बुधवार, १२ डिसेंबर, २०१२

सुखी, समृद्ध जीवनासाठी


सुखी, समृद्ध जीवनासाठी बुद्ध तत्त्वज्ञानाची नितांत गरज

-------------------------- 
शाक्‍यपुत्र सिद्धार्थ गौतमाने सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी बुद्धगयेच्या बोधीवृक्षाखाली बसून दिव्य ज्ञान प्राप्त केले. ते ज्ञान त्यांनी स्वत:पुरते न ठेवता मानवजातीच्या व प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी त्याचा प्रसार व प्रचार केला. सतत ६० वर्षे ते आपला उपदेश करीत फिरले. त्यांचा उपदेश म्हणजेच बुद्ध धम्म होय. "धम्म' हा शब्द पारंपरिक अर्थाने धर्म नसून तो मानसशास्त्र, तर्कशास्त्र आणि नीतिमूल्याचा समन्वय असलेली जीवन पद्धती आहे.
माणसाला विज्ञाननिष्ठ, विवेकवादी, विचारशील बनविणे हे बौद्ध धम्माचे परम उद्दिष्ट आहे. सनातन परंपरा, रूढी- अंधश्रद्धा व मानवी गुलामगिरी याविरुद्ध तत्त्वेच बुद्धाच्या शिकवणुकीचा मूळ गाभा आहे. प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री त्याचे स्तंभ आहेत. नीती ही बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा पाया आहे.
 राष्ट्र ही एकत्वाची भावना आहे. जाती-पोटजातीत विभागलेला मानव समाज राष्ट्र म्हणून आकारला येऊ शकत नाही. समतेवर आधारित समाज रचना राष्ट्रीय एकात्मतेची पूर्व अट आहे. यास्तव बौद्ध धम्माची शिकवण जनतेत रुजविणे काळाची गरज आहे.
प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री हे सद्‌गुण माणसात रूजावेत; स्वातंत्र्य, समता, बंधुता यावर आधारित समाज निर्माण व्हावा म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची रचना करताना या बुद्ध तत्त्वांचा जाणीवपूर्वक अंतर्भाव संविधानात केला. बुद्ध तत्त्वज्ञान प्रत्येक भारतीयाला सतत प्रेरणादायी ठरावे म्हणून तिरंग्यावर "अशोकचक्र' कोरले आणि "त्रिमूर्ती'ला राजमुद्रा म्हणून मान्यता मिळवून दिली. भारताच्या राष्ट्रपतींच्या खुर्चीवर "धम्म चक्र प्रवर्तनाय' हा बुद्धाचा प्रथम संदेश कोरला. या सर्व बाबींचा मूळ हेतू हाच की भारत एक धम्मशासीत राज्य निर्माण व्हावे आणि एक उज्ज्वल राष्ट्र घडावे. सारा भारत बौद्धमय व्हावा, ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आंतरिक इच्छा होती.
सध्याच्या परिस्थितीत धम्मशासीत पिढी निर्माण करणे अत्यंत आवश्‍यक आहे. त्यासाठी बालपणापासूनच मुलांना विज्ञाननिष्ठेचे मानवी मूल्याचे व विवेकाचे धडे देणे गरजेचे आहे. माणूस केवळ भाकरीवर जगत नाही. कारण त्याला मन आहे. त्या मनाला विचाराचे खाद्य पाहिजे. धम्म माणसाच्या हृदयात आशा निर्माण करतो. त्याला काम करण्यास प्रवृत्त करतो. बौद्ध धम्माला काळ आणि देश यांचे बंधन नाही. तो कुठल्याही देशात भरभराट पावू शकेल.
"बौद्ध धर्म' या ग्रंथाचे कर्ते ई. जे. मिल्स यांनी असे स्पष्ट प्रतिपादन केले की, ""बौद्ध धम्माइतका दुसऱ्या कोणत्याही धर्मात ज्ञानाच्या मूल्यावर आणि अज्ञानाच्या हिनतेवर भर दिलेला नाही. डोळे उघडे राखण्याबाबत दुसऱ्या कोणत्याही धर्मात इतका भर दिलेला नाही.''
प्रा. डब्ल्यू.टी. स्टेस आपल्या "बौद्ध धर्मीय नीतिशास्त्र' या ग्रंथात म्हणतात,""ज्ञान हे मुक्‍तीसाठी आवश्‍यक आहे आणि ते प्राप्त करण्यात अपयश येण्याची जी दोन कारणे आहेत त्यापैकी अज्ञान हे एक आहे तर दुसरे कारण तृष्णा आहे, असे बौद्ध धम्माने आग्रहपूर्वक सांगितले आहे.''
प्रगतिशील जगाला सर्वोच्च शिकवण देण्यासाठी बौद्ध धम्माचीच आवश्‍यकता आहे. विज्ञान हे बुद्धिप्रामाण्यवादाचे दुसरे नाव आहे. बुद्धाचा धम्म हा बुद्धिप्रामाण्यवादावर अधिष्ठित आहे. भगवान बुद्धाने सांगितलेला "अनित्यतेचा सिद्धांत' खरा ठरला आहे. बौद्ध धम्माने मानवात प्रच्छन्न असलेला अंत:सामर्थ्याच्या शोधाकडे लक्ष वेधले. सदाचारास प्रवृत्त होण्यासाठी मानसिक संस्काराचे महत्त्वही सांगितले. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३ ऑक्‍टोबर १९३५ रोजी येवला परिषदेत म्हणाले होते, ""जो धर्म आपल्याला समान दर्जा देईल, समान हक्‍क देईल आणि योग्य तऱ्हेने वागवील अशा एखाद दुसऱ्या धर्मात जावे, असे तुम्हाला वाटत नाही काय? दुर्दैवाने मी अस्पृश्‍य जातीत जन्मास आलो हा काही माझा अपराध नाही. परंतु, मरताना मात्र मी हिंदू म्हणून मरणार नाही.'' यावेळी निश्‍चितच डॉ. आंबेडकरांच्या मनात बौद्ध धम्म अधिष्ठित झालेला होता.
"गौतम बुद्धाचे चरित्र' हे पुस्तक बाबासाहेबांनी बालपणीच वाचले होते. तेव्हापासून बुद्ध तत्त्वज्ञानाचे कित्येक ग्रंथ त्यांनी वाचले होते. बुद्धाच्या संदेशात सिद्धांत आणि सामाजिक सुधारणा यांचे संकलन आहे. बुद्धाचा विचार हा एक सामाजिक संदेश आहे. बौद्ध धम्म प्रज्ञा शिकविते, करुणा शिकविते, समता शिकविते, या जगात सुखी आणि उत्तम जीवन जगता येण्यासाठी माणसाला याच गोष्टींची गरज आहे. विज्ञान जाणणाऱ्या आधुनिक माणसाला जर धर्म हवाच असेल तर बुद्धाचा धम्म याच एका धर्माचा स्वीकार करणे त्याला शक्‍य होईल, असे डॉ. आंबेडकरांनी प्रतिपादन केले. 
बुद्धजयंतीच्या वेळी नवी दिल्ली येथे एका सभेत बोलताना डॉ. आंबेडकर म्हणाले, "बौद्ध धर्म नीतीवर अधिष्ठित आहे. बुद्ध हा मार्गदाता आहे. बौद्ध धर्मात देवाची जागा नीतीने घेतलेली आहे. धर्म या शब्दाचा क्रांतिकारक अर्थ बुद्धाने विचारार्थ मांडला. बौद्ध धर्म हा समतेसाठी उभा आहे.
२९ सप्टेंबर १९५० रोजी वरळी येथील बौद्ध मंदिरामध्ये भाषणात डॉ. आंबेडकर म्हणाले, ""आपल्या हालअपेष्टा थांबविण्यासाठी लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारावा. आपले उर्वरित आयुष्य बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन आणि प्रसार करण्यासाठी व्यतीत करीन.'' १४ ऑक्‍टोबर १९५६ मध्ये नागपूरच्या नागभूमीवर त्यांनी धम्मचक्र फिरविले. इतिहासात अभूतपूर्व असा धम्मदीक्षेचा सोहळा संपन्न झाला. मनुष्य हा धर्माकरिता नसून, धम्म हा मनुष्याकरिता आहे. बुद्धाविषयी डॉ. आंबेडकर म्हणतात,
"Buddha was the first teacher in the world, who made morality the essence and foundation of religion. '' 
बुद्ध धम्माला देव-दैव, आत्मा-परमात्मा, पुनर्जन्म, कर्म या बाबी मान्य नाहीत. अंधश्रद्धा, रूढी-परंपरा बुद्धाने त्याज्य मानल्या आहेत. बुद्ध धम्मात जात, उच्च-निचता नाही. स्त्री-पुरुष समानता बुद्धाने मान्य केलेली आहे. सर्वांना समान संधी बहाल केली आहे. "बहुजन हिताय, बहुजन सुखाय' हे बुद्धाचे वचन आहे. "अत्त दिपो भवं' हा बुद्धाचा महान संदेश आहे.
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनीसुद्धा "होवो बुद्धाचे पुनरागमन' अशी कविता करून भारतात बुद्धाच्या पुनरागमनाची वाट पाहिली.
आज जगात आतंकवाद वेगाने पसरत आहे. मानवी मूल्याचे अवमूल्यन होत आहे. सीमावाद, प्रांतवाद गतिमान होत आहे. स्त्रियांवर रोजच अत्याचार होत आहे. देव- दैववाद डोके वर काढत आहे. कुजलेल्या जीर्ण रूढी- परंपरा पुनरुज्जीवित केल्या जात आहेत. एकाचे मंदिर पाडून दुसरा आपले मंदिर बांधत आहे. राजकारणाच्या नावाने हुकूमशाही वाढीस लागत आहे.
नवीन पिढी वेगाने व्यसनाधिनतेकडे जात आहे. न्याय व्यवस्था लुळी झालेली आहे. जाती व्यवस्था पुन्हा मूळ धरू लागली आहे. शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात देवी-देवतांचे प्रस्थ वाढत आहे. दूरदर्शनवर देव, अंधश्रद्धा, भूत- पिशाच्च यांचे आक्रमण सुरू आहे. या सर्व बाबींना दूर सारण्यासाठी आणि माणसाला सुखी व समृद्ध जीवन जगण्यासाठी बुद्ध तत्त्वज्ञानाची नितांत गरज आहे. यासाठी प्रत्येक बौद्ध म्हणविणाऱ्या उपासक-उपासिका, भिक्‍खू तथा भिक्‍खू संघ यांनी महायान- हीनयान या वादात न पडता सांघिक प्रयत्न करण्याची कालसापेक्ष गरज आहे. डॉ. आंबेडकर यांच्या शब्दांत "जग हे धम्म राज्य निर्माण होण्याची गरज आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा