● देशभक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर
लेख -
यतिन जाधव
ब्रिटीशांचा बगलबच्चा, गवतातला साप, देशद्रोही, भीमासूर, ब्रह्मद्वेष्टा, चार्वाक अशा शब्दातून बाबासाहेबांची मानखंडना करण्यात येई. त्याच बाबासाहेबांनी, ज्याला देशातील सर्वात मोठा देशभक्त समजले जायचे. त्या महात्मा गांधींचे प्राण वाचवून गांधीभक्त आणि परिवारावर अनंत उपकार केले पहा. प्रत्यक्ष ब्रह्माच्या मुखातून जन्म घेतलेल्या आणि स्वतःला भूदेव घोषित करणाऱ्या ब्राह्मण व्यक्तीने गांधीजींना कैलासवासी केले आणि जो चातुर्वर्ण्याचा भागच नाही त्या नागवंशीय भीमाने 'महात्म्याचे' प्राण रक्षण केले. देशभक्ती म्हणजे काय? प्रत्यक्ष हातात शस्त्रे घेऊन लढा देणे? अथवा स्वतंत्रतेचा नारा देत मोर्चा काढणे? असे असेल तर ब्रिटिशांना 'चले जाव' म्हणायला गांधीजींना १९४२ ची वाट पहावी लागली. मात्र असा नारा ब्रिटीश प्रतिनिधींच्या तोंडावर फेकायला बाबासाहेबांनी नोव्हेबर १९३० सालीच सिद्धता केली होती. पहिल्या गोलमेज परिषदेत ते म्हणतात - "ज्या लोकांची स्थिती गुलामांपेक्षा वाईट आहे आणि ज्यांची लोकसंख्या फ्रांस या देशातील लोकसंख्ये एवढी आहे, अशा भारतातील एक पंचमांश लोकांची गार्हाणी मी परिषदे पुढे ठेवीत आहे. अशा त्या दलितांची मागणी अशी आहे की, भारतातील सरकार हे लोकांनी लोकांकरिता चालविलेले लोकांचे राज्य असावे." असे घणाघाती प्रहार करून बाबासाहेब ब्रिटीश राजवटीतील अस्पृश्याची दैनावस्था परिषदे पुढे मांडून पुढे म्हणतात - "असले सरकार काय कामाचे?" या मर्मभेदी प्रहाराने ब्रिटीश ही अस्वस्थ झाले होते. या भीम पराक्रमाने महाराजा सयाजीराव यांनी आनंदाश्रूंनी "देशभक्तीची" थाप बाबासाहेबांच्या पाठीवर दिली.
राजे आपल्या राणीला म्हणाले - "आपले सारे प्रयत्न आणि पैसा ही सार्थकी लागली" यावेळी "आंबेडकर हे हाडाचे राष्ट्रभक्त आहेत." असे छापून केवळ 'संडे क्रोनिकल' याच वृत्तपत्राने बाबासाहेबांच्या देशभक्तीचा परिचय दिला नाही तर इंडिअन डेली मिरर, कुलाबा समाचार, सर्व्हंट ऑफ इंडिया, फ्री प्रेस जर्नल इत्यादी आघाडीच्या वृत्तपत्रांनी बाबासाहेबांच्या देशभक्तीची वाहवा केली. काय १९३० च्या पूर्वी बाबासाहेबांनी ब्रिटिशांचे वाभाडे काढले नाही? जरूर काढले. पी.एच.डी (PH.D) आणि डी.एस.सी (DS.C) चे प्रबंध याची साक्ष देतात. "भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा : एक ऐतिहासिक पृथक्करणात्मक परिशीलन" (National Dividend of India - A Historic and Analytical Study) व "ब्रिटीश भारतातील प्रांतिक वैत्तिक उत्क्रांती" (The Evaluation of provincial Finance In British India) "ब्रिटिशांनी भारतात शांतता प्रस्थापित केली, तरी शांतता आणि सु - व्यवस्था ह्यावर लोकांनी समाधान मानावे असे समजणे अयोग्य आहे, असे त्यांनी या ग्रंथात म्हटले आपल्या मायभूमीतील उद्योगधंदे आणि तेथील धनपती यांच्या हिताच्या दृष्टीनेच ब्रिटीश राज्यकर्ते आपले धोरण ठरवीत नि राज्यकारभार चालवीत असत. प्रत्येक देशात सामाजिक अन्याया खाली भरडला जात असलेला दलित समाज असायचाच. परंतु तसे असले तरी राजकीय अधिकार कुठल्याही देशाला त्यामुळे नाकारता येत नाहीत. असे निर्भीड व खणखणीत विचार त्यांनी मांडलेत. धनंजय कीर त्यात "देशभक्त" आंबेडकरांचा आत्मा हा प्रबंधकार आंबेडकरांशी समरस झाला आहे [धनंजय कीर] या प्रबंधामुळे त्यांचे नाव फारच गाजले. अमेरिकेहून जेव्हा बाबासाहेब लंडनला गेलेत तेव्हा एक 'क्रांतिकारक' म्हणून त्यांची बुटापासून तपासणी करण्यात आली. दुसऱ्या गोलमेज परिषदे करिता जेव्हा बाबासाहेबांची निवड झाली. तेव्हाही अनेक वृत्तपत्रांनी बाबासाहेबांचा देशभक्त म्हणून गौरव करून 'मातृभूमीची कीर्ती त्यांच्या हातून वाढो' अशी सदिच्छा व्यक्त केली. याच परिषदेत अस्पृश्यांना "स्वतंत्र मतदार संघ" बहाल करण्यात आला होता. जो गांधींच्या हट्टापायी पुणे करारातून संयुक्त मतदार संघात परिवर्तित झाला. १४ ऑगष्ट १९३१ रोजी गांधीजींनी बाबासाहेबांना भेटायला बोलाविले. तेव्हा बाबासाहेबांचा शाब्दिक संघर्ष झाला. गांधीजींना "मला मायभूमी नाही" असे बाबासाहेबांनी म्हटले तेव्हा 'डॉक्टर साहेब, तुम्हाला मायभूमी आहे आणि तिची सेवा कशी करावी हे तुमच्या येथील कार्याचाच नव्हे तर गोलमेज परिषदेच्या पहिल्या अधिवेशनातील वृत्तांत माझ्या कानांवर आला आहे, त्यावरून सिद्ध झाले आहे.' असे गांधीजी म्हणाले. तसे पहिले तर बाबासाहेबांच्या देशभक्त असण्याला कुणाच्या 'सर्टिफिकेट' ची गरज नाही. विशेष प्रतिनिधित्वाच्या अधिकाराला विरोध करून बाबासाहेबांनी संस्थानिकांच्या क्रांती विरोधी आणि सनातनी वृत्तीला चपराक हाणली होती.
सरदार पटेलांनी याच संस्थानिकांना अखेर स्वराज्यात सामावून घेतले होते. तेच पटेल बाबासाहेबांना देशभक्त म्हणतात. तेव्हा मिश्किलपणे बाबासाहेब त्यांना म्हणतात - "म्हणजे कॉंग्रेस मध्ये न राहता ही देशभक्त राहता येते तर?" १७ डिसेंबर १९४६ ला संविधान सभेत "जर समय आणि परिस्थिती अनुकूल झाली तर जगातली कोणतीही शक्ती या देशाला एकात्म होण्या पासून प्रतिबंधित करू शकणार नाही अशी माझी पक्की धारणा आहे." असे बाबासाहेबांनी ठासून सांगताच सभागृहाने त्यांना डोक्यावर घेतले होते. ही देशभक्तीच नाही काय? मजूर मंत्री, विधी मंत्री आणि संविधान निर्मिता म्हणून त्यांनी केलेले अतुलनीय कार्य भल्या भल्यांना तोंडात बोटे घालायला भाग पाडते. ज्या चीन ने गळ्यात गळा घालणाऱ्या पंडित नेहरूंच्या नरडीलाच हात घातला आणि आज ही भारताला डोके दुखी बनलेली आहे. अशा साम्यवादी चीन च्या खादाड वृत्तीवर राज्यसभेत टीका करून व पंडित नेहरूंना त्यांच्या तिबेट प्रश्ना वरील आणि परराष्ट्रीय धोरणातील चुका दाखवून त्यांना गंभीर इशारा देणारे बाबासाहेब देशभक्त नाहीत? त्यावेळेस बाबासाहेबांनी सुचविलेले राष्ट्र विकासाचे अनेक उपाय तुकड्या तुकड्यांनी सरकारने मंजूर केले व आज ही करत आहेत. महापुराने अत्यवस्थ झालेल्या देशाला "नदी जोड प्रकल्पाचे" वरदान बाबासाहेबांनी दिले होते ते मूर्त रुपात उतरले असते तर आज देश आणखी स्वयंपूर्ण झाला असता. एखादा (बाल = पाली भाषेत मूर्ख) मूर्ख माणूस बाबासाहेबांना "निजामाचा हस्तक" म्हणून त्यांची हेटाळणी करतो, तेव्हा त्याला पांच वर्षात देशाचे वाटोळे करण्याची कुवत असतांनाही तशी खुन्नस न बाळगता या देशातील बुद्धाचा धम्म स्वीकारून या देशावर आणि हिंदू धर्मावर बाबासाहेबांनी केलेले केलेले अनंत उपकार याची जाण नसते. यांनी स्वीकार करो अथवा न स्वीकारो. बाबासाहेबांना जगाने ओळखले आहे स्वीकारले ही आहे. एकाच जाती धर्माचे इजिप्त, लिबिया असो की ट्युनिशिया असो प्रचंड उलथा पालथ तिकडे सुरु असतांना विविध जाती धर्माचे लोक भारतात लोकशाहीच्या छत्रा खाली सांस्कृतिक एकतेने जगताहेत हेच संविधानाचे यश आहे, जे बाबासाहेबांच्या देशभक्ती वर कर्तृत्वातून जन्माला आले आहे.
आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"
साभार -
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"
------------------------
जय भिम
जय भारत
नमो बुद्धाय
••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••
एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA
• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU
• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123
• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com
• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com
• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number
सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा