बुधवार, १२ डिसेंबर, २०१२

भारतीय करतात सुट्यांशिवाय काम

भारतीय करतात सुट्यांशिवाय काम



हक्काच्या सुट्याही न घेता कामाला प्राधान्य देणाऱ्या देशांमध्ये भारताला पहिल्या चार देशांमध्ये स्थान मिळाले आहे. सुटीच्या दिवशीही ऑफिसचे काम करणे किंवा महत्त्वाच्या कामासाठी सुट्याच रद्द करणे, यात भारतीय आघाडीवर आहेत. "एक्‍स्पिडिया' या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात कमीत कमी सुट्या मिळणाऱ्या देशांमध्ये भारताला चौथा क्रमांक मिळाला आहे. मात्र, तरीही दोनतृतीयांशाहून अधिक भारतीय वरिष्ठ अधिकारी हाताखालच्या कर्मचाऱ्यांना सहज सुट्या मंजूर करतात, असेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे. 

एकट्याने प्रवास करण्याचा कंटाळा, सुट्या राखून ठेवत त्या ऑफिसला विकणे, कामाचे अतिदडपण आणि आपल्या अनुपस्थितीत ऑफिसमध्ये महत्त्वाच्या घटना घडण्याची भीती, ही भारतीयांनी सुटी न घेण्याची काही प्रमुख कारणे आहेत, असे "एक्‍स्पिडिया'च्या 
सर्वेक्षणात नमूद केले आहे. गेल्या वर्षभरात भारतीयांचे सुटी घेण्याचे प्रमाण वर्षाला 25 दिवसांवरून 20 दिवसांपर्यंत खाली घसरले आहे. गेल्या वर्षी याच सर्वेक्षणात भारताचा पाचवा क्रमांक होता. 
युरोपीय देशांच्या तुलनेत आशिया खंडातील कर्मचारी कमीत कमी सुट्या घेत काम करतात. या सर्वेक्षणात जगभरातील 22 देशांमधील 8,687 कर्मचाऱ्यांशी "ऑनलाइन' संवाद साधण्यात आला. 

सुट्या घेण्यात फ्रान्स अव्वल 

जागतिक पातळीवर सर्वांत जास्त सुट्या घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत फ्रान्स अव्वल आहे. फ्रान्समध्ये वर्षाला सरासरी 30, तर जपानमध्ये कमीत कमी 5 सुट्या घेतल्या जातात. अमेरिका आणि मेक्‍सिकोमधील कर्मचारी प्रत्येकी 10 दिवस सुट्या घेतात. स्पेन (30 दिवस), जर्मनी (28 दिवस) आणि ब्रिटन, नॉर्वे, स्वीडन (प्रत्येकी 25 दिवस) हे देशही सुट्या घेण्यात आघाडीवर आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा