ठा -
अण्णाभाऊनी त्यांची "फकिरा" ही कादंबरी डॉ आंबेडकराच्या झुंजार लेखणीला अर्पण केली होती. ६ डिसेंबर १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरीनिर्वान झाले त्यावेळी आणि त्याच्यानंतर सगळ्या देशामधून, राज्यामधून, जिल्ह्या मधुन, तालुक्या मधुन आणि नगरा - नगरा मधून बाबासाहेबांना श्रध्दांजली देण्याचा कार्यक्रम होत होता. अश्याच वेळी आपल्या महाराष्ट्रातील सगळे त्यावेळेचे ख्यातनाम गायक, ख्यातनाम कवी , शाहीर यांनी ठरवले कि आपण हि बाबासाहेबांना आदरांजली किंवा श्रद्धांजली म्हणुन एक कार्यक्रम ठेवायचा आणि प्रत्येकाने बाबासाहेबांना अभिवादन पद एक गाणं श्रद्धांजली म्हणून गायचे आणि गाण्याच्या रूपाने बाबासाहेबांना श्रद्धांजली द्यायची असे ठरवले. त्या कार्यक्रमाची तारीख ठरली. अंधेरी मधला एक हॉल निश्चित झाला आणि कार्यक्रम वेळेत सुरु झाला. त्या कार्यक्रमाला वामनदादा कर्डक, भिकू भंडारे, गोविंद म्हशीलकर, प्रल्हाद दादा शिंदे, विठ्ठल उमप, विठ्ठल शिंदे, आणि अण्णाभाऊ साठे असे नामचीन बरेच गायक मंडळी उपस्थितीत होती. या कार्यक्रमाला सगळे जण स्टेजवर बसून सगळी गायक मंडळी आणि शाहीर मंडळी स्वता:चे आप आपले गाणे सादर करत होते.
या सगळ्यांचे गाण सादर झाल्या नंतर शेवटी फक्त एकच गायक, एकच शाहीर राहिले होते आणि ते म्हणजे अण्णाभाऊ साठे. तर त्यावेळेस ख्यातनाम कवी, गायक वामनदादा कर्डक अण्णाभाऊंना बोलतात कि - "आण्णा तुला गाणे नाही बोलायचे का? आणि तू तर गाणे पण लिहून आणले नाही मग तू बाबासाहेबांना गाण्याच्या रूपाने श्रद्धांजली कसा वाहणार गाणे कसा बोलणार? मग त्यानंतर अण्णाभाऊ साठे खिश्यातून पेन आणि कागद काढतात आणि त्यानंतर ते गाणे लिहायला सुरुवात करतात आणि त्या लिखाणाची, त्या कवितेची, त्या गीतेची सुरुवात आण्णाभाऊ "जग बदल घालुनी घाव सांगून गेले मज भीमराव" ह्या ओळीने करतात आणि ते गाण सगळ्या देशात, संपुर्ण महाराष्ट्रात हे गाणं ऐवढ गाजतं कि त्या गाण्याला देशात कुठेच तोड नाही आणि सगळ्यांना हे गाणं हव हवेसे हे गान झाल आहे. सर्वाना हे गाणं जीवन जगण्यास प्रेरणा देतं. मी खाली ते गाणं देत आहे.
● जग बदल घालुनी घाव
जग बदल घालूनी घाव ।
सांगुनी गेले मज भीमराव ।।धृ।।
गुलामगिरीच्या या चिखलात,
रुतुन बसला का ऐरावत ।
अंग झाडूनी निघ बाहेरी,
घे बिनीवरती घाव ।।१।।
धनवंतांनी अखंड पिळले,
धर्मांधांनी तसेच छळले ।
मगराने जणू माणिक गिळीले,
चोर जहाले साव ।।२।।
ठरवून आम्हा हीन अवमानीत,
जन्मो जन्मी करुनी अंकित ।
जिणे लादून वर अवमानीत,
निर्मुन हा भेदभाव ।।३।।
एकजुटीच्या या रथा वरती,
आरूढ होऊनी चल बा पुढती ।
नव महाराष्ट्रा निर्मुन जगती,
करी प्रगट निज नाव ।।४।।
अण्णाभाऊनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर फक्त "जग बदल घालुनी घाव, सांगुनी गेले मज भीमराव" हे गीत लीहले आहे. जेव्हा एका पत्रकाराने अण्णाभाऊ यांना विचारले. अण्णाभाऊ तुम्ही बाबासाहेब यांच्यावर कादंबरी का नाही लिहली? तेव्हा अण्णभाऊ त्या पत्रकारावर संतापले आणि म्हणाले - "अरे बाबासाहेब सूर्य आहे आणि त्या सुर्याला मी एका पुस्तकांत कैद करूच शकत नाही. ज्यांनी बाबासाहेबांवर पुस्तकं लिहली त्याच्या लेखणीला आणि त्यांना माझा दंडवत."
"फकिरा" कादंबरी मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर असलेले प्रेमं - "लौकर चला! बेडस गावच्या त्या बामनाच्या वाड्यात ती दौलत अडकून पडलीय" फकिरा आवाज चढवीत म्हणाला - "तिला मोकळी करा! हो, पन आदी मला आईला - बाबाला, थोरल्या आईला एकदम भेटून येऊ दे. पर तुम्ही मानसांची जुळनी करा! शंभर मानसं कडवी घ्या नि चला"
हे सारं भिवानं ऐकलं होतं. तो पुढं म्हणाला - "पर बामनाकडं बंदूक हाय. आनी बंदुकी पुढं बळ बेकार व्हतं. भलताच मार हाय, म्हनं"
"माझं बळ तोफेपुढे बेकार व्हनार हाय!"
फकिरा तीव्र स्वरात म्हणाला - "बंदूक? असू दे बंदूक! किती गोळ्या उडवील ती? एक एक मानूस दहा दहा गोळ्या खाऊ या! पन जरा मानसावानी नि हिंमतीनं! पंत म्हनीत, एक राजा हतं झाला. त्येचं नाव मी इसरलो. त्यो राजा म्हनत व्हता, शेळी हूनशान शंभर वर्सं जगन्यापरास वाघ हूनशान एक दिवस जगावं. आनी त्येच खरं हाय. वाघच होऊ नि वाघासारखं मरू या! चला. जमवा मानसं नि चला"
या परिच्छेदातील "त्यो राजा म्हनत व्हता, शेळी हूनशान शंभर वर्सं जगन्यापरास वाघ हूनशान एक दिवस जगावं. " हे वाक्य कुणासाठी आलं असेल? अर्थातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अण्णाभाऊ साठे यांनी केलेले हे मानाचे वंदन आहे. फकिरा या बहुचर्चित कादंबरीत बेडस गावचा खजिना लुटण्याची योजना आखतो तेव्हा भिवा शंका व्यक्त करतो म्हणून फकिरा त्याला वरील उत्तर देतो. याच कादंबरीत जॉन साहेबां पुढे समर्पण करताना फकिराने हातातली तलवार टेबलवर ठेवली तेव्हा जॉन साहेब फकिराला विचारतात - "ही तलवार कुठं मिळाली?" तेव्हा फकिरा म्हणतो - "ही तलवार माझ्या पूर्वजाला शिवाजी राजानं दिली" ही तलवार घेऊन माझा बाप खोता संग लढला नि मी हिला घेऊन तुमच्याशी लढलो" तलवारीला धार नसेल तर, ती काय कामाची? धारं वाचून तलवार नि बळा वाचून बंड लटकं असतं "छत्रपति शिवराय आणि क्रांतिसूर्य भीमरायांच्या स्वाभिमानी हिंमतबाज लढयाला अण्णाभाऊ आपल्या कादंबरीतून केवळ वंदन करीत नाही तर ती जनते पुढे आणून प्रेरणा देतात. फकिरा हे अण्णाभाऊ साठे यांचे मामा होते. मांग - महारांच्या शौर्याची गाथा असलेली ही कादंबरी अण्णाभाऊनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केली आहे.
•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•
प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"
जय भिम
जय भारत
नमो बुद्धाय
••••••••••••••••••••••••••••
एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BSNETINDIA
• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NILEPAKHARU
• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UATINJADHAV789456123
• मंडणगड - दापोली सामाजिक प्रतिष्ठान
Plz Join us 'MDSP' : 7303535166
• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com
•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•
• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number
सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर Add सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.
धन्यवाद ।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा