महात्मा
या व्यासपीठावरून कला व विज्ञान, तत्त्वज्ञान व साहित्य यांच्या इतिहासात ज्यांची नावे अजरामर आहेत, अशा अनेक पाश्चिमात्य विभूतींविषयींची गौरवपर व्याख्याने आजपर्यंत झाली आहेत. परंतु आज पूर्वेकडील एका महात्म्याविषयी आपण विचार करणार आहोत. मानवजातीच्या विचारावर व जीवनावर गौतम बुद्धांनी केलेल्या परिणामास तुलनी नाही. असा परिणाम करणा-या विभूतींत अग्रगण्य आहेत. थोर धार्मिक परंपरेचे एक संस्थापक या दृष्टीने त्यांचे नाव पवित्र झाले आहे. त्या धार्मिक परंपरेने मानवी मनाची घेतलेली पकड इतर धार्मिक परंपरांपेक्षा किंचितही कमी नाही. इतर धर्म परंपरांप्रमाणेच बुद्धधर्माच्या परंपरेनेही मानवी मनावर खोल परिणाम केलेला आहे. जगाच्या वैचारिक इतिहासात बुद्धांचे उच्च स्थान आहे. सर्व सुधारलेल्या मानवजाताचे ते वारस झालेले आहेत. बौद्धिक प्रामाणिकपणा, नैतिक उत्कटता, खोल अध्यात्मिक दृष्टी, यांच्या कसोट्या लावून पाहू, तर नि:शंकपणे असे कबूल करावे लागेल, की गौतम बुद्ध हे इतिहासातील अत्यंत थोर विभूतींपैकी एक आहेत.
बुद्धांच्या ऐतिहासिकपणाविषयी जरी क्वचित् कोठे शंका घेतली जात असली, तरी आजकाल त्यांचे ऐतिहासिकत्व न मानणारा असा एकही महान पंडित सहसा आढळत नाही. बुद्धांचा काळ आता निश्चित करता येण्यासारखा आहे. त्यांच्या जीवनाची सर्वसाधारण रुपरेषा काढता येण्यासारखी आहे. धार्मिक तत्त्वज्ञानातील काही महत्त्वाच्या प्रश्नांवरील त्यांचे विचार व त्यांची शिकवण ही काहीशा निश्चितपणे शिकता येण्यासारखी आहेत. ज्यांनी गौतम बुद्धांस पाहिले होते, त्यांची वाणी ऐकली होती, अशांच्या स्मृती बुद्धधर्माच्या पहिल्या धार्मिक वाङमयात ब-याच आहेत. तो काळ असा होता, की ज्या वेळेस लेखनाचा फारसा प्रघात नव्हता; आणि म्हणून आजच्यापेक्षा त्या काळांत स्मरणशक्तीच अधिक तीव्र असे. आठवणीच अधिक बिनचूक व चिवट असत.
बुद्धधर्मीय वाङमयाच्या आधीचा ऋग्वेद स्मृतीच्या बळावरच जसाच्या तसा राखून ठेवण्यात आला. नंतरच्या वाङमयापेक्षा ऋग्वेदात किती तरी कमी पाठभेद आहेत. या गोष्टीवरुनही त्या काळात स्मरणशक्ती किती केळवली गेली होती ते दिसून येते. उत्तरकाळात मूळच्या बुद्धधर्मीय ग्रंथांचे संपादन करताना जरी बरेचसे फेरफार केलेले असले, तरीही या थोर धर्मसंस्थापकाची सुप्रसिद्ध वचने, नाना कृत्ये, यांचा पुष्कळच निश्चितपणे अभ्यास करता येणे शक्य आहे. बुद्धांच्या जन्माच्या वेळेस अनेक चमत्कार घडले, अनेक अद्भुत प्रकार घडले, अशी अनैतिहासिक वर्णने आहेत. परंतु त्यावरुन बुद्धांच्या व्यक्तिमत्वाविषयी त्यांच्या पहिल्या अनुयायांना किती दिव्यता व अपूर्वता वाटत होती एवढे दिसून येते. ते प्राचीन काळातील पहिले अनुयायी भक्त होते, चिकित्सक नव्हते. पाली ग्रंथ, सीलोनमधील जुने ऐतिहासिक ग्रंथ व संस्कृत ग्रंथ या सर्वांची गौतम बुद्धांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांच्या बाबतीत एकवाक्यता आहे. गौतम बुद्धांचे बाल्य व तारुण्य यासंबंधीच्या अनेक दंतकथा आहेत यात संशय नाही. परंतु अशा काही अवास्तव कथा जरी त्यांच्या चरित्राभोवती गोळा झालेल्या असल्या, तरी त्यांच्या जन्माविषयी, त्यांच्या वंशपरंपरेविषयी शंका घेण्यास मुळीच जागा नाही.
ख्रिस्तपूर्व ५६३ मध्ये बुद्ध जन्मले. शाक्य नावाच्या क्षत्रिय कुळात ते जन्मले. त्यांच्या पित्याचे नाव शुद्धोदन. काशीच्या उत्तरेस सुमारे शंभर मैलांवर नेपाळच्या सीमेवर कपिलवस्तु नामक शहरी हे क्षत्रिय घराणे राज्य करीत होते. सम्राट अशोकाने पुढे ही जागा शोधून तेथे एक स्तंभ उभारला व तो उद्याप उभा आहे. बुद्धांचे मूळचे नाव सिद्धार्थ असे होते. गौतम हे कुलनाम होते. बुद्धांच्या जन्मवेळेस जे उपाध्याय उपस्थित होते, त्यांनी भविष्य केले, की हे बालक जर राज्य करु इच्छील तर चक्रवर्ती होईल; परंतु जर पारिव्राजिक यतिजीवन कंठू पाहील तर बुद्ध होईल. एकच व्यक्ति एकच वेळी चक्रवर्ती व बुद्ध होणे अर्थातच अशक्य होते. कारण ज्याला धर्ममय जीवन उत्कटपणे कंठावयाचे आहे, त्याने संसार त्याग केलाच पाहिजे. सांसारिक जीवनाचा त्याग ही तर परमार्थिक जीवनाची पहिली पायरी. सूप्तनिपातांत एक गोष्ट आहे, की एकदा असित नावाचा एक वृद्ध मुनी या लहान मुलाला बघायला आला. मुलाला पाहून त्याने भविष्य केले, की हे मूल अलौकिक विभूती होईल. आणि हे बालक महात्मा होऊन जेव्हा जगाला नवधर्म देईल, त्या वेळेस आपण जिवंत नसू. असे मानात येऊन असित मुनींच्या डोळ्यातून अश्रू घळघळले.
हे अलौकिक मूल जन्माला आले आणि सातच दिवसांनी त्याची जन्मदात्री माता मरण पावली. तिचीच बहिण शुद्धोदनाची दुसरी पत्नी होती. तिचे नाव महाप्रजापति. तिने या अर्भकाला वाढवले. योग्य वेळी पुढे या अर्भकाचा विवाह झाला. त्यांच्या पत्नीचे नाव यशोधरा. पुढे त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव राहुल. उद्वेगजनक व दु:खद प्रसंग गौतमांच्या दृष्टीस पडू नयेत म्हणून पित्याने पुष्कळ दक्षता घेतली होती. परंतु शेवटी व्हायचे तेच झाले. असे सांगतात, की दैववशात् किंवा देवाच्या इच्छेने त्यांना रस्त्यात चार दृष्ये दिसली : एक अगदी गळून गेलेला असा जरार्जजर मनुष्य; एक रोगी; एक मृत मनुष्य आणि एक परिव्राजक संन्यासी ही दृश्ये पाहून गौतम विचार करु लागले. धर्ममय जीवनातच खरी शांती व गंभीरता लाभेल असे मनात येऊन त्यांना एक नवीन प्रेरणा मिळाली. ही दृश्ये दिसल्याची गोष्ट खरी असो, गोष्टीचे तात्पर्य इतकेच, की गौतम धार्मिक वृत्तीचे पुरुष होते. या जगातील सुखांनी, आशा-आकांक्षांनी त्यांचे समाधान होऊ शकत नव्हते. यति जीवनाच्या आदर्शाकडे त्यांचे मन खेचले गेले. ‘पवित्र जीवनाच्या ध्येयासाठी घरादाराचा त्याग करुन विश्वात परिव्राजकाप्रमाणे गृहहीन होऊन विचारतात,’ असे शब्द बुद्धांच्या प्रवचनांतून अनेकदा येतात. आजचा आपला काळ फार व्यवहारिक आहे. या आजच्या काळात भारतीय मनाला धर्माची केवढी ओढ असे, धर्ममय ध्येयासाठी भारतीय मन किती आपत्ती व कष्ट सोसावयास सिद्ध असे, त्याची कल्पना येणार नाही. गौतम सत्याचा शोध करु लागले. नवप्रकाशाच्या शोधात असता दोन ब्राह्मण यतींशी त्यांची गाठ पडली. बुद्ध त्याचे शिष्य झाले. त्या यतींची नावे अलार कालम व उद्दक रामपुत्र अशी होती. त्या दोघांनी स्वत:चे धर्मज्ञान बुद्धांस दिले. त्यांनी आपल्या ‘विनयां’तही बुद्धांस पारंगत केले. श्रद्धेची आवश्यकता, सदाचार, ध्यानधारणा, चिंतन इत्यादि गोष्टी या यतींपासूनच बुद्ध शिकले असावे. परंतु त्यांच्या शिकवणींतील मतितार्थ बुद्धांना ग्राह्य वाटला नाही. जगातील दु:खांवरचा उपाय कधी न संपणा-या वाग्युद्धात सापडणे शक्य नाही; तार्किकांच्या तर्कटांत व घटापटांत तो सापडणे शक्य नाही; म्हणून तपश्चर्येने ज्ञानप्रकाश प्राप्त करुन घेण्याच्या निश्चयाने गौतम निघाले. पाच शिष्यांसमवेत ते उरुवेला येथे गेले. उरुवेला हे मोठे रमणीय स्थान होते. सुंदर असे हे तपोवन होते. हिंदुस्थानात अशी एक सर्वसामान्य समजूत आहे, की ज्याला पवित्र जीवन कंठावयाचे असेल त्यांने निसर्गरम्य स्थानी राहावे. प्रशांत व मनोहर अशा निसर्गरस्थानी असे जीवन कंठणे अधिक सुकर असते. अशा ठिकाणी इंद्रिये प्रक्षुब्ध होत नाहीत. तेथे एक प्रकारची स्थिरता, शांती इंद्रियांना मिळते. मनालाही अशा ठिकाणी प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते. हिंदुस्थानातील धार्मिक मठ, मंदिरे बहुधा नदीतटाकी किंवा पर्वतशिखरांवर असतात. पावित्र्यावर व धार्मिक श्रद्धेवर भर देत असताना, त्यांच्या प्राप्तीसाठी वातावरण अनुकूल हवे, सभोवती निर्सगरमणीयता असायला हवी, ही गोष्ट हिंदुस्थान विसरला नाही.
गौतम बुद्ध त्या स्थानी जाऊन तप करु अत्यंत उग्र अशी तपश्चर्या त्यांनी आरंभली. ज्याप्रमाणे ओल्या काष्ठांच्या घर्षणातून अग्नी प्रकट होत नाही, त्यासाठी वाळलेल्या काष्ठांची आवश्यकता असते, त्याप्रमाणे ज्ञानाचा उदय होण्यासाठीही वासना, विकार शांत झालेले असले पाहिजेत, असे मनात येऊन बुद्धांनी कठिण असे अनशन व्रत आरंभिले. योनमार्ग, ध्यानधारणा यांचेही ते आचरण करु लागले. अति निष्ठुर देहदंडना त्यांनी आरंभिली. त्यांचे शरीर दुबळे झाले. मनोबुबद्धिला ग्लानी आली. कधी कधी तर आपण मरणार असेही त्यांना वाटे. परंतु इतके झाले तरीही जीवनाच्या प्रश्नावर थोडासाही प्रकाश पडलेला त्यांना दिसला नाही. शेवटी उपासतापास हा ज्ञानप्रकाशाचा मार्ग नव्हे, अशी मनाशी पक्की खूणगाठ त्यांनी बांधिली. दुसरा मार्ग शोधण्याचा ते विचार करु लागले. पूर्वी तरुण असताना आध्यात्मिक चिंतनाचा त्यांना एक अनुभव आला होता. त्याच दिशेने जाण्याचे त्यांनी ठरवले. मनाच्या अशा अस्थिर व अशांत स्थितीत असतानाच मार वगैरे षड्रिपूंनी बुद्धांवर हल्ला चढविला अशी दंतकथा आहे. मोह पाडणा-या या माराने बुद्धांनी निश्चयापासून परावृत्त व्हावे म्हणून नाना प्रयत्न केले. कधी अक्राळविक्राळ स्वरुपे त्यांच्याभोवती दाखविली, तर कधी मनाला भूल पाडणारी, उल्लू करणारी अशी मोहक दृश्ये दाखविली. या दंतकथांचा अर्थ इतकाच, की या काळात बुद्धांचे मन शांत नव्हते. एक अखंड अशी ध्यानधारा स्त्रवत नव्हती. ध्यानात मनोव्यत्यय येत होते. या वेळेस त्यांच्या हृदयात एक प्रकारचा झगडा चालू होता आणि अशा झगड्यांनीच त्यांनी शेवटी जुन्या कल्पना भिरकावून दिल्या. जुने मार्ग न जुन्या पद्धती सोडून ते नवीन मार्ग शोधू लागले. जुनी श्रद्धा जाऊन ते नवीन श्रद्धा पाहू लागले. ते मननात मग्न झाले. ध्यानात रंगले. ध्यानाच्या चार स्थितींतून गेल्यावर विशुद्ध अशी आत्मप्राप्ती त्यांना झाली. मनाची समता त्यांना लाभली. हे सारे विश्व ऋतसत्याच्या काही शाश्वत नियमांनुसार चालला आहे असे त्यांना स्पष्टपणे दिसून आले. या जगात सर्वत्र धडपड आहे, धावपळ आहे, कोणी सुखी, कोणी दु:खी, कोणी उच्च, तर कोणी नीच; हे कोट्यवधी प्राणी जीवनाच्या अनेक अवस्थांतून सारखे जात आहेत. सारखे स्थित्यंतर, सारखा बदल असे विराट विश्वदर्शन त्यांना झाले. आणि एके दिवशीची ती शेवटची ध्यानरात्र! पहाटेची वेळ होत आली आणि ‘सारे अज्ञान नष्ट झाले. ज्ञानप्रभा फाकली.... मी तेथे निश्चयाने, उत्कट वृत्तीने, अखंड प्रयत्नशील असा बसलो होतो.’ असे त्यांचे धन्योद्गार आहेत. गौतमांना बोधी प्राप्त झाली. ज्ञान प्राप्त झाले. गौतम आता ‘बुद्ध’ म्हणजे ज्याला सारे समजले आहे, ज्याच्या सर्व आशंका फिटल्या आहेत असे झाले.
स्वत:ला जे ज्ञान मिळाले ते जगासमोर मांडावे की न मांडावे, याचा निश्चय बुद्धांच्या मनात होईना. धर्मग्रंथ सांगतात, की ब्रह्मदेवाने सत्यप्रसार करण्याची त्यांना प्रार्थना केली. याचा अर्थ इतकाच, की जगत्संन्यास, जगत्संचार याविषयी त्यांच्या मनात झगडा चालला होता. शेवटी जग सोडून न जाता जगातच वावर’ असा त्यांच्या अंतरात्म्याने निर्णय दिला. ‘अमरत्वाची द्वारे उघडी आहेत; ऐकायला ज्यांना कान आहेत त्यांनी श्रद्धा दाखवावी.’ असे उद्घोषून जगत्संचारार्थ ते निघाले. दु:खी दुनियेला नवप्रकाश देण्यासाठी ते बाहेर पडले. उपदेश करणे सोपे असते; परंतु तेवढेच करुन ते थांबले नाहीत. मनुष्याने जसे जगावे असे त्यांना वाटत होते, तसे ते स्वत: जगात होते, तदनुरुप त्यांचे वर्तन होते. त्यांचा उपदेश व त्यांचा प्रत्यक्ष आचार यात विसंगती नव्हती. ते स्वत: भिक्षू बनले. दारिद्रय, अप्रियता, विरोध, इत्यादी गोष्टींना त्यांनी स्वीकारले. सर्व एकटे सहन करीत ते सर्वत्र संचार करु लागले. आपला संदेश देऊ लागले. तपश्र्चर्येच्या काळी जे त्यांचे पाच अनुयायी होते त्यांना त्यांनी प्रथम हे नवज्ञान दिले हे पाचही जण नवीन मताचे झाले आणि नंतर जेथे अर्वाचीन सारनाथ आहे तेथे बुद्ध गेले. सारनाथ येथे तपोवन होते प्राण्यांची हत्या करण्यास तेथे बंदी होती. त्या तपोवनात तपोधनास राहायची परवानगी होती. अशा या पवित्र स्थानी गौतम बुद्धांनी आपले पहिले प्रकट प्रवचन केले. शिष्य वाढू लागले. तीन महिन्यांत साठ शिष्य मिळाले. बुद्धांचा आवडता शिष्य आनंद या साठ शिष्यांतच होता. बुद्धांच्या सर्व परिभ्रमणात हा आनंद सदैव त्यांच्याबरोबर असे. एके दिवशी बुद्ध आपल्या शिष्यांना म्हणाले, “आता तुम्ही सर्वत्र बहुजनसमाजाच्या कल्याणासाठी हिंडा. येथून बाहेर पडा. जगाविषयी मनात सहानुभूती व करुणा बाळगून देवाच्या व मानवांच्या हितार्थ, कल्याणार्थ प्रयत्न करा. एकाच दिशेने सारे नका जाऊ. प्रत्येकाने निरनिराळ्या दिशेस जावे. जी शिकवण आरंभी, मध्ये व अंती सारखीच भव्य व दिव्य आहे, ती शिकवण जगाला द्या. जी शिकवण वाच्यार्थाने व लक्ष्यार्थाने केवळ कल्याणमय अशी आहे, खरोखर उदात्त अशी आहे, ती तुम्ही जगाला द्या. पावित्र्याने पूरित अशा विशुद्ध व निर्दोष जीवनाची घोषणा करा; सुफलित अशा कृतार्थ जीवनाची घोषणा करा. जा.”
स्वत: बुद्ध ही शिकवण देत ४५ वर्षे हिंडत होते, दूरवर त्यांनी प्रवास केला. त्यांच्याभोवती अनेक अनुयायी गोळा झाले. ब्राह्मण व यतिसंन्यासी, तपस्वी व साधू, परित्यक्त व अनुतप्त, थोर कुळातील स्त्रिया, असे नानाविध लोक त्यांचा संघात सामील झाले. या आपल्या शिष्यांना योग्य अशी शिकवण देणे, या संघाची नीट व्यवस्था करणे हे बुद्धांचे मुख्य काम होते. या कामात त्यांचा पुष्कळ वेळ जाई. आजच्या काळात गौतम बुद्धांस आपण बुद्धिवादी म्हणू, त्यांची प्रवचने वाचीत असता ते सारासारबुद्धीवर, विचारशक्तीवर किती भर देत असत ते दिसून येते. बुद्धींनी जे नितीमार्ग दाखविला त्यांची पहिली पायरी म्हणजे योग्य विचार करणे, अचूक दृष्टी घेणे. बुद्धिप्रदान अशी चिकित्सक दृष्टी घ्यावयास बुद्ध सांगतात. मानवजातीचे ध्येय, मानव्याची दृष्टी, यांना पदोपदी अडथळे आणणारी सारी भ्रमजाळे झगडून दूर करणे हे बुद्धांचे पहिले काम होते. यासाठी त्यांची किती धडपड किती यातायात! कळत नसून उगीच सर्वज्ञत्वाचा आव आणणा-यांना ते स्पष्ट प्रश्न विचारतात. गूढ व संदिग्ध धर्मवचने बोलणा-यांना’ या शब्दजालांतील स्पष्ट अर्थ काय?’ असे ते विचारतात. बुद्धांना पोकळ, शाब्दिक धर्मवल्गना नको असत. ह्यांतील अर्थ सांगा, असे ते आव्हनपूर्वक विचारीत. त्या काळी आपणास ईश्वराचे प्रत्यक्ष ज्ञान आहे असे अनेक जण म्हणत. ईश्वर आहे की नाही याविषयीचे केवळ मत ते सांगत असे नाही, तर ईश्वराचे विचार काय आहेत? तो काय करतो? कसा वागतो? याचेही ज्ञान आपणास आहे असे लोक म्हणत. ‘तुम्ही उगीच ही अध्यात्मिकतेची सोंगेढोंगे माजविता’ असे बुद्ध त्यांना स्वच्छ सांगत. तेविज्जसूत्तांत बुद्ध स्पष्ट सांगातात, की ‘धर्मोपदेशक ब्रह्मादिकांविषयी बोलतात त्यांनी त्याब्रह्मादिकांना कधीही प्रत्यक्ष पाहिलेले नसते. राजवाडा कोठे बांधावयाचा हे माहीत नसताना एखाद्याने जिना बांधावा, कोणती स्त्री हे सांगता येत नसूनही एखाद्याने प्रेमात पडावे, नदीच्या परतीरास पोहचू इच्छिणा-याने त्या तीरालाच स्वत:कडे येण्यास सांगावे, त्याप्रमाणे हे सारे आहे.’ आपणांपैकी पुष्कळांची धर्मिक वृत्ती असते. परंतु ही वृत्ती कोठे वळवायची याची आपणस स्पष्ट कल्पना नसते. भक्ती डोळस व बुद्धिग्राह्य असावी म्हणून ती सत्यावर आधेरलेली असली पाहिजे. बुद्ध धर्ममय लोकांना ब्रह्म-विहाराचे महत्त्व नेहमी विशद करुन सांगत असत. ब्रह्मविहार म्हणजे ब्रह्मात राहणे; ब्रह्मविहार म्हणजे एक प्रकारचे चिंतन; ज्या स्थितीत आपणास चराचराविषयी प्रेम वाटते अशी ती एक मनाची स्थिती असते. त्या वेळेस कोणाविषयीही मनात द्वेषभाव नसतो. परंतु ब्रह्मविहार म्हणजे निर्वाण नव्हे. निर्वाणाकडे अष्टविध मार्गांनी जावयाचे असते.
जगात नाना प्रकारची मतमतांतरे असतात. कोणी काही सांगतो, कोणी काही. नाना प्रकारची दर्शने, नाना तत्तवज्ञाने. बुद्ध आपल्या शिष्यांना उपदेशितात, ‘तुमच्यासमोर जे जे विचार मांडले जातील, जे निरनिराळे कार्यक्रम ठेवले जातील, त्यांना तर्काची कसोटी लावून पाहत जा. जीवनाची कसोटीही त्यांना लावून पाहा. केवळ एखाद्याविषयी आपणास आदर वाटतो, एवढ्यावरुन त्याचे म्हणणे स्वीकारु नये.’ बुद्धांनी या नियमाला स्वत:चाही अपवाद ठेवला नाही. ते म्हणतात केवळ ऐकीव गोष्टीवर विश्वासून ती स्वीकारु नका; परंपरा प्राप्त म्हणूनही स्वीकारु नका; असे असलेच पाहिजे असे अधीर होऊन म्हणू नका; अमूक एखादे वचन आपल्या पुस्तकात आहे, एवढ्यावरुन ते स्वीकारु नका; हे स्वीकारण्यास हरकत नाही अशाही समजुतीने स्वीकारु नका; किंवा अमूक आपल्या गुरुचे म्हणणे आहे एवढ्यावरुनही तुम्ही ते स्वीकारु नये.’ आपल्या अनुयायांना सहृदपणे प्रार्थून ते म्हणतात, ‘माझ्या नावाच्या मोठेपणामुळे तुम्ही स्वत:च्या विचारांत व्यत्यय येऊ देऊ नका, माझ्या व्यक्तिमत्त्वामुळे तुमच्या विचारसरणीत बाधा न येवो.’
सारिपुत्राने म्हटले, “भगवन् तुमच्याहून अधिक थोर असा ज्ञानवेत्ता महात्मा मागे कधी झाला नाही, पुढे कधी होणार नाही व आजही नाही.”
भगवन् बुद्धांनी विचारले, “का रे सारिपुत्रा, मागे होऊन गेलेले सारे बुद्ध तुला माहीत असतीलच ना?”
“नाही महाराज.”
“तर मग भविष्यकाळातील तरी तुला माहीत असताल?”
“नाही महाराज.”
“तर मग निदान तू तरी जाणत असशील? माझ्या मनात तरी तू खूप खोल डोकावून पाहीले असशील?”
“तसेही नाही महाराज.”
“तर मग हे सारिपुत्रा, अशी पुप्पित वाणी, असे अगडबंब शब्द का उच्चारलेस? असे धीट बोल तू कसा बोललास?”
बुद्धांचा असा हा स्वच्छ बुद्धिवाद आहे. त्यांच्या शिकवणीत गूढ असे काही नाही. आपणाजवळ काही गुह्य ज्ञान आहे असे म्हणणा-यांविषयी बुद्धांना तिरस्कार वाटे. ते म्हणतात. ‘हे शिष्यांनो, या जगात तिघांजवळ गुप्तपणा असतो, उघडपणा नसतो. स्त्रियांजवळ गुप्तपणा असतो, उघडपणा नसतो; उपाध्यायांच्या, भटभिक्षुकांच्या ज्ञानांत गुप्तपणा असतो, उघडपणा नसतो; आणि खोट्या धर्ममतांत गुप्तपणा असतो, उघडपणा नसतो. परंतु जो पूर्णपणे बुद्ध झाला, त्याची मते व त्याचे नियम सूर्यप्रकाशाप्रमाणे जगासमोर असतात. त्याच गूढ, गुप्त असे काही नसते.’ मरण्याच्या आधी थोडा वेळ भगवान् बुद्ध आपल्या आवडत्या शिष्याला म्हणाले, “ मी नेहमी सत्य उपदेशिले. सत्यामध्ये गुह्य सत्य व प्रकट सत्य असे भेद मी कधी केले नाहीत. आनंदा, तथागताजवळ झाकली मूठ नाही. एखादा गुरु आपल्या मूठीत काही बाकी ठेवतो, परंतु सत्याच्या बाबतीत तथागत असे कधी करीत नाही.” बुद्धांच्या प्रवचनांतून ते सॉक्रेटिसच्या प्रश्नोत्तररुप पद्धतीने बोलत आहेत असे दिसून येते. अनेकांशी त्यांचे प्रश्नोत्तररुप संवाद चाललेले दिसतात. प्रश्न करणारे ज्या गोष्टी गृहीत धरुन आरंभ करीत, त्याच गोष्टी त्यांना स्वीकाराव्या लागत. मोठ्या कुशलतेने बुद्ध त्यांचे मन वळवीत आहेत असे दिसून येते.
आध्यात्मिक प्रांतातील स्वातंत्र्य बुद्ध कधी हिरावून घेत नाहीत. स्वत:च्या अनुयायांनाही हे वैचारिक स्वातंत्र्य ते गमावू देत नाहीत. ते आपल्या अनुयायांना आपापल्या आध्यात्मिक स्वातंत्र्याचा भार स्वीकारायला लावतात. गुरुवर सर्व सोपवून आपण स्वस्थ बसावे, ही गोष्टी ते करु देत नाहीत. एखाद्याचा आध्यात्मिक अधिकार मान्य करुन शिष्यांनी स्वत: सत्यशोधनाचे कार्य सोडून द्यावे हे त्यांना संमत नाही. अनुयायी व शिष्य यांनाही स्वातंत्र्य असले पाहिजे. त्यांनी स्वत:च स्वत:ला प्रकाश दिला पाहिजे; स्वत:च स्वत:ला साह्य केले पाहिजे. बुद्ध म्हणतात,* ‘ज्यांना स्वत:चा आत्मा हाच दीप आहे, ज्यांना अन्य आधार नसून आत्मा हाच आधार आहे, असे तुम्ही बना; सत्यधर्म हाच ज्यांचा दीप आहे, सत्यधर्म हाच आधार आहे, असे बना.’ अधिकाराची सर्वश्रेष्ठ वाणी म्हणजे आपल्या आत्म्याची वाणी; आत्माच्या आवाजाला सार्वभौम स्थान. बुद्धांच्या शिकवणीत आग्रह नाही, हटवाद नाही. आपलेच खरे असे नाही. त्या काळात दुर्मिळ अशी विशाल दृष्टी त्यांच्याजवळ होती. अशी दृष्टी असल्यामुळे विरोधी मताचा, टीकेचा गळा ते गुदमरवू इच्छीत नाहीत. धर्माचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे असहिष्णुता असे त्यांचे मत होते.
एकदा अंहलठ्ठिक येथील सार्वजनिक सभागृहात बुद्धदेव शिरले, तो तेथे त्यांचे शिष्य एका ब्राह्मणाविषयी बोलत होते. त्या ब्राह्मणाने बुद्धांवर अधार्मिकतेचा आरोप केला होता. त्यातील दोष दाखविले होते. शिष्यांचे बोलणे ऐकून बुद्ध म्हणाले, “बंधूंनो, दुसरे माझ्याविरुद्ध बोलतात, माझ्या धर्माविरुद्ध किंवा संघाविरुद्ध बोलतात, म्हणून तुम्हाला रागवण्याचे काहीच कारण नाही जर तुम्ही रुसाल, रागवाल तर आध्यात्मिकदृष्ट्या तुमची हानी होण्याचा संभव आहे; आणि तुम्ही जर संतापाल, चिडून जाल, तर ते लोक जे म्हणत आहेत ते कितपत यथार्थ वा अयथार्थ आहे, याचाही निर्णय करायली तुम्ही अक्षम ठराल.” आज २,५०० वर्षे झाली तरीही, अडीच हजार वर्षांच्या ज्ञानप्रकाशानंतरही बुद्धदेवांचे हे शब्द, हे थोर विचार किती उन्नत व उदात्त वाटतात! आपले पूर्वग्रह दुखावले गेले किंवा प्रशंसिले गेले एवढ्यावरुन धर्मतत्त्वांची,
___________________________
*आत्तदीप, आत्तसरण, अनन्नसरण; धम्मदीप, धम्मसरण.
-महापरिनिब्बाणसूत्त : ३३
मतांची सत्यासत्यता ठरवायची नसते. अशा स्तुती-निंदांवरुन तत्त्वे सत्य की चुकीची ठरवायचे नसते. कितीही विचित्र व चमत्कारिक अशी असत्ये कोणी मांडली, स्वत:च्या मताविरुद्ध दुस-याचे मत कितीही पराकोटीस गेलेले असले, तरी त्या सर्वांचा विचार करायला बुद्ध सिद्ध असत. त्या सर्वांचा परामर्श घ्यायला ते भीत नसत. त्यांच्या काळात सर्वत्र गोंधळ माजलेला होता. मतमतांतरांचा गलबला होता. अशा काळात सर्व मतांची छाननी करण्यास सिद्ध असणे हाच एक उपाय होता. भ्रमनिरसनार्थ व सत्याची प्राप्ती व्हावी म्हणून हाच एक मार्ग होता. लोकांनी आपले जीवन बुद्धांच्या पायावर उभारावे म्हणून त्यांना साहाय्य देण्याचा हाच एक दृढ पंथ होता. इतर पंथांवर कोणी अयोग्य टीका केली, तर बुद्धांस खपत नसे. ते एकदा म्हणाले, “हे आकाशावर थुंकण्यासारखे आहे. तुमच्या थुंकीने आकाश तर नाहीच मळणार; ती थुंकी मात्र थुंकणा-याकडे परत येऊन त्याला घाणेरडे करील.”
बुद्ध संतापाने पेटले आहेत, त्यांच्या तोंडातून कठोर व निष्ठुर शब्द बाहेर पडले आहेत, असे कधीच झाले नाही. मानवजातींविषयी त्यांना अपार सहानुभूती वाटे. बुद्धांना हे जग दुष्ट नसे वाटत. जग वाईट आहे असे म्हणण्याऐवजी जगाचे अज्ञान आहे असे ते म्हणत. जग उच्छृंखल आहे असे म्हणण्याऐवजी ते तितकेसे समाधानकारक नाही असे ते म्हणत. बुद्ध विरोधाला शांतपणे व आत्मविश्वासाने तोंड देत. त्यांच्यापाशी चिडखोरपणा नाही, भयंकर संताप नाही. बुद्धांची वागणूक म्हणजे मूर्तिमंत सुसंस्कृतता; त्यांचे वर्तन म्हणजे सद्भावाचे आविष्करण. त्यांच्या वर्तनात थोडासा उपरोधिकपणा असे. परंतु त्यामुळे त्यांचे गोड वर्तन अधिकच रुचकर व स्वादिष्ट वाटे. एकदा त्यांचे परिभ्रमण चालले असता एका गृहस्थाने फारच कटु शब्द त्यांना उद्देशून उच्चारले. बुद्ध शांतपणे म्हणाले, “एखाद्याने याचकापुढे अन्न ठेवले, परंतु याचकाने जर ते नाकारले तर, ते अन्न कोणाचे?”
“त्या देणा-या गृहस्थाचे.” तो मनुष्य म्हणाला.
“त्याप्रमाणे जर तुमचे शिव्याशाप मी स्वीकारायचे नाकारले, तर ते तुमच्याकडे परत येतील. तुम्हालाच त्यांचा स्वीकार करावा लागेल, नाही? परंतु मला मात्र दरिद्री होऊन जावे लागत आहे. कारण मी एक मित्र गमावून बसलो.” बुद्ध म्हणाले.
सक्तीने धर्मांतर करायला लावणे ही गोष्ट बुद्धांना ठावी नव्हती. त्यांच्या धर्मपद्धतीचा पाया अंधविश्वास नसून कृती हा होता. मानवी स्वभावाला विशिष्ट वळण लावावे, विशिष्ट सवयी लावाव्या अशी त्यांची इच्छा होती. आपण आपल्या या मूर्ख वासनांमुळे दु:खी होतो. सुखी होण्यासाठी एकच मार्ग आहे, एकच गोष्टीची आवश्यकता आहे. स्वत:साठी एक नवीनच हृदय निर्माण करणे, नवीन डोळ्यांनी पहायला शिकणे ही ती गोष्ट. आपण मनातले असद्विचार जर दडपू व सद्विचारांची जर वाढ करु, तर आपले हे दु:खी मन, हे असज्जन मन सु:खी व सज्जन होईल. बुद्ध धर्मातराचा विचार करीत नाहीत. तुम्ही कोणत्याही धर्माचे असा. बुद्ध यज्ञपूजक ब्राह्मणाच्याही पवित्र होमाग्नीसमीप बसतील, नि स्वत:चे विचार सांगतील. स्वत:चे प्रवचन करीत असताना ते चुकूनही ब्राह्मणाच्या त्या पूजाधर्माची टवाळी करणार नाहीत. सिंह नावाचा एक जैन होता. पुढे तो बुद्धधर्मिय झाला. परंतु पर्वीप्रमाणेच स्वत:च्या घरी येणा-या जैन श्रावकांस तो अन्न देई, देणग्या देई. पूर्वीचा तो प्रघात चालू ठेवण्यासाठी त्याला मुद्दाम सांगण्यात आले होते. बुद्ध आपले विचार अत्यंत सौम्यपणे सांगत असत. दुस-यांची मने वळवण्यास सत्य स्वत:च समर्थ असते. गौतम बुद्ध सत्यावर सारे सोपवीत, सत्यच्या सामर्थ्यावर विसंबत.
बुद्ध हे नैतिक विजयाचे महान वीर होते. परंतु अशा या मूर्तिमंत नीतीधर्माला, या थोर महात्म्याला संघाच्या नीतिनियमांविषयींच्या बारीकसारीक गोष्टींतही लक्ष घालावे लागे. एखादी संस्था स्थापणे म्हणजे जगाशी तडजोड करणे, सामाजिक गरजा मान्य करणे. समाजाच्या सर्वसाधारण चाकोरीच्या जीवनात ज्यांना समरसता वाटत नाही, अशांच्यासाठी आश्रयस्थान निर्मिणे म्हणजे एखादी संस्था, संघटना स्थापिणे. बुद्धांनी असा संघ स्थापिला. परंतु त्यात अव्यवस्था माजली. काही भानगडी सुरु झाल्या. बुद्धांचा देवदत्त नावाचा एक पुतण्या होता. बुद्धांना बाजूस सारुन स्वत:च संघाचा मुख्य व्हावे अशी त्याची मनीषा होती. बुद्धांच्या विरुद्ध त्याने कारस्थान केले. परंतु शेवटी त्याला क्षमा करण्यात आली. एकदा एक भिक्षु अतिसाराने आजारी पडला. तो मलमूत्रात लोळत होता. बुद्धांनी ते पाहिले त्यांनी त्याचे अंग धुतले. त्याचे अंथरुण बदलले; आवडता शिष्य आनंद बुद्धास त्या कामात साहाय्य देत होता. बुद्ध शिष्यांना म्हणाले, “हे भिक्षूंनो, जो कोणी माझी शुश्रूषा करु इच्छील, तो आजा-याचीही शुश्रूषा करील.” बुद्धधर्मीय संघटनेत जातिभेदांस वाव नव्हता. बुद्ध उपदेशितात, ‘हे भिक्षूंनो, ज्याप्रमाणे गंगा, यमुना, अचिरावती, शरयू इत्यादि मोठमोठ्या नद्या समुद्राला मिळाल्यावर स्वत:ची पूर्वीची नावे व कुळे विसरतात आणि त्या सर्वांना सागर हे एकच नाव प्राप्त होते, त्याप्रमाणे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे चार वर्ण ज्या वेळेस तथागताने शिकविलेल्या धर्मा प्रमाणे, नियमांप्रमाणे वागून संकुचित संसारातून, विश्वसंसारात येतात, स्वत:ची घरेदारे सोडून ‘हे विश्वची माझे घर’ अशा स्थितीप्रत पोचतात, त्या वेळेस ते नाम-गोत्र विसरतात. भिक्षु या एकाच नावाने ते सारे संबोधिले जातात.’
बुद्धांच्या काळात स्त्रियांना स्वतंत्र्य होते. स्त्रियाही पवित्र जीवन कंठू शकतात, वैराग्यमय असे धर्ममय जीवन कंठू शकतात, अशी बुद्धांनी घोषणा केली. आयुष्याच्या अखेरच्या वर्षी अंबपाली येथे एका वेश्येच्या घरी बुद्धांनी भोजन केले. परंतु संघात स्त्रियांना प्रवेश देण्यापूर्वी ते पुष्कळ वेळ घुटमळत होते. एके दिवशी आनंदने त्यांना प्रश्न केला, “भगवन्, स्त्रियांच्या बाबतीत आम्ही कसे वागावे?”
“आनंद, त्यांचे दर्शन घेऊ नकोस; त्यांच्याकडे पाहू नकोस.” ते म्हणाले.
“परंतु आमची व त्यांची गाठ पडली, तर आम्ही काय करावे?”
“त्यांच्याशी बोलू नकोस.”
“परंतु त्या आमच्याशी बोलू लागल्या तर?”
“अत्यंत सावध व दक्ष राहा.”
आनंदला स्त्रीजातीविषयी सहानुभूती वाटे. स्त्रियांनाही संघात घ्यावे म्हणून त्यांचा आग्रह होता. स्त्रियांची बाजू तो मांडी. शेवटी बुद्धांनी संमती दिली. संमती देणे हाच योग्य मार्ग होता. परंतु हा मार्ग योग्य असला तरी उपयुक्त होताच, असे कदाचित् म्हणता येणार नाही. एकदा बुद्धां म्हणाले, “आनंदा स्त्रियांना जर संघात प्रवेश दिला नसता, तर शुद्ध धर्म अधिक काळ टिकला असता. संघाचे कल्याणकर नियम सहस्त्र वर्षे टिकले असते. परंतु ज्या अर्थी त्यांना आता प्रवेश दिलाच आहे, त्या अर्थी हे नियम आता पाचशेच वर्षे
राहतील.” संघात शिरताना स्त्रियांना आप्तेष्टांची संमती घ्यावी लागे. परंतु पुरुष निदान दिसायला तरी अधिक स्वतंत्र होता. स्वत:चा स्वामी होता. त्याला कोणाला विचारावे लागत नसे. संघाचे नियम अभंग नव्हते. बुद्धा म्हणतात, “ मी गेल्यावर संघाला वाटले तर संघाने कमी महत्त्वाचे असे बारीकसारीक नियम काढून टाकावे.”
महापरिनिब्बाणसूत्तांत बुद्धांच्या मरणाची कथा अत्यंत साधेपणाने परंतु करुण रीतीने देण्यात आलेली आहे. त्यांचे आता ८० वर्षांचे वय होते. प्रवासाने व यातायाताने ते थकून गेले होते. त्यांच्या अंगात आता त्राण उरले नव्हते. ख्रिस्तपूर्व ४८३ मध्ये कुशिनगराजवळच्या एका गावी बुद्ध मरण पावले. काशीपासून हा गाव १२० मैल दूर होता. सॉक्रेटिस, ख्रिस्त हे हुतात्मे झाले. परंतु बुद्धांचे मरण अति शांत असे होते. या तिघा महात्म्यांनी आपापल्या काळातील अंधश्रद्धा, भोळकटपणा, दुष्ट रुढी यांचे निर्मूलन केले. सॉक्रेटिस अथेन्समधील तत्कालीन धर्माचा जितका विरोधी होता, त्यापेक्षाही गौतम बुद्ध यज्ञयागात्मक अशा वैदिक धर्माचे विरोधी होते. असे असूनही ते ८० वर्षांपर्यंत जगले. कितीतरी अनुयायी त्यांनी गोळा केले व स्वत:च्या आयुष्यातच एक धार्मिक संघ त्यांनी स्थापिला. बुद्धांना हुतात्मा व्हावे लागले नाही. कारण भारतीयांचा स्वभावच धर्मिक. रुढ धर्माविरुद्ध बंड करणा-यासही हिंदुस्थानात सहानुभूतीने वागविण्यात येई. पूर्वेकडचा व पश्चिमेकडचा हा फरक आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा