रविवार, ५ फेब्रुवारी, २०१७

● राजकीय नेतृत्व बाबतचा बौद्ध दृष्टीकोन

● राजकीय नेतृत्व बाबतचा बौद्ध दृष्टीकोन

सद्या महाराष्ट्रात जिल्हा परिषदा व महापालिकांच्या निवडणुकांचे वातावरण आहे. निवडणुक मध्ये पक्षाच्या भूमिकेच्या आधारावर मते मागण्याचा काळ आता समाप्त झाला आहे. आता पक्षाच्या एखाद्या नेत्याला वाटेल ती विशेषणे चिकटवून त्या नेत्याला ब्रँड म्हणून पुढे करायचे व मार्केटिंगचे तंत्र वापरून हा ब्रँड मतदारांच्या मनात ठसवून मते मिळवायची असे तंत्र वापरण्यात येत आहे.आपल्या पक्षाचा अमुक नेता म्हणजे विकास पुरुष आहे, छपन्न इंचाची छाती असलेला आहे. हुशार आहे. देशाला परमोच्च वैभव शिखरावर नेण्याची क्षमता असलेला एकमेव व्यक्ती आहे. औकातवाला आहे. पारदर्शक आहे. विरोधकांना धडकी भरविणारा आहे. भ्रष्टाचाऱ्यांचा (दुसऱ्या पक्षातील) कर्दनकाळ आहे असे सर्व गुण केवळ आमच्या नेत्याच्या ठायी एकवटले आहेत म्हणून आम्हाला मते द्या असे निवडणुकीतील उमेदवार सांगताना दिसतात.

आंबेडकरवादी म्हणविणारे रिपब्लिकन गटाचे तसेच बहुजनवादी पक्षांचे नेतेही यात मागे नाहीत. प्रत्येक गटाचा कार्यकर्ता नामक स्वामीभक्त सेवक बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पक्षाच्या आताच्या वाईट अवस्थेसाठी दुसऱ्या गटाच्या नेत्याला दोष देऊन मोकळा होतो. हा कार्यकर्ता नामक स्वामी भक्त सेवक आपला नेता कसा अभ्यासू, निस्वार्थी, स्वाभिमानी, सत्तेसाठी तडजोड न करणारा, विचारांचा वारस वगैरे आहे वगैरे हर तऱ्हेने पटवून देतो. यासाठी खंडीने फेसबुक पोस्टी टाकतो. व्हाट्सअप ग्रुप बनवतो व नेत्याचे गुणगान करणारे फोटो, सुविचार, बाबासाहेबांच्या भाषणातील उतारे, रक्ताचा, विचाराचा वारसा वगैरे सांगणारे वाघाचे तोंड असलेले, निळ्या फेट्याचे निळे शेपूट लोंबकळतात दाखविणारे फोटोशॉप केलेले फोटो वगैरे टाकून आपल्या नेत्याचे ब्रॅण्डिंग करण्यात जीवाचे रान करीत असतो. केवळ आपला नेताच बाबासाहेबांचे विचार पुढे नेणारा कट्टर बौद्ध आहे असे तो हिरीरीने सांगतो. कार्यकर्ता नामक स्वामी भक्त सेवक नसलेले सामान्य बौद्धजन रिपब्लिकन गटांना जवळपास प्रत्येक निवडणुकीत वाट्यास येणाऱ्या अपयशाचे खापर गटा - तटात विभागलेल्या नेत्यावर फोडतात. सामान्य बौद्धजनांनी आपले नेतेच चांगले नाहीत हा समाज पक्का केला आहे. यावर जेव्हा त्यांना विचारले की, आपल्या कल्पनेतील नेता नेमका कश्या प्रकारचा असला पाहिजे तेव्हा मात्र या लोकांकडे नेमके असे उत्तर नसते. नेता मग तो राजकीय क्षेत्रातील असो, सामाजिक क्षेत्रातील असो किंवा अन्य कोणत्याही क्षेत्रातील असो त्याच्यामध्ये नेमके कोणते गुण असायला पाहिजेत की, ज्यामुळे तो समाजाचे, पक्षाचे, गटाचे, समूहाचे योग्य आणि यशस्वी नेतृत्व करू शकेल याबाबत आंबेडकरी जनतेच्या नेमक्या कसोट्या स्पष्ट नाहीत. यामुळे जो-तो आपल्या सोयी प्रमाणे कोणाला तरी आपला नेता मानतो आणि त्या नेत्याच्या "आगे बढो! जिंदाबाद!" च्या घोषणा द्यायला लागतो. नेता निवडताना तो रक्ताचा वारस म्हणून, कार्यकर्त्यांशी गोड - गोड बोलतो म्हणून, अडीनडीला अधिकाऱ्याला, मंत्र्याला, पोलिसांना फोन करतो म्हणून, जन्म, विवाह, मृत्यू समारंभात न चुकता हजेरी लावतो म्हणून, फार चांगले भाषण देतो म्हणून, आपला जवळचा नातेवाईक आहे म्हणून, गाववाला म्हणून, आपल्या विभागातील म्हणून, आपल्या विरोधकाला शिव्या देतो म्हणून अशा फुटकळ कारणा पैकी काही तरी कारणामुळे स्वीकारला जातो असे दिसते.

भारत देशात राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचे ध्येय्य बाळगणाऱ्या चळवळीचा नेता ठरविण्यासाठी अशा फुटकळ कसोट्या लावल्या जात असतील तर ही चळवळ आपले इप्सित धेय्य कदापी ही प्राप्त करू शकणार नाही. महाराष्ट्रातील आंबेडकरी अनुयायी प्रामुख्याने बौद्ध धम्माचे अनुसरण करणारे आहेत. बौद्ध धम्माने भारतातील ब्राह्मणवादी राजकीय, सामाजिक आणि धार्मिक व्यवस्थेला जवळपास दीड हजार वर्षे पराभूत अवस्थेत ठेवले होते. या दृष्टीने बौद्ध धम्माची चळवळ एक यशस्वी चळवळ आहे. मग प्रश्न निर्माण होतो की ब्राह्मणवादी चळवळीचा दीड हजार वर्षे मुकाबला करणाऱ्या या चळवळीच्या नेतृत्वात असे कोणते विशेष गुण होते की ज्यामुळे ते नेतृत्व यशस्वी ठरले? बुद्धाने नेतृत्वाच्या काही कसोट्या निर्धारित केल्या होत्या काय की, ज्यामुळे धम्माचे वाहक असलेले राजे,शास्ते, प्रणेते धम्म क्रांतीचे नेतृत्व बुद्धाच्या महानिर्वाण नंतर ही यशस्वीपणे करू शकले? याचा शोध घेणे व त्यानुसार चळवळीचे नेतृत्व निवडणे आवश्यक आहे. नेता हा केवळ निवडणूक जिंकण्यासाठीच आवश्यक नसून सामाजिक हित दक्षता वाढवून समाजाला गतिमानता प्रदान करण्यास नेतृत्वाची मोठी भूमिका असते. म्हणून नेतृत्वाच्या संदर्भातील बौद्ध दृष्टिकोन काय आहे याची चर्चा केली पाहिजे.

• बुद्धाचा राजकीय नेतृत्व बाबतचा दृष्टीकोन :

बुद्धाचा काळ हा गणराज्ये मोडकळीस येऊन राजाच्या नेतृत्वा खालील निरंकुश सत्ता प्रस्थापित होण्याचा काळ आहे. बुद्ध स्वतः एका गणराज्याचा निवासी होता. गणराज्यातील काही चांगल्या प्रथा आणि परंपरा विषयी बुद्धाला प्रेम होते हे त्यांनी वज्जी संघ गणाच्या सात अपरिहानीय गण धम्माच्या केलेल्या स्तुती वरून दिसून येते. परंतु बुद्धाचा आदर्श ही गणराज्ये असल्याचे दिसत नाही. गणराज्यातील दास - सेवकाच्या श्रमावर आधीरीत जुनाट उत्पादन पद्धती, गणाच्या अल्प लोकसंख्येमुळे धोक्यात आलेली संरक्षण व्यवस्था, उत्पादन व वितरण व्यवस्थेच्या अभावामुळे व्यापार विकास न होणे इत्यादी अनेक सामाजिक व आर्थिक कारणामुळे गणराज्ये मगध, कोसल या सारख्या साम्राज्यात विलीन होत होती. वेगाने विकसित होत जाणारी मोठी साम्राज्ये पाहता या साम्राज्याचे नेतृत्व ज्यांच्या हातात राहणार आहे तो राजा कोणत्या गुणाने युक्त असावा? याबाबत बुद्धाने अनेक सुत्ता मधून उपदेश केला आहे. राजा हा प्रजेचा मुख्य नेता असल्यामुळे राजाच्या अंगी जे गुण असणे आवश्यक आहेत तेच गुण कोणत्याही समूहाचे, पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या नेतृत्वात असले पाहिजेत हा दृष्टीकोन नेतृत्वाचा बौद्ध दृष्टीकोन समजला पाहिजे.

बुद्धाने आदर्श राजा - प्रजापालक - प्रणेता यास "धम्मराजा" या स्वरुपात कल्पिले आहे. हा धम्मराजा ईश्वराचा अवतार नाही तसेच तो वंश परंपरेने सिंहासनावर बसलेला व्यक्ती नसावा तर जनतेने सर्व संमतीने मान्य केलेला व्यक्ती म्हणजेच 'सम्मुतिदेवा' असावा असे बौद्ध साहित्यात म्हटले आहे (जातक कथा क्र.१३२) राजा किंवा प्रणेता किंवा खत्तिय याची निवड त्याच्या गुणा वरून केली पाहिजे, त्याच्या मध्ये चारित्र्य (शील) आणि बुद्धिमता (पञ्ञा) असली पाहिजे असे बुद्धाने स्पष्ट केले आहे. नेत्या मध्ये शरीर बल, धन बल, सदाचरण बल हे गुण असले पाहिजेत असे बुद्धाने दिग्घ निकायाच्या अग्गण्यं सुत्तात स्पष्ट केले आहे. याशिवाय राजा किंवा प्रणेता दहा श्रेष्ठ गुणांनी (दसविध राजसधम्म) युक्त असावा असा उपदेश बुद्धाने केला आहे ते गुण असे :-

१) दान : 
प्रजा किंवा प्रणेत्याचे अवलंबित - अनुयायी यांच्या हितासाठी राजा - प्रणेत्याने आपल्या प्रिय वस्तूचा त्याग करण्याची तयारी ठेवली पाहिजे. यामध्ये धनत्याग, जनसेवा, ज्ञानदान यांचा समावेश आहे. राजा - प्रणेत्याने प्रसंगी स्वतःचे बलिदान देण्याची तयारी ठेवली पाहिजे.

२) शील (नैतिकता) : 
राजा - प्रणेत्याने कायिक आणि मानसिक नैतिकता याचे पालन करून आपल्या प्रजे समोर - अनुयाया समोर आदर्श ठेवला पाहिजे

३) परिच्चाग (परित्याग) : 
निस्वार्थ भावना आणि उदारता.

४) अज्जवा (आर्जव) : 
राजा - प्रणेत्याने निष्ठा, सत्यता, निष्कपटता आणि प्रामाणिक हेतूने कर्तव्याचे पालन केले पाहिजे.

५) मद्दवो (नम्रता) : 
राजा - प्रणेत्याने मृदू आणि नम्र स्वभाव, अहंकार विरहित वागणूक आणि आपल्या चुकीसाठी इतरांना जबाबदार न धरण्याची वृत्ती अंगी बाळगली पाहिजे.

६) तपो (आत्म निरोधन) : 
राजा - प्रणेत्याने मना मध्ये कोणताही किंतु, कपट भाव न ठेवता समर्पित भावनेने जबादारी निभावली पाहिजे.

७) अक्कोध (क्रोधापासुन मुक्तता) : 
राजा - प्रणेत्याने क्रोध आणि कोणाची ही घृणा करणे यापासून मुक्त असले पाहिजे.

८) अविहिंसा (अहिंसा) : 
राजा - प्रणेत्याने आपली प्रजा किंवा अनुयायी यांच्या विरोधात बदल्याची भावना ठेऊ नये.

९) खंति (धैर्य) : 
राजा - प्रणेत्याने धैर्यवान असले पाहिजे. कोणत्याही कार्यात उताविळपणा दाखवू नये किंवा निराशाभाव ठेऊ नये.

१०) अविरोधना (शुचिता, नेकी) :
राजा - प्रणेत्याने इतर व्यक्तिच्या मताचा आदर केला पाहिजे. कोणा विषयी पूर्वग्रह बाळगू नये. (जातक कथा ३७८ - भाग ५)

राजा - प्रणेत्याने आपल्या प्रजेच्या अनुयायाच्या कोणत्याही गटा विषयी पक्षपात करू नये, कोणा विषयी विशेष प्रेम तर कोणा विषयी विनाकारण पूर्वग्रह बाळगू नये.राजा - प्रणेत्याने सर्व जीवित प्राणीमात्र आणि सर्व स्तरातील मनुष्य यांच्या प्रती उदात्त भावना ठेवावी म्हणजेच ब्रह्म विहार करावा. हे चार प्रकारचे ब्रह्म विहार पुढील प्रमाणे -

१) मेत्ता 
२) करुणा 
३) मुदिता 
४) उपेक्खा

हे चार प्रकारचे ब्रह्म विहार राजा - प्रणेत्याने केलेच पाहिजेत. {दिग्घ निकाय खंड. २ (१९६) व खंड. ३ (२२३)} राजा - प्रणेत्याने आपली प्रजा - अनुयायी कोणत्याही वर्ण ,रंग, रुपाची असो, कोणत्याही प्रदेशात राहणारी असो, त्यांच्या विषयी चार प्रकारच्या दुर्भावनेपासून मुक्त असले पाहिजे. या चार प्रकारच्या दुर्भावना अशा -

१. चंड गति - 
विशेष प्रकारे पसंत करीत असल्यामुळे त्याच्या प्रती जवळीक वाटणे.

२. दोस गति -
विशेष प्रकारे नापसंत असल्यामुळे त्याच्या प्रती दुरावा वाटणे.

३. मोह गति - 
भ्रम किवा अविचार यामुळे पूर्वाग्रह दुषित होऊन पक्षपात करणे.

४. भय गति - 
भीती किंवा दबाव यामुळे पूर्वाग्रह दुषित होऊन पक्षपात करणे. {दिग्घ निकाय खंड. ३ (१८२, २८८ )}

बुद्धाने राजा किंवा प्रणेता यांच्या मध्ये कोणते गुण असले पाहिजेत म्हणजे तो समाजाचे - प्रजेचे कल्याण करू शकेल याबाबत विविध प्रसंगी नेमका असा उपदेश केला आहे. या सर्व उपदेशाची चर्चा एकाच लेखात करता येणे अशक्य आहे. रिपब्लिकन पक्षाचे पुनरुज्जीवन करण्याची आस बाळगून असलेल्या तरुणांनी या उपदेशाचे सखोल वाचन व चिंतन करून नेत्यांच्या निवडीचे कोणते निकष असावेत हे निश्चित केले तर गुणवान नेता निवडणे व रसातळास गेलेल्या रिपब्लिकन पक्षाचे पुनरुज्जीवन करणे अशक्य नाही.

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
सुनील खोब्रागडे (संपादक : दैनिक जनतेचा महानायक, मुंबई)

धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com

• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com

••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••

• YATIN JADHAV :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा किंवा खालील लिंक ओपन करा.

सूचना -
आपण फक्त एकाच समूहात सामील होऊ शकता.

◆ BSNET INDIA :
https://chat.whatsapp.com/HHbSpflXc8Y8Juwa5WbNqy

◆ BSNET INDIA (1) :
https://chat.whatsapp.com/HHbSpflXc8Y8Juwa5WbNqy

◆ BSNET INDIA (2) :
https://chat.whatsapp.com/58XH9KINHuVL5OOMVoTADh

धन्यवाद ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा