● लेकरू
चंद्रमोळी झोपडीत
गोजिरवाणी परी ।
पितृछत्र हरवलेलं
आई तेवढी घरी ।।धृ।।
भाकर तुकडा झाल्यावर
माय निघायची घरून ।
पुन्हा परत यायची
काबाड कष्ट करून ।।१।।
एक दिवस विटा गोटे
वाहत होती माय ।
शिडीवरून तोल गेला
मोडला तिचा पाय ।।२।।
बिछान्यावर खिळली तेव्हा
स्वतः वरच रागवायची ।
चिंता पडली होती तिला
रोजचा खर्च भागवायची ।।३।।
घरामध्ये नव्हता
अन्नाचा एक ही कण
अन तशातच आला
दिवाळीचा सण ।।४।।
कोमेजलेली परी बघून
लागल्या आसवांच्या धारा ।
म्हणे माझ्या चिमण्या बाळा
कुठून आणू रे चारा ।।५।।
तिची ईवली लेकच मग
झाली तिची माय ।
म्हणे आई! धीर सुटावा
असं घडलंय तरी काय ।।६।।
आसवे पुसली आईची
अन अशी बिलगली घट्ट
म्हणे सांग आई कधी तरी
मी केला का गं हट्ट ।।७।।
चिंता कशाला करते आई
रडणं जरा तु सोड ।
अगं माझं पोट तर आत्ता भरेल
फक्त एक पप्पी दे तु गोड ।।८।।
रिकामं आहे पोट
ह्यात काही वाद नाही ।
पण तुझ्या गोड मुक्याचा
पक्वान्नाला ही स्वाद नाही ।।९।।
एकमेकींच्या मुक्याचा
भरवू एकमेकींना घास ।
आपलं पोट नक्की भरेल
आई मला आहे विश्वास ।।१०।।
माय म्हणाली येरे कुशीत
माझ्या लाडक्या पाखरा ।
कुठून आली एवढी समज
सांगा माझ्या लेकरा ।।११।।
आसवे ओघळली ओठांवर
माय झाली मूक
अश्रूंनी तहान गेली
गेली मुका घेताच भूक ।।१२।।
कवी -
रावसाहेब शिंदे
धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"
••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••
एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA
• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU
• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123
• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com
• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com
• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number
सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा