सोमवार, २९ ऑक्टोबर, २०१८

● नव दीक्षित लोक, खोडसाळ प्रचार, २२ प्रतिज्ञा आणि आपण

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

    ● नव दीक्षित लोक, खोडसाळ प्रचार,
              २२ प्रतिज्ञा आणि आपण
                   लेख - कैलाश शिंदे

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

परवा तालुक्यातीलच चिंचपूर येथील आप्तेष्टांच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने तिथे जाणे झाले, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे काल आदर्श ग्राम हिवरे बाजारच्या शिवे वर असलेल्या व संपूर्ण हागणदारी मुक्ती मिळवलेले भारतातील पहिले गाव असा लौकिक मिळवून जागतिक स्तरावर झेंडा फडकविलेले वडगाव (आमली) ता. पारनेर जि. अहमद नगर. येथे मित्र महोदयांच्या चुलत्याच्या जल दान विधि निमित्त हजेरी लावणे झाले. तिथे एका सद गृहस्थांचे बुद्ध धम्मावर प्रवचन ऐकण्याचा योग आला. सुरुवातीला ते कुणी बौध्दाचार्य असतील. असा त्यांच्या विषयी समज झाला.

परंतु त्यांच्या प्रवचनात येणाऱ्या सर मिसळी वरून उत्सुकता निर्माण झाली. कार्यक्रम नंतर त्यांच्या विषयी चौकशी केली असता ते जुन्या काळातील एम.डी. डॉक्टर असून ही ग्रामीण भागात व्रतस्थ भावनेने वैद्यकीय सेवा करण्यामुळे तसेच स्वतः ब्राह्मण असुन ही जवळपासच्या दहा - पाच गावातील सर्व जाती धर्मातील सर्वांच्या सुख दुःखात कौटुंबिक भावनेतुन सहभागी होणारे सर्व समावेशक व्यक्तिमत्व असल्याने सर्वांच्या मनात आस्थेचे एक आगळे स्थान निर्माण केलेले व्यक्तीमत्व अशी त्यांची ओळख समजली. त्यांच्यात असलेल्या सदरच्या अंगभूत गुणांमुळे कोणीही शहाणा मनुष्य त्यांचे कौतुकच करील.

तसेच कौतुक मी ही मनापासून करतो. (कारण इतर धर्म - देव - मनुष्याच्या नात्या विषयी बोलतात. तर बुद्ध धम्म माणसाचे माणसाशी असलेल्या प्रेमळ आपुलकीच्या नात्यावर चर्चा करतो, असो.) बोलण्याच्या ओघात त्यांनी 26 देशांचा प्रमुख धर्म असलेल्या बुद्ध धर्माकडे मी कसा आकर्षित झालो, परंतु मला दीक्षा घेण्यासाठी योग्य स्थान भारतात उपलब्ध न झाल्यामुळे थायलँड येथे जाऊन धम्म दीक्षा घेतली. वगैरे सांगत असताना हिंदू धर्म व बौद्ध धर्मावर काही योग्य भाष्य ही केले. पण शेवटी एके ठिकाणी मात्र "बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे" असे सांगितले. त्यांच्या याच वाक्याने ही पोस्ट लिहिण्यास प्रवृत्त केले आहे. चिंचपूर येथे ही प्रवचनकारांनी कार्यक्रमा नंतर खाजगीत बोलताना हा मुद्दा मांडल्याचे ऐकले. आता अवतार म्हणजे काय? तर...

यदायदाही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ।।
परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम ।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे ।।

ही गोष्ट कुरूक्षेत्रावर गिता सांगताना श्री कृष्णाने स्पष्ट केली. देवाचे असे दहा जन्म झाले असून शेवटचा बुद्धाचा असुन तोच सध्या चालू आहे, अशी हिंदू मध्ये धारणा आहे. गीतेनुसार देव म्हणतात - "धर्माचे रक्षण करण्यासाठी मी अवतार धारण करतो आणि अवनी तलावर जन्म घेतो." पण कोणत्या धर्माचे रक्षण हे मात्र देवाने स्पष्ट केलेलं नाही. ते का केलं नाही हे त्या परमेश्वरालाच ठाऊक! कदाचित भावी काळात जगामध्ये अनेक धर्म निर्माण होणार आहेत. हे त्या काळात श्री कृष्णाला ही माहीत नसावं! तर कुठल्या तरी धर्माचं रक्षण करण्यासाठी परमेश्वर अवतार धारण करतो.

पण ज्या ज्या वेळेस देवानं अवतार धारण केला  त्या त्या वेळेस धर्माला खरेच ग्लानी आली होती का? धर्मावर संकट आलं होतं का? ग्लानिर्भवति भारत नुसार धर्माला ग्लानी भारतातच का येत होती? देवाच्या वामणावताराने मारलेल्या बळीराजाचे पाप कोणते? त्याने असा कोणता कहर माजवला होता? जर बळीराजा दुष्ट होता. व्हिलन होता तर बहुसंख्य बहुजन स्त्रिया आज ही त्याची आठवण काढुन "इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो' अशी त्याच्या राज्याची करुणा का भाकतात? यावरून तर त्याचे राज्य न्यायाचे असावे असे दिसते. मग आपल्या अवतारांमध्ये देव गीतेतल्या आश्वासना प्रमाणे किंवा वचना प्रमाणे वागला का? हे प्रश्न कुणाही निष्पक्ष पाती विचारी जनाला विचारात न घेता टाळता येण्या सारखे नाहीत. रामावतार नंतर देवाने दोन अवतार घेतले. कृष्ण आणि बुद्ध!

तिसरा अवतार अद्याप झालेला नाही. देवाने घेतलेल्या सर्व अवतारात राम आणि कृष्ण हे फार श्रेष्ठ अवतार मानले जातात. यातील कृष्णावताराच्या सांगितलेल्या जाणाऱ्या कथेनुसार पाहिले तर देवाने तो अवतार अनार्यांना नष्ट करण्यासाठी नव्हे, तर वैदिक संस्कृतीची घडी स्थिरस्था वर करण्यासाठी आणि आर्यांतील आपसातले संघर्ष मिटविण्यासाठी घेतला होता. होय! श्री कृष्णाने आपल्या आयुष्यात हेच कार्य केलं. त्याच्या अवतारात दोन - चार असुर राजांचा उल्लेख येतो. पण ते फुटकळ स्वरूपाचे आहेत. त्यांनाही श्री कृष्णाने नष्ट केलं, परंतु केवळ त्यांना नष्ट करण्यासाठी श्री कृष्ण अवतार झालेला नव्हता. श्री कृष्ण अवताराचा प्रमुख हेतू तो नव्हता. आर्यांच्या साम्राज्याची घडी व्यवस्थित बसवून देणं. हे या अवताराचं प्रमुख कार्य होतं.

इथे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. तो म्हणजे इतर अवतारांचे सोडा. पण बुद्ध स्वतः अवतार, पुनर्जन्म मानतात का? या प्रश्नाच्या अनुषंगाने आधुनिक प्रबुद्ध महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आपल्या 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथात बुद्धाने काय नाकारले यातील अधम्म म्हणजे काय या प्रकरणामध्ये लिहितात, "दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म होय." दैवी चमत्कृतीवादाचे खंडन करण्यात भगवान बुद्धाचे तीन हेतू होते. पहिला माणसाला बुद्धिवादी बनविणे. दुसरा माणसाला स्वतंत्रता पूर्वक सत्याचा शोध लावण्यासाठी सिद्ध करणे. तर तिसरा ज्या भ्रामक समजुती माणसाची शोध घेण्याची प्रवृत्ती मारतात त्यांची उत्पत्तीच नष्ट करणे ही होत. यालाच बुद्ध धम्माचा कर्म (कम्म) सिद्धांत म्हणतात. याच कारणास्तव दैवी चमत्कृतीची पूजा अधम्म मानली जाते.

"ईश्वरावर विश्वास हे धम्माचे आवश्यक अंग नव्हे!" कर्म सिध्दांत किंवा हेतूवाद हा बौध्द धम्माचा केंद्रिय सिध्दांत आहे. हा सिध्दांत विवेकवादाचा पुरस्कार करतो आणि बौध्द धम्म म्हणजे विवेकवाद शिवाय दुसरे काहीही नाही. म्हणून परप्राकृतिक शक्तिची उपासना म्हणजे अधम्म होय. मग जिथे बुद्ध स्वतःच देव - दैवाचे अस्तित्व नाकारतात. नव्हे तो विषय दुर्लक्षित करण्या इतका गौण मानतात. त्या देवाचा ते स्वतः अवतार असण्याचा प्रश्नच शिल्लक रहात नाही. म्हणूनच डॉ बाबासाहेब नागपूरच्या धम्म दीक्षे वेळी आपल्या अनुयायांना २२ प्रतिज्ञा देताना त्यातील ४ थ्या प्रतिज्ञेत लिहितात, "देवाने अवतार घेतला. यावर माझा विश्वास नाही." तर ५ व्या प्रतिज्ञेत सांगतात - "बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, हा खोडसाळ प्रचार असल्याचे मी मानतो.

संदर्भ
'बुद्ध आणि त्यांचा धम्म' या पुस्तकातून...
'खपले देवाच्या नावाने' या पुस्तकातून...

◆◆◆

लेखक -
कैलाश शिंदे : पुणे
(लेखक, कवी एवं आंबेडकरी विचारवंत)

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

• मातृ संघटनेत सहभागी होण्याकरिता
Www.SSDIndia.Org

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

• YATIN JADHAV : 9967065953
• RAMESH BHOSALE : 9773338144
• BSNET HELPLINE : 7738971042
(Use Only One WhatsApp Number)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

*मधन्यवाद ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा