● भारतीयत्वाचा शोध घ्यायलाच हवा!
उद्देश -
‘आजच्या संघर्षांत इतिहास कालीन संघर्षांचा उपयोग’ असे न करता ‘आजच्या एकत्वासाठी (भारतीयत्वासाठी) इतिहासाचा अन्वयार्थ’ अशी भूमिका ठेवण्याची गरज आहे. वरील माहिती लहान ते वयोवृद्ध पाठवावी तसेच खालील लेखात दिलेली माहिती प्रसारित करणे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य असले पाहिजे.
लेख -
आयुष्यमान शेषराव मोरे (इतिहासाचे अभ्यासक)
••◆●◆•◆●◆•●◆●•◆●◆•◆●◆••
सध्या देशात असहिष्णुतेची लाट आली आहे, अशी सहिष्णू लोकांची तक्रार आहे. सरत्या वर्षांत लोक सभेपासून साहित्य अकादमी पर्यंत सर्वत्र हीच चर्चा चालू होती. बिगर सहिष्णुवाद्यांचे म्हणणे असे की, ही तक्रार व आरोप निव्वळ राजकारणप्रेरित असून खोटे आहेत. त्यांचा दावा आहे की, या देशाची संस्कृती हीच मूलत: सहिष्णू असून तिच्यासाठी असहिष्णुता ही परकीय गोष्ट आहे. या संस्कृतीत जन्मास येणारा माणूस जन्मत:च सहिष्णू असतो. या देशाची संस्कृती मानणारा असहिष्णू असू शकत नाही. या देशाचा इतिहास हा सहिष्णुतेचाच आहे.
‘सहिष्णुता विरुद्ध असहिष्णुता हा साधासाधा वा तात्कालिक प्रश्न नाही. तो दोन संस्कृतींचा संघर्ष आहे. बुद्धपूर्व संस्कृती सहिष्णू नव्हतीच; बुद्धाने सांस्कृतिक क्रांती केली व सहिष्णू संस्कृती उदयास आली. त्यानंतर इ. पू. दुसऱ्या शतकात पुष्यमित्र शुंगाने मनूच्या साहय़ाने प्रतिक्रांती घडवून आणली व भारतीय समाज पुन्हा विषमतेचा व अन्यायाचा बळी झाला. त्यानंतर सुमारे बावीसशे वर्षांनी भारताच्या राज्यघटनेने पुन्हा पूर्वी सारखीच क्रांती घडवून आणली व आधुनिक मूल्यांचे व सहिष्णुतेचे युग सुरू झाले; परंतु आता मनूसारखीच प्रतिक्रांती घडविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. असहिष्णुतेचे वाढते वातावरण व घडणाऱ्या घटना या पुढील प्रतिक्रांतीची नांदी होत.’ अशी ही आजच्या वातावरणाची विचारवंत "रावसाहेब कसबे" यांनी त्यांच्या मध्यममार्गी सम्यक दृष्टीतून केलेली मीमांसा आहे. याचा अर्थ स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे झाली तरी अद्याप आपल्यात ‘भारतीयत्व’ निर्माण झालेले नाही. परस्परां विषयीचा अविश्वास व भीती अद्यापही कायम आहे. हा अविश्वास व भीती केवळ सद्य:कालीन घटनांचा परिणाम नसून त्यामागे प्राचीन काळापासूनचा इतिहास उभा आहे. वस्तुत: स्वातंत्र्य प्राप्ती नंतर व आधुनिक मूल्यांवर आधारित राज्यघटना आल्यानंतर आपण केवळ ‘भारतीय’ किंवा ‘आधी भारतीय मग अन्य काही’ अशी भावना प्रत्येक नागरिकाच्या मनात निर्माण होणे अभिप्रेत होते. मागच्या काळातील गोष्टींकडे केवळ इतिहास म्हणून किंवा भारतीयत्वाला पूरक म्हणून पाहायला हवे होते. अशा प्रकारचे भारतीयत्व निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झालाच नाही.
केवळ शाळांच्या पाठ्य पुस्तकांतून ‘भारत माझा देश आहे; सारे भारतीय माझे बांधव आहेत’, अशा प्रतिज्ञा समाविष्ट केल्याने हे साध्य होणारे नव्हते. यासाठी परस्परांत अविश्वास व संघर्ष निर्माण करणारी बीजे असणाऱ्या पूर्वीच्या इतिहासाकडे भारतीयत्वाच्या दृष्टीने कसे पाहावे याची समाजाला शिकवण देण्याची गरज होती. इतिहास कालीन व वर्तमान कालीन धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक अन्याय वा अत्याचाराची बुद्धिवादी, समतावादी व कठोर चिकित्सा तर करायलाच हवी, पण ‘आजच्या संघर्षांत इतिहास कालीन संघर्षांचा उपयोग’ असे न करता ‘आजच्या एकत्वासाठी (म्हणजेच भारतीयत्वासाठी) इतिहासाचा अन्वयार्थ’ अशी भूमिका ठेवण्याची गरज आहे. यासाठी खोटा इतिहास सांगण्याची गरज नसून या भूमिकेतून इतिहास मीमांसा मात्र केली पाहिजे. प्राचीन इतिहासात निर्णायक पुरावा नसणाऱ्या संदिग्धतेच्या भरपूर जागा आहेत. त्याचा भारतीयत्वाच्या दृष्टीने इतिहास मीमांसा करण्यासाठी उपयोग करून घेता येतो.
इतिहास ही एक प्रेरक शक्ती आहे. भारतीयत्वाचा जन्म इतिहासातूनच झाला आहे. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला, पण भारतीयत्वाचा जन्म काही त्या दिवशी झालेला नाही. त्यापूर्वी ही ते अस्तित्वात होतेच. ते तसे होते म्हणून तर आपण स्वातंत्र्याची आकांक्षा धरू शकलो, स्वतंत्र होऊ शकलो, स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार करू शकलो आणि ती राज्यघटना लिहिण्यासाठी ‘मनुवादी’ भारतीयांनी कोणाची निवड केली? तर ज्यांच्यावर प्रतिक्रांतिवाद्यांनी शतकानुशतके सामाजिक अन्याय केला त्या समाजाचे नेते व प्रतिनिधी असणाऱ्या व त्या अन्यायासाठी जबाबदार असणाऱ्या मनुस्मृतीचे दहन करणाऱ्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची! म्हणूनच ‘एका हातात राज्यघटना व दुसऱ्या हातात मनुस्मृती असे चालणार नाही’, ही बाबासाहेबांची घोषणा भारतीयत्वाची आधारशिला बनली आहे. भारतीयत्वाची मूलतत्त्वे कोणती? ते आपल्यात आहे म्हणजे नेमके काय? भारतीयत्वाची वैशिष्टय़े कोणती? भारतीयत्व निर्माण वा वृद्धिंगत करायचे म्हणजे काय करायचे? भारतीयत्वाला विरोधी असणाऱ्या शक्ती, विचार या श्रद्धा कोणत्या आहेत? भारतात प्राचीन काळापासून एकत्व ही आहे आणि विविधत्व ही आहे याचा अर्थ काय? भारतीयत्व आणि आधुनिकता यांचा समन्वय कसा करायचा?
भारतीयत्व म्हणजेच भारतीयांचे एकत्व, म्हणजेच भारताचे राष्ट्रीयत्व. राष्ट्रीयत्व म्हणजे भारतीय लोकांतील देशपातळीवरील एकत्वाची भावना. अशा राष्ट्रीय भावनेने एका राज्यसत्तेखाली एकत्र राहात असलेले लोक म्हणजे राष्ट्र. आम्ही असे एक वैशिष्टय़पूर्ण स्वतंत्र राष्ट्र आहोत, अशी भूमिका मांडणारा सिद्धांत म्हणजे राष्ट्रवाद. धार्मिक, वांशिक, भाषिक, सांस्कृतिक, प्रादेशिक वा भौगोलिक अशा प्रकारचे विविध राष्ट्रवाद जगात मांडले गेले. अत्याधुनिक म्हणून प्रादेशिक वा भौगोलिक राष्ट्रवाद मानला जातो. आपण एका भूमीवर आणि एका राज्यसत्ते खाली राहात आहोत व आपले ऐहिक व भौतिक हित संबंध समान आहेत एवढ्या खातर आपण एक राष्ट्र, ही भूमिका या भौगोलिक राष्ट्रवादाचा पाया होय. हा राष्ट्रवाद आदर्श असला तरी या उच्च अवस्थेपर्यंत भारतीय लोक पोहोचले आहेत काय, असा प्रश्न उपस्थित केला जातो. राज्यघटनेने व आपण बहुतेक सर्वानी धर्माधारित राष्ट्रवाद नाकारलेला आहे, परंतु सांस्कृतिक राष्ट्रवाद नाकारला आहे काय, हा गंभीर वादाचा विषय होऊन बसलेला आहे. राज्यघटना धर्म निरपेक्ष आहे, पण संस्कृति निरपेक्ष आहे काय? राष्ट्रीयत्व वा राष्ट्रवाद याचा भावनेशी संबंध आहे की नाही? राष्ट्रवाद हा धर्म निरपेक्ष आहे, पण तो भावना निरपेक्ष ही आहे काय? केवळ समान ऐहिक हित संबंधांवर राष्ट्र उभे राहू शकते काय, असा प्रश्न उपस्थित केला जातो.
स्वातंत्र्य पूर्व काळात राष्ट्रवादाची खूप चर्चा झाली. ब्रिटिश लोक भारतीयांना हिणवीत होते की, तुम्ही एक राष्ट्र नाहीत, भारतात अनेक राष्ट्रे आहेत. यास उत्तर देण्यासाठी आपण आग्रहाने मांडू लागलो की, आम्ही एक राष्ट्रच आहोत. जसे ब्रिटिश हे एक राष्ट्र आहेत तसेच आम्हीही एक राष्ट्र आहोत. राष्ट्रीयत्वासाठी पाहिजे असणारे जे घटक तुमच्यात आहेत तसे आमच्यात ही आहेत. त्या काळात भारत हे एक राष्ट्र आहे, की ते अनेक राष्ट्रांनी बनलेले आहे, असा कडाक्याचा वाद विवाद चालत असे; परंतु भारतीय एक राष्ट्रवाद मानणाऱ्यांनी ही त्या राष्ट्रवादाची मूलतत्त्वे वा आशय मांडणारा एखादा आधारभूत ग्रंथ लिहिलेला नाही. त्या काळात आग्रहाने मांडला जाणारा मुस्लीम राष्ट्रवाद व हिंदू राष्ट्रवाद यास विरोध करणारे प्रतिपादन एवढ्या पुरतेच त्या भारतीय राष्ट्रवादाच्या मांडणीचे स्वरूप राहिले. स्वातंत्र्योत्तर काळात ही या स्थितीत फारसा फरक पडलेला नाही. भारतीय राष्ट्रवादाची समग्र मांडणी करणारा ग्रंथ अद्याप ही उपलब्ध नाही, असे का झाले? याचे एक कारण हे की, स्वातंत्र्योत्तर काळात देशात डावे व उजवे अशी विचारवंतांची विभागणी करण्यात आली. मार्क्सवादाच्या प्रभावा खाली असलेल्या डाव्या विचारवंतांना मूलत: राष्ट्रवादच मान्य नव्हता. साम्यवाद वा समाजवाद हीच त्यांची सर्वोच्च विचारसरणी होती. राष्ट्रवादाला ते प्रतिगामी मानत असत. एवढेच नव्हे तर आपल्या विचाराला न मानणाऱ्यांना ते उजवे व प्रतिगामी मानत असत. आजचे सहिष्णू व बिगर सहिष्णू हे अनुक्रमे त्याच डाव्या व उजव्यांचे वैचारिक वारसदार होत. त्यामुळे त्यांच्याकडून भारतीय राष्ट्रवादाच्या मांडणीची अपेक्षा करता येत नव्हती. आता उरले तथा कथित उजव्या विचारांचे नेते व विचारवंत. त्यांना, एखाद्याचा अपवाद वजा जाता, पाहिजे होता धार्मिक राष्ट्रवाद. त्याला ते सांस्कृतिक राष्ट्रवाद म्हणत असले तरी आशय होता धार्मिक राष्ट्रवादाचा. अल्पसंख्याकांनाच काय, पण हिंदूंतील बहुसंख्याकांना ही तो मान्य होणारा नव्हता. त्यामुळे त्यांना ही भारतीय राष्ट्रवादाची मांडणी करता आली नाही. एवढेच काय, पण त्यांना हिंदू राष्ट्रवादाची ही समग्र वा नीट मांडणी करता आली नाही. आज ही भारतीय राष्ट्रवाद त्याच्या समग्र मांडणी अभावी डावीकडे व उजवीकडे असे हेलकावे खात अभ्यासकांसमोर प्रश्न म्हणून उभा आहे.
जीनांच्या मुस्लीम लीगने ‘मुसलमान हे स्वतंत्र राष्ट्र आहेत’ असा सिद्धांत मांडला. धर्माच्या आधारावर फाळणी झाल्यामुळे उर्वरित भारताला ‘हिंदुस्थान’ हे नाव देणे तर्कशुद्ध व स्वाभाविक ठरले असते. आज ही सामान्यत: उपखंडातील मुसलमान या देशाचा उल्लेख ‘हिंदूस्थान’ असा करतात. असे असता ही आपण या देशाचे नाव ‘हिंदुस्थान’ न ठेवता ‘भारत’ असे ठेवले. ऐतिहासिक दृष्टीने पाहता ‘भारत’ हे प्राचीन नाव असून ‘हिंदू’ हे मध्ययुगीन नाव आहे. डॉ. आंबेडकरांच्या मते ‘हिंदू’ हे नाव भारतात आल्यावर मुसलमानांनी दिलेले आहे व तत्पूर्वीच्या धर्म ग्रंथात व इतिहासात ते सापडत नाही. ‘भारतीयत्व’ हे हिंदुत्वा पेक्षा प्राचीन होते. भारतीय नेत्यांना हेच अभिप्रेत होते. म्हणून त्यांनी या देशाचे नाव ‘भारत’ ठेवले. या भारतीयत्वाचा शोध आपल्याला घ्यायलाच हवा.
●◆●
आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
आयुष्यमान शेषराव मोरे (इतिहासाचे अभ्यासक)
••◆●◆•◆●◆•●◆●•◆●◆•◆●◆••
धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••
एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA
• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU
• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123
••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••
• YATIN JADHAV :
9967065953 WhatsApp number
सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा
धन्यवाद ।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा