गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०१७

● बौध्दांनी हातचे सोडून पळत्या मागे लागू नये.

● बौध्दांनी हातचे सोडून पळत्या मागे लागू नये.

लेख -
सतीश कांबळे : कोल्हापुर

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

सोशल मिडीया वापरणाऱ्या आंबेडकरी बांधवांना माझी विनंती आहे. प्रत्येक समाजाने आप आपले महापुरुष वाटून घेतलेत. आपणच कुठल्याही समाजाचा विनाकारण उदोउदो करणे सोडायला हवे. माझे हे बोलणे कदाचित आवडणार नाही, पण सत्य आहे. गरज नसताना आपण भावुक होत असतो, हा पण माझा तो पण माझा हे चूक आहे. आज वरचा ईतिहास पाहिला तर बौध्दांना संघर्षा शिवाय काही मिळत नाही. आपण उदार होवुन दुसऱ्यांसाठी संघर्ष करतो, पण ते लोक नंतर आपल्या वरच उलटतात. कोणतीही सामाजिक घटना पहा. जिथे आपला काहीच संबंध नसतो तिथे ही आपण रिऍक्ट होतो व धावती गाढवं अंगावर घेतो. मला वाटते की ज्याची लढाई त्यानेच लढावी. आपण करतो काय की दुसऱ्यांना दळुन देतो. नको असलेले विषय चघळत राहतो. आरक्षण, ऍट्रोसिटी हे केवळ आपल्याकरता आहे का? तरीही या विषयी आपण लोक कमालीचे प्रतिक्रीयावादी बनतो. विरोधकांचे टार्गेट बनतो. जे ईतर आरक्षण घेतात ते आपली मजा पाहत असतात. गोळीला आपण व पोळीला सगळे असा सगळा मामला असतो. हे कुठे तरी थांबायला हवे. आरक्षणाची गरज केवळ आपल्यालाच आहे का? ऍट्रोसिटीची गरज केवळ आपल्यालाच आहे का? जर केवळ आपल्यालाच गरज असेल तर त्यावेळी आपल्या साथीला कोण असते का? कधी कुठल्या समाजाने बौध्दांना पाठिंबा म्हणुन एखादा मोर्चा काढलाय का?निदर्शने केली आहेत का? तेव्हा आपण एकटे लढत असतो. बाकीचे फक्त आपली मजा घेत असतात. परोपकार करावा पण परोपकारासाठी आपले आयुष्य खर्च करु नये.

मी माझा अनुभव सांगतो. चळवळीतील ईतर समाजाच्या लोकांना मदत केली तेच आज आपल्या समाजा विषयी निट बोलत नाहीत. बाबासाहेब, बुध्द व धम्मा विषयी तिरस्कार बाळगतात. आपल्याला गरज असते तेव्हा ते टांग वर करतात. हा माझा अनुभव आहे. आपण परोपकारी गंपु होणं सोडायला हवे. आपल्या प्रश्नांबद्दल आपल्यालाच जर संघर्ष करायचा आहे तर मग दुसऱ्यांची मढी घेवुन रुदाली का बनायचे? माझा हा विचार काही लोकांना स्वार्थीपणाचा वाटेल, याचा राग ही येईल. काहींना वाटेल की आपण जागृत आहोत म्हणुन त्यांच्या प्रश्नांवर रिऍक्ट होतो, त्यांना मानसिक बळ मिळण्यासाठी त्यांचा संघर्ष आपण करतो पण तुम्ही कधी ऑब्झर्व्ह केलेय का? जेव्हा एखाद्या समाजाच्या प्रश्नांविषयी आपण रस्त्यावर येतो व नंतर तो प्रश्न निकाली निघाल्या वर ते लोक त्याची जाण ठेवतात का? मंडल आयोगापासुन किंवा त्या आधीच्या प्रश्नांबाबत ही बारकाईने तपासा. बघा कधी कुठला समाजाने आपल्या मदतीची जाण ठेवली आहे का?

समाज व्यवस्थेशी, जातीयतेशी, अन्याय, अत्याचार, बलात्कार व ईतर प्रश्नांवर रिऍक्ट होण्याचा आपण ठेका घेतला नाही. सहानुभूती ठेवा पण त्याला ही मर्यादा असू द्या. सहानुभूती या शब्दामुळे आपले खुप नुकसान झाले आहे. नको तिथे, नको त्याला, नको तितकी सहानुभूती देवुन आपण विरोधकांच्या रडार वर येतो. तसे ही आपण लोक संख्येने कमी आहोत. आपण सरकार बदलु शकत नाही की सरकार मध्ये कोण लोक असावेत हे पण ठरवु शकत नाही. जितके आपले पक्ष आहेत त्यातुन आपण एक खासदार निवडून आणु शकलो नाही गेल्या काही वर्षात आपल्यातील काही पक्ष व नेते विरोधी गोटात आहेत. तिथुन त्यांना मोक्याच्या जागा भेटतात. ते फायद्यात असतात. तिथे त्यांना आवश्यक असणारे बुस्टर मिळत असते. कधी पैशा बाबतीत तर कधी सत्तेच्या वाट्याच्या स्वरुपात, पण ते पुरेसे आहे का? तशी प्रलोभने म्हणजे कुत्र्याच्या पुढे टाकलेल्या हड्डी सारखे असते. ते चघळणारे महान आहेत. असो तो विषय वेगळा आहे. जो वेळ, श्रम, पैसा आपण ईतरांच्या भानगडी निस्तारण्यात वाया घालवतो ते सगळे आपण आपल्या समाजासाठी वापरु या. आपण जातीसाठी माती खावी असे म्हणने नाही माझे पण आपण आपल्या समाजासाठी, ग्रंथालये, आरोग्य सेवा, नोकरी व व्यवसाय मार्गदर्शन, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन, कलागुणांची जोपासणुक यासाठी प्रयत्न करु शकतो. आपले बरेच पक्ष व संघटना अस्तीत्वात आहेत, पण कुणी ही अशा पध्दतीची कामे करताना दिसत नाहीत. पक्ष वाढीसाठी, संघटन मजबूत होण्यासाठी असे प्रयत्न होणे गरजेचे असते. चौका चौकात बॅनर लावणे किंवा बोर्ड लावणे म्हणजे समाज सेवा नव्हे. सर्वास पोटास लावणे आहे, हे शिवरायांचे वाक्य आहे. यानुसार जर काम केले तर पक्ष, संघटना का वाढणार नाही?

आपल्यातील बरेच युवक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, ग्रंथालये उभी करताना दिसत आहेत. ही एक चांगली बाब आहे. अशा प्रकारची कामे व्हायला हवीत. धम्म प्रसारासाठी खेडोपाडी जावुन जन जागृती करायला हवी. नव नवीन लोक जोडायला हवेत. तरुणांना संघटित करायला हवे. बौध्द आळीतुन बाबासाहेब, बुध्द व धम्म गावाच्या प्रत्येक काना कोपऱ्यात पोहचायला हवा. आपण तसे खुप हुशार आहोत  पण ती हुशारी अशा कामांमध्ये दाखवत नाही. ते व्हायला हवे. आज खेडोपाडी प्रत्येक जयभीम नगरात, बौध्द वस्त्यांमध्ये धम्म पोहचवणे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी काय करता येईल ते पहावे. जितके शक्य असेल तितके करत रहावे. सोशल मिडीया द्वारे जर सरकार निर्मिती होत असेल तर राज्यभरात ग्रंथ चळवळ, व्यवसाय मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन का होवु शकत नाही? केवळ ईतरांच्या समस्या, नेतृत्व, आदर्शां बाबत किती बोलायचे? आपण आपल्या समस्या सोडवुया मग बघू ईतरांकडे. बरोबर ना?

ज्यांना आपण मदत करतो तेच लोक धम्म चिकीत्सेच्या नावा खाली द्वेष करतात. "बुध्द आणि त्यांचा धम्म" कधी वाचलेलाच नसतो, तरीही त्यावर ही टिका करतात. बाबासाहेब व संविधान यावर ही टिका करतात. काही जन तर आरक्षण मुद्यावर विरोधी भूमिका मांडताना दिसतात.२२ प्रतिज्ञा कालबाह्य झाल्याचे ही म्हणतात. या सगळ्याला आपल्यातले ही काही महाभाग साथ देतात. आपल्यातील तथा कथित महान पुढारी हे पण सध्या टिकाकाराच्या भुमिकेत दिसतायत. बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा, संविधान यावर गरज नसताना सोशल मिडीया व खाजगी रित्या ही बोलताना दिसतात. या बोलण्याने आपण नकारात्मकता पसरवत असतो व विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत देत असतो याचे भान ठेवायला हवे ना, पण तसे होताना दिसत नाही. सध्या आपल्याला गरज काय हे ओळखावे. नेहमीच आपल्या विरुध्द षडयंत्र सुरु असताना आपल्यातील लोक आपलेच पाय ओढताना दिसतात. त्यांना बाजूला करायची वेळ आली आहे हे नक्की.

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
सतीश कांबळे उर्फ सतीश भारतवासी
(लेखक, विचारवंत एवं युवा मार्गदर्शक)

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

धम्म प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

═══════════════════════

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• YATIN JADHAV :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा

धन्यवाद ।

1 टिप्पणी: