अलिबाबाने दगडी गुहेच्या बाहेर उभे राहून ' तिळा, तिळा दार उघड ' म्हटल्यावर, त्या ओबडधोबड दगडी दरवाज्याच्या मागे त्याला खजिना दिसला तेव्हा त्याची जी काय मनःस्थिती झाली असेल, तशीच आपली ' भीमायन ' हे पुस्तक उघडल्यावर होते.
काहीसे सुमार आणि मातकट रंगांचे कव्हर असलेले ' भीमायन- अस्पृश्यतेचे अनुभव ' हे पुस्तक उघडल्यावर प्रत्येक पानागणिक उत्तमोत्तम चित्रांचा खजिना हाती लागतो. दुर्गाबाई व्याम आणि सुभाष व्याम या पूर्व मध्य प्रदेशामधील प्रधान गोंड कलाकारांचे हे चित्रलेणे श्रीविद्या नटराजन आणि एस्. आनंद यांच्या कथेला अक्षरशः उजळून टाकते. एखादा वास्तुरचनाकार घर बांधताना त्याचा आराखडा तयार करतो. उभे-आडवे पिलर आणि बिम यांच्यामधून आर.सी.सी.चा सांगाडा उभा करतो आणि मग त्यामध्ये विटांच्या भिंती, भिंतींमध्ये खिडक्या-दारे मोकळी ठेवून घर बनवतो. आणि हे सारे त्या आडव्या-उभ्या सांगाड्यांवर तोललेले असते. तसेच डिझायनर आडव्या-उभ्या कॉलमच्या रेषांच्या आधारे एक ' ग्रीड ' बनवतो आणि मग मजकुरांच्या भिंती टाकून अधेमध्ये फोटो, चित्रे, मोकळ्या जागा सोडत पेज लेआऊट किंवा पुस्तकाची मांडणी करतो. आणि या सर्वांना बांधून कोण ठेवते तर ते मुळातले ' ग्रीड. ' पण हे झाले नियम. या सर्वांना तोडून त्या ग्रीडच्याही पलीकडे जाण्याची प्रत्येक सृजनशील कलावंताची झेप असते. त्या अवकाशात उडण्याची झिंग काही वेगळीच. आणि अशी जन्मतःच झिंग घेऊन येणारी कलाकारमंडळी जेव्हा नेहमीच्या बंदिस्तपणाला नाकारून ' मोकळ्या अवकाशात ' खुल्ली कला सादर करतात, तेव्हा ' भीमायन ' पैदा होते.
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जीवनातील प्रसंगांवर आधारित हे पुस्तक करावयाचे ठरले, तेव्हा डॉ. आंबेडकर कोण, हेही या कलाकार दाम्पत्याला माहित नव्हते. पिण्याच्या पाण्यासाठी झालेली लहान भीमाची वणवण, जेव्हा ते स्वतः नवायनच्या ऑफिसमध्ये गेले आणि त्यांच्या गावंढळ दिसण्यामुळे त्यांना त्या जागेच्या मालकिणीकडून विशिष्ट प्रकारची वागणूक मिळाली, त्यामुळे अगदी खोलवर जाणवली. आम्ही कलावंत आहोत, फ्रँकफर्टला जाऊन आलेलो आहोत, आदी गोष्टी सांगूनही त्या बाईवर काही परिणाम होत नव्हता.
हा दुःखाचा पूल मूळ घटनांमधील वास्तवाला, अवहेलनेला जोडणारा ठरला आणि मग ही केवळ पुस्तक सजवणारी चित्रे उरली नाहीत, तर त्या मजकुराला अर्थ देणारी, त्या अर्थांचे पदर उलगडून दाखवणारी नक्षत्रं ठरली. तहानलेल्या भीमासाठी मग माश्यांचे रूपक आले.
सृजनशील कलावंताचे मन काय जादू करू शकते, हे या पुस्तकात पानोपानी दिसून येते. प्रत्येक पान अवकाशाला कवेत घेत असते ही ' खुल्ली ' कला वाचकांचे मनच ' खुळं ' करून टाकते. शहरात घडणाऱ्या घटनाही पशू, पक्ष्यांच्या साक्षीने होतात. रेलगाडीचा साप होतो, उंच मोठा भीतीदायक किल्ला सिंह होतो. लोकांच्या मनात आंबेडकरांना पाहून होणारा आनंद मोराच्या रूपाने नाचू लागतो. महाडच्या तळ्यात केवळ हात दिसतात. त्यांचे भाषण लोकांच्या कानावर सतत शिडकावा केल्याप्रमाणे वारंवार ध्वनिक्षेपक दाखवून व्यक्त होते. पाण्याविना मासा हे रूपक पूर्ण पानच होऊन येते. बडोद्याच्या बागेत चिंताग्रस्त बसलेले आंबेडकर स्वतःच पूर्ण बाग होतात, ही कल्पनाच वंडरफुल आहे.
वणवण फिरून कोठेच पोहचत नाही, हे दर्शविण्यासाठी घाण्याच्या बैलाचे गोल गोल खुर आणि चालणारे पाय चक्रावून टाकतात. गोंड जमातीच्या जमिनीवर व भिंतीवर काढल्या जाणाऱ्या पारंपरिक ' दिग्ना ' नक्षीच्या स्टाईलने चित्रित झालेली ही चित्रे, प्रत्येक पानावर आपली स्वतःची एक कविता उभी करतात. काही ठिकाणी बॉर्डरचा वापर आहे. तो घराबाहेरच्या कुंपणावरून सुचला. हे फक्त निसर्गाच्या सान्निध्यात असणारा खुल्या आकाशाखालील मातीतला कलावंतच सहज व्यक्त करू शकतो.
गोधडी शिवलेली असावी आणि त्या धाग्यांच्या टाक्यांची एक तुटक-तुटक रेघ निर्माण व्हावी. तसे काहीसे स्वरूप असलेली ही शैली निसर्गात मिळणाऱ्या मातीच्या रंगानेच सजवली जाते. ऋतुप्रमाणे रंगीत माती मिळते. सफेत चुही माती फक्त जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात ' बरेन्डा ' जंगलात मिळते. पिवळ्या रंगाची ' रामराज ' अमरकंटक टेकडीवर, नर्मदा नदीच्या उगमापाशी नर्मदादेवीच्या उत्सवाआधी फक्त काही दिवसच मिळते. नंतर ती लाल होते. लाल माती धुरीच्या जंगलात मिळते.
केवळ हवा तो रंग मिळवण्यासाठी वेगवेगळे प्रदेश पायाखाली घालणारे कलावंत आपल्या ' ग्रीड 'मध्ये बंदिस्त होऊच शकत नाहीत. क्षितीज नसणारे आकाश आणि पायाखालची रंगीत माती, साऱ्या आसमंतालाच कवेत घेत असते आणि त्याचे प्रतिबिंब आपल्या हातात पुस्तकाच्या रूपाने असते. हे पुस्तक नाहीच! आरशाचा एक तुकडा आहे. आपण तो फिरवून, वेगवेगळ्या दिशांना वळवून, कोनांमध्ये वाकवून बघणे आपल्याला शक्य आहे. तेवढे या मुक्त पाखरांचे जग पाहण्याचा प्रयत्न करावयाचा. त्यातल्या अमानवी घटनांमध्ये आपला चेहराही दिसतो, हा भाग वेगळा!
आंबेडकरांच्या जीवनातील घटनांबरोबरच ' खैरलांजी प्रकरण ', ' ऑनर किलिंग ', ' बलात्काराच्या 'बातम्या आदी आजच्या वर्तमानातील घटनाही आपले पाय जमिनीवर ठेवण्याच्या कामी येतात इंग्लिश, हिंदी, कन्नड, मल्याळम्, तमीळ, तेलगू, कोरियन, फ्रेंच आदी भाषांमधून प्रसिद्ध झालेले हे पुस्तक लोकवाङ्मय गृह आणि नवायन यांनी मराठीमध्ये अतिशय प्रामाणिकपणे आणले आहे. मोठ्या चित्रांना न्याय देणारा आकार, छान योग्य कागद, उत्तम रंगीत छपाई, परफेक्ट बाइंडिंग आदी गोष्टींनी हे एक उत्तम आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुस्तक झालेले आहे.
अॅस्ट्रीक, टिनटिन, सुपरमॅन, बॅटमॅन, हॅरीपॉटर वाचणाऱ्या कोवळ्या हातांमध्ये हे पुस्तक अधिकच उठून दिसेल. सिनेमॅटिक पद्धतीने, क्लोजअप, लाँगशॉट, एकरेषीय, कथानक, हिंसा, बॉम्बस्फोट आदींचे उदात्तीकरण करणाऱ्या चित्रशैलीपेक्षा वेगळे या मातीतले हे चित्रण, त्यांच्या आकलनाच्या कक्षा निश्चितच रुंदावेल.
उपोषणाला बसलेल्या गांधीजींच्या हातामध्ये कुऱ्हाड दाखवणे हा संपादकीय दृष्टिकोन असू शकतो, पण हे पुस्तक संपादकाचे नाहीच मुळी. ते कलावंतांचेच आहे. व्यक्तिचित्रणामध्ये चेहऱ्याचे प्रोफाइल, पण डोळे समोरून पाहिल्यासारखे हे या शैलीचे वैशिष्ट्य पिरॅमिडमधील इजिप्शियन चित्रशैलीशी नाते सांगणारे आहे. किंबहुना वैश्विक वेदनेचे प्रतीक असावे.
दुर्गाबाई व्याम व सुभाष व्याम यांना आंबेडकर कोण, असा प्रश्न पडला असताना त्यांच्या १२ वर्षांच्या मुलीने बाजारात हाताचे बोट उंच केलेला पुतळा आहे ना, ते आंबेडकर... अशी ओळख करून दिली होती. त्या उंचावलेल्या हाताच्या बोटाचा प्रभाव म्हणून की काय, पुस्तकात पॉइंटरसारखा या दिशादर्शक बोटांचा भरपूर वापर केला आहे.
या सुंदर पुस्तकाच्या वितरणासाठी भरपूर प्रयत्न होणे जरुरीचे आहे. प्रत्येक शाळेच्या वाचनालयामध्ये याची किमान एक प्रत असणे जरुरीचे आहे आणि तीसुद्धा काचेच्या कपाटात राहू नयेत. ज्या मातीतून ही चित्रसंपदा बहरली आहे, त्या मातीने हे पुस्तक मळलं पाहिजे. नव्या सृजनशील कुमार वयांच्या मुलांमध्ये रुजलं पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा