रविवार, १ जानेवारी, २०१७

● महात्मा फुले आणि स्त्री सक्षमीकरण

● महात्मा फुले आणि स्त्री सक्षमीकरण

• स्त्री मुक्ती दिन स्पेशल लेख :

(०१ जानेवारी १८४८ रोजी पुण्यात मुलींची पहिली शाळा उघडून संपूर्ण ब्राह्मणी व्यवस्थेला तडा देऊन संपूर्ण स्ञि जातीला शिक्षणाच्या प्रवाहात आणले. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती वर मात करून त्यांनी आपल्या बहुजन बांधवांवर मुलां सारखं प्रेम केलं. त्या प्रेम आणि त्यागाचं फलित आज समस्त स्ञी वर्ग आणि तुम्ही आम्ही ज्ञानाची नव नवीन यशो शिखरे पार करीत आहोत.)

महिला स्वत: च्या अस्तित्वाची जाणीव करुन देण्यासाठी आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. त्यासाठी तीच्या अंतरमनातून येणारा आत्मविश्वास, आणि धाडस हे तिला पाठबळ देत आहेत. आज ही जगातील महिलांना विविध क्षेत्रात जसे की, सामाजिक, धर्मिक विधी, शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतीक, अशा प्रत्येक क्षेत्रात निर्णय घेण्यास त्यांना दुय्यम स्थान दिले जाते. महिला सक्षमीकरणाची समिक्षा ही मानवाधिकाराच्या नजरेतुन करण्याचे काम पंचायतराज करत आहे. नुकतेच बिंजिग मध्ये जागतिक स्तरावर संपन्न झालेले ४ थे जागतिक संम्मेलनाचे घोष वाक्य होते -  ‘‘महिलांच्या दृष्टीतुन जगाकडे पाहा.‘‘ महिला सक्षमीकरणात सर्वात महत्वाची बाब म्हणजे तिला माणुस म्हणुन जगण्याची संधी देऊन तिला तिचे व्यक्तिमत्व विकसित करण्यास समाजातून प्रोत्साहन मिळावे.

महिला सक्षमीकरणाचा अर्थ महिलांना भीक नको आहे, कोणाची दया नको आहे, तर त्यांना पुरुषांप्रमाणे समान संधी हवी आहे. आणि यासाठीच महिला सक्षमीकरण महत्वाचे ठरते. महिला सक्षमीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरु आहे. महिला सक्षमीकरण ही संकल्पना महिला विकासाच्या संदर्भात रुढ झाली आहे. पावलो फ्रिरे यांनी सर्व प्रथम ही संकल्पना उपयोगात आणली ‘‘महिलांना सबला करणे आणि त्यांना समान हक्क व संधी देणे हेच यामागील तत्व आहे‘‘. स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये महिलांसाठी ३३ टक्के जागा राखीव ठेवण्यासाठी ७३ वी घटना दुरुस्ती इ. स. १९९० मध्ये करण्यात आली. तसेच महाराष्ट्रामध्ये स्वंय साहाय्यता बचत गटाच्या माध्यमातुन महिलांच्या विकासाला एक नवि दिशा मिळाली आहे.

• व्याख्या - 
१. ‘‘सत्तावंचित - संधीवंचित महिलांना कोणत्याही भेदभावाशिवाय प्रगती करण्याची संधी देणे म्हणजे महिला सक्षमीकरण होय.‘‘

२. ‘‘महिला सक्षमीकरण म्हणजे दुर्बलता नष्ट करणारी, स्त्रीच्या शरीर, मानव बुध्दीमध्ये स्वत्वाची जाणीव व स्वत: बद्दल जागरुकता निर्माण करणारी व त्यादृष्टीने स्वयं विकासासाठी प्रवृत्त करणारी एक संकल्पना होय.‘‘

३. ‘‘महिला सक्षमीकरण म्हणजे स्त्रीचे व्यक्तिमत्व एक माणुस म्हणुन व्यक्ती म्हणुन विकसित करणे आणि त्यांना समान संधी देणे होय.‘‘

• महिलांचे सामाजिक योगदान - 
ब्रिटिश सत्तेच्या स्थापने नंतर भारतीयांना पाश्चात्य ज्ञान, संस्कृतीची ओळख झाली. प्रशासनाचा व्याप सांभाळण्यासाठी भारतीयांना तयार करण्याच्या उद्देशाने शिक्षणाची सुरुवात ब्रिटिशांनी केली. बुध्दिवाद, स्वातंत्र्य, समता यांना महत्व आले. यावर आधारित सामाजिक बदलाला प्रारंभ झाला. स्त्रियां वरील अन्याय दूर व्हावेत, त्यांना समाजात समानता, पुरुषांच्या बरोबरीचे स्थान प्राप्त करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. स्त्रियांना प्रथम शिक्षण दिले पाहिजे हे ओळखूनच स्त्री शिक्षणावर भर देण्यात आला. त्यामुळेच आधूनिक काळातील स्त्रीची जडण - घडण होऊ लागली. समाजाचा आधार असलेली स्त्री पुरुषाच्या बरोबरीने मुक्ती लढा व समतेचा लढा देण्यास सज्ज झाली. त्यामुळे महिलांनी जे सामाजिक योगदान दिले आहे त्याचा ही विचार व्हायला हवा.

महाराष्ट्रातील स्त्री मुक्ती आंदोलनाची पहिली अग्रणी, पहिली स्त्री शिक्षीका व पहिली मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले, यांनी मुलींच्या शिक्षणासाठी अनेक प्रकारचा त्रास सहन केला. पती निधना नंतर त्यांनी सत्यशोधक समाजाचे कार्य केले. विधवा पुन: र्विवाह घडवून आणणारी सभा स्थापन केली. त्यामध्ये हळदी कुंकू, समारंभ, रसपान, प्रौढ स्त्रियांचे शिक्षण आणि स्त्रीयांवर होणारा अन्याय या विषयांवर चर्चा व उपाय सूचवले जात असत, तसेच आत्माराम तर्खडकर यांनी आपल्या तिन्ही मुलींना शिक्षण दिले. अन्नपूर्णा ही विलायतेत शिक्षणासाठी जाणारी पहिली महाराष्ट्रीय महिला होती. पंडिता रमाबाई यांचे स्त्री सुधारणे संदर्भात कार्य मोलाचे समजले जाते. स्त्रियांच्या उन्नती संदर्भात शिक्षण प्रसाराचे कार्य केले. भारतातील शिक्षण पध्दतीत पुनर्रचना करण्यासाठी १८८३ मध्ये हंटर कमिशन समोर रमाबार्इंनी साक्ष नोंदवली. मार्च १८८९ ‘शारदा सदन‘ नावाची मुंबई येथे शाळा सुरु केली. स्त्रियांमध्ये पंडिता रमाबाई यांच्या नंतर प्रभावी कार्य करणारी प्रमुख महिला म्हणून रमाबाई रानडे यांचा उल्लेख केला जातो. अमेरिकेत जाऊन वैद्यकिय शास्त्रातील पदवी मिळवणारी देशातील पहिली महिला आनंदीबाई जोशी होत्या. महात्मा फुले यांच्या कार्या पासून प्रेरणा घेऊन ताराबाई शिंदे यांनी स्वतंत्र विचार मांडले. १८८२ मध्ये ‘स्त्री-पुरुष तुलना‘ या विषयावर निबंध लिहिला. विठ्ठल शिंदे यांची बहिण जनाबाई शिंदे यांनी अस्पृश्य स्त्रियांमध्ये जागृती करण्याचे कार्य केले. स्पृश्य - अस्पृश्य महिलांना एकत्र आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्या नंतरच्या काळात भारतीय स्वातंत्र्यासाठी झाशीची राणी लक्ष्मीबाई, मादाम कामा, प्रितीलता वेदार अशा अनेक स्त्रियांनी मोलाचे योगदान दिले. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणुन इंदिरा गांधींनी उत्कृष्ट कार्य केले. स्त्री चळवळीची बीजे रोवण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी रोवली, आज त्याचा वटवृक्ष झाला आहे. हे काम उल्का महाजन, मेधा पाटकर, डॉ. राणी बंग, मंदा आमटे इ. स्त्रीया अखंडपणे चालवत आहेत.

• महिलांचे सक्षमीकरण - 
स्त्रियांचे सबलीकरण होणे म्हणजे तिचे व्यक्तिमत्व एक माणूस म्हणून विकसित करायचे व तिला तशी संधी मिळवून द्यायची. महिलांना कोणत्याही भेदभावाशिवाय प्रगती करण्याची संधी द्ययला हवी. कारण, प्रत्येक वेळी ती अबला आहे तसेच तिला काही कळत नाही, ती सक्षम नाही, पुरुषांच्या तुलनेत ती काम करण्यास सक्षम नाही. असे म्हटले जाते. तसेच विविध जाती धर्माच्या स्त्रियांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. स्त्रियांच्या अंगी असणारी सहन शक्ती, संयम या गुणांमुळे तिला प्रत्येक वेळी गृहित धरले जाते, परंतु झाशीची राणी लक्ष्मीबाई ते आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना गार्ड ऑफ ऑनर देणारी पुजा ठाकुर यांच्या उदाहरणावरुन स्त्रिया किती सक्षम आहेत हेच दिसून येते.

आज महिलां संदर्भात विविध विकास योजना राबवल्या जात आहेत. त्यांचा विकास होण्यास प्रारंभ देखील झाला आहे, परंतु ही विकासाची वाटचाल सातत्याने टिकवावी लागेल. समाजाला स्त्रियांच्या प्रश्नांसंदर्भात जागृत करणे आवश्यक आहे.

• महिलांचे सामाजिक स्थान आणि सक्षमीकरण - 
भारतीय संस्कृती विकासाच्या इतिहासाची पाने उलगडून पाहिली तर एक गोष्ट लक्षात येते की, पूर्व कालखंडात स्त्री ही पुरुषांच्या बरोबरीची होती, मध्य कालखंडात ती वासना आणि विटंबनेची प्रतीक बनली आणि उत्तर कालखंडात गुलामगिरीच्या पाशात स्त्री अडकली गेली. स्त्रीयांचे आजच्या समाजातील स्थान काय याचा विचार के ला तर एक गोष्ट निश्चितपणे लक्षात येते की, मातृसत्ताक कुटूंब पध्दतीत जीथे घरातील सर्व अधिकार महिलांकडे आहेत, तिथे स्त्री पुरुष नात्यांमध्ये मात्र महिलांना एकतर पुरुषांच्यासाठी पुरक मानलं गेलं किंवा देवत्वाच्या सोनेरी पिंज-यात तीला बंदिस्त करण्यात आलं, एक माणुस म्हणुन आम्ही स्त्री कडे कधी पाहिलंच नाही हे ही वास्तव आहे.

लहानपणी बाप, तरुणपणात नवरा आणि म्हातारपणी मुलगा या तीन कक्षांमध्ये महिला बंदिस्त झाल्या. रांधा, वाढा, उष्टी काढा यातुन व चूल आणि मूल यातून स्त्री बाहेर पडली नाही. काळ बदलला तशी परिस्थिती बदलली. आज विविध क्षेत्रात महिला आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटवतांना दिसत आहेत. मात्र, एकीकडे ही परिस्थिती असतांना आमच्या देशत आजही सार्वजनिक ठिकाणी स्त्रीयांसाठी स्वच्छता गृहे नाहीत, ही परिस्थिती आहे. पूर्वीची स्त्रीची प्रतिमा आता विस्तारली असली तरी, सामान्य गृहिणीपासून, डॉक्टर, शिक्षीका, कायदे तज्ञ, लेखिका, पत्रकार, अभियंता या क्षेत्रात ही अस्तीत्वासाठी स्त्रीयांना संघर्ष करावा लागतोय. आजचे स्त्रीयांचे समाजातील स्थान याचा वास्तवतेने विचार केल्यास "यत्र नार्यस्तू पुज्यन्ते रमन्ते तत्र देवता" असे सांगणाऱ्या संस्कृतीत ‘‘स्त्री जन्मा ही तुझी काहणी - हदयी अमृत नयनी पाणी‘‘ अशी परिस्थिती आहे. बीड जिल्हा हा स्त्री भ्रुण हत्या प्रकरणात देशात गाजला, ही परिस्थिती का आली याचा ही विचार व्हायला हवा. स्त्रीकडे आम्ही उपभोग्य वस्तू म्हणून पाहिले. त्यामुळे तीचे समाजातील स्थान डळमळीत झाले. महिलां वरील अत्याचार वाढले. हुंड्या सारख्या प्रथेने आमच्या समाजात पाय घट्ट रोवले, मुलगी घरात होणे म्हणजे मुलीच्या बापासाठी जीवाला घोर निर्माण झाला. आणि आजारापेक्षा उपचार भयानक या उक्ती प्रमाणे महिला अत्याचार, हुंड्याची समस्या या बाबत उपाय शोधण्या पेक्षा मुलगी न होऊ देणे हा पर्याय निवडण्यात आला. २०११ च्या जनगणनेच्या अहवाला नुसार देशात दहा वर्षात ४ कोटी मुली गर्भातच मारल्या गेल्या, हा जर अधिकृत आकडा असेल तर अनाधिकृत आकडा यापेक्षा नक्कीच जास्त असेल.

समाजात आज स्त्री राजकारण, समाजकारण, अर्थकारण, सहित्य, कला, क्रीडा या सगळ्या क्षेत्रात मुक्तपणे संचार करत आहे. तीच्या पाऊलखुणा, पदचिन्ह विविध ठिकाणी उमटत आहेत. प्रतिकुल परिस्थितीवर मात करत स्त्रीयांनी समाजातील आपले स्थान निर्माण केले आहे.

• शिक्षणाद्वारे महिलांचे सक्षमीकरण :- 
महात्मा फुले म्हणतात की - ‘‘घरातील एक माता शिकुन शहाणी झाली तर, सर्व कुटूंब शहाणे होईल, सगळ्या स्त्रीया शिकल्या की, सर्व देश जागा होईल.‘‘ असा विचार करुनच महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाचे कार्य हाती घेतले. स्त्री शिक्षणाच्या बाबतीत भारतच नव्हे तर महाराष्ट्र देखील अग्रेसर राहीला आहे. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी हिंगणे येथे महिला शिक्षण संस्था सुरु केली. आज महाराष्ट्रात अनेक संस्था स्त्री शिक्षणाचे कार्य करत आहेत. मुलीं करिता स्वतंत्र शाळा, वस्तीगृहे, महाविद्यालये, त्या अंतर्गत चालवली जातात. शासनाकडून स्त्री शिक्षणाच्या प्रसारा करिता १२ वी पर्यंतचे शिक्षण मुलींना मोफत दिले जाते. प्राथमिक स्तरावर १९६० - ६१ ते २००० - ०१ या अवधीत मुलींच्या संख्येत ३.८२ पट, माध्यमिक स्तरावर १० पट व उच्च माध्यमिक स्तरावर ६.५ पट वाढ झालेली आहे. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात ही महाराष्ट्रीयन स्त्रीयांचे प्रमाण वाढत आहे. ही प्रगती निश्चितच नोंद घेण्यासारखी आहे.

• आर्थिक दृष्ट्या महिलांचे सक्षमीकरण - 
भारतातील बहुसंख्या घर कामात गुंतलेल्या आहेत. समाजात माणूस म्हणून जगायचे असेल तर, आर्थिक स्वावलंबन आवश्यक आहे. स्त्रीयांच्या आर्थिक स्थिती बाबत मार्केस म्हणतो की - ‘‘उत्क्रांतीच्या टप्यावरुन पुढे सरकताना, आणि रानटी अवस्थेतुन सांस्कृतिक आवस्थे पर्यंत येताना उत्पादन साधने विकसीत होत गेली. नंतर खाजगी मालमत्ता ही संकल्पा रुढ झाली. आणि संपत्ती वरील इतर हक्क पुरुषांकडे गेले. एन्जेल्स म्हणतो - ‘‘जस जशी संपत्ती वाढली, तस तसा पुरुषाचा कौटूंबीक आणि कुटूंबा बाहेरचा दर्जा स्त्रीयांच्या तुलनेत उंचावला, यातुन स्त्रीच्या लेखी दुय्यम दर्जा प्राप्त झाला.‘‘ उपरोक्त संदर्भा नुसार वेतना संबंधी भेदभाव, स्वयं रोजगार अर्थ सहाय्याचा अभाव, विना वेतन काम व बेरोजगारी, कुटीर उद्योगात मालकी हक्क नाही अशा अनेक कारणांमुळे स्त्रीचे आर्थिक स्थान पुरुषांपेक्षा दुय्यम राहीले, असे दिसते. महिलांना स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देऊन आर्थिक दृष्ट्या महिला सक्षमीकरण करणे हा या प्रक्रियेचा उद्देश आहे. महिलांना आर्थिक अधिकार मिळवून देणे, उत्पादन प्रक्रियेत सहभागी करुन घेणे या गोष्टी केल्या तरच राष्ट्राचा विकास होईल.

• राजकीय दृष्ट्या स्त्रीयांचे सक्षमीकरण - 
महिलांना पुरुषांच्या तुलनेत समान स्तरावर आणण्यासाठी सबलीकरणाची नविन संरक्षक शक्ती व सामर्थ देणे गरजेचे आहे. राजकीय स्तरावर निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढल्यास राजकारणात बदल होईल. तसेच राजकारणाला नवी दृष्टी मिळेल आणि राजकारणात संस्थात्मक बदल देखील घडतील. शिक्षणाचा आभाव राजकारणाकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टीकोण, महिलांची कुटूंबाप्रती असणारी जबाबदारी व परंपरेमुळे तसेच मानस शास्त्रीय दृष्ट्या स्त्री राजकारणा पासून उदासिन राहते. या व अशा अनेक बाबी स्त्रीयांच्या राजकीय सहभागातील कमी प्रमाणास कारणीभुत ठरतात. परंतु इंदिरा गांधींपासून आजच्या ग्राम विकास मंत्री पंकाजा मुंडे यांच्या पर्यंत स्त्रीयांचा राजकारणातील सहभाग नाकारता येणार नाही.

• उपसंहार - 
महिलांना सक्षम करुनच आपण समाज आणि राष्ट्राला बलवान करु शकतो. महिलांचा सहभाग, त्यांना संरक्षण, त्यांची आर्थिक उन्नती, त्यांच्या क्षमतांचे संवर्धन आणि या सर्वांसाठी अनुकूल वातावरण निर्मिती करावी लागणार आहे. स्त्रीयांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणे आवश्यक आहे. २१ व्या शतकातील आधूनिक समाजाने स्त्रियांकडे निखळ दृष्टीने पहायला हवे असा समाज घडविणे ही पुरुष व स्त्री दोघांची जबाबदारी आहे. समाजाने आपली मानसिकता बदलून स्त्रीयांना जगवले पाहिजे तरच ती शिक्षीत होऊ शकेल तसेच त्या माध्यमातून विकसित राष्ट तयार होईल. कारण, स्वामी विवेकानंद म्हणतात, स्त्रियांची स्थिती सुधारल्याशिवाय जगाच्या कल्याणाची शक्यता नाही.

कोमल हैं कमजोर नही तू 
शक्ती का नाम ही तेरा नारी है !
सबको जीवन देणे वाली 
मौत भी तुमसे हारी है !

धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

जय भिम
जय भारत
नमो बुद्धाय

••¤••••¤••••¤••

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com

• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com

• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा