सोमवार, १६ जानेवारी, २०१७

● डॉ. बाबासाहेबांनी सांगितलेले विचार म्हणजे राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रप्रेम आहे.

● डॉ. बाबासाहेबांनी सांगितलेले विचार म्हणजे राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रप्रेम आहे.

लेख -
यतिन जाधव

ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांना पत्रकाराने विचारले होते, ''व्हॉट इज डिफरन्स बिटवीन ए पॉलिटिशियन ऍंड ए स्टेट्समन?'' त्यावर क्षणात विस्टन चर्चिल म्हणाले होते, ''जो येणाऱ्या निवडणुकीवर डोळा ठेवून बोलतो तो 'पॉलिटिशियन' आणि जो येणारी पिढी डोळयां समोर ठेवून बोलतो तो स्टेट्स मन.'' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यातील दुसऱ्या क्रमांकात मोडणारे महापुरुष म्हणावे लागतील. ते केवळ द्रष्टेच नव्हते, तर त्यांच्या द्रष्टेपणाला नियोजन बध्द कृतीची जोड होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर काल ही काल सुसंगत होते आणि आज ही त्यांची प्रासंगिकता अधिक आहे. येणाऱ्या काळात तर ती प्रासंगिकता आजच्या पेक्षा ही जास्त असेल. समाजातील अस्पृश्यांना उच्च वर्णीयां कडून जी हीनतेची वागणूक दिली जात होती, त्यातून अस्पृश्य समाजाला मुक्तीचा मार्ग दाखविण्याच्या दिशेने वाटचाल करताना अस्पृश्य समाजात स्वाभिमानाचे स्फुल्लिंग चेतविताना त्यांनी राष्ट्र जीवनाच्या विविध समस्यांचा ही विचार केलेला आहे. आधुनिक भारताच्या जडणघडणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान ऐतिहासिक स्वरूपाचे आहे. पण अजूनही आपल्या एकूण सार्वजनिक जीवनात त्यांचे असलेले योगदान लक्षात घेतले जात नाही. डॉ. आंबेडकरांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू आश्चर्याने थक्क करणारे आहेत.

अमेरिकेतील विश्व विख्यात कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन विश्व विद्यापीठ येथून पदव्या घेतलेले एक श्रेष्ठ अर्थ शास्त्रज्ञ, 'महानायक' आणि 'बहिष्कृत भारत'चे झुंजार संपादक, अस्पृश्यता पालनाने केवळ अस्पृश्यांचेच नाही, तर सबंध भारतीय समाजाचे कसे अतोनात नुकसान झाले आहे हे प्रभावीपणे सांगणारे एक द्रष्टे विचारवंत, 'बुध्द आणि त्यांचा धम्म' हा ग्रंथ लिहून बुध्दाच्या समग्र तत्त्वज्ञानावर भाष्य करणारे तत्त्वज्ञ, मुंबई उच्च न्यायालयात वकिली करणारे एक निष्णात बॅरिस्टर, १९४२ ते १९४९ या चार वर्षांत व्हाईस रॉयच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मध्ये असताना भारतातील कामगारांचे सर्व प्रकारचे हित जोपासण्यासाठी कायदे करण्यात पुढाकार घेणारे निर्भीड मजूरमंत्री, भारतीय महिलांना समान अधिकार मिळविण्यासाठी प्रयत्न करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

डॉ. आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे हे विविध पैलू पाहिले की भारतातील एकही समाज घटक त्यांच्या ऋणातून मुक्त नाही. तरी ही भारतीय समाजाने त्यांच्या या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची दखल म्हणावी तेवढी घेतलेली दिसत नाही. अस्पृश्यांचे - फार तर दलितांचे पुढारी आणि 'भारतीय घटनेचे शिल्पकार' इथ पर्यंत त्यांची ओळख आपण मर्यादित ठेवली आहे. पण या मर्यादित परिचयाने आपण या उत्तुंग आणि तेजस्वी व्यक्तिमत्त्वाच्या कर्तृत्वाला आणि व्यक्तित्त्वाला जणू सीमित करून ठेवले आहे.

'सीमित' या अर्थाने की, बाबासाहेबांच्या प्रकांड बुध्दिमत्तेला आणि तितक्याच भव्य आविष्कारांना न्याहाळण्याचे कष्टच आपण घेत नाही. खरे पाहता, डॉ. आंबेडकर यांनी या देशाच्या जवळजवळ प्रत्येक प्रश्नांचा अगदी मुळाशी जाऊन विचार केलेला आहे. इतकेच नव्हे, तर या प्रश्नांची सोडवणूक कशी करावी यासंबंधी वेळोवेळी उपाय योजना ही सांगितली आहे. आर्थिक धोरण, भाषावार प्रांतरचना, शिक्षण प्रणाली, पाणी धोरण, वीज विषयक धोरण, नद्यांच्या पाणी वाटपाचा प्रश्न, पाकिस्तान समस्या. देशाचा एकही प्रश्न त्यांच्या नजरेतून सुटला नाही. देशातील प्रश्नांचा इतका समग्र, विस्तृत आणि सखोल विचार त्यांनी का केला असेल? आणि जातीय कारणाने त्यांना सतत अवहेलना सहन करावी लागत असतानाही? त्याचे एकच उत्तर आहे - डॉ. आंबेडकर हे प्रखर देशभक्त होते. हजारो वर्षांच्या जाति व्यवस्थे विरुध्द अगदी एकाकीपणे संघर्ष करणे ही भारतीय इतिहासाने त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी होती आणि ती जबाबदारी यशस्वीपणे निभावून भारतीय समाज व्यवस्थेला सामाजिक आशय देण्याचे ऐतिहासिक कार्यच त्यांच्या हातून घडले आहे. हा आशय प्रत्यक्ष देण्याची संधी जेव्हा त्यांना घटना समितीच्या मसुदा समितीच्या अध्यक्ष पदामुळे मिळाली, तेव्हा ही आंबेडकरांनी त्या संधीचे सोने केले.

पर्वत, नद्या, डोंगर, फुले आणि फळे ही राष्ट्राच्या अस्मितेची प्रतिके आहेत हे खरे. परंतु मुळात राष्ट्र ही संकल्पना माणसाने निर्माण केली, म्हणून राष्ट्राचा खरा नायक माणूस आहे. राष्ट्र म्हणजे माणसां माणसांतील संबंध. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय यावर हे संबंध आधारलेले असावेत, हा डॉ. आंबेडकरांचा आग्रह होता. डॉ. बाबासाहेब म्हणत - ''विचार सुध्दा मर्त्य असतात. ज्या प्रमाणे रोपटयांना पाण्याची आवश्यकता असते, त्याप्रमाणे विचारांना सुध्दा प्रचार - प्रसारांची नितांत आवश्यकता आहे.'' डॉ. आंबेडकरांचे विचार सुयोग्य प्रकारे समाजाच्या सर्व स्तरापर्यंत नेण्यासाठी ग्रंथ निर्मिती, कला निर्मिती, काव्य, साहित्य संमेलने यांची नितांत निकड आहे. डॉ. बाबासाहेबांनी सांगितलेले विचार म्हणजे राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रप्रेम आहे. त्याच बरोबर विषमते विरुध्द लढणारा एक विचार आहे. सामाजिक सामंजस्यच सामाजिक परिवर्तन घडवून आणते. खऱ्या अर्थाने आपल्या विचारांतून परिवर्तनाचे ध्येय सांगणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आज ही तितकेच मार्गदर्शक आहेत.

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

साभार -
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

------------------------

जय भिम
जय भारत
नमो बुद्धाय

••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com

• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com

• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा