● निवडणूक, शिखांचे योगदान आणि कायदे - मंत्री मंडळाच्या गोष्टी
बाबासाहेब आंबेडकरांच्या घटना समितीतील प्रवेशा संबधी दोन निवडणूका महत्त्वाच्या आहेत. त्यापैकी पहिली निवडणूक होती ती १९४६ सालची आणि दुसरी १९५२ सालची. १९३७ साली झालेल्या मुंबई प्रांतिक असेंब्लीच्या निवडणूकांत बाबासाहेबांच्या स्वतंत्र मजूर पक्षाने विजयी पताका फडकावत १५ आमदार निवडून आणले. परंतू १८४६ सालच्या निवडणूकीत विजयाचा हाच कित्ता पुन्हा न गिरवता आल्याने पक्षाचा दारूण पराभव झाला. परिणामी घटना समितीत डॉ. आंबेडकरांना मिळणाऱ्या प्रतिनिधित्वाची आशाच नष्ट झाली. त्यांना मतदार संघच उरला नव्हता. त्यातच बाबासाहेबांचा कोणत्याही प्रकारे घटना सभेत प्रवेश होऊ नये यासाठी काँग्रेस पक्षानं त्यांना हरेक तऱ्हेने नामोहरम करण्याचे प्रयत्न केले. सरदार वल्लभभाई पटेलांनी तर जाहीरपणे स्टेटमेंट ही दिलं की - ‘आम्ही कोणत्याही परिस्थितीत डॉ. आंबेडकर घटना समितीत येणार नाहीत, याची पूर्ण काळजी घेतली आहे.’
यावर उत्तर देताना अतिशय कष्टी मनानं बाबासाहेब म्हणाले - ‘मला घटना समितीची दारे, खिडक्या बंद करण्यात आली. इतकेच काय, हवा येण्यासाठी जी तावदाने लावली जातात, ती सुद्धा बंद करण्यात आली आहेत.” पण हार मानतील ते डॉ. आंबेडकर कसले. बाबासाहेब आंबेडकरांचा घटना समितीवर जाण्याचा पक्का इरादा होता. परंतु प्रांतिक विधि मंडळाने घटना समितीवर जाणाऱ्या प्रतिनिधींची निवड करावयाची होती. मुंबई विधि मंडळात डॉ. आंबेडकरांचे पक्षाचे सभासद नव्हते. मागास जातींस मंत्रि मंडळ व विधि मंडळात योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी बाबासाहेब अथक प्रयत्न करत होते. तत्कालीन मंत्रि मंडळात मागास जातींचं प्रतिनिधीत्व केवळ दोनच खांद्यांवर होतं. आणि ते म्हणजे बॅ. जोगेंद्रनाथ मंडल आणि बाबू जगजीवनराम. बॅ. जोगेंद्रनाथ मंडल हे तत्कालीन हंगामी मंत्रि मंडळात कायदेमंत्री म्हणून कार्यरत होते. त्याच दरम्यान त्यांनी मुंबई इलाख्याला भेट दिली. तेथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी डॉ. आंबेडकरांनी लंडन मध्ये केलेल्या धडपडी बद्दल समाधान व्यक्त केले. आपल्या मंत्रि मंडळातील प्रवेशाला डॉ. आंबेडकरांचा पूर्ण पाठिंबा असल्याचे पत्रकारांना सांगितले आणि बॅ. मंडल यांनी डॉ. आंबेडकरांनी बंगाल विधि मंडळातील मागास वर्गाच्या प्रतिनिधींच्या समर्थनावर घटना समितीसाठी डॉ. आंबेडकरांना नामांकन भरावयाचे सुचविले.
निवडणूकांत पराभव, हाताशी कोणताही मतदार संघ नाही. परंतू संविधान सभेवर जाण्याचा पक्का इरादा आता बॅ. जोगेंद्रनाथ मंडल यांच्या पाठिंब्यामुळे थोडा शक्य वाटू लागला होता. त्यानुसारच बाबासाहेबांनी बंगाल विधान परिषदेतून संविधान सभेत निवडून जाण्यासाठी नामांकन पत्र दाखल केलं. पण इथेही त्यांना प्रचंड संघर्षाला सामोरं जावं लागलं. स्वातंत्र्य पूर्व काळात नेमण्यात आलेल्या कॅबिनेट मिशनने सुचवलेल्या शिफारशींनुसार संविधान सभेसाठी सदस्य निवड सुरू झाली. बाबासाहेबांनी बंगाल विधान परिषदेतून आपले नामांकन पत्र भरले. बंगाल विधान परिषदेत एकुण साठ जागा होत्या. त्यातील २७ जागा ह्या हिंदू तर ऊर्वरित ३३ जागा ह्या मुस्लिमांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. कॅबिनेट मिशनने बंगाल प्रांतातील अनुसुचित जातींना हिंदू जागां सोबतच जोडून टाकले होते. निवडणूकीची तारिख ठरली १७ जुलै १९४६. या निवडणूकीसाठी बाबासाहेब आधी पासूनच कोलकात्यात ठाण मांडून होते. तत्कालीन बंगाल प्रांतात हजारोंच्या संख्येत पंजाब प्रांतातील मागासवर्गीय चर्मोद्योग करीत होते. ते बंगाली दलितां बरोबर खांद्याला खांदा लावून संघर्षात सहभागी झाले होते. दलितांच्या या संयुक्त मोर्च्याने डॉ. आंबेडकरांना संविधान सभेत निवडून पाठविण्याची प्रतीक्षा केली होती. ते विधायकांच्या घरांपुढे निदर्शने करून बाबासाहेबांना मत देण्याचे वचन घेत असत. राजकीय जीवन आणि मृत्यूचा हा संघर्ष मतदानाच्या दिवसा पर्यंत चालू होता. बाबासाहेबांना बंगाल विधान परिषदेतील अँग्लो इंडियन सदस्यांच्या समर्थनाची अपेक्षा होती. परंतु त्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्यामुळे त्यांच्या समर्थनापासून बाबांना वंचित राहावे लागले. बाबासाहेबांनी निवडणूकीसाठी बॅ. मंडल यांच्या साथीने जय्यत तयारी केली होती. कार्यकर्त्यांची मोट बांधली. विरोधकांना जशास तसे उत्तर देण्याची पूर्ण मनिषा बाळगूनच ते मैदानात उतरले होते. मंडल यांच्या नेतृत्वामुळे बंगाल प्रांतातील सर्वच मागासवर्गीय आता बाबासाहेबांच्या बाजूने लढायला तयार झाले होते. निवडणूकीच्या दिवशी काही दगाबाजी होऊ नये म्हणून हजारो मागासवर्गीय आणि पूर्वा स्पृश्य बाबासाहेबांच्या नावाचा जयजयकार करत विधान भवनाच्या आवारात पोहोचले. आणि त्यानंतर घडलेल्या घटना क्वचितच इतिहासात ठळकपणे सांगितल्या गेल्या आहेत. त्या अशा १७ जुलै १९४६ च्या दिवशी बंगाल प्रांतातील हजारो मागासवर्गीय आणि पूर्वा स्पृश्य बॅ. मंडल यांच्या नेतृत्वा खाली बंगाल विधान भवनाच्या आवारात दाखल झाले. पोलिसांच्या लाठ्या आणि अचानकपणे होणाऱ्या गोळीबाराची पूर्व कल्पना असून ही लोकांनी हेतू पुरस्सरपणे विधान भवनाचा परिसर घेरून टाकला. पंजाबी - शीख मागास वर्गीयांच्या हातातल्या तलवारी भर उन्हात लखाखत होत्या अन् बाबासाहेब आंबेडकर जिंदाबादचा नारा आकाशात निनादत होता.
एवढ्यातच त्या गर्दीतून एक तरूण पुढे आला. त्यानं आपलं किरपान हवेत फिरवत जोरदार घोषणा दिली. "मी प्रतीक्षा (प्रण) करतो की, जर 'डाकदार उम्मेदगार' (पंजाबी उच्चारण डॉ. आंबेडकरांसाठी) यांना निवडणुकीत पराभूत केले गेले तर ही माझी तलवार त्या गद्दारांच्या रक्ताने लथपथ होऊन जाईल आणि मी आपल्या प्राणाची आहुती दिल्या शिवाय राहणार नाही." हा तरूण होता बुद्ध सिंह. बुद्ध सिंह हा मूळचा जालंधर जिल्ह्यातला ढिलवा गावचा रहिवाशी. बुद्ध सिंहाचा आवेश पाहताच शेकडो तरूणांनी त्याचा कित्ता गिरवत प्रतीज्ञा केली. निवडणूकीच्या दिवशी जमलेल्या जमावाचे रौद्र रुप पाहून प्रशासन व्यवस्थेने ही नरमाईची भूमिका घेत वातावरण शांत करण्याची भूमिका घेतली. अखेर निवडणूक कोणत्याही प्रकारे हिंसाचार न होता पार पाडली. या मोर्च्याचा उल्लेख तत्कालीन कलकत्याहून प्रकाशित होणाऱ्या जवळपास सर्वच दैनिकांनी घेतली.
कलकत्याहून प्रकाशित होणाऱ्या डेली स्टेटमन या वर्तमान पत्रात १८ जुलै १९४६ रोजी फोटोसहित सदर मोर्च्याची बातमी देण्यात आली होती. "ज्यावेळी मतदान चालू होते त्यावेळी ऑल इंडिया शेड्युल्ड कास्टस् फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी परिषदेच्या आवारात प्रवेश करून डॉ. भीमराव आंबेडकरांच्या जयजयकाराचे नारे लावून निदर्शने केले. या संपूर्ण निवडणूक अभियानात जोगेंद्रनाथ मंडल यांनी दलित निदर्शकांचे नेतृत्व केले. कारण त्यांच्याच विनंती वरून बाबासाहेबांनी बंगाल विधान परिषदेतून निवडणूक लढण्याची स्वीकृती दिली होती. २० जुलै १९४६ ला निवडणुकीच्या निकालाची घोषणा झाली. बाबासाहेब आंबेडकर नुसते विजयीच झाले नाही तर काँग्रेसी नेते शरदचंद्र बोस यांच्या पेक्षा ही सर्वात जास्त मतांनी ते निवडून आले. सहा काँग्रेसी आमदारांनी आपल्या पक्षाच्या सचेतकाची पर्वा न करता बाबासाहेबांना मतदान केले. बाबासाहेबांच्या विजयामुळे देशातील दलितां मध्ये आनंदाची लहर पसरली. कलकत्यात प्रचंड जुलूस निघाला." लोकांनी भांगडा नाच केला. ढोल ताशे वाजविले, फटाके उडविले. बाबासाहेबांच्या या नेत्र दीपक विजयामुळे संविधान सभेत दलितांचे प्रतिनिधित्व करणारा अत्यंत योग्य समर्थ, निर्भय आणि चरित्रवान महामानव पोहोचल्याने सर्वांना आनंद आणि गर्व वाटू लागला.
सरदार वल्लभभाई पटेल म्हणाले होते, "मी संविधान सभेचे दरवाजे आणि खिडक्याच नव्हे तर तावदान देखील बंद केली आहेत, पाहतो तेथे डॉ. आंबेडकर कसा प्रवेश करतात ते, बाबासाहेबांच्या या विजयाने लोह पुरुषांची ही भीष्म प्रतिज्ञा पराभूत झाली आणि जेव्हा बाबासाहेबांना ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष पद प्रदान करण्यात आले तेव्हा एका काँग्रेसी नेत्याने सरदार पटेलांजवळ नाराजी व्यक्त करीत म्हटले, 'तुम्ही गांधी विरोधी आणि काँग्रेस विरोधी डॉ. आंबेडकरांना घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष पद कसे काय प्रदान केले?" तेव्हा सरदार पटेल म्हणाले, "तुम्हाला संविधानाचे काय कळते? आम्हाला डॉ. आंबेडकरांशिवाय या कामासाठी अधिक योग्यतेचा कोणीच मिळाला नाही. म्हणून आम्हाला त्यांना अध्यक्ष पद देण्याशिवाय गत्यंतरच नव्हते." ३ ऑगस्ट १९४७ ला मंत्रि मंडळाची घोषणा झाली. त्यात बाबासाहेबांचे नाव होते. बाबासाहेबांनी १५ ऑगस्ट १९४७ ला नवीन मंत्रि मंडळाबरोबर कायदे मंत्री म्हणून शपथ घेतली. ३० ऑगस्ट १९४७ ला बाबासाहेबांना घटनेच्या मसुदा समिती (ड्राफ्टिंग कमिटी) चे अध्यक्ष पदावर निवडण्यात आले. पण हा आनंद ही फार काळ टिकणार नव्हता. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. भारताच्या स्वातंत्र्य सोबतच संविधान निर्मितीसाठी नियुक्त करण्यात आलेली संविधान सभा समीती देखील सार्वभौम झाली. भारताच्या स्वातंत्र्याचा ठराव करण्यात आला तेव्हा तारिख होती १५ जुलै १९४७. त्या तारखेपर्यंत अस्तित्वात असलेली संविधान समिती ही अखंड भारताची समिती म्हणून मान्यता प्राप्त होती. परंतू अवघ्या महिना भराच्या अंतराने झालेल्या फाळणीमुळे घटना समिती वरील निवडक सभासदांच्या जागा मात्र रद्द झाल्या. बंगालच्या फाळणीमुळे रद्द झालेल्या जागेत बाबासाहेबांची जागा ही होती. परंतु डॉ. जयकरांच्या राजीनाम्यामुळे रिकाम्या झालेल्या जागी मुंबई विधि मंडळातील काँग्रेस पक्षाने डॉ. आंबेडकरांची घटना समितीवर निवड केली. कारण बाबासाहेबांनी घटना समितीत केलेल्या कार्य आणि वक्तृत्वाने त्यांची योग्यता काँग्रेसला कळली होती. संविधान निर्मिताच्या कार्यात डॉ. आंबेडकरांची योग्यता त्यांना अपरिहार्य व अटळ वाटली. या कामी डॉ. आंबेडकरांशिवाय दुसरा पर्यायच नाही याची खात्री त्यांना पटली होती.
बाबासाहेब आंबेडकरांची घटना समितीला असलेली गरज काँग्रेसला किती सतावत होती हे घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी मुंबई राज्याचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांना ३० जून १९४७ ला लिहिलेले पत्राद्वारे पाहता येईल. या पत्रात डॉ. राजेंद्रप्रसाद लिहीतात की - "Apart from any other consideration, we have found Dr. Ambedkar's work both in the Constituent Assembly and in the various committees, to which he was appointed to such an order as to require that we should not be deprived of his services. As you know, he was elected from Bengal and after the diversion of the province he has ceased to be a Member of the Constituent Assembly. I am anxious that he should attend the next session of the constituent Assembly from 14th July and it is therefore necessary that he should be elected immediately." याच मुद्यावर सरदार पटेल आणि मावळकरांत झालेला पत्र व्यवहार सुद्धा आंबेडकरांच्या विद्वतेची संविधान सभेला असणारी गरज विशद करते आहे. ज्यात बाबासाहेबांना संविधान सभेत येऊ देण्यास कट्टर विरोध करणारे सरदार पटेल लिहीतात की - "Dr. Ambedkar's election require earlier action and as there is only one vacancy at present, we have asked him to send his form today. He has not been elected from Bengal and all people here felt that his attitude has changed and he has been a useful member in the committee." आणि त्याच दिवशी म्हणजे ०३/०७/१९४७ रोजी सरदार पटेलांनी अजून एक पत्र लिहीलं होतं. ते पत्र होतं स. का. पाटलांच्या नावानं. ज्यात ते स. का. पाटलांना उद्देशून लिहीतात की - "Dr. Ambedkar's nomination has been sent to P.M. I hope, there would be no contest and he would be returned unopposed, so that he could come here on 14th."
काँग्रेस श्रेष्ठींच्या मध्ये डॉ. आंबेडकरांच्या नियुक्ती विषयी दूरध्वनी वर बोलणी झाली. त्या बोलणीत प्राथमिक निर्णय घेण्यात आल्यावर पं. नेहरूंनी आपल्या सचिवालयात डॉ. आंबेडकरांना पाचारण करून 'स्वतंत्र भारताच्या मंत्रि मंडळात कायदे मंत्री पद स्वीकारण्यास आपण आपली संमती द्याल काय?' अशी विचारणा केली. नेहरूंनी त्यांना नियोजन आणि विकास खाते देण्याचे ही आश्वासन दिले. बाबासाहेबांनी आपली संमती दर्शविली. पं. नेहरूंनी नियोजित मंत्र्यांची यादी घेऊन दिल्लीत भंगी कॉलनी मध्ये गांधीजींची भेट घेतली. गांधीजींनी त्यांना मान्यता दिली. काँग्रेस नेत्यांनी डॉ. आंबेडकरांशी जुळते - मिळते घेण्याची इच्छा प्रकट केली. ते डॉ. आंबेडकरांच्या योग्यतेचे व गुणांची कदर करण्याच्या मनःस्थितीत होते. आता स्वातंत्र्याच्या स्थैर्यासाठी व वृद्धीसाठी डॉ. आंबेडकरांच्या भीम शक्तीचा सदुपयोग करण्याचा त्यांचा निर्धार होता. आतापर्यंत त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्षच केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर देखील स्वतः काँग्रेस बद्दलचे कटू अनुभव विसरून राष्ट्र कार्यात सहभागी झाले. काँग्रेसचा नव्हे तर देशाने पुढे केलेला मैत्रीचा हात त्यांनी स्वीकारला. अन् इथून सुरू झाला घटना समितीचा प्रवास.
भारत स्वतंत्र झाला. नवं मंत्री मंडळ डॉ. राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीच्या अध्यक्ष स्थानी निवड झाली. पं. नेहरूंनी घटना समितीचे उद्देश व ध्येय साध्य करणारा ठराव १३ डिसेंबरला प्रभावी भाषणातून मांडला. त्यांनी भारत स्वतंत्र आणि सार्वभौम प्रजासत्ताक झाल्याची घोषणा केली. इतक्यात घटना समितीच्या अध्यक्षांनी अचानकपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव बोलण्यासाठी पुकारले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर धीर गंभीर आवाजात म्हणाले - "आज आपण राजकीय, सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या दुभंगले आहोत याची मला जाणीव आहे. आपण विरोधी छावण्या करून आहोत आणि मी स्वतः ही कदाचित युद्धाची छावणी उभारलेल्या एका जमातीचा नेता आहे." असे असले तरी माझी पूर्ण खात्री आहे की, परिस्थिती आणि समय काळ येताच आपण एक झाल्याशिवाय राहणार नाही. जरी जाती नी पंथ अनेक असले तरी आपण एक राष्ट्र होऊ याविषयी माझ्या मनात शंका नाही. मुस्लीम जरी भारताच्या फाळणीसाठी चळवळ करीत आहेत, तरी एकदा त्यांच्या मनावर परिणाम होऊन अखंड भारत सर्वांसाठी जास्त हितकर असल्याचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. सत्ता ही गोष्ट वेगळी आणि शहाणपणा नी दूरदर्शीता ही गोष्ट वेगळी. बर्फने म्हटल्या प्रमाणे 'सत्ता देणे एकवेळ सोपे आहे परंतु शहाणपण देणे कठीण आहे.' राष्ट्राचे भवितव्य ठरवतांना व्यक्ती किंवा राजकीय पक्ष यांच्या प्रतिष्ठेला महत्व देण्यात येऊ नये.
"देशातील सर्व लोकांना एकत्र नेण्याची आणि शेवटी एकी होईल असे मार्ग स्वीकारण्याची आपल्या अंगी ताकद आणि शहाणपणा आहे हे आपल्या वर्तनाने प्रत्ययास आणू या."
बाबासाहेबांच्या भाषणाने घटना समिती मंत्रमुग्ध झाली. बाबासाहेबांच्या वक्तृत्वामुळे सभासदांच्या मनात सहकार्याची भावना निर्माण झाली आणि जे हात त्यांना मारण्यासाठी उगारले गेले होते, तेच हात टाळ्यांचा कडकडाट करून डॉ. आंबेडकरांचे अभिनंदन करू लागले. डॉ. आंबेडकर आता घटना समितीचे सल्लागार बनले. त्यांचा उपहास करणारे त्यांचे मित्र बनले. नेहरू ठरावा वरील चर्चा पुढे ढकलण्यात आली. राज्यघटने बद्दल बोलतांना डॉ. आंबेडकर म्हणालेत - 'राज्यघटना किती ही चांगली किंवा वाईट असली तरी शेवटी ती चांगली वाईट ठरणे हे जे राज्यकर्ते तिचा वापर कसा करतील यावरच अवलंबून आहे.' हिंदूच्या जातीभेद आणि पंथभेद या जुन्या शत्रूंमध्ये परस्पर विरोधी असलेल्या नवीन पक्षांची भर पडली आहे. या जाणिवेमुळे माझी चिंता दुणावली आहे. जर पक्षांनी आपले पक्षमत राष्ट्रहिता पेक्षा श्रेष्ठ मानले तर भारताचे स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात येईल आणि कदाचित कायमचे नष्ट होईल. म्हणून शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत स्वातंत्र्यासाठी लढण्याचा निर्धार केला पाहिजे. लोकशाहीच्या रक्षणासाठी आपण सामाजिक व आर्थिक हेतू साध्य करताना घटनात्मक साधनांचा मार्ग अवलंबिला पाहिजे. असहकार, कायदे भंग, आणि सत्याग्रहाचे मार्ग वर्ज्य केले पाहिजेत. हे घटना बाह्य मार्ग म्हणजे केवळ अराजकतेची बाराखडी होय. लोकशाहीला दुसरा धोका विभूती पूजेचा आहे. जॉन स्टुअर्ट मिल लोकशाहीच्या संरक्षकास इशारा देताना म्हणतो - "एखादा माणूस कितीही थोर महान असला तरी त्याच्या चरणावर आपले स्वातंत्र्य अर्पण करू नये. ज्या थोर लोकांनी आयुष्यभर राष्ट्रसेवा केली, त्यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगावी परंतु कृतज्ञेस मर्यादा असावी." आयरिश देशभक्त आकोनेल म्हणतो, आपल्या अब्रुचा बळी देऊन कोणतीही स्त्री कृतज्ञता व्यक्त करू शकत नाही. स्वाभिमानाचा बळी देऊन कोणीही मनुष्य कृतज्ञ राहू शकत नाही आणि स्वातंत्र्याचा बळी देऊन कोणतेही राष्ट्र कृतज्ञ राहू शकत नाही. केवळ राजकीय लोकशाहीत समाधान मानू नये. राजकीय लोकशाहीला सामाजिक व आर्थिक लोकशाहीत परिवर्तीत केले पाहिजे. सामाजिक लोकशाही समता, स्वातंत्र्य व बंधुता या जीवनमूल्यांना ओळखते. सामाजिक समता नसेल तर मूठभर लोकांचे राज्य जनतेवर असल्या सारखे होईल.
बाबासाहेबांचे ४० मिनिटांचे भाषण ऐकण्यात घटना समिती तल्लीन आणि मंत्रमुग्ध झाली होती.
आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
वैभव छाया (एक ज्वलंत आंबेडकरी विचारवंत)
संदर्भ -
• प्रा. डॉ. भाऊ लोखंडे यांच्या लेखातून काही संदर्भ.
• चां. भ. खैरमोडे लिखित ८ व्या खंडातील
पृ. क्र. १९८ ते २०० वरील उतारे.
• दुर्गावास यांनी संपादित केलेल्या सरदार वल्लभभाई पटेल पत्र व्यवहाराच्या ५ व्या खंडातील उतारे.
धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"
••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••
एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA
• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU
• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123
• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com
• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com
••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••
• YATIN JADHAV :
9967065953 WhatsApp number
सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा