शुक्रवार, २ मार्च, २०१८

● रामाला अखेरचा राम - राम ठोकला.

● रामाला अखेरचा राम -  राम ठोकला.

लेख -
यतिन जाधव

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

१५ नोव्हे १९२९ च्या बहिष्कृत भारतात बाबासाहेबानी एक झणझणीत अग्रलेख लिहला. “सर्वच स्पृश्य हिंदुंच्या जनतेचे मत परिवर्तन झाल्या शिवाय मंदिर प्रवेश नसावा. असे जर त्यांचे मत असेल तर अस्पृश्याना अनंत काला पर्यंत थांबावे लागणार. सत्याग्रह करणे अपरिहार्य होऊन बसले आहे. आपण लवकरच मंदिर प्रवेशाची चळवळ हाती घेणार. जो पर्यंत हिंदु म्हणुन या समाजाचा आहोत, तो पर्यंत मंदिर प्रवेश हा आमचा अधिकार आहे व तो आम्ही बाजावुनच दम घेऊ” अशा अर्थाचा अग्रलेखा झडकल्यावर सारे सनातनी पेटुन उठले.

पुण्यातील अस्पृश्यानी चालविलेला पर्वती मंदिर सत्याग्रहाच्या अपयशानी बाबासाहेब बरेच अस्वस्थ झाले. सनातन्यानी अस्पृश्यांवर दगड फेक करुन जखमी केले. राजभोज तर थेट दवाखान्यात पोहचले होते. वार पुण्यात झाला पण जखम तिकडे मुंबईत बाबासाहेबांच्या हृदयात झाली. आता मात्र हि चळवळ बाबासाहेब स्वत: चालविण्याच्या विचारात होते. सनातन्यांचे धार्मिक नाक म्हणजे नाशिक. बाबासाहेबानी या वेळेस यांचा नाकच दाबायचा संकल्प केला. नाशिक म्हणजे सनातन्यांचे अत्यंत महत्वाचे तिर्थस्थान. ईथले सनातनी पराकोटीचे जातियवादी. या लोकांच्याच छाताडावर बसुन बुक्क्या मारण्याचा निर्धार केला. धर्माचा श्वासच कोंडवुन सोडायला एकंदरीत आराखडा आखण्यात आला.

१७ नोव्हे. १९२९ देवळाली येथे सभा घेण्यात आली. ईथे महारांचा एक संघ स्थापण करण्यात आला. संभाजी रोकडे या सभेचे अध्यक्ष होते व भाऊराव गायकवाड (उर्फ दादासाहेब) हे चिटणीस होते. नाशिकच्या सत्याग्रहाची पहिली रुप रेषा ईथे ठरली. सत्याग्रहाची सिद्धता कशी करावी? निधी कसा गोळा करावा? इथ पासुन सत्याग्रहाची एकुन रुप रेषा ईथेच ठरविण्यात आली.

२५ जानेवारी १९३० रोजी त्र्येंबकेश्वरच्या निवृत्तीनाथाच्या यात्रेच्या वेळी एक टोले जंग सभा घेण्यात आली. या सभेत बाबासाहेब स्वत: येणार होते. पण काही कारणास्तव ते येऊ न शकल्याने श्री. अमृतराव रणखांबे यानी अध्यक्ष पद भुषविले. भाऊसाहेब, देवराव नाईक, मिंदे पाटील इत्यादी नेत्यानी तडाखे बंद भाषण केले. या वेळी सत्याग्रहाची एकुन रुप रेषा बाबासाहेबांच्या उपस्थीतीत अधिकृत करुन घ्यावयाची होती. पण ते न आल्याने हजर नेत्यांच्या संमतीने सत्याग्रहाची आखणी करण्यात आली. सत्याग्रहाची नोंदणी, निधींची जमवा जमव पासुन सगळा कार्यक्रम ईथे संमत करुन घेतला. आता मात्र दलित जनतेला हुरूप आला. खेडोपाडयात प्रचाराचे घोडे दौडु लागले. भीम सैनिकानी सगळा प्रांत पिंजुन काढला. नागपूर पासुन बेळगाव पर्यंत जंगी प्रचार चालु झाला. जिकडे तिकडे फक्त याच सत्याग्रहाची चर्चा चालु झाली. लोकांचा भर भरुन प्रतिसाद मिळत होता. अपेक्षेपेक्षा जास्त लोकं सत्याग्रहाला पाठिंबा देऊ लागली.

बाबासाहेबांच्या कार्याला यश आल्या वाचुन राहणार नाही अन हा आमचा नेता आमचा उद्धार करुन दम घेईल याची प्रत्येकाला खात्री वाटु लागली. सत्याग्रहाची माहिती देण्यासाठी खेड्या - पाड्यातुन घेण्यात येणाऱ्या लहान सहान सभाना अलोट गर्दी होत असे. मुलभूत हक्कावर गदा आल्यास चळवळ स्वत: च आकार घेते, फक्त कुणी तरी हाक देणारा हवा, बाबासाहेबांच्या चळवळीला लोकानी दिलेला प्रतिसाद हा बाबासाहेबांच्या अंगभूत गुणांचा, संघटान कौशल्याचा अन कळकळीने चालविलेल्या समाज सेवेची फलश्रूती होती. पण त्याच सोबत अटाकावाच्या विरोधात आकार घेणारा प्रतिकार अत्यंत वेगाने एकवटतो अन त्याचा उद्रेक होतो तेंव्हा साऱ्या तटबंद्या उध्वस्त होतात. भीम सेना म्हणजे अशा साऱ्या तटबंद्या तोडण्यास सज्ज झालेली, आपल्या नेत्याच्या प्रति पराकोटीची निष्ठा बाळगणारी एक अत्यंत बलवान संघटना होती. गावा गावातुन वाहनारे सत्याग्रहाचे वार सनातन्यांच्या अस्वस्थ करु लागले.

१३ फेब्रुवारी १९३० ला सनातन्यांची जाहिर सभा झाली. व्ही. बी. आकूत (वकील) निळकंठ पाटणकर, श्रीधर अणाशास्त्री, व गोपाळ शास्त्री पुराणीक या सनतनी नेत्यांच्या नेतृत्वा खाली हि सभा भरविण्यात आली. दोन्ही शास्त्री बुवानी अस्पृश्यांचा कडाडून विरोध केला. महारानी मंदिरात येणे हे त्याना अजिबात मान्य नव्हते. त्यांच्या पाठिशी सगळा सनातनी वर्ग उभा होता. तरी बाबासाहेबांच्या भीम सैनीकाची ताकत बघुन पोटात गोळा येई म्हणुन त्यानी हि सभा घेतली होती. सरसकट सगळ्याना आपण दोष देतो पण या सभेत एक पुरोगामी ब्राह्मण होता. ज्यानी सगळा विरोध झुगारुन अस्पृश्याना मंदिरात प्रवेश देण्यात यावा, असं स्पष्ट मत नोंदविलं. अस्पृश्याची बाजु लावून धरणारा तो संवर्ण होता. नीळकंठराव पाटणकर. त्यामुळे सभेद गदारोळ झाला. सनातन्यानी या मताचा जोरदार निषेध केला. सभेत हल्ला कल्लोळ उडाला. अन आकूत मात्र तटस्थ राहिले.

◆ काळाराम मंदिराची कहाणी :

१७८२ साली सरदार रंगाराव ओढेकरानी सुमारे तीस लाख रुपये खर्च करुन नाशिकात हे मंदिर बांधुन घेतले. दरवर्षी राम नवमीला या मंदिरातून रथयात्रा निघत असे. मंदिरातील हे रथ स्पृश्य व अस्पृश्य दोघानी मिळून ओढण्याची प्रथा सुरुवाती पासुनच चालत आलेली होती. पुण्यातील पेशवे माधवराव यांच्या मातोश्री गोपीकाबाई या मुळच्या नाशिकच्या. त्यांच्या माहेरचे आडनाव रास्ते. त्यानी या मंदिराला दोन रथ भेट दिले होते. पुढे त्या दोन्ही रथाची देखभाल व इतर खर्च याची जबाबदारी रास्त्यांवरच होती. आज मात्र ईथल्या अस्पृश्यानी थेट मंदिरात प्रवेश मिळावा म्हणुन अत्यग्रह करण्याची भीम गर्जना केली. त्यामुळे राम बाटणार म्हणुन सनातन्यानी दंड थोपटले.

१९३० वर्ष नवीन विचारांचे, प्रतिकाराचे, पराक्रमाचे व दोन जग प्रसिद्ध सत्याग्रहाचे म्हणुन भारताच्या इतिहासात अनंत काळापर्यंत आठवला जाणारं असं हे अप्रतीम वर्ष. २ मार्च १९३० ला बाबासाहेबानी नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह सुरु केला, अन तिकडे १२ मार्च १९३० ला मा. गांधी यानी दांडी यात्रा सुरु केली. गांधीचा लढा राजकीय होता, तर बाबासाहेबांचा सामाजीक होता. गांधीची सगळी समीकरण शेवटी संवर्णाना लाभदायक ठरणारी तर बाबासाहेबांची अस्पृश्याना किमान माणुस म्हणुन स्विकारावे याची. गांधीचा लढा परकीयांशी होता तर बाबासाहेबांचा स्वकीया सारखे दिसणारे पण पराकोटीचं परकियत्व बाळगणाऱ्या ऐत्तद्देशीयांशी होता.

गांधी हे गूढ व्यक्तीमत्व होते. तर बाबासाहेब स्पष्ट वक्ते होते. गांधी हे भारतातील अत्यंत धनाढ्य लोकाना पाठिशी घेऊन चालणारे एक अतीश्रीमंत नेते होते तर बाबासाहेब पै पै साठी मोताज अशा दरिद्री लोकांचे नेते होते. एका साम्य दोन्हीकडे होतं, करोडोची किंमत ओवाळून टाकावा अशी निष्ठावानांची फौज दोघांकडे होती. चळवळीत ईतर सगळ्या गोष्टी दुय्यम ठरतात. सगळ्यात प्रथम क्रमांक लागतो निष्ठावाणांचा अन ईथे दोन्ही कडचे निष्ठावान सर्व ताकत झोकून देण्यास सदैव तय्यार असतं.

भाऊसाहेबांकडे या सत्याग्रहाचे सगळी जबाबदारी होती, ठरल्या प्रमाणे दोन तारखेला एक सभा व मिरवणुक अन ३ मार्च १९३० पासुन प्रत्यक्ष सत्याग्रहास सुरुवात होणार होती. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातुन लोकांनी नाशिकच्या दिशेनी यायला सुरुवात केली. रोज ट्रका भरुन लोक नाशकात उतरु लागली. तिकडे महारवाडयात लोकांच्या राहण्याची चोख व्यवस्था बजावण्यात आली होती. दोन मार्च पर्यंत महार वाडयात एकुण ८००० भीम सैनीक सत्याग्रहात सामिल होण्यासाठी येऊन दाखल झाले. तेंव्हा नाशिकचे जिल्हाधिकारी होते.

आर. डी. गार्डन, यानी मध्य विभागाचे आयुक्त श्री. जे. घोषाळ (रविंद्रनाथ टागोरांचे मेहुणे) याना कळविले की उभं नाशिक घुमसत आहे. सनातनी ऐकायला तयार नाहीत किंवा बाबासाहेब ही सत्याग्रह मागे घ्यायला तयार नाहीत. एकुण परिस्थीत फार स्फोटक होत चालली आहे. १८५७ चा धार्मिक उठाव इंग्रजाना पुरुन उरला होता. त्यामुळे सनातन्यांच्या विरोधात जाण्यास इंग्रज धजावत नव्हते. अस्पृश्याना त्यांची सहानुभूती जरुर होती पण धर्मात ढवळाढवळ करण्याची आता त्यांच्यात हिम्मत नव्हती. अन गार्डन साहेबांचा झुकाव सनातन्यांकडून होता असे वाटायचे. ईकडे बाबासाहेबांच्या अध्यक्षते खाली २ मार्चला सकाळी १० वाजता एक टोले जंग सभा भरविण्यात आली. सत्याग्रह कसा चालु ठेवायचा? कोण कोण नेतृत्व करणार? पहिली आघाडी कोणाची असेल? किती लोकांचे गट असावे? अन सगळ्यात महत्वाचं हे की हा सत्याग्रह अहिंसेच्या मार्गानी करायचा आहे. याची सगळ्याना सुचना देण्यात आले.

मधे जेवणासाठी ब्रेक घेतला व परत तीन वाजता सभा भरली. तो पर्यंत नाशकात आजुन सात - आठ हजार भीम सैनिक येऊन थडकले होते. तीन वाजता १५,००० लोकांची एक मिरवणूक निघाली. सर्व स्त्याग्रही अत्यंत शांत, शिस्तीने व नियमाचे काटेकोर पालन करत अगदी रांगेत पुढे सरकु लागले. “श्री राम जय राम जय जय राम” चा जयघोष चालु होता. सगळ्याच्या मुखात रामाचे नाव अत्यंत आदराने गुणगुणल्या जात होते. हि मिरवणूक जशी मंदिराजवळ येते. तसं मंदिरांच्या पुजाऱ्यानी सगळे दरवाजे धडाधड बंद केले. अस्पृश्यां पासुन रामाचे रक्षण करण्यासाठी सनातनी सज्ज झाले. मिरवणूक गोदावरीच्या घाटाकडे वळली. एक जंगी सभा घेऊन मिरवणूक विसर्जीत करण्यात आली.

आता उदया पासुन म्हणजेच ३ मार्च पासुन सुरु होणार होता सत्याग्रह. प्रत्यक्ष मंदिराला वेढा घालुन मानवी हक्क बजावण्यासाठी भीमसैनीक अहो रात्र मंदिर आवारात लढणार होते. जिल्हाधिकारी गार्डन साहेब २ तारखेला जातीने मंदिर आवारात पुरेपुर पोलिसांची कुमक घेऊन हजर होते. कुठल्याही परिस्थीती परिस्थीती नियंत्रनात ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली होती. परिस्थीती आटोक्यात ठेवण्यासाठी त्यानी जय्यत तयारी केली होती. नाशिक शरातील कुमक कमी पडणार म्हणुन बाहेरुन जादा कुमक मागविण्यात आली होती. अन पाहता पाहता ३ मार्च उजाडला.

३ मार्च १९३० बाबासाहेबांच्या आदेशानी सत्याग्रहाची सुरुवात झाली. सत्याग्रहांच्या चार तुकड्या पाडण्यात आल्या. प्रत्येक तुकडीत १२५ पुरुष व २५ महिला अशी दिडशे सत्याग्रहाची संख्या होती. ह्या तुकड्या मंदिराच्या चारी दरवाजावर सकाळ पासुन ठाण मांडून बसल्या. पतित पावन दास (उत्तर दरवाजा), कचरु साळवे (पुर्व दरवाजा), पांडूरंग राजभोज (दक्षिण दरवाजा) व शंकरदास नारायण दास (पश्चिम दरवाजा) असे चार खंदे सरदार मंदिराच्या चारी दिशांवर आपापल्या आघाड्या सांभाळत होते. बाबासाहेब अन भाऊराव हे प्रत्यक्ष सत्याग्रहाच्या ठिकाणी सारी व्यवस्था पाहात होते. मंदिराचे सर्व दरवाजे बंद होते. दरवाजे उघडल्यास सत्याग्रही मंदिरात प्रवेश करणार अन रामाचे दर्शन घेणार असे ठरले. पण आज राम बंदिस्त झाला होता. तो दलितांसाठी कधीच उठुन बाहेर येणार नव्हता, किंवा हा राम सनातन्यांच्या शब्दा बाहेर नव्हता.

तिकडे याच दिवशी रात्री शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यानी संवर्णाची सभा बोलावली. सनातनी आज फार भडकलेले होते. दिवसभर सत्याग्रच चालला होता. महाराना धडा शिकवुन सत्याग्रह फोडून काढण्याची भाषा सनातनी कार्यकर्ते बोलू लागले. काही झाले तरी मंदिर खुले करायचे नाही या अटीवर सगळयांचे एकमत झाले. पाटणकरानी तसे करण्यापेक्षा तडजोड करावी अशी सुचना दिली. त्यांच्या या सुचनेनी कार्यकर्त्यां हुल्लड घातली. सुधारणेस अनुकूल सनातन्यांवर दगड फेक झाली. प्रक्षोभिम धर्म वेड्यानी जोडे फेकुन मारले. शंकराचार्यानी तडजोडीच्या भानगडीत न पडता अलिप्त रहावे अशी धमकी वजा विनंती करण्यात आली. एकंदरी परिस्थीती स्फोटक बनली होती. कधी हि प्रस्फ़ोट होईल अशा तंग वातावरणा मुळे शंकराचार्यानी सभा तहकुब करण्याचे जाहिर करुन शेवटचे काही वाक्य बोलले तेंव्हा ते म्हणतात -

“आज प्रत्यक्ष राम जरी अस्पृश्यांच्या बाजुने आला तर हे रामाला ही फेकून देतील. प्रवेश नाकारतील” असे म्हणुन शंकराचार्यानी हताशपणे आपले भाषण आवर्ते घेतले. सारं सनातन्यांच्या मनासारखं झालं होतं. ८ मार्च १९३० आयुक्ट घोषाळ नाशिकला आले. गार्डन कडुन वारंवार ईथल्या अस्पृश्यांच्या सत्याग्रहा बद्दल तक्रारी गेल्यामुळे आज आयुक्त स्वत: ईथे हजर होते. त्यानी आधी बाबासाहेबांचे मत जाणुन घेतले.

बाबासाहेब म्हणतात - 
“मी माझ्या लोकाना हक्क मिळवुन देण्यासाठी लढा उभारला आहे, वाजवी तडजोड होत असल्यास आम्ही सत्याग्रह तहकूब करायला तयार आहोत” असे घोषाळाना सांगितले. बाबासाहेबांच्या एकंदरीत रवैय्यानी घोषाळ खुष झाले. नंतर त्यानी सनातन्यांशी बोलणी केली. सनातन्यानी मंदिर खाजगी असल्याचा नवीन पिल्लू काढला. मंदिराला दर वर्षी १०००/- रुपये सरकारी अनुदान मिळत असल्याचे लगेल. सिद्ध करुन हा डाव हाणुन पाडण्यात आला. सनातन्यांच्या मुजोरीमुळे काहीच तडजोड होत नाही व घोषाळ साहेब निराशपणे परत जातात. पण परत गेल्यावर त्यानी आपला कावा दाखवला. आयुक्त घोषाळानी हॉटसन साहेबांस एक पत्र लिहले.

“मी आताच नाशिकहुन परतलो. मला आधी वाटत होते त्यापेक्षा हे प्रकरण खूपच गंभीर आहे. देवळाला सरळ सरळ वेढा घालण्यात आला आहे. सकाळी मला तेथे आंबेडकर भेटले. शंभर महार तेथे गीत गात होते. अधून मधून उंच आवाजात युद्ध घोषणा देत होते. तेथे बऱ्याच स्त्रीया ही होत्या. खाकी पोषाक केलेले व हातात काठा घेतलेले लोकं पहारा देत आहेत. सत्याग्रहयांचा वेष खादी व डोक्यावर गांधी टोप्या होत्या. त्या त्याना नुकत्याच देण्यात आल्या होत्या. दर पाच दहा मिनटानी सत्याग्रह्यानी भरलेल्या लॉऱ्या नाशिकात येत होत्या. सत्याग्रहात अडथळा आणणारा कुठला ही हुकूम पाळला जाणार नाही असे आंबेडकरानी सांगितले आहे.

श्री. गार्डन, श्री. रेनाल्डस (पोलिस अधिक्षक) व मी सकाळी जेंव्हा तेथे गेलो तेंव्हा धरणे धरुन बसलेल्या महारां पैकी कोणीच उठून उभे राहिले नाही. त्यापैकी बरेच जण खेड्यातुन आलेले वतनदार महार आहेत. मी त्यांच्याशी बोलत असताना सुद्धा ते उठून उभे राहिले नाहित. परंतू आंबेडकर येता क्षणीच ते उठून आनंदाने उड्या मारु लागले. त्याना सलाम करु लागले. गांधीजी की जय अशा घोषणा दिल्या. सत्याग्रहाची मोहिम कुणालाच आवडली नाही. केवळ ब्राह्मणच नाही तर व इतर सर्व हिंदु या महारांचा व सत्याग्रहाचा विरोध करत आहेत. नाशिक परिसरातील महारांवर तेथील संवर्णानी बहिष्कार घातलेला आहे. अशा परिस्थीतीत उत्तेजण देणे म्हणजे त्यांची खरी सेवा करण्या सारखे नाही. या चळवळीचे स्वरुप धार्मिक असण्यापेक्षा, सामाजीक व राजकीय आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या १४७ व्या कलमानुसार गार्डनने ताबडतोब कारवाई करावी, असे मला वाटते. खेड्यातील वतनदर महारही आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक याना डरत नव्हते.”

मुजरे घेण्याची सवय असलेल्या साहेबांची आगपाखड या पत्रातुन दिसुन येते. गोऱ्या व काळ्या साहेबांना महारांचे वागणे कसे आवडत नव्हते हे घोषाळांच्या पत्रावरुन स्पष्ट दिसते. बाबासाहेबानी मेलेल्या मुर्द्यां मध्ये घातलेल्या स्वाभिमानाच्या फूंकरेचा जीवंत ठेवा. घोषाळांच्या पुढे वाढला होता. सनातनी दास्य झुगारुन देऊन आंबेडकरी रंगाने झडाडुन निघालेली नवचैतन्यानी भरलेली भीमाची पहिली तुकडी बघुन घोषाळाचे नेत्र दीपून गेले होते. बाबासाहेबांच्या मार्गदर्शना खाली तयार होणारी महारांची भावी सेना कशी असेल याचा नांदी आज घोषाळाना नशकात दिसली.

१४७ व्या कलमा खाली महारांवर कारवाई करण्याची घोषाळांची सूचना मुंबई सरकारने फेटाळली. नाशिक सत्याग्रहा बद्दल त्यांच्या पत्रातुन ओझरणारा दूराग्रह अचुक हेरल्यावर वरिष्ठानी घोषाळांवर नाराजी व्यक्त केली व २६ मार्च १९३० रोजी तडका फडकी त्यांची बदली केली. त्यांच्या जागी मध्य विभागाचे आयुक्त ए. डब्ल्यू मॅकाय काम पाहु लागले. यानी सुत्र हाती घेताच मंदिराच्या पुजा-याना बजावले की उत्तर दरवाजाच्या बाजुने एक लहानसा दरवाजा होता जो पुजाऱ्याच्या घरात जात असे. त्या दरवाजातुन पुजाऱ्यानी लोकाना आत सोडल्याची तक्रार आली व तसे न करण्याची ताकिद दिल्या गेली. आता मात्र सर्व सनातनी चवताळून उठले. ईकडे अस्पृश्य ही दंड थोपटुन उभे ठाकले. पुजाऱ्यानी नियम तोडल्यास त्यांच्या खाजगी दरवाज्या जवळ सत्याग्रह करण्याची मागणी होऊ लागली.

९ एप्रिल १९३० राम नवमी. आज रथ यात्रा निघणार अन सत्याग्रही अधिक आक्रमक होत चालले. पोलिसानी दंगल वगैरे होऊ नये, म्हणुन बंदोबस्त वाढविला. एकंदरीत तणाव वाढताना बघुन दोन्ही कडच्या नेत्यानी मिळून एक तात्पुर्ती तडजोड काढली. रथ ठेवण्याच्या जागे पासुन पुर्वेच्या श्री राम मंदिरापर्यंत रथ स्पृश्यानी आणायचा. तिथुन पुढे विमान सर्वस्वी अस्पृश्याने न्यावे अन रथ मात्र स्पृश्य व अस्पृश्यानी मिळून ओढावे. पण शब्दाला जागतील ते स्पृश्य कसले. ऐन वेळी अस्पृश्यांशी धोका केला. वेळेच्या आधीच रथ बाहेर घाई घाईने ओढण्यास सुरुवात केली. अस्पृश्याना चुकवुन रथयात्रा काढण्याचा प्लॅन होता. चरण पादूकाजवळ थांबलेल्या अस्पृश्यांच्या लक्षात येताच त्यानी सर्व शक्ती एक वटुन रथ अडाविला. या वरुन मिरवणूक बाजूला राहिली व मारामारी, दगडफेक झाली. तोवर बाबासाहेब प्रत्यक्ष घटनेच्या ठिकाणी पोहचले.

दगडांचा वर्षाव चालु होता. ईतक्यात पोलिसांचा कडा फोडुन भास्कर कद्रे नावाचा भीम सैनीक मंदिरात घुसला अन रक्ताने माखुन बेशुद्ध पडला. उपस्थीत सर्व सत्याग्रह्याना व स्वत: बाबासाहेबाना ही लहान सहान इजा झाल्या होत्या. सनातन्यानी पुर्ण ताकत झोकून दिली होती. ईकडे गावात महारांची दशा फार वाईट होती. दिसेल त्या महाराला सनातन्यानी झोडपणे सुरु केले. कित्येक गावांमधुन बहिष्कार टाकण्यात आला. जागो जागी महारांचे हाल हाल करण्यात येत होते. या सर्व परिस्थीला पाहुन रामाच पक्ष कोणाता व रावणाचा कोणता हे सांगणे न लागे. अशा प्रकारे हा सत्याग्रह १९३५ पर्यंत चालतो पण शेवट पर्यंत सनातन्यानी आपली सर्व शक्ती पणाला लाऊन महाराना रामाच्या भेटी पासुन रोखुन धरले. शेवटी हताश झालेले अस्पृश्य हे जाणतात की - आता या सत्याग्रहात राम राहिलेला नाही व आपला खरा राम शोधण्यासाठी काळा रामाला एकदाचा राम राम ठोकतात. अनंत काळापासुन तेजो भंग करण्यात आलेल्या या समाजाला आता गोलमेजच्या नविन दिशा खुणावत होत्या.

◆◆◆

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

साभार -
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया",
"दि नॅशनल नेटवर्क बुद्धिस्ट युथ : पुणे ग्रुप"

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

═══════════════════════

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/Y.M.JADHAV123

• मातृ संघटनेत सहभागी होण्या करिता
Www.SSDIndia.Org

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• YATIN JADHAV :
9967065953 Or 7738971042
(Use Only One WhatsApp Number)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा

धन्यवाद ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा