गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०१७

● भारतीय पत्रकारितेतील ब्राह्मणी प्रवृत्ती

● भारतीय पत्रकारितेतील ब्राह्मणी प्रवृत्ती

लेख -
आयुष्यमान सुनील खोब्रागडे
(संपादक : दैनिक जनतेचा महानायक, मुंबई)

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

भारत हे जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र आहे असे आपण गौरवाने म्हणतो. लोकशाही व्यवस्थेचे सर्वात प्रमुख लक्षण हे असते की या व्यवस्थेत सर्व शक्तींचे केंद्रीकरण कोणत्याही एका व्यक्तीकडे किंवा संघटनेकडे . झालेले नसते. असे केंद्रीकरण झाले तर ती व्यवस्था लोकशाही व्यवस्था न राहता हुकूमशाही व्यवस्था बनते. लोकशाहीचे वैशिष्ट्य हे असते की, या राज्य व्यवस्थेत परस्परांशी जोडलेले, परस्परांवर अंकुश ठेऊन असलेले परंतु परस्परांपासून स्वतंत्र अस्तित्व राखून असलेले, सत्ता आणि शक्तीचे तीन भाग ठळकपणे विभागलेले असतात. ते असे :

१) विधायिका -
म्हणजे कायदेकारी मंडळ. कायदेकारी मंडळात लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी समाविष्ट असतात.

२) कार्य पालिका -
म्हणजे कायद्यांची अंमल बजावणी करणारी प्रशासकीय व्यवस्था.

३) न्याय पालिका -
कायद्याच्या कलमांचे, शब्दांचे व कायद्या मागील भावनेचे मर्म ध्यानात घेऊन, त्या कायद्यांची अंमल बजावणी कार्य पालिकेकडून नीट झाली की नाही, हे बघणारी व्यवस्था म्हणजे न्याय पालिका.

लोकशाही व्यवस्थेची ही तीनही अंगे स्वतंत्र समजण्यात येतात. व्यवहारात मात्र असे दिसून येते की, कायदे मंडळात किंवा संसदेत ज्या प्रतिनिधींचे बहुमत असते ते सत्ताधारी मंत्री,आपल्या मर्जीतील नोकर शहांना पाहिजे त्या ठिकाणी नियुक्ती देऊन आपल्याला हवी तशी कायद्याची अमल बजावणी करून घेतात. कायदेकारी मंडळातील सदस्याच्या इच्छेशिवाय प्रशासकीय अधिकारी महत्वाचे निर्णय घेत नाही. न्यायपालिका स्वतंत्र असते, असे म्हटले जाते. पण न्याय पालिकेतील न्यायाधीशांची नियुक्ती प्रधान मंत्री, आणि नोकर शहा यांच्या मान्यतेनेच होते. यामुळे न्याय पालिका क्वचितच सत्ताधाऱ्यांच्या विरोधात निर्णय देते. यामुळे लोकशाही व्यवस्थेचे हे जे तीन स्तंभ आहेत ते परस्पर संलग्न आणि परस्परांची पाठ राखण करणारे असतात असे म्हणावे लागते.

• लोकशाहीचे चौथे अंग -

लॉर्ड मेकॉले यांनी त्यांच्या १८२८ साली प्रसिद्ध झालेल्या ‘कॉन्स्टिट्यूशनल हिस्टरी’ या निबंधात लोकशाहीच्या या तीन अंगा शिवाय एक चौथे अंग सुद्धा आहे अशी कल्पना मांडली. ते चौथे अंग म्हणजे पत्रकारिता होय. मेकॉलेनी पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ असा दर्जा दिला. सर एडमंड बर्क यांनी ‘मानवी जीवनाचे नियमन करणाऱ्या धर्म सत्ता (लॉर्डस स्पिरिच्युअल), राज सत्ता (लॉर्डस टेंपोरल) व लोक सत्ता (कायदे मंडळ) या तीन शक्तींप्रमाणे नव्हे, त्यांच्या पेक्षा ही अधिक महत्वाची शक्ती म्हणजे पत्रकारिता (प्रेस गॅलरी) होय, असे नमूद केले आहे.’ यावरून लोकशाही व्यवस्थेत पत्रकारितेचे महत्त्व आणि स्थान कोणत्या प्रकारचे आहे ते स्पष्ट होते. भारतामध्ये मात्र जगातील प्रगत देशात पत्रकारितेचे असलेले महत्व व कर्तव्य काय आहे हे विसरून सत्ताधाऱ्यांचा अनुनय, नायक पूजा, प्रचंड खोटारडेपणा, दिशाभूल, जातीय पक्षपात, यालाच पत्रकारिता म्हणून प्रस्थापित केले आहे. भारतीय पत्रकारीते बाबत आपले मत व्यक्त करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात - “एखाद्याला नायकत्व बहाल करणे आणि त्याचे पूजन करणे हेच आपले परम कर्तव्य असल्याचे भारतीय पत्रकारितेने ठरविले आहे. सनसनाटी निर्माण करण्याच्या कुहेतुने बेजबाबदार वृत्त देणे,सहेतुक स्वार्थ ठेऊन लोकांच्या भावनेशी खेळणाऱ्या तर्कहीन अफवा पसरविणे यात भारतीय पत्रकारिता रममाण झाली आहे. भारतीय पत्रकारिता म्हणजे वाजंत्र्यांनी आपल्या नायकाचा गाजावाजा करण्यासाठी ढोल बडविणे होय. भारतीय पत्रकारितेने नायकपूजेसाठी इतक्या मुर्खतम पातळीवर जाऊन देशाच्या हिताशी यापूर्वी कधीच सौदा केलेला नव्हता.आजचा भारत नायक पूजेच्या कैफाने आंधळा झाला आहे व त्यास भारतीय पत्रकारिता जबाबदार आहे." (BAWS, Vol 1, P. 227) बाबासाहेबांनी हे विचार १८ जानेवारी १९४३ रोजी व्यक्त केले आहेत. मात्र आज ही ते तेवढेच संयुक्तिक आहेत.

• भारतीय पत्रकारांचा ब्राह्मण वर्चस्ववादी जातीय दृष्टीकोन -

अमेरिकन आणि युरोपियन राष्ट्रांमध्ये पत्रकारिता जेवढी प्रगल्भ आहे त्याच्या आसपास ही भारतीय पत्रकारिता फिरकत नाही. अमेरिकन आणि युरोपियन वृत्त पत्रांच्या आणि वृत्त वाहिन्यांच्या मालक - संपादकांनी स्वतःवर लिखित स्वरूपात काही नैतिक बंधने लादून घेतली आहेत. त्याच प्रमाणे आपल्या पत्रकार - कर्मचाऱ्यांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे निश्‍चित केली आहेत. अमेरिकन पत्रकारितेच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आस्थापनेत (प्रि - ऍम्बल) पत्रकाराच्या तत्त्व निष्ठेवर आत्यंतिक (integrity) भर देण्यात आला आहे. या संहितेच्या पहिल्याच कलमात सांगितले आहे की, ‘‘वार्ता मिळविणे आणि त्या पसरविणे व त्यावर मत प्रदर्शन करणे या क्रियांचा पहिला उद्देश लोक कल्याणाचा राहील. त्यांनी पुरविलेल्या माहितीच्या आधारे लोकांना त्या त्या घटनेचे मूल्यांकन करता आले पाहिजे. जे पत्रकार स्वार्थ साधनेसाठी त्यांना मिळालेल्या सामर्थ्याचा उपयोग करतात, ते स्वत:च्या व्यवसायाशीच द्रोह करीत असतात. अमेरिकेत पत्रकारितेला जे स्वातंत्र्य, घटनेने बहाल केले आहे, त्याचा उद्देश केवळ माहिती पुरविणे किंवा चर्चा घडविणे हा नाही. त्याचा उद्देश समाजात जी शक्तिकेंद्रे आहेत, त्या केंद्रांच्या अधिकार्‍यांच्या वागणुकीची ही नि:पक्षपाती चिकित्सा करणे, हा आहे.’’ भारतात मात्र पत्रकार आपली नैतिकता गुंडाळून ठेऊन आपल्या जात वर्गाचे हित संबंध जपण्यासाठी अत्यंत हीन स्तराला जातात हे अनेक प्रकरणात दिसून आले आहे. अनुसूचित जाती - जमातीच्या अत्याचारांशी संबंधित वृत्त, सामाजिक न्यायाच्या बाबी, ब्राह्मणेत्तर नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे इत्यादी बाबतीत पत्रकारांचा ब्राह्मण वर्चस्ववादी जातीय दृष्टीकोन अत्यंत बटबटीत रूपाने पुढे आल्याचे दिसते.

• भारतीय पत्रकारितेतील अनैतिकता -

‘‘वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य (Freedom of the Press) हे खर्‍या अर्थाने लोकांचे स्वातंत्र्य आहे. सरकारी असो अथवा खाजगी, क्षेत्राकडून, लोकांवर होणार्‍या आघातांपासून त्या लोक स्वातंत्र्याचे रक्षण पत्रकारितेला करता आले पाहिजे. आपण देत असलेली बातमी सत्य आहे आणि अचूक आहे याची सर्वतोपरी खबरदारी घेतली गेली पाहिजे. पत्रकार, त्यांच्या बातमीचे जे स्रोत आहेत, त्यांच्या दडपणा खाली नसले पाहिजेत.’’ ही तत्वे अमेरिकन व युरोपीय वृत्तपत्राच्या नैतिक कर्तव्यात समाविष्ट आहेत. ही तत्त्वे ध्यानात घेऊन वेगवेगळ्या वृत्तपत्रांनी आपल्या बातमीदारांसाठी काही पथ्येही सांगितलेली आहेत. त्यातले एक पथ्य हे की, बातमीदारांनी भेट वस्तू स्वीकारू नयेत. वृत्तपत्रांनी, त्यांच्या बातमीदारांच्या प्रवासाचा व भोजनाचा ही खर्च केला पाहिजे. ब्रूस स्वेन या लेखकाने लिहिलेल्या ‘रिपोर्टर्स एथिक्स’ (वार्ताहरांचे नीति शास्त्र) या पुस्तकात, निरनिराळ्या वृत्तपत्रांनी आपल्या संपादकांसाठी निर्धारित केलेली तत्त्वे, परिशिष्टात दिलेली आहेत. शिकागो सन् टाईम्स, डेस मॉईनेस रजिस्टर, ट्रिब्यून, लुई व्हिले कोरियर जर्नल, स्क्रिप्स हॉवर्ड न्यूज पेपर्स, वॉशिंग्टन पोस्ट इत्यादी वृत्तपत्रांनी आपल्या कर्मचार्‍यांसाठी केलेल्या नियमांचा आणि पथ्यांचा त्यात अंतर्भाव आहे. यातील काही बाबी खालील प्रमाणे आहेत.

१) मोकळ्या मनाने आणि पूर्वग्रह न बाळगता काम करण्याची त्यांनी (वार्ताहरांनी) प्रतिज्ञा घेतलेली आहे.

(२) ज्यांचा आवाज निघत नाही त्यांचे म्हणणे जाणून घेणे, उद्धटपणाच्या कृती टाळणे आणि सभ्यतेने व मोकळेपणाने जनतेला समोरे जाणे ही त्यांची जबाबदारी आहे.

३) आमचा खर्च आम्ही करणार. वृत्तांच्या स्रोतांकडून कोणती ही भेटवस्तू घेणार नाही, आम्ही फक्त आमच्या वृत्तपत्राशी बांधलेले आहोत, सत्ताधारी, कार्पोरेट किंवा इतर कुणाशीही आमची बांधीलकी नाही.

४) चूक होऊ नये, याची आम्ही काळजी घेऊ. ती झालीच तर ती लगेच दुरुस्त करू. अचूकता हे आमचे लक्ष्य आहे आणि निष्कपटता हा आमचा बचाव आहे.

भारतातील राष्ट्रीय म्हणविणाऱ्या एक ही वृत्तपत्रांनी किंवा वृत्त वाहिनीने आपल्या कर्मचार्‍यांसाठी अशी आचार संहिता तयार केलेली नाही. यामुळेच पत्रकारांनी लाच घेऊन बातम्या देणे, खंडणी वसूल करणे, मंत्री, लोक प्रतिनिधी, उद्योग पती, नोकर शहा यांच्या कडून भेट वस्तू स्वीकारणे, ओली पार्टी घेणे हे प्रकार भारतीय पत्रकारितेचे अविभाज्य भाग बनलेले आहेत.

• ब्राह्मण - बनियांचे हित जपणे हा भारतीय पत्रकारितेचा उद्देश -

सद्यस्थितीत भारतीय पत्रकारितेने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची व प्रधान मंत्री मोदी तसेच भाजपाध्यक्ष अमित शहा यांची जी चाटू कारिता चालविली आहे ती पत्रकारितेच्या स्वतंत्र अस्तित्वाला नाकारणारी,अत्यंत उबग आणणारी आहे. सरकार व वृत्तपत्रे यांचे संबंध कसे असावेत यावर प्रसिद्ध अमेरिकन पत्रकार बिल मॉयर्स, यांनी ‘प्रेस अँड गव्हर्नमेंट’ या निबंधात अत्यंत मौलिक विचार व्यक्त केले आहेत. बिल मॉयर्स, हे जॉन केनेडी तसेच लिंडन जॉन्सन या अमेरिकेन अध्यक्षाचे प्रमुख प्रसिद्धि अधिकारी होते. पुढे त्यांनी ‘न्यूज् डे’ या नावाचे स्वतःचे वृत्तपत्र काढले. ते लिहितात - ‘‘पत्रकारिता आणि सरकार हे परस्परांचे मित्र नाहीत; प्रतिस्पर्धी आहेत. दोघांचा ही उद्देश लोकहित हाच असला पाहिजे. यात प्रत्येकाचे विशिष्ट स्थान आहे. आपल्या संविधानानेच राष्ट्रपतीचे स्थान निर्माण केले आहे, तर त्याच संविधानाने पत्रकारितेला संरक्षण दिलेले आहे. पत्रकारांनी हे ध्यानात घेतले पाहिजे की, राष्ट्रपतीला राज्य करण्याचा जनादेश मिळालेला आहे आणि राष्ट्रपतीने हे मान्य केले पाहिजे की, पत्रकारितेला, आपण कसे राज्य करतो हे शोधून काढण्याचे स्वातंत्र्य आहे. दोन्ही कशा रीतीने कार्य करतात, यावर जी आपली मुक्त आणि स्वतंत्र व्यवस्था (लोकशाही) आहे, तिची परिणामकारकता अवलंबून आहे.’’ (Mass Media in a Free Society, Oxford & IBH Publishers) भारतीय संदर्भात बिल मॉयर्स यांचा दृष्टीकोन तपासला तर असे दिसून येते की, भारतीय वृत्तपत्रांनी आपले स्वातंत्र्य सत्ताधाऱ्यांच्या चरणावर अर्पण केले आहे तद्वतच भारतीय पत्रकारितेचा उद्देश लोकहित हा नसून आपल्या ब्राह्मण - बनिया जात भाईंचे हित जपणे आहे.

●◆●

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
आयुष्यमान सुनील खोब्रागडे
(संपादक : दैनिक जनतेचा महानायक, मुंबई)

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

═══════════════════════

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• YATIN JADHAV :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा

धन्यवाद ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा