बुधवार, ३ ऑक्टोबर, २०१८

● १४ ऑक्टोबर की अशोक विजया दर्शमी?

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

               ● १४ ऑक्टोबर कि
                 अशोक विजया दशमी?

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

बाबासाहेबांनी धम्म क्रांतीसाठी १४ ऑक्टोबर हा दिवस का निवडला? ह्या संदर्भात संशोधन करत असता आपल्याला बाबासाहेबांनी लिहिलेल्या पंत्रांचा आधार घ्यावा लागतो. त्यात पहिले पत्र हे दादासाहेब गायकवाड ह्यांना ७ सप्टेंबर १९५६ रोजी पाठवलेले पत्र मार्गदर्शनीय आहे. त्या पत्रात बाबासाहेबांनी धम्म दीक्षा सोहळ्याची तारीख अंतिम केल्याचा संदेश देतात. त्या पत्रात बाबासाहेब काय म्हणतायेत? हे बघूया.

"प्रिय भाऊराव, आपले ता. ४/९/५६ चे पत्र मिळाले. माझ्या पोटात काहीसा बिघाड झाला असल्याने माझा सर्व कार्यक्रमच मला बदलाने भाग पडले. आता ठीक आहे. डिसेंबर पर्यंत तरी मी मुंबईस येण्याच्या विचारात नाही. दसरा सीमोल्लंघनाच्या दिवशी बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याचे मी निश्चित केले आहे. नोव्हेंबर मध्ये मी नेपाळ मध्ये (कांडमांडूला) होणाऱ्या जागतिक बौद्ध परिषदेला जाणार आहे. त्यामुळे राजकीय कार्य करायला मला काही फुरसत नाही."

ह्या पत्रात "दसरा सीमोल्लंघन" हा असा महत्वाचा उल्लेख केलेला आढळेल. याच प्रकारे संदेश वजा पत्र त्यांनी, २६, अलीपूर रोड, दिल्ली येथून ता. २३ सप्टेंबर १९५६ रोजी "प्रबुद्ध भारत" च्या संपादकांना पाठवलेले आणि ते प्रबुद्ध भारतच्या दिनांक २६ सप्टेंबर ५६ च्या अंकात छापलेले आढळेल. त्या काय म्हणतायेत बाबासाहेब हे बघूया.

"बौद्ध धर्म स्वीकारण्याचा दिवस आणि ठिकाण मी आता निश्चित केले आहे. येत्या दसऱ्यास तारीख १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे मी धर्मांतर करणार आहे. या दिवशी सकाळी ९ ते ११ वाजता माझा धर्म दीक्षा विधी समारंभ होईल व संध्याकाळी माझे सर्व लोकांसाठी जहि व्याख्यान होईल."

- बी. आर. आंबेडकर
२३ सप्टेंबर १९५६

ह्या दोन्ही पत्रात बघितले तर दोन गोष्टी आढळतात. पहिल्या पत्रात दसरा सीमोल्लंघन तर दुसऱ्या पत्रात सीमोल्लंघन ह्या शब्दाला चाट देऊन फक्त दसरा आणि त्यापुढे तारीख १४ ऑक्टोबर १९५६. तर मुद्दा असा उरतो कि - बाबासाहेबांना खरच धम्म दीक्षा सोहळा म्हणजे धम्म क्रांती हि दसऱ्याला करायची होती का? तर उत्तर हे नाहीच भेटणार, त्यासाठी बाबासाहेबांनी बुद्ध जयंती १९५६ ला आपल्या अनुयायांना दिलेल्या संदेशाचा मजकूर मार्गदर्शनीय आहे. काय आहे हा संदेश? ते हि बघूया.

"मी मागे जाहीर निवेदन काढून येत्या वैशाख पौर्णिमेला धर्मांतर करण्याचा माझा मनोदय जाहीर केला होता. त्या प्रमाणे अस्पृश्य समाजातील व इतर वर्गीयांपैकी शेकडो लोक धर्मांतर करण्यास तयार झाले आहेत, हे ऐकून मनाला समाधान वाटते व धर्मांतर करण्यास तयार झालेल्या सर्व लोकांचे मी मनापासून अभिनंदन करतो. तुमची सामुदायिक धर्मांतराची इच्छा पूर्ण व्हावी, म्हणून मी अनेक ठिकाणी दौरा ही काढणार आहे.

असे आश्वासन देत ते पुढे म्हणतात -
"आपणा प्रमाणेच माझ्याकडे उत्तर भारतीयांची हि शेकडो पत्रे आली आहेत. त्यांच्या शाखा स्थापून त्या मार्फत प्रचंड बहुसंख्येने धर्मांतरास योग्य तो अवसर सर्वांना मिळावा. यासाठी आपले धर्मांतर चार - पाच महिने पुढे ढकलावे. अशी त्यांनी विनंती केल्या वरून मी माझे धर्मांतर येत्या ऑक्टोबर महिन्यात करण्यात योजिले आहे. आपण इतके दिवस थांबलात. तसे काही दिवस अजून थांबाल अशी आशा बाळगतो. येत्या वैशाख पौर्णिमेस सर्वांनी गतवर्षी प्रमाणेच २५०० वी बुद्ध जयंती साजरी करावी." ह्या निवेदनातून दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवतात.

१. बाबासाहेबांनी सुरुवातील २५०० वी बुद्ध जयंती ह्या दुर्मिळ पर्वणीला आपले धर्मांतर करण्याचे योजिले होते.

२. परंतु नंतर लोकांनी केलेल्या विनंती वरून त्यांनी तो बेत ऑक्टोबर महिन्या पर्यंत पुढे ढकलला.

ह्यात बाबासाहेबांनी लोकांची सोयच बघितेलेली दिसते नाकी कोणता मुहूर्त. हे असे असताना आज ५८ वर्ष नंतर देखील आपण गोंधळी अवस्थेत आहोत कि बाबासाहेबांनी केलेल्या धम्म क्रांती दिनाचे दिव्य स्मरण कधी करायचे? : १४ ऑक्टोबर कि अशोक विजयादशमी?" ह्यात अडकलोय. ह्या प्रश्नच मागोवा घेताना सर्व प्रथम अशोक विजयदशमी नेमकी काय आहे? हे पाहावे लागेल.

अशोक विजयदशमी म्हणजे सम्राट अशोकाने कलिंग युद्ध जिंकले आणि त्या नंतर तो दिवस अशोक विजय दशमी म्हणून साजरा केला जाई. असे ढोबळ मानाने बिन काही ऐतिहासिक संदर्भ घेता मानले जाते. दसऱ्याला येणारी विजयादशमी हि तिथी नुसार असते, त्यात विजया हे दुर्गेचे नाव आहे आणि दशमी हि तिथी आहे. म्हणजे घटस्थापणे नंतर बरोबर ९ दिवसा नंतर दहाव्या दिवसाला येणारी तिथी म्हणजे दशमी.

आता कलिंग युद्ध हे ९ दिवस चालले होते आणि दहाव्या दिवशी म्हणजे दशमीला अशोकाने युद्ध जिंकले असं रेकोर्ड करून ठेवणारी कोणती तिथी आहे आणि तिचा इतिहासात कुठे संदर्भ तरी मिळतो का? सम्राट अशोकाचा इतिहास शिला लेखांतुन आणि प्रस्तराभि लेखांतुनच मिळतो, तेच अशोकाच्या इतिहासाचे Authentic संदर्भ मानले जातात. असा एखादा कोणता शिलालेख व प्रस्तराभि लेख आहे का? ज्यातुन आपण म्हणु शकु कि - अशोक कालीन लोकं अशोक विजयादशमी साजरी करत होते?

कलिग युद्धा संबधी गिरनार आणि शहाबाजगढ येथील तेरा नंबरचे प्रस्ताराभि लेख अभ्यासनीय आहेत. त्यातील गिरनारच्या प्रस्ताराभिलेखाच्या प्रारंभी येणाऱ्या ओळींचा अनुवाद असा देत येईल.

१. राजा कडून कलिंग जिंकले गेले. अप (हृत) तिथे एक लाख मारले गेले आणि बहुतांश मेले. त्या नंतर सांप्रत काळी कलिंग जिंकून घेतल्यावर धर्माचा तीव्र उपाय.

२. देवनाम प्रिय अनुताप (कलिंग) जिंकून (जो) जनतेचा वध, मरण अथवा अपहरण झाले ते देवनाम प्रियच्या मते अतीव दुखः प्रत आणि गंभीर होय.

शाहबाजगड च्या प्रस्ताराभि लेखात सुद्धा थोड्या फार फरकाने हेच कथन केलेले आहे. ते डॉक्टर राजबिल पांडेय यांच्याच शब्दात सांगणे होताचे ठरेल.

१. अष्ट वर्षभिशिक्त देवानां प्रिय प्रियदर्शी राजा द्वारा कलिंग जीता था. डेढ लाख प्राणी (मनुष्य) वहासे अपहृत, एक लाख हत और उसासे कई गुणा मृत हुये.

२. उसके पश्चात आज जिते हुए कलीगमे देवानां प्रिय द्वारा प्रचुर धर्म का व्यवहार, धर्मका प्रेम तथा धर्मका उपदेश. (किया गया है) कलिंग पर विजय करके देवानां प्रिय को अनुताप (पश्चाताप) है.

आता, कलिंग विजय नंतर सम्राट अशोक जर पश्चाताप पद्घ असेल तर त्याच्या नावाने "विजय दशमी" आपण साजरी करणे उचित ठरेल काय? आणि तसे करणे त्याला तरी रुचले असते काय? कारण त्यानेच मागे आपल्या एका अभिलेखात. लोकांनी आपला अमुल्य वेळ कर्मकांडात आणी समारंभात वाया घालवू नये. असं उपदेश केला आहे. मग सांगा बघू! सम्राट अशोकाच्या नावाने विजयादशमी साजरी करणे उचित ठरेल काय?

आता आपण विचार करू शकतो ज्या अशोक विजय दशमीचा उल्लेख बाबासाहेबांनी न कधी आपल्या पत्रात केला न कधी आपल्या भाषणात तसेच अशोकाने देखील असला काही सन उत्सव करा. अश्या आज्ञा दिलेल्या नाहीत तर मग धम्म दीक्षेच्या पूर्वी 'विजयादशमी' अथवा 'अशोक विजयादशमी' असं शब्द प्रयोग कुणी केला? ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला धम्म दीक्षेच्या इतिहासाकडे डोकावे लागले आणि त्यात डोकावल्या नंतर आपल्या असे लक्षात येईल. धम्म दीक्षेच्या इतिहासात दोन प्रवाह सुप्तपणे कार्यरत होते.

एक म्हणजे बाबासाहेब आणि दुसरे वामनराव गोडबोले. भारतीय बौद्ध महासभेच्या स्थापणे अगोदर वामनराव गोडबोले ह्यांच्या अधिपत्या खाली "बुद्धदूत सोसायटी" या नावाची कार्यरत होती. परंतु नंतर धम्म दीक्षा सोहळ्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अधिपत्या खाली "भारतीय बौद्धजन समिती" हि संस्था स्थापन करण्यात आली. त्यामुळे वामनराव गोडबोलेंना त्यांची संस्था बंद करून बाबासाहेबांच्या नवीन संस्थेची पताका आपल्या खांद्यावर घ्यावी लागली. त्याच प्रतिक म्हणजे दिनांक २१ सप्टेंबर १९५६ रोजी त्यांनी "भारतीय बौद्धजन समिती" याच मराठी नावाने, तिचा चिटणीस म्हणून काढलेले 'मास कन्वर्शन' विषयीचे काढलेले इंग्रजी पत्रक. त्या पत्रकात वामनराव गोडबोले हे बाबासाहेबांनी वापरलेल्या "दसरा सीमोलंघन" ह्या शब्दाचा पर्याय म्हणून 'विजयादशमी' या नव्या शब्द संहितेचा प्रथम च वापर करताना दिसतात.

त्या नंतर धम्मदीक्षेच्या कार्यक्रमाचा तपशील सांगण्यासाठी वामनराव गोडबोले यांनी समिती द्वारे छापलेल्या पहिल्या पत्रिकेत ‘सामुदायिक धर्मांतर कार्यक्रम पत्रिका' जाहीर केलेली आहे. ती अशी कि - "शनिवार ता. १३/१०/५६ रोजी सायंकाळी ५ ते ८ परित्राण, ८ ते १० महाबोधी सोसायटीचे जनरल सेक्रेटरी, श्री. डी. वलिसिन्हा यांचे भाषण; आणि भगवान बुद्धाचे चरित्र व भारतातील प्रसिद्ध बौद्ध स्थळे यावर म्याजीक ल्यानटर्न शो."

त्यानंतरच कार्यक्रम पुढे नमूद करता वामनराव गोडबोले म्हणतात - "रविवार ता. १४/१०/५६ (अशोक विजयादशमी) सकाळी ८ ते ११ परमपुज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सौ. माईसाहेब आंबेडकर आणि इतर दीक्षार्थीची पुज्य भिक्षु चंद्रमणी महास्थवीर यांच्या हस्ते बौद्ध धर्म दीक्षा."

इथे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुद्धिवादाला न पटणारा असं 'परित्राण' पाठाच्या कार्यक्रमाचा उल्लेख झाला आहे. अशा वेळी डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथात पूजा विधी नि कर्मकांड विषयक नमूद केलेले विचार आठवतात. 'धम्मात प्रार्थना, तीर्थयात्रा, कर्मकांड, विधी अथवा यज्ञ यांना स्थान नाही. (IV:I:6:4) त्यामुळे धार्मिक असलेल्या वामनराव गोडबोले यांच्याकडेच या कार्यक्रम पत्रिकेच्या विषयाचे श्रेय जाते. आणि त्यांनीच या कार्यक्रम पत्रिकेत 'अशोक विजया दशमी' हा शब्द प्रयोग टाकला आहे आणि तो कसा? तर कंसात! बाबासाहेबांना आवडेल न आवडेल, या भीतीने!

अर्थात - धम्मदीक्षा समारोहाच्या इतिहासात 'अशोक विजयादशमी' या शब्दाला स्थान डॉक्टर आंबेडकरांनी दिलेले नाही. ते श्रेय या सामोरोहाचे चिटणीस वामनराव गोडबोले यांचे आहे, याद वाद नाही. अशोक विजयादशमी हि दर वर्षी दसऱ्याला येते. दसरा हा सन तिथीनुसार पंचांगतून काढावा लागतो. म्हणजेच ह्या वर्षी दसऱ्या नुसार धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला तर हा धम्मक्रांती दिन पुढच्या वर्षी कधी साजरा करावा. हे बघण्यासाठी आपल्याला पंचांग बघावा लागतो. म्हणजेच ज्या दिवशी तुमची धर्मांतर अर्थात तुमचे मुल्यांतर केले त्याच दिवसाचे दिव्य स्मरण कधी करायचे हे बघण्यासाठी तुम्हाला तुमच्या जुन्या धर्माच्या मूल्यांकडे जावे लागते.

ज्या बौद्धिक गुलामगिरीतून आपल्याला बाबासाहेबांनी बाहेर काढले आणि ज्या दिवशी काढले त्या दिवसाचे दिव्य स्मरण कधी करावे? हे बघण्यासाठी आम्हाला पुन्हा बौद्धिक गुलाम व्हावे लागते. इतकी पंगु आणि मानसिक अपंग, बौद्धिक गुलाम झाल्या सारखी हि अवस्था बघून येथला माणूस बंड का करत नाही? हे आमचे म्हणणे आहे. हि फार मोठी शोकांतिका आहे.

मित्रांनो, आपल्याला हि गुलामगिरी झटकावीच लागेल. बाबासाहेबांनी सुरुवातीला २५०० व्या बुद्ध जयंती ह्या दुर्मिळ पर्वणीला आखलेला आपला धर्मांतराचा बेत लोका खातर पुढे ढकलला ह्यात त्यांनी लोकांची सोयच बघितली होती. हे आपल्याला माहित आहे. पण त्या नंतर त्यांनी आपल्या दोन पत्रात दसरा सीमोल्लंघन आणि त्यानंतरच्या पत्रात फक्त येत्या दसरा १४ ऑक्टोबरला धर्मांतर करणार असे म्हंटले. ह्यात हि लोकांची सोयच बघितलेली आहे.

पहिली गोष्ट "दसरा सीमोल्लंघन" म्हणजे आम्ही दसऱ्याला धर्मांतर करून सीमोल्लंघन करणार म्हणजे जुन्या धर्माला तिलांजली देवून नवीन धर्म स्वीकारणार आणि दुसरी गोष्ट दसरा १४ ऑक्टोबरला धर्मांतर करणार म्हणजे १४ ऑक्टोबरला रविवार असल्याने परत हि लोकांची सोयच तसेच नुसता रविवार असून आपल्या लोकांना उपयोगाचे नाही. कारण त्या वेळी अस्पृश्य बहुतांश जवळ पास सगळे हे कामगार, मजूर होते. म्हणजे हत्यार वापरून काम करणारे होते. तर दसऱ्याला कोणताही मालक आपला मजुरांना हत्यार वापरू देणार नाही. हे त्रीकाल बाह्य सत्य आहे. म्हणजेच सरळ सोट सर्व अस्पृश्यांना हि सुट्टीच असणार ह्यात काही शंका नाही. हेच ते लोकांच्या सोयीचे औचित्य आहे आणि ते अगदी बरोबर साधले गेले. ह्यात तिळमात्र शंका नाही.

"अशोक विजयादशमी" ची टूम एकोणिसाव्या शतकाच्या उत्तार्धात दिनदर्शिकेत, पंचांगात टाकण्यात आलेली आहे. परंतु १९५६ च्या अगोदर इथ कोणते बौद्ध अशोक विजयादशमी साजरी करत होते? हेच सांगता यायचे नाही. बाबासाहेबांच्या च शब्दात सांगायचे झाले तर ते म्हणतात - "वास्तविक, १९५१ सालच्या खाने सुमारीत तुम्हाला सर्व धर्मीय व पंथाचे लोक आढळतील. पण उभ्या भारतात एक हि बुद्ध धर्मीय माणूस या खाणे सुमारीत तुम्हाला आढळणार नाही."(मून वसंत आणि इतर : उक्त ग्रंथ, उक्त खंड , पृष्ठ : ४६९)

हि टूम टाकण्या मागे बौद्ध धर्माला हिंदू धर्माचीच एक शाखा ठरविण्याचा प्रयत्न असावा, हे आपण नाकारून शकतो काय? खर तर डॉक्टर आंबेडकरांना धर्मांतर हवे होते ते कुठल्याही एका तारखेसाठी नव्हे; तर मानवासाठी आणि पर्यायाने ते त्यांना मानवी मुक्ती साठी हवे होते. म्हणजेच त्यांचे धर्मांतर हे कोणत्या तारखेसाठी अडले नव्हते तर मानवांसाठी अडले होते. त्याची तारीख ठरवण्यासाठी ते मानवी सोयच पाहत होते. म्हणूनच म्हणावे लागते कि, त्यांचे नाते तारखेशी नव्हते, तर धर्मांतराशी होते. या विशिष्ठ परिस्थितीत आपणाला मान्यच करावे लागेल कि त्यांना कुठल्याही विशिष्ठ तारखेसाठी धर्मांतर नको हवे होते; तर त्यांनी धर्मांतरासाठी सुयोग्य तारीख हवी होती आणि तशी सोय व संधी ते पाहत होते.

मित्र हो, आपल्या समाजात आमुलाग्र क्रांती घडवून आणणाऱ्या त्या महान अशा धर्मातीत (सेकुलर) क्षणाचे रुपांतर आपण "विजयादशमीत" करणार कि, "चौदा ऑक्टोबर" मध्ये करणार?

बाबासाहेबांनी घडवलेला इतिहास हा धर्मातीत (सेकुलर ) इतिहास असल्यामुळे त्याला भारतीय तिथ्या मिथ्यात न गुंतवता; त्याला त्याच्या कार्य कर्तुत्वाला जागतिक परिभाषा द्या. कारण तो केवळ अस्पृश्यांचा, केवळ भारतीयांचा मार्गदाता नाही. तर सबंध जगाचा मानवी बंध मुक्ततेच्या लढ्याचा अधिनायक होता. त्याची स्मृती सबंध जगाने जपायची असेल तर त्याला तिथी - मिथीच्या संकुचित संदर्भात णा जोखता, त्याला जागतिक कालमापनाच्या परिमाणाने मोजा आणि त्या साठीच चौदा ऑक्टोबर च्या बाजूने उभे राहा. विजया दशमीला तिलांजली वाहा.

◆◆◆

साभार -
"AB Platform" (Community)

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

• मातृ संघटनेत सहभागी होण्याकरिता
Www.SSDIndia.Org

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

• YATIN JADHAV : 9967065953
• RAMESH BHOSALE : 9773338144
• BSNET HELPLINE : 7738971042
(Use Only One WhatsApp Number)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

धन्यवाद ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा