बुधवार, ३० ऑगस्ट, २०१७

● बौद्ध धम्म म्हणजे हिंदू धर्माच्या विरोधाचे साधन नव्हे.

● बौद्ध धम्म म्हणजे हिंदू धर्माच्या विरोधाचे साधन नव्हे.

लेख -
आयुष्यमान सुनील खोब्रागडे
(संपादक : दैनिक जनतेचा महानायक, मुंबई)

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

बौद्ध धम्मात सांस्कृतिक प्रदूषण होत आहे असा टाहो फोडत, बौद्धांनी अमुक करू नये, तमुक करू नये, असे वागावे,असा पोशाख करावा, अमुक प्रकारचे सण पाळावेत, स्वतःला अमुक नावाने संबोधावे अशा प्रकारचे फतवे काढणाऱ्या तथा कथित कट्टर बौद्धांची जमात अलीकडे सोशल मीडियातून धुमाकूळ घालताना दिसते. यापैकी काहींनी कुठल्या तरी मासिकात, वृत्तपत्रात फुटकळ स्वरूपाचे लेख लिहून तर काहींनी लहान मोठ्या पुस्तिका प्रकाशित करून आपल्या प्रिय गृहितकांना लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे.महाराष्ट्रातील या तथा कथित कट्टर बौद्धांची आपल्या धम्माप्रतीची निष्ठा मान्य करून ही अशा प्रकारचा कट्टरतावाद आंबेडकरवादी अनुयायांमध्ये पसरविण्याची त्यांची धडपड म्हणजे धर्मांतरित बौद्धांना विचार न करणारा समाज बनविण्याचा प्रयत्न वाटतो.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना आणि विशेषतः तत्कालीन अस्पृश्य समाजाला वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ समाज म्हणून घडविण्याचा प्रयत्न केला. बौद्ध धम्माकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन हिंदू धर्माला पर्याय देणारा कर्मकांडी धर्म म्हणून नव्हे तर प्रज्ञावंत, करुणामयी, द्वेषरहित, क्षमाशील आणि सजग माणूस निर्माण करण्यासाठी सहायक धर्म या स्वरूपाचा होता. बुद्ध की कार्ल मार्क्स? या आपल्या सुप्रसिद्ध निबंधात त्यांनी बौद्ध धर्म हा प्रज्ञावंत, करुणामयी, द्वेषरहित, क्षमाशील आणि सजग असा विचार करणारा माणूस घडविण्याची क्षमता असलेला एकमेव धर्म आहे हे बुद्धाच्या प्रवचनांचा हवाला देऊन पुराव्यानिशी स्पष्ट केले आहे. बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथात त्यांनी बुद्धाच्या धम्माचे प्रयोजन,तत्वज्ञान आणि व्यवहार यांची पारंपारिक बौद्ध धम्माच्या अनुयायांना न पटणारी चिकित्सक मांडणी केली आहे. तरीही बाबासाहेबांच्या या दिशादर्शक लिखाणाकडे दुर्लक्ष करून बौद्ध धम्माला हिंदू किंवा अन्य धर्माच्या विरोधाचे एक साधन या स्वरुपात उभे करणे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म क्रांतीची धार बोथट करणे होय. बाबासाहेबांच्या धम्माचे हे स्वरूप समजून न घेता बौद्धांनी स्वतःला दलित म्हणू नये,अमुक - तमुक सण साजरे करू नये, अमुक पद्धतीनेच विवाह विधी करावा, दर पौर्णिमेला उपवास करावा, दर रविवारी शुभ्र पोशाख घालून विहारात जावे, पाली गाथांचे पठण करावे, भिक्खुच्या माध्यमातून विवाह, गर्भ संस्कार,नामकरण, मृत्यु संस्कर,गृह पूजा, परित्राण पाठ इत्यादी कर्मकांड करावेत हे जो करीत असेल तोच खरा बौद्ध नाहीतर तो आंबेडकरी विचारांचा नाही असा जो प्रचार या तथा कथित कट्टर बौद्धांकडून चालविला जातो आहे तो महाराष्ट्रातील आंबेडकर अनुयायी बौद्ध जनतेच्या हिताचा नक्कीच नाही.

स्वतःला बौद्ध धर्माचे म्हणविणारे बरेच लोक हिंदू देव देवतांची पूजा करतात, हिंदूंचे सण - उत्सव साजरे करतात, हिंदू प्रथा आणि परंपराचे पालन करतात ही बाब खरी आहे. अशा लोकांमुळे बौद्धांची स्वतंत्र ओळख किंवा स्वतंत्र संस्कृती निर्माण होत नाही या विषयीची खंत बौद्धामधील सुशिक्षित तरुण, विविध संघटनांचे कार्यकर्ते, चळवळीतील वयोवृद्ध कार्यकर्ते इत्यादी सर्वांकडूनच वेळोवेळी व्यक्त केली जाते. मात्र यासाठी जो नकारात्मक प्रचार (हे करू नका, ते करू नका, असे आचरण करू नका इ.) केला जातो त्यातून बौद्धांची स्वतंत्र ओळख किंवा स्वतंत्र संस्कृती निर्माण होईल हा माझ्या तरी दृष्टीने भ्रम आहे. बुद्धाने आपल्या धम्माची उभारणी करताना समाजाला नव्हे तर व्यक्तीला केंद्रस्थानी मानले आहे. व्यक्तीच्या चेतनेचा स्तर (Level Of Consciousness) अधिकाधिक उच्चतम पातळीवर वाढवीत नेण्यास बुद्धाने आत्यंतिक महत्व दिले आहे. व्यक्तीमध्ये परिवर्तन झाले तर सामुहिक जन चेतनेच्या स्तरामध्ये वाढ होईल आणि अपेक्षित सामाजिक परिवर्तन घडून येईल. जर व्यक्तीच्या चेतनेचा स्तर (Level Of Consciousness) उंचावला नाही तर किती ही कठोर फतवे जरी केले तरी अपेक्षित सामाजिक परिवर्तन घडून येण्याची शक्यता नाही.आता मूळ प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे व्यक्तीच्या चेतनेचा स्तर वाढविण्याची कार्यपद्धती कोणती असावी? ही कार्य पद्धती रूढ करणे म्हणजे बौद्धांची स्वतंत्र ओळख किंवा संस्कृती निर्माण करणे होय. यासाठी प्रथम समाज (Society) आणि जनता (People) या संकल्पना व त्यांचे व्यक्ती (Individual) या घटकाशी असलेले नाते समजून घेतले पाहिजे.

अनेक व्यक्तींच्या एकत्र येण्यातून जनता बनते मात्र समाज बनत नाही. समाज ही एक परस्परावलंबी व्यक्तींची संरचना किंवा व्युह आहे. या संरचनेतील प्रत्येक व्यक्तीला निश्चित अशी एक भूमिका ठरवून दिलेली असते. या भूमिकांचा मिळून समाज बनतो. भूमिका कशा ठरतात? तर भूमिका या अपेक्षांपासून ठरतात.तुम्ही अमुक असाल तर तुमच्याकडून अशी-अशी अपेक्षा आहे.तुम्ही भिक्खू असाल तर तुमच्याकडून या.. या.. अपेक्षा आहेत. उपासक, बौद्धाचार्य असाल तर तुमच्याकडून अशा... अशा... वर्तणुकीची अपेक्षा आहे. या अपेक्षा कोण करतात? तर व्यक्तीच अपेक्षा करतात. या अपेक्षांचा आधार काय तर पूर्वापार चालत आलेले संकेत. (Convention) संकेत कोणी निर्माण केले? तर कोणा तरी ज्ञात किंवा अज्ञात व्यक्तीनेच संकेत निर्माण केले.या संकेतांना आधार काय? प्रचलित दृष्टीकोनातून संकेतांना आधार असलाच पाहिजे असे आवश्यक नाही. मात्र बौद्ध दृष्टीकोनातून आणि बौद्ध तत्वज्ञानाच्या आधारे या प्रश्नाचे उत्तर शोधल्यास प्रज्ञावंत, करुणामयी, द्वेषरहित, शीलवंत आणि सजग असा माणूस घडविणे व त्याद्वारे अखिल विश्वाचे कल्याण साधणे, हाच संकेताचा आधार आहे. संकेत हे नित्य आचरणातून वारंवार अवलंबिल्याने संस्कार बनतात. नित्यनेमाने मनावर पडलेले संस्कार हे व्यक्तीच्या स्वभावाचाच एक भाग बनतात.अशा प्रकारे व्यक्तीची जाणीव नियंत्रित करण्याचे सामर्थ्य संस्कारांना प्राप्त होते. या नियंत्रित जाणीवेमुळे समाजाला एक प्रकारे स्वतःचे वजन प्राप्त होते.परंतु समाज हा जड (बौद्ध परिभाषेत नामरूप) व व्यक्ती या चैतन्यमय असल्याने व्यक्ती समाज घडवू शकतात.बिघडवू शकतात. समाजाची पुनरर्चना करू शकतात. हे लक्षात घेतले तर समाजासाठी व्यक्ती नाही तर व्यक्तींसाठी समाज आहे. समाजाकडे व्यक्तीच्या चेतने मध्ये परिवर्तन करण्याची शक्ती नसते. ही बाब लक्षात घेता बौद्धामधील काही गटांनी अथवा झुंडीनी फतवे काढून परिवर्तन घडून येणार नाही हे समजून घेतले पाहिजे.

व्यक्तीच्या चेतने मध्ये परिवर्तन करण्याची क्षमता व्यक्तीतच असू शकते. मात्र यासाठी जीवन विषयक विशेष दृष्टीकोण विकसित होणे गरजेचे असते.बौद्ध धर्माचा प्रारंभ, विकास आणि ऱ्हास याचा इतिहास पाहिला तर बुद्ध काळातील राजे, व्यापारी, आणि श्रेष्ठी अशा जीवन विषयक विशेष दृष्टीकोण बाळगणाऱ्या वर्गाने सर्व प्रथम बुद्धाचा धम्म आणि विनय समजून घेतला आणि तो आचरणात आणला. स्वतःमधील सुप्त शक्तीचा संपूर्ण विकास करा! 'अत्त दीप भवः' हे बुद्धाचे आवाहन स्वीकारून ते अर्हत पदाला पोहोचले. सामान्य जनतेने या वर्गाचे अनुकरण करून आपले नैतिक आचरण सुधारले. सम्राट अशोकाने प्रथम स्वतः बुद्धाचा धम्म आणि विनय समजून घेतला आणि तो आचरणात आणला. अशोकाच्या मंत्रीगण, सरदार - अमात्य आणि प्रजेने त्याचे अनुकरण केले. पुढे काळाच्या ओघात बौद्ध धम्माचा आश्रयदाता अभिजन वर्ग तसेच भिक्खु वर्ग धम्म आणि विनय सोडून जस जसा भ्रष्ट, स्वार्थी, मठवासी झाला तस तसा बौद्ध धम्माचा समाजावरील प्रभाव ओसरत गेला व धम्माचा ऱ्हास झाला. आधुनिक काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः मधील सुप्त शक्तीचा संपूर्ण विकास करा! 'अत्त दीप भवः' हे बुद्धाचे आवाहन स्वीकारून ते स्वतः परिपूर्ण बौद्ध झाले. त्यानंतरच इतरांना ते बुद्धाचा धम्म स्वीकारा हे आवाहन करू शकले.म्हणूनच बौद्ध धम्माचा अधिकाधिक प्रचार - प्रसार व्हावा अशी इच्छा बाळगणाऱ्या बौद्ध जणांनी सर्व प्रथम बुद्धाचा धम्म आणि विनय हा आपल्या स्वतःच्या संस्काराचा भाग बनविला तरच इतरेजन त्यांचे अनुकरण करतील.

वरील विवेचन पाहिल्या नंतर बौद्धांची स्वतंत्र ओळख किंवा स्वतंत्र बौद्ध संस्कृती निर्माण करण्यासाठी कोणत्याही धर्माच्या रूढी,परंपरा पळू नका, सण - उत्सव साजरे करू नका, देवी - देवताचे पूजन करू नका असा नकारात्मक प्रचार करण्याची आवश्यकता भासणार नाही. स्वतः मधील सामर्थ्याचा विकास आणि प्रकटीकरण करण्यासाठी एखादा भिक्खू, बौद्धाचार्य यासारख्या मध्यस्थाची आवश्यकता नसते. त्याचप्रमाणे प्रतीक पूजा, गाथा पठण, व्रत बंधन इत्यादिंची ही आवश्यकता नसते. स्वतः मधील सामर्थ्याचा विकास आणि प्रकटीकरण करण्याची प्रक्रिया पूर्णपणे व्यक्तीनिष्ठ स्वरुपाची आहे. स्वतःच्या अंतरंगाचा ठाव घेणे, स्वतः चा स्वतः च शोध घेऊन स्वतः मधील माणूसपणाची व्याप्ती मोजणे यातूनच स्वतः मधील सामर्थ्याचा विकास आणि प्रकटीकरण करणे व्यक्तीला शक्य होऊ शकते. निरंतर अभ्यासाने व्यक्तीला स्वतः मधील गुण दोषांचा शोध घेऊन आपल्या चेतनेचा स्तर (Level Of Consciousness) अधिकाधिक उच्चतम पातळीवर वाढवीत नेता येऊ शकतो. हा निरंतर अभ्यास कोणी ध्यान किंवा विपश्यनेच्या मार्गाने करू शकतात तर कोणी विवेकशील चिंतनाच्या माध्यमातून करू शकतात. बुद्धाने स्वतः यासाठी झान (संस्कृत भाषेत ध्यान) मार्गाचा अवलंब करून चेतनेचा सर्वोच स्तर (बुद्धत्व प्राप्ती) गाठला होता. व्यक्तीच्या चेतनेचा स्तर जस जसा उंचावेल तस तसा व्यक्ती आर्य अष्टांगिक मार्गाचे पालन करू लागेल, या मार्गाच्या पालनाच्या आड येणाऱ्या दहा आस्रवांना पार करू शकेल आणि दहा पारमिताना आपल्या संस्कारांचा भाग बनवेल.असा नैपुण्य प्राप्त व्यक्तीच बौद्ध बनू शकतो. मात्र यासाठी प्रचंड निग्रह, मानसिक क्षमता आणि धाडस लागते. हे धाडस कमावण्याची शक्ती ज्यांच्याकडे असेल तोच बौद्ध बनू शकतो. केवळ माझ्या बापजाद्यानी धर्मांतर केले होते म्हणून किंवा मी भिक्खुच्या हातून अथवा अन्य कोणाच्या हातून दीक्षा घेतली आहे म्हणून मी बौद्ध आहे असे म्हटल्याने किंवा दर रविवारी विहारात जातो, परित्राण करतो, गाथा पठण करतो, बौद्धांच्या तीर्थ स्थळांना भेटी देतो, जन्म, विवाह, नाम करण बौद्ध पद्धतीने करतो म्हणून कोणी बौद्ध बनू शकत नाही. असे बौद्ध केवळ सरकारी जणगणनेपुरते संख्यात्मक बौद्ध असू शकतात. बाबासाहेबांना अपेक्षित गुणात्मक दृष्ट्या उन्नत बौद्ध नाही.

●◆●

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
आयुष्यमान सुनील खोब्रागडे
(संपादक : दैनिक जनतेचा महानायक, मुंबई)

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

═══════════════════════

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• YATIN JADHAV :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा

धन्यवाद ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा