● ...आणि आदिवासी जागृत झाला.
तसा मी मुर्ती पुजेच्या विरोधातच आहे. पण केवळ मुलांच्या हट्टा खातर मी ह्या वेळेस दिड दिवसाचा गणपती घरी आणला होता. मुलांनी अगदी मन लावून चांगली सजावट केली होती. कधी नव्हे तो घरात अगरबत्ती घमकार घरात घुमत होता. मी पण बाजारातून गणपतींच्या गाण्यांच्या व कथांच्या CDs विकत आणल्या होत्या. 'पंचांग प्रमाणे' सकाळी दहाच्या आत 'मुर्ती प्रतिष्ठापना' करायची असल्याने आम्ही ती नऊ वाजताच करून घेतली होती.
व्यवसायाने मी विमा एजंट असल्यामुळे माझा प्रत्येक क्षेत्रातील माणसांशी संबध येतोच. म्हणून ट्रेन मधील तसेच इतर मित्र मंडळींना मी गणपती निमित्ताने घरी येण्याचे आमंत्रण - निमंत्रण दिले होते. दुपारी बारा वाजल्या नंतर मित्र मंडळी येण्यास सुरुवात झाली. प्रत्येकाच्या हातात केळी, सफरचंद, संत्री, मोदक पाहून एखाद्या इस्पितळात रोग्याला भेटायला जाताना माणसं जशी जातात तसे वाटत होते. जणू काही आज खरोखरच गणपतीचा जन्म झालाय की काय? असे ही क्षणभर वाटले. दर्शन घेतल्या नंतर सर्व जण एकत्र बसून चहा पान घेत होते, तेव्हाच माझ्या मुलाने मी आणलेली DVD लावली होती आणि तो ती मन लावून बघत होता. त्याला लागलेली समाधी पाहून आमचे ही त्या गाण्याकडे लक्ष गेले. ते गाणे होते.
"मळाचा गणपती पार्वतीने केला."
गाण्याची मध्यवर्ती संकल्पना अशी होती की, एकदा शंकर जंगलात गेला असतो आणि पार्वती घरी एकटीच असते. तिला अंघोळीला जायचे असते पण घराबाहेर पहारा देण्यासाठी कुणीच नसते म्हणून मग ती तिच्या अंगावरील मळ काढून त्याची मुर्ती बनविते व त्यात जीव टाकते. आणि त्या चिमुकल्यास बाहेर पहारा देण्यास सांगते. तेवढयात आपले काम आटोपून शंकर घरी येतो तेव्हा त्याला घरात प्रवेश करण्यापासून तो गणपती रोखतो. मग त्यांच्यात तुंबळ युद्ध होते आणि शंकर गणपतीचा शिरच्छेद करतो. इकडे अंघोळ उरकून पार्वती बाहेर येते आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जीवाला बघून हंबरडा फोडते. आणि माझ्या पोटच्या गोळ्याला जिवंत करून द्या असा शंकराजवळ हट्ट करते. मग शंकर जंगलात जाऊन एका हत्तीचे शिर कापून आणतो आणि त्या धडास बसवतो व ते धड जिवंत होते. अशी ही कथा. गाणे संपले तरी सर्व जण शांतच होते. ताटातील फराळ तसाच होता. तेवढयात आमच्यातील पेशाने वार्ताहर असलेला एकजण मध्येच ओरडला. ह्या साल्या मिडीया वरच केस करायला पाहीजे.
आज जग विज्ञान युगात जगत असताना असले अज्ञानाचे चित्रीकरण करून दाखविले जाते आणि लहान- थोर हे पाहतात. यातून कसले डोमल्याचे संस्कार होणार. तेवढ्यात पेशाने डाॕक्टर असलेल्या मित्राने त्याचीच री ओढली. तो म्हणाला की - पहीली गोष्ट म्हणजे पार्वतीच्या अंगावर एवढा मळाचा थर झाला होता की, त्यापासून एखादी मुर्ती तयार व्हावी हे किती लज्जास्पद आहे? साधी गणपतीची तीन फुटांची मुर्ती तयार करायची म्हंटले तरी दहा किलो माती लागेल. मग तिच्या अंगावर जमलेल्या मळाची कल्पना न केलेलीच बरी. तसेच अशा अस्वच्छतेमुळे त्वचेचे खरूज, नायटा, गजकर्ण या सारखे त्वचा रोग उद्भवतात ते वेगळेच. यातून एक आई आपल्या मुलांना कसले स्वच्छतेचे धडे देणार? तसेच माझ्या मित्राच्या वडीलांच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांच्याच रक्त गटाशी मिळता - जुळता रक्तगट शोधताना आमच्या नाकी नऊ आले होते. आणि येथे एका माणसाला हत्ती सारख्या प्राण्याचा रक्तगट कसा काय जुळला हे समजण्या पलीकडचे आहे. तसेच शिर धडावेगळे झाल्यावर मेंदूची क्रिया बंद पडते तर मग पुन्हा जिवंत होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही?
तेवढ्यात पेशाने वकील असलेला माझा मित्र तर "आॕर्डर... आॕर्डर..." म्हणून चक्क टेबला वरच चहाचा कप आपटू लागला. आता त्याची बारी होती. सर्व प्रथम पार्वती वरच एका अल्पवयीन मुला कडून रखवालदाराचे काम करून घेतल्या बद्दल बाल कामगार कायद्यातंर्गत कारवाई करण्याची मागणी केली. तसेच शंकरावर सदोष मनुष्य वधाचा एक आणि गणपतीचे जीव वाचविण्यासाठी एका निष्पाण प्राण्याचा दुसरा बळी म्हणजेच पशु वधाचा असे दुहेरी हत्याकांडाचे आरोप कायम करायला पाहीजेत, अशी मागणी केली. प्राणी मित्र संघटनेचा सदस्य असलेल्या एका मित्राने तर या गाण्याचे चित्रीकरण करणाऱ्या कंपनी विरोधात कोर्टात याचिकाच दाखल करणार असे ठणकावून सांगितले.
आता पर्यंत सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणारा आमच्यातीलच पेशाने शिक्षक असलेला मित्र बोलू लागला. आज काल विविध वाहीन्यांवर जे काही दाखविले जाते त्याचे जवळ जवळ अनुकरण केले जाते. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास धूम स्टाईलने चोऱ्या करणे, दरोडे टाकणे, मुलींना त्रास देणे, अपहरणाच्या घटना अशी नाना प्रकारची उदाहरणे देता येतील. आपण पुस्तकातून मुलांना प्राणी मात्रांवर दया करा, असे उपदेश करतो. परंतु आपल्या मुलाचे प्राण परत आणण्यासाठी एका निष्पाप मुक्या जीवाचा बळी घेणे म्हणजे क्रुरतेचा आणि स्वार्थीपणाचा कळसच म्हणावा लागेल. उद्या एखाद्या मुलाने घरातील कुणी वयस्कर व्यक्ती दगावली आणि तिला पुन्हा जिवंत करण्यासाठी घरातीलच पाळत्या कुत्र्याचे मुंडके छाटून लावायचा सल्ला दिला तर नवल वाटायला नको. आणि जर मेलेला जीव पुन्हा जिवंत करण्याची किमया शंकराला अवगत होती तर मग त्याने गणपतीचेच मुंडके त्याला परत लावून का नाही जिवंत केले?
आमचे चहाचे कप उचलायला आलेली माझी सौभाग्यवती आमचे सर्वांचे संभाषण शांतपणे ऐकत होती. आता तिने ही तिचा प्रश्न उपस्थित केला की, जर एका मातीच्या गोळ्यात जीव टाकण्या एवढे सामर्थ्य जर पार्वतीत होते तर मग तिने गणपती ऐवजी एक मजबूत दरवाजा असलेले न्हाणीघरच का नाही बनविले? सगळा प्रश्नच सुटला असता आणि पुढील महाभारत घडलेच नसते. तिचे ही बरोबरच होते. सर्वांनी आपापल्या नजरेतून या गाण्याची समिक्षा केल्यावर सगळे जण आपापल्या घरी गेले.
माझा मुलगा मात्र झालेल्या त्या संभाषणा नंतर अगदीच गप्प झाला होता. अगदी दुसऱ्या दिवशी विसर्जनाला जाताना ही तो गप्पच होता. जणू काही त्याचा उत्साहच मावळला होता. गणपती विसर्जन करताना मात्र तो मला लाख मोलाचे बोलला - "बाबा आत्ता कळतयं की तुम्ही मुर्ती पुजेच्या विरोधात का होते ते, या काल्पनिक कथेचे न जाणो माझ्या सारखे अजून किती जण बळी पडले असतील. आपल्या मदतीला सदैव धावून येणारा डोंगऱ्या देव, निसर्ग देव हेच खरे. यापुढे कुठल्याही देवाची मुर्ती आपल्या घरात आपण ठेवायची नाही."
मी मुर्तीचे विसर्जन केले. एकीकडे मुर्ती पाण्यात भिजत होती. तर दुसरीकडे आदिवासी संस्कृती माझ्या घरात रुजत होती.
●◆●
आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
संतोष द. मुंडे (एक जागृत आदिवासी बांधव)
••◆●◆•◆●◆•●◆●•◆●◆•◆●◆••
धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••
एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA
• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU
• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123
••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••
• YATIN JADHAV :
9967065953 WhatsApp number
सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा
धन्यवाद ।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा