शुक्रवार, १ सप्टेंबर, २०१७

● निरुत्तर करणारे काही प्रश्न

● निरुत्तर करणारे काही प्रश्न

आपण कोणासाठी जगतो? कोणीही उत्तर देईल, आपण स्वत: साठीच जगतो. पत्नीला अर्धागिनी म्हणतो म्हणून ५०% टक्के तिच्यासाठी जगतो. संसार सुरू झाला की मुलं ही जन्माला येतातच. त्यांच्यासाठी २५% टक्के जगतो. जवळच्या नातेवाईकांसाठी ५ - १०% टक्के जगतो. ज्या जगात आपण वावरतो, त्या जगात तर अब्जावधी माणसे राहतात. ती मग आपली कोणी नसतात का? माणसांत राहून आपण माणसांपासून इतके अलिप्त का राहतो? ज्याला आपण बंधुभाव म्हणतो, तो तर तद्दन खोटा असतो. आपण आपल्या शिवाय कोणावर प्रेम करतच नसू तर प्रेम वैश्विक जीवन मूल्य कसे? आपण कोणाला किती देतो, त्या उलट आपण कोणा कडून किती ओरबाडतो? मग कधी कधी मीच मला प्रश्न विचारतो, तू कोणासाठी जगलास? तू नोकरी केलीस, पैसे कमवलेस. त्यापैकी किती गोर गरीबांना दिलेस? तू कविता लिहीत राहिलास. कवितांनी तुझे नाव मोठे केले, पण कवितांनी काय केले? तू स्वत:ला चळवळीतला कार्यकर्ता म्हणतोस. खरंच सांग, तू चळवळीत होतास? तू किती समाज परिवर्तन केलेस?’ हे प्रश्न मला निरुत्तर करतात.

बाबासाहेबांनंतर आमची पिढी लिहू - वाचू लागली. बाबासाहेबांच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करू लागली. पण जे बाबासाहेबांनी केले ते कार्य आम्हा कोणाला जमलं का? आम्ही ही भीमाचे सैनिक आहोतच, आम्ही कोठे अन्याय घडताच 'पँथर’ सारखे धावतोच, चित्त्याची झेप घेतोच, संघर्षाच्या ठिणग्या आमच्याही मनात पेटतातच. मोर्चे, धरणं, उपोषण यास चळवळ म्हणायचे काय? चळवळीचा जर अर्थ ‘सामाजिक बदल’ असा असेल तर आम्ही सामाजिक बदलासाठी काय केले? आम्ही समाजाचे किती प्रबोधन केले? आम्ही चळवळीचा चुकीचा अर्थ लावत स्वत:चीच पाठ थोपटत आलो. बरं ज्यांना चळवळी म्हटल्या त्या तरी किती खऱ्या होत्या? किती चळवळी बाजारात विकल्या? कवितेला, लिखाणाला चळवळीचे हत्यार म्हटले, पण मला नेहमीच प्रश्न पडतो, आमच्या कवितेला ‘धार’ होती का? येथील व्यवस्थेचा कोथळा कवितेच्या धारेनं बाहेर काढता आला? आम्हीच आमच्या लेखांना ‘विद्रोही’ म्हटलं. कवितेतील विद्रोहाचा वणवा समाज मनात पेटला का? माणसं पेटून का उठली नाही?

ज्या दलित समाजाला जागे करण्यासाठी क्रांति सन्मुख करण्यासाठी लेख, कविता लिहिले ते दलित समाजाला समजल्याच नाहीत. बाबासाहेबांनी आमच्याही हातात रूसो, व्हॉल्टेअरची लेखणी हातात दिली होती, पण ती वांझोटी ठरली. बाबासाहेब कोणा एका जातीच्या विरोधात लढले नाहीत. त्यांची लढाई ‘जाती अंताची लढाई’ होती. येथील चातुर्वर्ण्य व्यवस्थेवर आधारित जी चार मजली इमारत हजारो वर्षापासून उभी आहे. त्या इमारतीखाली बाबासाहेबांनी सुरुंग लावला; पण ती जमीनदोस्त झाली नाही. बाबासाहेबांच्या नंतर ‘जाती अंताची लढाई’ च आम्ही विसरून गेलो. आम्ही माणसां - माणसांमध्ये ‘पूल’ बांधण्या ऐवजी ‘भिंती’ बांधत राहिलो. आम्ही कोणीच बाबासाहेबांचा गाडा ओढण्यास समर्थ ठरलो नाही. तो गाडा जमिनीत कायमचा गाडला गेलाय!

परत बाबासाहेबांच्या प्रतीक्षेत समाज आहे. येथील श्रमकरी आहेत ते कोण आहेत? ते दलित आहेत, आदिवासी आहेत, भटके आहेत. या सर्वाच्या घामावर देश उभा आहे, पण त्यांची पोटे नेहमीचीच रिकामी आहेत. आदिवासी हा ‘वनांचा राजा!’ त्याचे वनच संपले! तो परागंदा झाला! रानातून तो बाहेर फेकला गेला. एका जागी स्थिर असणारा हा समाज ‘भटका’ झाला! तो पोट घेऊन भाकरीसाठी भटकंती करीत असतो. ‘स्थलातंरीत जमात’ म्हणून आदिवासींची नवीन ओळख होतेय. हे कसले लक्षण आहे? त्यांच्यासाठी कोण लढे देतोय? त्यांच्या नावाने जे होतात, ते सर्व राजकीय लढे असतात, ते नकली लढे असतात. भटक्या जमातीं पैकी आता कुठे २५% टक्के जमाती स्थिर होताहेत, ७५% टक्के जमाती अजून ही डोक्यावर संसार घेऊन गावोगावी भटकतच आहेत. त्यांची भटकंती कधी थांबणार आहे?

बाबासाहेब म्हणाले -
‘खेडी सोडा, शहरात चला ।’

लोक शहरात आले. गावाकडे घर होते, शहरात झोपडीत किंवा फूटपाथ वर राहू लागला. सर्वाच्याच हाताना काम मिळत नाहीत. मग श्रम विकणाऱ्यांचे तांडे शहरातील चौका चौकात उभे राहू लागले. पूर्वी गुलामांचे बाजार भरायचे. चौकातल्या मजुराला दिवसासाठी ‘गुलाम’ म्हणूनच ₹. १०० - १५० रुपयांत विकत घेतले जाते. हे चौकातील मजुरांचे बाजार कधी थांबणार आहेत काय? त्यांच्यासाठी कोणी लढे देतात का? सर्व चळवळींचे विसर्जन मंत्रालयाच्या पायरी पर्यंत होताना दिसते.

भीम अनुयायांनो,
ही खंत बाळगून थांबतो, यातले काही प्रश्नांची जरी आज रात्री झोपताना विचार करा आणि स्वतःच उत्तर शोधा.

●◆●

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
निलेश यशवंत आंबेडकर : नाशिक
(लेखक, विचारवंत एवं युवा मार्गदर्शक)

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

═══════════════════════

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• YATIN JADHAV :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा

धन्यवाद ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा