बुधवार, ८ फेब्रुवारी, २०१७

● बुद्धाचा स्वातंत्र्य विषयक दृष्टिकोन

● बुद्धाचा स्वातंत्र्य विषयक दृष्टिकोन

स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही मुल्ये वैश्विक मानवी मुल्ये म्हणून मान्यता पावली आहेत. युरोप मध्ये सर्व प्रथम फ्रेंच राज्यक्रांतीच्या क्रांतिकारकांनी या तत्वाचा उदघोष केला. तेव्हा पासून सर्व जगाने लोकशाही राज्याचा मूलाधार म्हणून ही तत्वे मान्य केली आहेत. परिवर्तनवादी चळवळीतील प्रत्येक कार्यकर्ता उठता - बसता या मुल्यांवर आधारित समाज निर्माण करण्याचे स्वप्न पाहत असतो. भारतीय राष्ट्र निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तर आपल्या जीवनाचे तत्वज्ञान या तीन शब्दात सामावले असल्याचे सांगितले आहे.मात्र ही मुल्ये आपण फ्रेंच राज्यक्रांतीतून नव्हे तर आपले गुरु भगवान गौतम बुद्ध यांच्या तत्वज्ञानातून प्राप्त केली असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे या मूल्य संकल्पना विषयी बुद्धाचा दृष्टीकोन काय होता? आधुनिक जगताने स्वीकारलेली स्वातंत्र्याची, समतेची, न्यायाची आणि बंधुत्वाची संकल्पना व बुद्धाने मांडलेली संकल्पना यामध्ये काय फरक आहे? फरक आहे अथवा नाही? या प्रश्नांची विस्तृत चर्चा व तुलना केल्यास या मूल्य संकल्पना नेमकेपणाने समजून घेता येतील.

• स्वातंत्र्याचा उगम -

स्वातंत्र्य हे प्रत्येक व्यक्तीला प्राण प्रिय आहे. आपल्याला आपल्या स्वातंत्र्याचा आपल्या मनाप्रमाणे उपभोग घेता यावा ही प्रत्येक व्यक्तीची आकांक्षा असते. स्वतःला पाहिजे तशी निवड करता येणे, निर्णय घेता येणे, आकांक्षा पूर्ण करता येणे, त्यावर कोणाचीही बाह्य आडकाठी, बंधन नसणे म्हणजे स्वातंत्र्य ही स्वातंत्र्याची ढोबळ व्याख्या आहे. ही निवड कोण करतो, निर्णय कोण घेतो, आकांक्षा कोण बाळगतो? तर व्यक्तीच्या जाणीवे मध्ये अस्तित्वात असलेला 'स्व' हे सर्व काही करीत असतो. बुद्धाने या "स्व" ला ''अत्त" असे संबोधन दिले आहे. मनात उद्भवणाऱ्या अंतर्गत किंवा सभोवताल अस्तित्वात असलेल्या बाह्य कारणांच्या परिणामाला प्रतिसाद देऊन हा "स्व" जागृत होऊन निर्णय घेतो, निवड करतो. हेच व्यक्तीच्या "स्व" मध्ये, अस्तित्वा मध्ये अंतर्भूत असलेले स्वातंत्र्य होय. स्वातंत्र्याचा उगम या ''स्व'' मधून होतो. हे स्वातंत्र्य मिळवावे लागत नाही. ते गमावात ही येत नाही. जोपर्यंत व्यक्तीची जाणीव (Conscience) जागृत आहे तोपर्यंत मी निर्णय घेतो,-मी निवड करतो, मी अमुक करतो, मी तमुक करतो ही जाणीव कायम राहत असते. यालाच स्वतःच्या अस्तित्वातील स्वातंत्र्य (Freedom in conscience) असे म्हटले जाते. स्वातंत्र्याचा हा मुलभूत व प्राथमिक स्वरूपाचा प्रकार होय. स्वातंत्र्याचा दुसरा प्रकार म्हणजे वास्तवातील स्वातंत्र्य (Freedom in Reality) हा होय. अस्तित्वातील स्वातंत्र्याला (Freedom in conscience) निवड करण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी प्रत्यक्षात सभोवतालच्या भौतिक परिस्थितीवर, सामाजिक परिस्थितीवर आणि मानसिक परिस्थितीवर अवलंबून राहावे लागते. यामुळे जाणीवेत स्वतंत्र पण प्रत्यक्षात परतंत्र अशी स्थिती उद्भवते. जाणीवेतील स्वातंत्र्य आणि वास्तवातील पारतंत्र्य यांचा संघर्ष म्हणजेच स्वातंत्र्याचा संघर्ष होय. या संघर्षात व्यक्तीच्या मनात असलेले किंवा जाणिवेतील स्वातंत्र्य (True Freedom) कसे प्राप्त करायचे? हे स्वातंत्र्य सभोवतालच्या भौतिक परिस्थितीवर, सामाजिक परिस्थितीवर आणि मानसिक परिस्थितीवर अवलंबून (Conditioned) न राहता निर्भेळ (सम्यक) कसे राहील? या विषयी बुद्धाने विचार केला आहे. फ्रेंच राज्यक्रांतीने किंवा पाश्चिमात्य तत्वज्ञानाने याविषयी विचार केलेला नाही. यामुळे फ्रेंच राज्यक्रांतीची किंवा पाश्चिमात्य तत्त्वज्ञानांची स्वातंत्र्याची संकल्पना आणि बुद्धाची स्वातंत्र्याची संकल्पना या मध्ये मुलभूत फरक आहे.

• स्वातंत्र्याचे आयाम -

आपल्याला आपल्या स्वातंत्र्याचा आपल्या मनाप्रमाणे उपभोग घेता यावा ही आकांक्षा किती ही तीव्र असली तरी प्रत्यक्षात आपल्या मनाला वाटेल तसा स्वातंत्र्याचा उपभोग घेणे खरोखरीच शक्य आहे काय? मनुष्य जर एकटा असेल तर कदाचित त्याला वाटेल तसे वर्तन तो करू शकेल ही. परंतु व्यक्तीची जर प्रज्ञा विकार रहित नसेल तर मनाला वाटेल तसे वर्तन करणे व्यक्तीच्या स्वतःच्या हिताच्या दृष्टीने घातक ठरते.प्रज्ञा जर तृष्णेने (तन्हा) बाधित झाली असेल, प्रज्ञा जर अभिमानाने (मान) ग्रासित झाली असेल, प्रज्ञा जर पूर्व धारणेने (दिटठी) दुषित झाली असेल तर व्यक्तीच्या वर्तनावर परिणाम होतो. यातून "स्व" च्या निर्णय घेण्यात निवड करण्यात, क्रिया करण्यात दुविधेची किंवा संघर्षाची स्थिती निर्माण होते. मनात बाळगलेल्या इच्छा, आकांक्षा बाह्य जगतातील कारणामुळे किंवा स्वतः मधील कमतरता मुळे पूर्ण करता येत नाही आणि मनातील इच्छा पूर्ण करण्याची उर्मी त्याला स्वस्थ बसू देत नाही अशी मानसिक दुविधेची आणि मानसिक संघर्षाची स्थिती निर्माण होते. व्यक्तीवर जेव्हा अशी दुविधेची आणि स्वतःच्या जाणीवेतील स्वातंत्र्याशी संघर्ष करण्याची पाळी येते तेव्हा व्यक्ती स्वतः मधील हे संघर्ष दडपून टाकण्यासाठी स्वतःची जाणीव तात्पुरती का होईना, पण विसरून जाण्याचा प्रयत्न करतो. यासाठी तो देव भक्ती, देश भक्ती, स्वामि भक्ती यासारख्या गुलामीत स्वतःला गुरफटून घेतो अथवा नशेच्या आहारी जाऊन स्वतःला विसरून जाण्याचा प्रयत्न करतो. हे सर्व प्रकार व्यक्ती स्वतः मध्ये निहित असलेल्या स्वातंत्र्या पासून सुटका करून घेण्यासाठी करीत असतो. व्यक्तीने धारण केलेल्या इच्छा - आकांक्षाची तीव्रता जेवढी जास्त तेवढा जाणीवेतील स्वातंत्र्याला विसरून जाण्याचा संघर्ष म्हणजेच स्वतः विरुद्ध हिंसा करण्याची तीव्रता (भक्ती किंवा नशा खोरी) जास्त अशी ही अवस्था असते. स्वतः मधील स्वातंत्र्याचा पूर्ण आविष्कार करून व्यक्तीने मुक्त होणे (Enlightenment) हि प्रक्रिया समजून घेण्यासाठी बुद्धाने वापरलेली स्वतः च्या सायको - एनालिसिसची प्रक्रिया जाणून घेऊन ती अंगीकारणे आवश्यक आहे. बुद्ध मतानुसार "स्व" ची निर्णय प्रक्रिया व्यक्तीच्या मनात उदभवलेल्या चार प्रकारच्या अंतः प्रेरणांवर अवलंबून असते.

१) काम उपादान
२) दिट्ठी उपादान
३) सिलब्बातुपादान
४) अत्तावधुपादानं

या चारही प्रकारच्या उपादनांना योग्य प्रकारे नियंत्रणात ठेऊन मनाचे स्थिरीकरण करणे (समता) व संस्काराची उत्पत्ती रोखणे याद्वारे सम्यक दृष्टी प्राप्त केली तर स्वतःमधील स्वातंत्र्याचा पूर्ण आविष्कार करून व्यक्तीला स्वतः च्या जाणिवेतील स्वातंत्र्य (True Freedom) प्राप्त करता येते असे बुद्धाचे म्हणणे आहे. मात्र हा मार्ग पूर्णतः व्यक्तीनिष्ठ (Subjective) आहे. यासाठी जीवन विषयक एक विशेष दृष्टी आवश्यक असते. ती स्व प्रयत्नाने कमवावी लागते. तिचे सामान्यीकरण (Generalization) करता येत नाही.

जेव्हा व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीशी संबंध येतो, कुटुंबातील किंवा समाजातील अन्य व्यक्तीशी जेव्हा त्याला आंतर क्रिया कराव्या लागतात तेव्हा व्यक्तीला आपल्या मना प्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य उपभोगणे शक्य नसते. जगातील कितीही उदारमतवादी देश असला तरीही तो आपल्या नागरिकांना त्यांच्या मनाला वाट्टेल तसे वर्तन करण्यावर बंधने घालीत असतो. नागरिकांना वाजवी बंधने घालून बहाल करण्यात आलेले हे स्वातंत्र्य म्हणजे "नागरी स्वातंत्र्य" होय. व्यक्तीच्या जाणीवेतील स्वातंत्र्याहून नागरी स्वातंत्र्य भिन्न असते. यामुळेच लोकशाहीतील नागरी स्वातंत्र्याची व्याख्या "इतरांच्या हक्कांना बाधा न आणता वाजवी निर्बंधासह आचार विचार करण्याचे व अभिव्यक्त होण्याचे वर्तन करण्यास दिलेली मुभा म्हणजे नागरी स्वातंत्र्य" अशी केली जाते.

स्वातंत्र्याचा विकास : सक्ती, संघर्ष, संतुलन, स्वेच्छा, समावेशकता जेथे निर्बंध येतात तेथे या निर्बंधा विरुद्ध संघर्ष अटळ असतो. यातून निर्बंध लादणारा एक गट व निर्बंधा विरुद्ध संघर्ष करणारा एक गट असे दोन गट निर्माण होतात. या दोन गटातील हे संघर्ष अधिकाधिक तीव्र होत गेले आणि अमर्यादपणे वाढत राहिले तर त्यातून सर्वांचाच विनाश होईल.दुसरी गोष्ट म्हणजे हे संघर्ष अमर्याद काळापर्यंत चालू ठेवण्यासाठी आवश्यक सामर्थ्य व्यक्ती मध्ये अथवा सामाजिक समूहामध्ये असेलच असे नाही.यामुळे या संघर्षांचा कुठे तरी निकाल लावण्याची गरज निर्माण होते. संघर्षांचा निकाल लावण्याचे दोन मार्ग आहेत. एकतर हे संघर्ष सोडविले पाहिजेत किंवा दुसरा मार्ग म्हणजे हे संघर्ष दडपून टाकले पाहिजेत. संघर्षाचा निकाल काहीही लागला तरी यातून एक जिंकणारा (बलवान) आणि दुसरा (बलहीन) असे जेता - जीत संबंध तयार होतात. म्हणजेच बलहीन गट बलवान गटाच्या बलाला मान्यता देतो. बलहिनांच्या गटाने बलवानांच्या बलाला दिलेली मान्यता म्हणजे 'सत्ता' होय. बलहिनानी बलवानाच्या गटाला स्वेच्छेने मान्यता दिलेली नसते. त्यांच्या स्वातंत्र्याचा हा सक्तीने केलेला लोप असतो. "सक्ती" ही कितीही न आवडणारी बाब असली तरीही ती मर्यादित अर्थाने का होईना पण स्वातंत्र्याच्या संकल्पनेचा एक भाग आहे. "सक्ती" म्हणजे सर्वात खालच्या दर्जाचे, नको असलेले स्वातंत्र्य होय.

कोणत्याही समाज समुहाला सक्ती लादून फार काळ शांत ठेवता येत नाही. यामुळे संघर्ष पुन्हा - पुन्हा उद्भवत राहतात. हे संघर्ष पुन्हा - पुन्हा उद्भवू नयेत यासाठी संघर्षाची सोडवणूक करणे आवश्यक असते. ही सोडवणूक एकाच गटाचे हित संबंध लक्षात घेऊन केली गेली तर ती विघातक सोडवणूक ठरते. हा प्रकार सक्तीने केलेली सोडवणूक या प्रकारात मोडतो. मात्र संघर्षाची सोडवणूक दोन्ही गटाचे हित लक्षात घेऊन केली गेली तर ती विधायक सोडवणूक असते. हा प्रकार तडजोडीने केलेली सोडवणूक या प्रकारात मोडतो. तडजोड ही सक्तीने लादलेली नसते. परंतु वारंवार होणाऱ्या संघर्षामुळे होणारे नुकसान टाळले जावे म्हणून एकमेकांच्या इच्छांना थोडीफार मुरड घालून एकमेकांना बहाल केलेली मुभा असते. याचाच अर्थ "तडजोड" हा स्वातंत्र्याचा "सक्ती" पेक्षा थोडा उन्नत प्रांत समजला पाहिजे. तडजोडीमुळे एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या इच्छा एकमेकांशी संतुलन साधून उभ्या राहतात. संतुलन साधण्यासाठी धाकद पटशा किंवा धमकी ऐवजी सामंजस्याने काढलेला तोडगा व त्याचे दोन्ही बाजूने पालन करणे या गोष्टी आवश्यक असतात. या प्रकारात परस्पर विरोधी गटांचे मतैक्य झालेले नसते. मात्र एकमेकांची ताकत ओळखून संघर्ष टाळले पाहिजेत अशी गरज निर्माण होऊन ही स्थिती निर्माण होते. सक्ती, संघर्ष तडजोड, संतुलन या चढत्या क्रमाने विकसित होणारे स्वातंत्र्याचे हे प्रांत बलाधिष्ठीत स्वातंत्र्य प्रकार या प्रकारातील आहेत.

निती दृष्ट्या विकसित झालेल्या समाजात यापेक्षा उन्नत पातळी वरील स्वातंत्र्य प्रकार आविष्कृत होऊ शकतो. तो म्हणजे एकमेकाची तत्वे जरी एकमेकाला पटत नसतील परंतु जर ती एकमेकांच्या हिताच्या आड ही येत नसतील तर प्रत्येकाला त्याच्या स्वेच्छेप्रमाणे वागण्याची मुभा देणे. यात मी तुला तुझ्या स्वेच्छेप्रमाणे वागण्याची मुभा देतो, तू मला माझ्या स्वेच्छेप्रमाणे वागण्याची मुभा दे असे संगनमत तयार झालेले असते. या स्वातंत्र्य प्रकारास 'मुभा' असे नाव देता येईल. या प्रकारात एकमेकांच्या तत्वांना छेद न जाणे हे उपेक्षाकारी स्वरूपाचे असते. ते कधीही बिघडू शकते. यातून पुन्हा संघर्ष उफाळून तडजोड, सक्ती अशी घसरण होऊ शकते. स्वातंत्र्याचा सर्वश्रेष्ठ आविष्कार बलाधीष्ठीत नव्हे तर बलविरहित समावेशनातूनच होऊ शकतो. यासाठी इतरांच्या स्वातंत्र्याचा आदर करणे, इतरांच्या सुख - दुःखाना दाद देणे, सहवेदना (Compassion), करुणा, इतरांच्या सुखामुळे स्वतःला सुख वाटणे (मुदिता) अनसूया, हे सद्गुण व्यक्ती मध्ये जेव्हा मनःपूर्वक अंतर्भूत होऊ लागतात तेव्हाच व्यक्ती मध्ये बलविरहित समावेशनाची वृत्ती निर्माण होते. इतरांच्या स्वातंत्र्याचा आदर केला तरच माझ्या स्वातंत्र्याचा आदर इतरांकडून केला जाईल ही समज विकसित झाल्यामुळे मान्य केलेले अन्य समावेशक स्वातंत्र्य हा स्वातंत्र्याचा सर्वश्रेष्ठ प्रांत होय. अश्या प्रकारे स्वातंत्र्य ही संकल्पना सक्ती, संघर्ष संतुलन, स्वेच्छा, समावेशकता या चढत्या श्रेष्ठत्व क्रमाने विकसित होते. यातील श्रेष्ठतम प्रकार आपल्यापेक्षा कनिष्ठ्तम प्रकारच्या प्रांताला सवरून घेत असतो. समावेशक स्वातंत्र्याच्या प्रांतात एकमेकांच्या इच्छांना मुभा देणारा अवकाश वाढतो आणि सक्ती करण्याची आवश्यकता उरत नाही.जेथे सक्ती करण्याची आवश्यकता उरत नाही तेथे स्वातंत्र्याची पूर्णतः प्रस्थापना झाली आहे असे समजले पाहिजे.

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
सुनील खोब्रागडे (संपादक : दैनिक जनतेचा महानायक, मुंबई)

धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com

• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com

••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••

• YATIN JADHAV :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा किंवा खालील लिंक ओपन करा.

सूचना -
आपण फक्त एकाच समूहात सामील होऊ शकता.

◆ BSNET INDIA :
https://chat.whatsapp.com/HHbSpflXc8Y8Juwa5WbNqy

◆ BSNET INDIA (1) :
https://chat.whatsapp.com/HHbSpflXc8Y8Juwa5WbNqy

◆ BSNET INDIA (2) :
https://chat.whatsapp.com/58XH9KINHuVL5OOMVoTADh

धन्यवाद ।

२ टिप्पण्या: