मंगळवार, ११ डिसेंबर, २०१२

तीर्थ



तीर्थकुंडात लघुशंका करणाऱ्या बडव्याला शिक्षा

पंढरपूर, दि. ५ (प्रतिनिधी) - श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील तीर्थकुंडात लघुशंका करणाऱ्या गोपाळ बडवे (वय ५५, रा. बडवे गल्ली, पंढरपूर) याला येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी.डी. सुभेदार यांनी तीन महिन्यांची साधी कैद, १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.


राज्याची आध्यात्मिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपुरात १५ मे २००३ रोजी घडलेल्या या प्रकरणाने खळबळ उडाली होती. गोपाळ बडवे हा १५ मे २००३ रोजी मंदिरात झोपण्यासाठी आला होता. रात्री मंदिर बंद झाल्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे काही कर्मचारी स्वच्छतेची कामे करीत होते. रात्री १.२० वा. गोपाळ बडवे हा मंदिरातील गोमुख या तीर्थकुंडाजवळ लघुशंका करीत होता. मंदिर समितीचे कर्मचारी माणिक यादव यांनी हा प्रकार पाहिला. यानंतर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना बोलावून गोपाळ बडवेला ताब्यात घेतले. दुसऱ्या दिवशी या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली. वारकरी संप्रदायातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. विविध सामाजिक संघटनांनी निषेध करून गोपाळ बडवे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली.


यानंतर मंदिर समितीचे कर्मचारी बाळासाहेब माळी यांनी याप्रकरणाबाबत तत्कालीन प्रांताधिकारी आणि मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीवरून रमेश चव्हाण यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गोपाळ बडवे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.


यानंतर पंढरपूर न्यायालयात खटला भरण्यात आला. न्यायालयात पाच जणांच्या साक्षी नोंदविल्या. तपासी अंमलदार आर.जे. कुलकर्णी यांच्या तपासातील बाबीही तपासण्यात आल्या. बचावासाठी सुधीर बडवे याने साक्ष दिली. सरकार पक्षातर्फे अॅड. दत्तात्रय नलावडे यांनी काम पाहिले. सरकार पक्षाचा युक्तिवाद विचारात घेऊन न्यायालयाने गोपाळ बडवे याला तीन महिने कैद तर १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

दलित शब्दाची व्याप्ती कळणार कधी?


दलित शब्दाची व्याप्ती कळणार कधी?




चंद्रपूर येथील अखिल भारतीय दलित साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ४ मार्च १९८९ ला पुलंनी केलल्या भाषणातला अंश... 

आयुष्यात माणसाला निखळ माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा देणारा मंत्र मला केशवसुतांच्या ' मळ्यास माझ्या कुंपण पडणें अगदी न मला साहे ' या ओळीत सापडला. शाळकरी वयापासून आजतागायत केशवसुतांना मी अनेक वेळा भेटत आलो. माझ्याप्रमाणे तुमच्यापैकी अनेकांसाठी केशवसूत आजही गातचि बसले आहेत. वाढत्या वयाबरोबर आसपास पाहायला लागल्यावर वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाच्या मळ्याला जात, धर्म, राष्ट्रीयत्त्वाच्या भ्रामक कल्पना, देव, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, पुनर्जन्म, पूर्वजन्म, कर्मविपाक अशा नाना प्रकारची नाना कारणांनी उभारलेली असंख्य कुंपणं दिसायला लागली.

ऐहिक आणि पारलौकिक दहशतीच्या दगडांच्या भिंतीची ती कुंपणं होती. अशा या अंधा-या वातावरणात जगणा-यांच्या जीवनात वीज चमकावी, गडगडाट व्हावा, मुसळधार पाऊस कोसळून नांगरल्याविण पडलेल्या भूमीवर नवं पीक येण्याची चिन्हं दिसावी अशी अवस्था झाली. बाबासाहेबांनी एक नवा शब्द शिकवला आणि त्यातून जुनं जग उलथवण्याची शक्ती असलेलं साहित्य उभं राहिलं. तो शब्द म्हणजे ' धम्म ' . ' धम्म ' या शब्दानं समाजात माणसाचं श्रेष्ठत्व आणि ऐहिकता या सर्वात महत्त्वाच्या मूल्यांची प्राणप्रतिष्ठा केली. या नव्या जीवनमूल्यांना त्यांनी धम्म म्हटलं. बाबासाहेबांनी एका धर्माचा त्याग करून दुसरा धर्म स्वीकारला, असं झालं नाही. तर, निखळ प्रज्ञा आणि करुणेचं त्यांना जिथे अपूर्व मिश्रण आढळलं, त्या तत्त्वज्ञानाचा त्यांनी स्वीकार केला. अंधश्रद्धांवर आधारलेल्या जीवनपद्धतीकडून प्रेम आणि निर्मळ बुद्धीच्या बळावर चालणा-या जीवनपद्धतीचा त्यांनी स्वीकार केला. या बुद्धिनिष्ठ जीवनपद्धतीचं नाव ' धम्म ' असं आहे. 

बाबासाहेब हे सामाजिक शोषणाच्या पाळामुळाशी जाऊन कुदळ चालवणारे पहिले क्रांतिकारक म्हणायला हवेत. उन्मत्ताच्या टाचेखाली रगडल्या जाणा-या माणसाला माणुसकीच्या प्राथमिक हक्कांसाठी लढणारा सैनिक म्हणून उभं करणं हे एक दिव्य होतं. बाबासाहेबांनी ते करून दाखवलं. चवदार तळ्याचं पाणी सर्वांना वापरायला द्यायची घोषणा म्हणजे बाबासाहेबांनी आंधळ्या रुढी पाळणा-या अमानुषांना निखळ सुंदर माणसं बनवण्याची दिलेली एक सुवर्णसंधी होती.

दलित साहित्याचं जे सूर्यकूल आपण मानतो त्याची पहाट महाडच्या क्षितीजावर फुटली होती, असं म्हणायला पाहिजे. शरसंधानासारखं हे शब्दसंधान होतं. एका नव्या त्वेषाने पेटलेल्या कवींना आणि कथा-आत्मकथा-कादंबरीकारांनी या प्रतिमासृष्टीतून वास्तवाचं जे दर्शन घडवलं, ते साहित्यात अभूतपूर्व असं होतं. जिथे धर्म, वर्ण, वर्ग या शक्ती माणसाच्या छळासाठी अन्याय्य रीतीने वापरल्या जातात, तिथे त्या प्रवृत्तींचा नाश करायला शस्त्र म्हणून जेव्हा शब्द वापरले जातात त्या क्षणी दलित साहित्याचा जन्म होतो. त्या साहित्यिकाचा जन्म कुठल्या जातीत आणि कुठल्या धर्मात झाला याचा इथे काहीही संबंध नाही. शोषण, उपेक्षा, जन्मावरून उच्चनीच भेद ठरवणा-या रुढी यांचा बीमोड करायला उठलेलं हे साहित्य फक्त माणुसकीला मानतं. ' बहुजन हिताय बहुजन सुखाय ' हीच मुळी या साहित्याची मूळ प्रतिज्ञा आहे. वास्तवाशी इमान राखून तिथे पदोपदी जाणवणा-या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, या ध्येयाने प्रेरित झालेले हे साहित्य जन्मजातच दुय्यम दर्जाचे, असा साहित्यिक हिशेब मांडणा-यांना दलित साहित्य हा शब्द खटकणारच.

दलित शब्दाची व्याप्ती लक्षात न घेणा-यांना दलित संमेलन हा सवतासुभा वाटतो. पण ही विचारसरणी नवी नाही. माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, हा विश्वव्यापी विचार घेऊन लढलेल्या आंबेडकरांना हिंदू समाजातल्या अस्पृश्यांचे पुढारी म्हणून एका कुंपणात टाकून देण्यात आले होते. त्यांच्या प्रेरणेने निर्माण झालेल्या साहित्यालाही अशाच प्रकारचं लेबल लावून त्यामागील व्यापकता आकुंचित करण्यात आली तर त्यात नवल नाही. बाबासाहेबांसारखा ग्रंथप्रेमी आजच्या काळात लाखात एखादा झाला असेल. पण जीवनातला त्यांचा प्रवास मात्र ग्रंथाकडून ग्रंथाकडे असा झाला नाही. ग्रंथाकडून जीवनाकडे आणि जीवनाकडून ग्रंथाकडे अशी त्यांची परिक्रमा चालली होती. अशी जीवनातून प्रेरणा घेऊन पुन्हा जीवनालाच सार्थ करणारे साहित्य निर्माण करायची प्रेरणा लाभावी या साहित्य संमेलनाचा प्रपंच आहे, असं मी मानतो.

विश्व परिवर्तनाचा क्रांतीकारी ...!!!



विश्व परिवर्तनाचा क्रांतीकारी ...!!!



विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तीमत्त्व, विचार आणि कार्य हे एकविसाव्या शतकातील वैश्विक समाजक्रांतीच्या अभ्यासकांचे, व पाईकांचे, चिंतनाचे आणि अनुसरणाचे प्रमुख दर्शन आहे. आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाच्या सामर्थ्याचा नेमका आवाका कोणाही सच्च्या आंबेडकरवाद्याला अजूनही आलेला नाही. ही समाजपरिवर्तनाच्या चळवळीची खरी शोकांतिका आहे.
या शतकातील जगासमोर किंग मार्टीन ल्यूथर, जॉर्ज डब्ल्यू कर्व्हर, मार्क्स, लेनिन, माओ, थॉमस पेन, म.ज्योतिराव फुले, म.गांधी हे महामानव समाज शिल्पज्ञ(Social Arcitect) म्हणून उभे राहणार आहेत.

या सर्वांच्या मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या विशिष्ट जात, वर्ग, वर्ण आणि विचार स्थानामुळे अग्रभागी असणार आहेत.  
बाबासाहेबांचा जन्म एकोणिसाव्या शतकातला असला तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एकूण विकास आणि प्रकाश विसाव्या शतकातला आहे. महामानवाला फारसे व्यक्तीगत जीवन नसते. किंवा असे म्हणता येईल की, त्यांचे व्यक्तीगत खाजगी जीवनसुध्दा त्यांच्या प्रकट सामाजिक जीवनाचेच एक अविभाज्य अंग असते. बाबासाहेबांचे अध्ययन, संशोधन आणि पदवीधारणाचे काम चालू असतानाच त्यांच्यातला दृष्टा महापुरुष आकार घेत असणार. आपली भावी दिशा आखत असणार.

बाबासाहेबांची सामाजिक भूमिका स्वीकारण्याची सुरुवात साधारणपणे 1916 साली झाली असे आपण मानले तर सुमारे चाळीस वर्षे एक जिवंत भौतिक वैज्ञानिक विचारयंत्र जागतिक समाजरचनेच्या फेरमांडणीचा जिवंत प्रयोग बाबासाहेबांच्या रुपाने करत होते, हे आपण समजून घेतले पाहिजे.  
जगातला कुठलाही महापुरुष शून्यात, चमत्काराने अवतरत नसतो. कोणी काहीही म्हटले तरी तो ईश्वराचा पुत्र, प्रेषित, पूर्वी होऊन गेलेल्या महापुरुषाचा नवा अवतार अगर ईश्वरी अवतार मुळीच नसतो.
  
तत्कालीन समाजवास्तवाचा वेध घेत विसंगती, विषमता, शोषण आणि अन्यायाच्या विरोधी मूलगामी संघर्ष उभे करणारे ते एक गतीमान सातत्यशील लोकनेतृत्व असते. जनप्रबोधनाच्या लाटेमागून लाटा उभा करणारे, समाजजीवन व्यवहारात वेगवेगळया चळवळी उभ्या करुन आचार आणि विचाराच्या नव्या संहिता पेरुन समाजाची कार्यक्षमता, गुणवत्ता आणि क्रांतीकारीता विकसित करणारे ते एका समाजशास्त्रज्ञाचे घडणारे आणि घडविणारे प्रेरणारुप असते. भूतकाळातील अपयशी पण क्रांतीकारी प्रयोगांचे तपशील, तत्त्वज्ञान आणि व्यवहार अभ्यासत भविष्यकाळातील सहकाऱ्यांच्यासाठी कार्यशैलीचा वस्तुपाठ उभा करत नवजीवन दर्शन उभे करणारे ते इतिहासाचे एक अपरिहार्य पान असते.  

बाबासाहेबांनी अभ्यास, निरीक्षण आणि चिंतन बालपणीच सुरु केले. ज्ञान आणि शहाणपण एकाच वेळी घ्यायला सुरुवात केली. त्यांच्या बालपणी समाजसेवेचे दलितवर्ग सुधारणेचे, दानाचे, उपकाराचे असंख्य प्रयोग सुरु होतेच. बाबासाहेबांचे वेगळेपण मूलगामिता, क्रांतीकारीता आणि पर्यायी समाजरचनेच्या शक्यतांचा वेध घेण्यात आहे. त्यांनी गडबडीने कोणाचा गंडा दोरा बांधला नाही. घाईगर्दीने व्यवस्थेचा एक भाग होणे टाळले. व्यवस्था परिवर्तनासाठीचा अभ्यास आणि प्रयोग आरंभला. तर्कसंगतता, विवेकशिलता, विज्ञाननिष्ठा व्यापकता, सखोलता आणि व्यवहार्यता ही बाबासाहेबांच्या कार्यशैलीची वैशिष्टये आहेत. त्यांनी प्राचीन भारतीय भौतिक संघर्षाचा आणि अवैदिक परंपरेचा वेध घेतला.

त्या प्रवासात त्यांना गौतम बुध्द, महावीर, चार्वाक, निस्मार, दिग्नाग, अश्वघोष, धम्मकिर्ती, चक्रधर, बसवेश्वर भेटले. भक्तीसंप्रदायातले कबीर, तुकाराम, चोखोबा अठरा पगड जातीचे संत भेटले. म.फुले, शाहू राजे त्यांच्या समोर होतेच. मार्क्स, एंगल्स, केन्झ, थॉमस पेन, रुसो, वाल्टेअर, व्हिटमन, सॉक्रेटिस प्लेटो, ऍरिस्टॉटल या साऱ्यांचे विचारदर्शन बाबासाहेबांनी जवळून घेतले होते.
इंग्लंड, अमेरिकेतील विद्यापीठांची ग्रंथालये बाबासाहेबांनी आपली साधनागृहे बनविली. तत्कालीन अनेक प्राध्यापक, विद्यार्थी यांच्याबरोबर चर्चा केल्या. बुध्द, कबीर आणि फुले या गुरुत्रयींनी बाबासाहेबांना जीवनमूल्ये पुरविली. त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा पाया घातला. जीवनातील अस्पृश्यता आणि दारिद्य्राच्या वास्तवाने त्यांना अनुभवाचे कारुण्य मूल्य बहाल केले.  
    
प्रज्ञा, करुणा आणि शील. शिका व संघटीत व्हा आणि संघर्ष करा. राजकारणाच्या गाडीचे चालक व्हा! आपल्या घराच्या भिंतीवर जावून लिहा आम्ही राज्यकर्ती जमात होणार आहोत! ही  आणि अशा आशयाची आवाहने करुन बाबासाहेबांनी आपली विचार दिशा मांडली. बाबासाहेब लोकशाहीवादी, जातीअंताचा लढा उभारणारे शुद्रातिशूद्र आणि स्त्रियांच्या हक्काचे रक्षणकर्ते ठरले. शाहूराजांनी सुरु केलेल्या राखीव जागांच्या धोरणाला बाबासाहेबांनी उत्क्रांतरुप दिले. भारताची राज्यघटना लिहून भारतीय समाजाच्या भावी वाटचालीची दिशा त्यांनी आखून दिली.

धर्मांतराच्या कृतीने त्यांनी हिंदू अस्पृश्यांना गौतम बुध्दांच्या अनित्यतावादाच्या क्रांतीकारी वाटेवर उभे केले.
रिपब्लिकन पक्षाची स्थापना करुन एक लोकशाहीवादी राजकीय महामार्ग त्यांनी तयार केला. आपल्या दर्जेदार, विपूल, वैचारिक साहित्य लेखनातून जात, वर्ण, वर्ग, लिंगवादी विषमतेने ग्रासलेल्या भारतीय समाजव्यवस्थेत बदल घडविण्याची आयुधे बाबासाहेबांनी भारतीय  जनसमूहांना बहाल केली.     
बाबासाहेबांना आपला जीवन प्रवास करत असताना अनेक कटू गोड अनुभव आले होते. पुरोगाम्यांच्या मर्यादा. प्रतिगाम्यांचे कडवेपण. विद्वानांचा एकांगीपणा. गरीब पण सवर्ण जनतेची गतानुगतीकता. कष्टकऱ्यांच्या राजकारणाचे फूटीरपण. सर्वदूर पसरलेला वर्गजाणीवेचा अभाव. व्यापक-सर्वंकषतेचा आत्मविश्वास न गवसलेले पक्ष आणि पुढारी. जात वर्ण वर्ग वंशांच्या किमान पाच-सहाशे लहान मोठया गटागटात विखुरलेला समाज. स्वजातीच्या खोटया मोठेपणाविषयीचा अहंकार आणि परजाती विषयी द्वेष पोसण्याची मानसिकता. मागास उत्पादन पध्दती. सरंजामी जमीनदार आणि नव्याने विकसीत होऊ घातलेल्या भांडवलदारांचा समाजातला वरचष्मा. संवेदनाहीन क्रूर बनलेली शोषणयंत्रणा. स्वत:च्या शोषणाबद्दल, शोषकाबद्दल फारसे ज्ञान, व संताप नसलेले थंड पडलेले जनसमूह. अज्ञान, दारिद्य्र, विषमता, अंधश्रध्दा, अनारोग्य आणि व्यसन अशा दोषांनी ग्रस्त समाज. या आणि अशा भारतीय जनसमूहांच्या वास्तव प्रश्नांचे भान असणारे फार थोडे नेते तत्कालीन भारतीय समाजात उपलब्ध होते. काहींचा अभ्यास चांगला होता पण ते कृतिसंदर्भात संकुचित होते. व्यापक चिंतन आणि संवेदनशीलतेचा अभाव हे भारतीय नेतृत्वाचे खास चरित्र आहे. दीर्घकाळ जाती बंद रचनेचे खोलवर रुजलेले दुष्परिणाम नवा माणूस नवे आधुनिक नेतृत्व तयार करण्यात अडसर बनत  होते. म.गांधींच्या सारखे आश्वासक सर्वस्पर्शी नेतृत्व उच्चवर्ण वर्गांच्या, अभिजन वर्गाच्या हृदय परिवर्तनावर, दलित कष्टकरी आणि स्त्रियांच्या अभ्युदयाचा रंजक आशावाद पेरत होते.
प्रबोधनाच्या पातळीवरची व्यापक, प्रतिनिधीक आंदोलने करुन समाज समन्वयाच्या पध्दतीने आधुनिक लोकशाही समाजनिर्मितीचे स्वप्न म.गांधी पहात होते. या पार्श्वभूमीवर लोकशाहीवादी पण प्रखर जनआंदोलनांच्या आधारे सामाजिक, आर्थिक न्यायावर आधारीत नवा विज्ञाननिष्ठ समाज निर्मितीचे स्वप्न डॉ.आंबेडकरांनी पाहिले. रचना प्रबोधन आणि संघर्षाच्या पायावर तळातील जातवर्गातून उत्क्रांत होऊ घातलेला एक नवा राजकीय प्रवाह डॉ.आंबेडकरांनी जन्माला घातला. त्यांनी पुढच्या शंभर वर्षातील समाजाच्या बदलाचे चित्र पाहिले. तोच विषय आपल्या चिंतनाचा, संवेदनशीलतेचा विषय बनविला. आपले सारे लेखन त्यांनी त्या दिशेने आशयघन बनविले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या प्रकारचे समजशक्तीने समृध्द बनलेले एकटे आणि एकमेव प्रभावी जनमान्य नेते होते.  

आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर भारतीय उपखंडाबरोबर सारे विश्व हालले, हादरले. बाबासाहेबांचे हे असे आपल्या कार्यकर्तृत्वांच्या शिखरावर असताना कालवश होणे सर्वांना धक्का देऊन गेले होते. अजून किमान दहा वीस वर्षे बाबासाहेब आपले विश्व समाज निर्मितीचे गतीमान काम करत राहतील असे अनेकांना वाटत होते. बाबासाहेबांच्या नंतरची त्यांच्या अनुयायांची पाचसहा वर्षे स्वत:ला सावरण्यात गेली. त्यानंतर हे सर्व अनुयायी गटागटात विभागलेले जनतेने पाहिले. नेतृत्वाच्या व्यक्तीवादी अतिरेकाने चळवळ फुटत गेली. भारतातली भांडवली लोकशाही आपल्या गतीने विकास पावत होती. देशी विदेशी भांडवलदार लढणाऱ्या जनसमूहांना प्रभावहीन बनविण्याचे नवे नवे मार्ग शोधत आहेत. सरंजामदार, जमिनदार आणि धर्मांध जातीयवादी मनापासून भांडवलदाराशी एक रुप होत आहेत. दलित, कष्टकरी, कामगार, शेतमजूर, छोटे कष्टकरी शेतकरी, कारागीर, बलुतेदार, आलुतेदार, आदिवासी, भटक्या विमुक्त जमाती, स्त्रीया हे आंबेडकरी लोकशाहीच्या विकासाचे मूळ घटक दिवसेंदिवस फूटकळ बनत आहेत. परस्परविरोधी दावे करत आहेत. आंतरविरोध, विसंगती, अविश्वास आणि अहंकाराने परिणामशून्य बनत आहेत. आंबेडकरी प्रवाहाचे अग्रदल ''नवबौध्द'' बहुजन समाजाला आपल्या पंखाखाली घेऊ शकणारे व्यापक नेतृत्व देण्यात आजतरी यशस्वी झालेले नाहीत. तसे प्रयत्नही दिसत नाहीत. उत्तर भारतामध्ये सत्तरच्या दशकापासून कांशीराम यांनी समाजशास्त्रीय दृष्टया शास्त्रशुध्दपणे बहुजन समाजाची चळवळ बांधली. बामसेफ डी.एस.फोर आणि पुढे बहुजन समाज पक्षाच्या रुपाने एक राजकीय प्रवाह उभा केला. चौदा खासदार आणि सत्तर आमदार निवडून आणण्यात त्यांनी यश मिळविले. फुले, शाहू, आंबेडकर यांची नावे आणि तत्त्वज्ञान मांडण्यात त्यांनी यश मिळविले पण एका राजकीय संकटातून बाहेर येण्यासाठी आणि सत्तेच्या मोहातून त्यांनी भाजपबरोबर युती करुन आपल्या विकासाच्या शक्यता आपल्याच हातांनी धुळीला मिळविल्या. डॉ.आंबेडकरांच्या नंतरचा संसदीय राजकारणात सर्वात जास्त यशस्वी झालेला हा आंबेडकरवादी नेता पथभ्रष्ट झाला. बहुजनांच्या चळवळीतला कोलंबस वाट चुकला.     
सत्तेच्या माध्यमातून समाजपरिवर्तन हे यशवंतराव चव्हाणांचे आवडते राजसूत्र कांशीरामनी अनुसरले. तुफान प्रचारच्या क्षमता लाभलेल्या मायावतींनी ते पुढे नेले. बहुजन जातींचे संघटन जातीअंतासाठी, बहुजन समाजनिर्मितीसाठी करायचे हे सूत्र व्यवहारात मागे पडले. बहुजन समाजपक्षाने आपले  नेमके आर्थिक धोरण आजवर ठरविले नाही. पहिला निवडणूक जाहीरनामा पक्ष स्थापने नंतर वीस वर्षांनी जाहीर केला. मतांचे आडाखे, जागांचे गणित अडवणूक क्षमतेचा अधिक लाभासाठी वापर मूल्यशून्य आघाडया यामुळे पक्षाची विश्वासार्हता क्रमश: घसरत चालली आहे. गुजराथमध्ये नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यापर्यंत मायावतींची मजल जावी, याचा खऱ्या आंबेडकरवाद्यांना खेद वाटणार नाही काय? शाहू विद्यापीठ नवे जिल्हे, आंबेडकर उद्यान असे करत करत मायावती ताज कॅरीडॉर पर्यंत पोहोचल्या. आता आर्थिक गुन्हेगार म्हणून त्यांना तुरुंगाच्या कॅरीडॉर मध्ये पाठवायला भाजप उत्सुक आहे.      महाराष्टातला रिपब्लिकन पक्ष धर्मांध जातीयवाद्यांपासून आजपर्यंत तरी सावध आहे. या ना त्या भांडवली पक्षाचा दुय्यम सहकारी बनल्यावाचून या पक्षाचे पाऊल पुढे पडत नाही. निवडणूका लढवायला पैसा लागतो. दलित जनता आणि नेत्यांच्याकडे तेवढा पैसा नाही. पण नवे पर्याय शोधणार का नाही? एकसंघ पक्ष उभारणार का नाही? नवबौध्दाशिवाय उर्वरीत दलित जाती, जमाती, आदिवासी, फिरत्या जमाती, आलुतेदार, बुलतेदार, कारागीर, कष्टकरी जनसमूहांमध्ये विश्वासार्हता तयार करुन पक्षाचा पाया विस्तारीत करणार की नाही? कधी कसे करणार? असे अनेक प्रश्न आज उभे आहेत.   

दुसऱ्या बाजूला या जगातली एक महत्वाची विचारधारा म्हणून आंबेडकरवाद विकसीत होतो आहे. देशात आणि परदेशात सर्वदूर आंबेडकरांच्या वैचारिक मांडणीचा सखोल अभ्यास होतो आहे. भारतीय उपखंडातील सर्व देशातली दलित कष्टकरी तळातली जनता आंबेडकरवादी, प्रभावी, प्रवाही आणि आश्वासक नेतृत्वाच्या शोधात आहे. जनतेचे प्रश्न, शोषण वाढलेले आहे. धर्मांध जातीयवादी आणि भांडवलदार एकजीवाने जनतेला मिळत आहेत. दहशत वाढवत आहेत. जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण, व्यापारीकरण, यांत्रिकीकरण अशा धोरणांनी जनता हैराण झालेली आहे. सांस्कृतिक साम्राज्यवादाने परिसीमा गाठली आहे. रेडीओ, टी.व्ही., वर्तमानपत्रे जाहिराती आणि भांडवली प्रचारात दंग आहेत. गरीब कष्टकरी दलित निर्णायकी बनते आहे. एक पर्याय म्हणून आंबेडकरांच्या विचाराकडे आकर्षित होते आहे. डॉ.आंबेडकरांची जयंती आणि महापरिनिर्वाण दिनाच्या आगे मागे सारा भारतवर्ष आंबेडकरमय झालेला असतो. नागपूर, मुंबईपासून पाच दहा घरांची बकाल खेडी कोटयवधी भूकेकंगालांच्या अस्मितादर्शनाने ''नीलसागर'' बनत आहेत. जगातली वीस टक्के जनता आंबेडकरांना कमी जास्त प्रमाणात ओळखते, मानते. जगातल्या दीडशे देशात आंबेडकरी दर्शनांचा अभ्यास या ना त्या कारणासाठी सुरु आहे.     

या अवस्थेत खऱ्या आंबेडकरी नेतृत्त्वाने आत्मविश्वासाने आक्रमकपणे राजकीय सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रात आश्वासक हस्तक्षेप केला पाहिजे. व्यापकता, सखोलता, शास्त्रशुध्दता, क्रांतीकारकता आणि तडजोड शून्यता स्वीकारुन जननायकत्व खेचून घेतले पाहिजे. भोगवादी भांडवली संस्कृतीला पर्यायी दलित कष्टकरांची विचार आणि कृतिनिष्ठ राजकीय संस्कृती उभी केली पाहिजे. नवा चारित्र्यसंपन्न राजनायक  जनतेत उभा केला पाहिजे. नवी साधने, नव्या प्रचार पध्दती अवलंबल्या पाहिजेत. पायी, सायकल, मोटर सायकल. फार तर एखाद दुसरी जीप एवढया तटपुंज्या साधनावर परिसर ढवळून काढला पाहिजे. हातावर चटणी भाकर खाणे. ओढया नाल्यावर कपडे धुणे, गरीबाच्या झोपडीसमोर एअर कंडिशन वातावरणात विश्रांती घेणे अंगिकारले पाहिजे. असे केले तर वीस वर्षात खरा आंबेडकरी नायक देशाच्या प्रमुख पदी पोहोचेल. कष्टकऱ्यांची लोकशाही क्रांती सफल होईल. गरज आहे विचारनिष्ठेची. श्रमिक, दलित निष्ठेची. समाजक्रांतीच्या तळमळीची. दृष्टिकोनाची आत्मविश्वापूर्वक राबण्याची.

एक स्वप्न पुन्हा नालंदा नांदण्याचे....!

एक स्वप्न पुन्हा नालंदा नांदण्याचे....!




साऱ्या जगाला अभिमान वाटावे असे आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आजच्या बिहारच्या भूमीत नालंदात होते. जगभरातून आलेले साडेआठ हजार विद्यार्थी  आणि दीड हजार विद्वान अध्यापक असणारे हे विद्यापीठ धर्मांध मोहम्मद बख्तियार खिलजी या आक्रमकाने पेटवले. इथला अपार ग्रंथ संग्रह तेव्हा सतत सहा महिने जळत होता. इथल्या गुरुजनांचा या आक्रमणात बळी तरी गेला किंवा ते परागंदा तरी झाले. 'नालंदा' या भारताला अभिमान वाटणाऱ्या इतिहासाची उजळणी करण्यासाठी त्याच जागी आता नालंदा विद्यापीठ नव्याने उभे राहते आहे. त्यासाठी पुढाकार घेताहेत नीतिशकुमार आणि अमर्त्य सेन. नालंदाला भेट देऊन टिपलेली ही निरीक्षणे.

...

दुपारचे दोन. सूर्य डोक्यावर तळपत होता. तापमान ४२ डिग्री असावे. वाटेत नालंदाचा फलक वाचला. मनात कुतूहल निर्माण झाले. नालंदा विद्यापीठाविषयी आजवर बरेच ऐकले होते. एकदा नालंदात जावे आणि विद्यापीठाचे अवशेष पहावेत, अशी उत्कंठा अनेक वर्ष मनात होती. लोकसभेची निवडणूक कव्हर करण्यासाठी बिहारमधे हिंडत होतो. योग जुळला. ज्या भूमीने अनेक शतकांपूर्वी साऱ्या जगाला ज्ञानसाधनेची शीतल छाया दिली, त्या पवित्र जागेचे दर्शन घ्यावे, असे वाटले. वाट वाकडी करून नालंदात शिरलो. विद्यापीठाचा इतिहास समजावून घेण्यासाठी गाइड शंभुनाथ मिश्रांना सोबत घेतले. नालंदाच्या खंडहरात मिश्रांची रनिंग कॉमेंट्री ऐकताना, मनाचा प्रवास भूतकाळाच्या दिशेने सुरू झाला. पंधरा शतकांपूवीर्चे दृश्य थेट डोळ्यासमोर उभे राहिले.


जगाच्या ज्ञान परंपरेत बिहारच्या नालंदा विद्यापीठाचे स्थान अतुलनीय आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरचे हे जगातले पहिले विद्यापीठ. सलग आठ शतके साऱ्या विश्वात नालंदा ही ज्ञानदानाची तपोभूमी होती. केवळ भारतच नव्हे तर चीन, कोरिया, तिबेटसह जगातले हजारो विद्याथीर् ज्ञानार्जनासाठी इथे यायचे. प्रवेशासाठी त्यांना कडक प्रवेशपरीक्षा द्यावी लागे. दहापैकी दोनतीन विद्यार्थ्यांची निवड व्हायची. साहित्य, तर्कशास्त्र, चिकित्साशास्त्र, अंकगणित, दंडनीती, ज्योतिषशास्त्र, योगविद्या, व्याकरण, चित्रकला, शिल्पकला, मंत्रविद्या, वेदविद्या तसेच बौद्ध आणि जैन संप्रदायांची शिकवण इथे दिली जायची. सत्याच्या शोधाची पहिली अट असते स्वातंत्र्य. हा नालंदाचा मानदंड. रोज इथे १०० व्याख्याने होत. एकाच वेळी ८५०० विद्यार्थी 
, विविध कलांमध्ये पारंगत व्हायचे. त्यांना शिकवण्यासाठी विद्यापीठात तब्बल दीड हजार अध्यापक होते. इथले अभ्यासक्रम प्रगत, उदार आणि बहुव्यापी होते. विविध कलासंस्कार शिकवणाऱ्या नालंदात सांप्रदायिकता नव्हती. रत्नसागर, रत्नोदय आणि रत्नरंजक अशा तीन देखण्या इमारतींमध्ये ग्रंथालय होते. या परिसराला धर्मगंज म्हणत. जगातल्या अनेक विषयांची अलौकिक ज्ञानसंपदा इथे होती. नालंदा निवासी विद्यापीठ असल्याने विद्यार्थी आणि अध्यापकांसाठी हजारो स्वतंत्र खोल्या होत्या. या वसतिगृहांच्या भिंती रूंद असल्याने हिवाळ्यात खोल्या उबदार तर उन्हाळ्यात थंड राहात. निवासाबरोबर विद्यार्थ्यांना भोजन, कपडालत्ता, औषधोपचार सारे विनामूल्य मिळायचे. कनोजचे राजे हर्षवर्धन आणि पाल राजांचा उदार आश्रय विद्यापीठाला दीर्घकाळ मिळाला. दान मिळालेल्या शंभर खेड्यांच्या उत्पन्नातून अन् राजाश्रयातून विद्यापीठाचा खर्च चालायचा. इथले विद्यार्थी होतकरू होते आणि शिक्षक बुद्धिमान, अभ्यासू आणि चारित्र्यसंपन्न होते. कौशल्यपूर्ण प्रशासन आणिराजाश्रया मुळे नालंदा विद्यापीठाची भरभराट होत गेली. आर्यदेव, शीलभद, कर्णमती, स्थिरमती, गुणमती, बुद्धकीतीर्, शांतरक्षित, कमलशील अशी विद्वानांची मालिकाच निर्माण झाली. न्यायशास्त्र ही नालंदा विद्यापीठाने जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी. जगभर अध्ययन आणि अध्यापनाची श्रेष्ठ परंपरा निर्माण करण्यात, नालंदाचा अर्थातच मोठा वाटा आहे. बाराव्या शतकापर्यंत ज्ञानदानाचा अखंड यज्ञ नालंदा विद्यापीठात सुरू होता.


नालंदाजवळ पावापुरीत भगवान महावीरांना केवलज्ञान प्राप्त झाले. जैन धर्माच्या या चोविसाव्या तीर्थंकराचे महानिर्वाणही पावापुरीतच झाले. महावीरांच्या निर्वाणानंतर ७५ वर्षांनी भगवान बुद्धाला नालंदा जवळच्या बोधगयेतच चैतन्याचा साक्षात्कार झाला. त्या शतकात भगवान महावीर आणि गौतम बुद्धाने नालंदा विद्यापीठाला अनेकदा भेट दिल्याचा इतिहास, पाली भाषेतल्या नोंदीत सापडला आहे. नालंदा विद्यापीठाच्या संस्कृतीवर जैन आणि बौद्ध संप्रदायांच्या शिकवणीचा मोठा प्रभाव आहे, असे इथल्या खंडहरात वावरताना जागोजागी जाणवते. वस्तु संग्रहालयातही त्याचे अनेक मौल्यवान पुरावे आहेत. बाराव्या शतकात बौद्ध तत्वज्ञानाविरूद्ध पेटून उठलेल्या मोहम्मद बख्तियार खिलजी नामक आक्रमक युद्धखोराने, नालंदावर हिंसक हल्ला चढवला. विद्यापीठाला मिळणारा राजाश्रय ही तोपर्यंत संपुष्टात आला होता. बख्तियार खिलजीने विद्यापीठाचा विध्वंस केला. इथल्या ग्रंथालयाला आग लावली. या आगीत विद्यार्थी आणि अध्यापकांच्या सामुदायिक प्रयत्नातून निर्माण झालेली अलौकिक ज्ञानसंपदा, इथले ग्रंथ, सलग सहा महिने जळत होते. बुद्ध संप्रदायाचे अनेक प्रसारक आणि गुरू या हल्ल्यात ठार झाले अथवा परागंदा झाले.

ज्ञानाच्या शोधात हिमालय पार करून, पाहियान (इ.स. ४११)आणि ह्युएन त्संग (इ.स. ६११ ते ६४४) नालंदात आले. नालंदाच्या शिक्षण पद्धतीवर या चिनी तत्त्वज्ञांनी विपुल लेखन केले. कालांतराने ह्युएन त्संगच्या जीवनावर एक कादंबरी प्रसिद्ध झाली. ती तुफान गाजली, जगभर खपली अन् वाचली गेली. 'जनीर् टू द वेस्ट' या इंग्रजी ग्रंथाच्या अनेक आवृत्या निघाल्या. इतिहासकार म्हणतात, जागतिक ज्ञानपरंपरेत ब्रिटनच्या ऑक्सफर्ड, केंब्रिज अथवा अमेरिकेतल्या हार्वर्ड, स्टॅनफर्ड विद्यापीठांचे जसे स्थान आहे, त्याच दर्जाचे वैभव सलग आठ शतके नालंदा विद्यापीठाचे होते. ही परंपरा आणि वारसा भारताने टिकवला असता तर कदाचित देशाचा इतिहास बदलला असता.

डोंगराच्या पोटात दडलेल्या नालंदाचा ब्रिटीश व्हाईसराय कनिंगहॅम यांना १८६१ साली शोध लागला. या परिसराचे सलग दहा वर्ष १८७१ पर्यंत उत्खनन झाले. त्यात मोठी सभागृहे, बुद्धविहार, बौद्ध तत्त्वज्ञानाच्या मुदा, वसतिगृहे इत्यादींच्या स्वरूपात जणू खजिनाच सापडला. चीन, जपान, कोरिया, थायलंड, व्हिएतनामसह आशिया खंडाच्या अनेक देशांमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार झाला. भारतात डॉ. आंबेडकरांनी त्याचे पुनरूज्जीवन केले मात्र तोवर तो जवळपास लोपलेला होता. नालंदाचा ऐतिहासिक वारसा किती महान आहे, याची आंबेडकरांचा वारसा सांगणाऱ्या बहुतांश नवबौद्धांना जाणीव नसावी, हे इथे लक्षात आले. 

बिहारमध्ये नेहेमीच या राज्याचे दोन चेहरे समोर येतात. राजकीयदृष्ट्या बिहार परिपक्व आणि जागरूक आहे, मात्र अलिकडे सामाजिक न्यायाचा झेंडा मिरवणाऱ्या नेत्यांनी झोटिंगशाही आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा उघड पुरस्कार केला. दांडगटांना राजकीय प्रतिष्ठा मिळवून दिली, इतकेच नव्हे तर त्यांच्या हाती सत्ताही सोपवली. या गैरव्यवहारामुळे राज्य बेशिस्त बनले. इतरांचे कायदेशीर हक्क हिरावण्याची वृत्ती वाढली आणि बिहारमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा विनाश ओढवला. मूळ बिहारची ओळख मात्र अशी नाही. इथल्या भूमीत प्रचंड ज्ञानलालसा आहे. स्वभावात धाडस आहे. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात प्रचंड कष्ट करायला बिहारी लोक घाबरत नाहीत. अनेकांच्या हाती कला आणि प्रखर बुद्धी आहे. आयएएस, आयपीएससारख्या स्पर्धा परीक्षेत बिहारी विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी  सर्वाधिक असते. बेशिस्त वाटणाऱ्या भूमीत ज्ञानलालसेचा हा संस्कार नेमका कुठून आला? नालंदाच्या अवशेषांमधून तर हा प्रेरणास्त्रोत निरंतर वाहात नसावा?

माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी नालंदा विद्यापीठाच्या धतीर्वर 'इंडो एशियन इस्टिट्युट ऑफ लर्निंग चे स्वप्न पाहिले. नितीशकुमारांनी त्याला अनुसरून नालंदा विद्यापीठाचे सर्वार्थाने पुनरूज्जीवन करण्याचा निर्णय तीन वर्षा पूर्वी  घेतला. जपान आणि सिंगापूरनेही यात सहभागी होण्याची इज्छा व्यक्त केलीय. विद्यापीठासाठी नोबेल पुरस्कार विजेते अर्मत्य सेन यांच्या नेतृत्वाखाली समिती कार्यरत आहे. नव्या विद्यापीठात विज्ञानाच्या विविध शाखा, इंजिनीअरिंग, वैद्यक, तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, समाजशास्त्रे, भाषा, साहित्य आणि व्यवस्थापनाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे अभ्यासक्रम सुरू करण्याचा समितीचा मानस आहे. बौद्ध तत्त्वज्ञानासाठी स्वतंत्र विभागाखेरीज तत्त्वज्ञान, इतिहास आणि विविध धर्मांच्या तौलनिक अभ्यासाची अद्ययावत केंदे विद्यापीठात असतील. नालंदा विद्यापीठाच्या प्राचीन अवशेषांजवळच ५०० कोटी खर्चून ४५० एकरांवर हे विद्यापीठ उभे राहील. जवळच एक खास टाऊनशिपही होईल. संस्कारांच्या आदानप्रदानाचे नालंदा पुन्हा आंतरराष्ट्रीय केंद बनावे, यासाठी बिहार सरकार आणि अर्मत्य सेन यांची समिती मनापासून मेहनत करते आहे. अर्थात विद्यापीठाचे स्वरूप आंतरराष्ट्रीय असल्याने संसदेला त्यासाठी खास कायदा मंजूर करावा लागेल. अर्मत्य सेन यांनी मध्यंतरी या प्रकल्पासाठी पंतप्रधान मनमोहन सिंगांची भेट घेतली तेव्हा त्यांनी या प्रकल्पाला तात्काळ संमती दिली. केंदात लवकरच नवे सरकार येईल. कायदेशीर सोपस्कार लवकर आटपले तर नालंदाचे पुनरूज्जीवन लवकर होईल, असे अर्मत्य सेन म्हणतात. अंधारलेल्या बिहारचे भवितव्य नालंदाच्या निमित्ताने उजळले तर साऱ्या देशालाही ते हवेच आहे!





महाराज्यांच्या नावाखाली काहीही


महाराज्यांच्या नावाखाली काहीही

राष्ट्रीय दिनदर्शिका शके सवंत व बौद्ध संस्कृती


राष्ट्रीय दिनदर्शिका शके सवंत व बौद्ध संस्कृती

 
          मागच्या 2500 वर्षात बौद्ध संस्कृतीने भारताला व जगाला अनेक गोष्टींची देणगी दिलेली आहे. योग-शास्त्र, आयुर्वेद, आधुनिक शिक्षण-पद्धती, मार्शल आर्ट, स्थापत्य शास्त्र व मानसशास्त्र इत्यादी ज्ञानशाखा बौद्ध संस्कृतीतून निर्माण झालेल्या आहेत. तर राष्ट्रीय ध्वजावरील धम्मचक व चारही दिशेला धम्म गर्जना करणारे सिंह ही राज-मुद्रा बौद्ध  संस्कृतीची देणगी आहे. पण, भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका शके सवंत ही सुद्धा बौद्ध संस्कृतीची देणगी आहे, हे फार कमी लोकांना माहित आहे. त्यामुळे ह्या दिनदर्शिकेशी आपला काही संबंध नाही, अशी भूमिका अनेक बौद्ध लोक मांडतात.
तसेच, बौद्धांची चळवळ भरकटविण्यासाठी किंवा नष्ट करण्याकरिता अनेक संघटना कार्यरत आहे. यांची कार्यपद्धती म्हणजे इतिहासाचे विदुपीकरण किंवा सामावून घेणे असे आहे. जसे प्राचीन बौद्ध लेण्यांचा बाजूला मूर्तीची स्थापना करणे व कालांतराने त्यावर कब्जा करणे. बुद्धगयेस महाबोधी विहारावर अजूनही असलेला गैर-बौद्धांचा ताबा, महाशिवरात्रीच्या दिवशी मुंबई परिसरात असलेल्या लेण्यास पूजा-पाठ करण्यास येणारा जन-समूह व 26 जानेवारीशी काहीही संबंध नसताना सरकारी कार्यालयात व सार्वजनिक ठिकाणी होणाऱया सत्यनारायणाची पूजा, हे याचे जिवंत उदाहरण आहेत.
शके सवंतची ऐतिहासिक पार्श्वभूमी : शके संवतची उदाहरण शक वंशातला सम्राट कनिष्क (78-101)ने राज्याभिषेकपासून केली. आणि आजही शके संवत व ग्रेगरियन दिनदर्शिकेत 78 वर्षाचे अंतर कायम आहे. त्या शकाला शालिवाहन ही नंतर जोडलेली उपाधी आहे. सम्राट कनिष्क बौद्ध राजा होता. त्याचा साम्राज्याचा विस्तार काश्मिर ते महाराष्ट्र व बिहार ते मध्य आशियापर्यंत होता. बघा : चित्र क्र.1 त्याच्या काळात चौथी धम्मसंगिती जालंधर किंवा काश्मिरला झाली. भगवान बुद्धाची पहिली मुर्तीसुद्धा याच काळात तयार झाली. तसेच, सम्राटांनी स्वतची व भ. बुद्धांची प्रतिमा असलेली सोन्याची नाणी तयार केली. (बघा : चित्र क्र. 2). सम्राटाने पेशावरला बांधलेला विहार हा 400 फुट उंच होता. सम्राट कनिष्कामुळे बुद्धाच्या धम्मप्रसार मध्य आशिया व चीन या भागात झाला. अश्वघोष, वसुमित्र, नागार्जुनसारखे विद्धान व चरकसारखे वैद्य त्यांचे दरबारी होते. (संदर्भ :1. बौद्ध धर्म के 2500 वर्ष : राहुल सांकृत्यायन, 2. जगातील बुद्धधम्माचा इतिहास : मा.श. मोरे, पृ. 22-24; 3. Ancient and Medieval India : Prasad, Pg. 114-123)
दिनदर्शिकेचे प्रकार : तीन प्रकारच्या दिनदर्शिकेचे अस्तित्व आहे. पहिली ः सूर्यावर आधारलेली ग्रेगरीअन जी कार्यालयात वापरली जाते. या दिनदर्शिकेचा संबंध ख्रिस्ती संस्कृतीसोबत येतो. दुसरी : चंद्रावर आधारलेला म्हणजे हिजरी सवंत. या दिनदर्शिकेचा संबंध मुस्लिम संस्कृतीसोबत येतो. तर तिसरी दिनदर्शिका सूर्य व चंद्र यांच्यावर आधारलेली आहे. यात विकम सवंतचा ब्राह्मणी (हिंदू) तर शके सवंतचा संबंध बौद्ध संस्कृतीशी येतो. विक्रम सवंतला नेमके कुणी सुरू केले, याचा ऐतिहासिक दाखला मिळत नाही. शके सवंतला किंचित बदलून राष्ट्रीय दिनदर्शिकेचा दर्जा 1956ला देण्यात आला. तरीसुद्धा सार्वजनिक सुट्टीकरिता जुनाच शके सवंत वापरला जातो.
दिनदर्शिकेचा व बौद्ध संस्कृतीचा संबंध : बौद्ध संस्कृतीतील सर्व कार्यक्रम पौर्णिमा, अमावस्या व अष्टमीप्रमाणे ठरलेले आहेत. बुद्ध पौर्णिमा, गुरू पौर्णिमा (पंच वर्गिय भिक्षुस धम्मदेसना), माघ पौर्णिमा, वर्षावास व धम्मचक्र प्रवर्तन दिवस या सर्वांच संबंध चंद्रावर आधारलेल्या दिनदर्शिकेशी येतो. बौद्ध परंपरेप्रमाणे काही ठळक घटना आणि त्यांचा दिनदर्शिकेशी संबंध पुढे दिला आहे. (संदर्भ : तथागतांच्या धम्मात पौर्णिमांचे महत्त्व : रा.पि. गायकवाड)
चैत्र पौर्णिमा (चित्त) : सुजाताचे भ. बुद्धास खिरदान, वैशाख पौर्णिमा (वेसाक्को) : भ. बुद्धांचा जन्म, 35व्या वर्षी ज्ञानप्राप्ती व 80व्या वर्षी महापरिनिब्बान, ज्येष्ठ पौर्णिमा (जेठ्ठ) : तपुस्स व भल्लुकाची धम्मदीक्षा, संघमित्रा व महेंद्र यांनी श्रीलंका येथे बोधीवृक्ष लावला, आषाढ पौर्णिमा (आसाळहो) : राणी महामायाची गर्भधारणा, राजपूत्र सिद्धार्थाचे महाभिनिष्कमण, सारनाथ येथे धम्मचक्र प्रवर्तन म्हणजेच गुरू पौर्णिमा, वर्षावासाची सुरूवात, श्रावण पौर्णिमा (सावणो) : अंगुलीमालाची दीक्षा, भ. बुद्धांच्या महापरिनिब्बान नंतर पहिली धम्म संगितीची सुरूवात, भाद्रपद (पोठ्ठपादो) : वर्षावासचा कालावधी, अश्विन (अस्सयुजो) : पौर्णिमेस वर्षावास समाप्ती, या महिन्याच्या दहाव्या दिवशी सम्राट अशोकची भिक्खू मोग्लीपुत्त तिस्स यांच्याकडून धम्मदीक्षा अर्थात अशोक विजयादशमी, बाबासाहेब आंबेडकर व 5 लाख लोकांची नागपुरला धम्मदीक्षा, कार्तिक पौर्णिमा (कार्तिको) : आधुनिक मूलगंधकुटी विहार, सारनाथला अनागरिक धम्मपाल यांनी तक्षशिला (पाकिस्तान) येथे प्रात्प झालेल्या भगवंताच्या पवित्र अस्थी भारतात आणून सुरक्षित ठेवल्या. या अस्थींच्या दर्शनार्थ जगभरातील उपासक पौर्णिमेस भेट देतात, मार्गशिर्ष (मागसीरो) : पौर्णिमेस सिद्धार्थ गौतम यांची बुद्धत्व करण्यापूर्वीची राजा बिंबीसार सोबत पहिली भेट, पौष पौर्णिमा (पुस्सो) : राजा बिंबीसारांची धम्मदीक्षा, माघ (माघो) पौर्णिमा : भ. बुद्धांची महापरिनिब्बनाची घोषणा, स्थविर आनंद यांचे परिनिब्बान, फाल्गुन (फग्गुनो) पौर्णिमा : बुद्धत्व प्राप्ती नंतर कपिलवस्तूस पहिली भेट, पुत्र राहुलची धम्मदीक्षा.
स्पष्टपणे, बौद्ध संस्कृतीची नाळ चंद्रावर आधारित दिनदर्शिकेशी जुळलेली आहे. याच दिनदर्शिकेच रूपांतरण नंतर सम्राट कनिष्काने शके सवंत यात केला. तरीही बौद्ध दिनदर्शिका नाही, याचा बौद्ध संस्कृतीशी काहीही संबंध नाही; अशा अप्रचारास बळी पडू नये. तसेच, जर यावर कुणी दुसऱया संस्कृतीचा रंग चढवित असेल तर दक्षता घ्यावी. चैत्र शुल्क 1, 1933 (4 एप्रिल, 2011)ला शके सवंत प्रमाणे नवीन वर्षाची सुरूवात होत आहे. तरी बौद्ध बांधवांनी हा बौद्ध परंपरेप्रमाणे साजरा करून संस्कृती जतन करावी.

शिवाजी महाराज हे हिंदू कधीच नव्हते


शिवाजी महाराज हे हिंदू कधीच नव्हते

देशभरात कुराण, बायबल यांचे शिक्षण दिले जाते; मात्र हिंदु तत्त्वज्ञान शिकविणारी एकही शाळा संपूर्ण हिंदुस्थानात नाही . कारण आज पर्यंत हिंदू धर्म कोणाचा हाच पेच सोडवता आला नाही, मराठे म्हणतात हिंदू धर्म आमचा तर ब्राम्हण हि तेच म्हणतात , मराठा समाज शिवाजी महाराजांना डोळ्या समोर ठेऊन स्वताला हिंदू म्हणतात पण शिवाजी महाराज हे हिंदू कधीच नव्हते, ते शैव धर्मीय होते महादेव शंकर हे त्यांचे दैवत होते, हे आजून मराठा समाजाच्या डोक्यात येत नाही , तर ब्राम्ह्णन यांचा धर्मच मूळी हिंदू आहे. मग शाळा काढली तर तेथे कोण जाणार कारण मराठा आणि ब्राम्हण यांच्यातले वैर हे काही आजचे नाही.