मंगळवार, ११ डिसेंबर, २०१२

’एक शुन्य मी’ धर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही


’एक शुन्य मी’ 

धर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही

        -पु. ल. देशपांडे.

भारतीय समाजप्रबोधनाच्या बाबतीत आपल्या देशातले नेते हे एक प्रकारच्या भ्रमातच वावरत होते असे मला वाटते. निखळ वैज्ञानिक दृष्टिकोनाचे एकूणच आपल्या देशातील हिंदूंना आणि मुसलमानांना वावडे. बरे, ज्या ख्रिस्ती लोकांशी संबंध आला, ते पाद्री धर्मप्रसारक. शाळा-कॉलेजे त्यांनीच चालवली. त्यांच्याही डोळ्यांना झापडे बांधलेली. शिवाय आपल्या देशात शारीरिक श्रमाइतकाच वैचारिक श्रमाचा तिटकारा. 

बाबासाहेब आंबेडकरांनी एके ठिकाणी म्हटले आहे, की ब्राम्हण इंग्रजी विद्या शिकले ते कारकुनी नोकऱ्या मिळाव्यात म्हणून. लाखात एखादा सोडला तर ब्राम्हणांच्या घरातही पाठ्यपुस्तकापलीकडे व्यासंगासाठी ग्रंथसंग्रह नव्हता. वेदांचा फक्त अभिमान बाळगायचा; त्याला अक्कल लागत नाही. पण वेद वाचून वेदांचा अभिमान बाळगणारे शोधून सापडायचे नाहीत. सारे अभिमान आंधळे! कुणी तरी भारतात सोन्याचा धूर निघत होता म्हणायचे आणि इतरांना तो आपण पाहिल्यासारखे वागायचे. आमचे इतिहाससंग्रह हे जवळजवळ कल्पनारम्य पुराणासारखे. ऐतिहासिक घटनांचे विश्लेषण नाही, आत्मपरीक्षण नाही. सदैव वास्तव नाकारत जगायचे. कुठल्याही घटनांचे कार्यकारणभाव लावण्याच्या फंदात पडायचे नाही. सारा हवाला एक तर देवावर नाही तर दैवावर.

 न्यायमूर्ती रानड्यांसारखी माणसेदेखील इंग्रजी राज्य हे Divine dispensation मानताना पाहिली की आश्चर्य वाटते. आमचे देवदेखील वरती हिंदुस्थानचा नकाशा घेऊन जरा चार इंग्रज पाठवून भारतीयांना शहाणे करू या म्हणत बसले होते. स्वातंत्र्याच्या चळवळीच्या काळात जातिभेद नष्ट झाल्याच्या भ्रमातच आपण सारे जण वावरत होतो. जातीय संघटनांच्या शक्तीची जाणीव, मते पदरात पाडून घ्यायला स्वातंत्र्यानंतर जेव्हा व्हायला लागली तेव्हा सेक्युलर भारताचा जयजयकार करणाऱ्या नेत्यांची गाळण उडाली. लाखातला एखादा अपवाद वगळला तर उमेदवारांच्या निवडीपासून ते प्रचारापर्यत सारे काही जात, धर्म, पंथ यांच्या दुराभिमानाला जागवतच चालत असत. मग 

निवडणूक-प्रचाराचे नारळ तुळजाभवानीपुढे फुटतात, दर्ग्यावर चादर चढते, देवळावर कळस चढतात. तान्ही पोरे दुधावाचून तडफडत असली तरी दगडी पुतळ्यावर शेकडो दुधाच्या घागरी उपड्या होतात

आपल्या देशात केवळ हिंदूच नव्हे तर मुसलमान, ख्रिश्चन, बुध्द, जैन, शीख- सगळ्यांची अस्मिता जात आणि पंथाधिष्ठितच आहे. एखाद्या राजकीय किंवा भाषिक चळवळीच्या प्रसंगी किंवा चीन-पाकिस्तानसारख्या युध्दाच्या प्रसंगी माणसे एकत्र आल्यासारखी वाटतात; पण लगेच पुन्हा आपापल्या जातीच्या कळपात जातात. मुसलमानांतले शिया आणि सुनी, आगाखानी, कटियारी, मोमीन, खोजे, बोहरी वगैरे लोकही एकमेकांपासून विधर्मीयांइतकेच दूर आहेत. केरळातले सिरीयन ख्रिस्ती आणि मंगळूरचे कॅथॉलिक किंवा महाराष्ट्रातले प्रोटेस्टंट किंवा मेथॉडिक यांच्यात वैमनस्याच्या भिंती उभ्या आहेत. गोव्याच्या ख्रिस्ती लोकांत बामण खिरिस्तॉव आहेत. आहिंसा परमो धर्म मानणाऱ्या श्वेतांबर आणि दिगंबर पंथांच्या जैनांच्या देवाच्या अलीकडील घटना तुम्हाला ठाऊक असतीलच.

 मनुष्यस्वभावात हा जा नावाचा व्हायरस इतका घट्टपणे कसा रोवून घेऊन बसतो हे एक विलक्षण कोडे आहे.

  आर्थिक अभ्युदयाबरोबर जातीच्या प्रश्नांची तीव्रता कमी होईल असे वाटले होते. कामगार-चळवळीला जोर आल्यावर सारे कामगार यापुढे ‘कामगार’ हीच जात मानतील, असाही विश्वास होता. पण तेही खरे ठरले नाही. त्या चळवळीच्या नेत्यांचे पितळ कामगार-चळवळीच्या प्रारंभीच्या काळात सूत-गिरण्यांतल्या अस्पृश्य मानल्या गेलेल्या कामगारांना दूर ठेवण्यापासूनच उघडे पडले होते. खुद्द कम्युनिस्ट देशांतही पुन्हा एकदा राष्ट्रवादाने जोर धरल्यासारखे दिसते. रशियन कामगार आणि चिनी कामगार आता एकमेकांचे वैरी झालेले दिसताहेत. ज्या चीनमध्ये माओचे रेड बुक म्हणजे रोज सकाळी उठून भक्तिभावाने वाचायचा ग्रंथ होता आणि ‘माओच्छिष्ठम् जगत् सर्वम्’ अशी परिस्थिती होती, तिथे इतिहासातून माओचे नाव पुसून टाकायचा चंग बांधलेला दिसतो आहे. अरब राष्ट्रांकडे पहावे तर अंधश्रद्धा, रूढी, धर्म-दुराभिमान ही मध्ययुगीन भुते थैमान घालताना दिसताहेत. खोमिनीच्या राज्यात बायका पुन्हा एकदा घरातल्या अंधारात कोठड्यात गेल्या. ही भुते उतरवण्याऐवजी त्यांचे सामर्थ्य वाढीला लावण्यात येत असलेले दिसत आहे.
 आपल्या देशात पुरोगामी विचारांचा झेंडा मिरवणाऱ्या साम्यवाद्यांनी तर बुद्धिप्रामाण्य वाढीला लावण्यासाठी किंवा एकूणच समाजप्रबोधनासाठी कुठलेही धाडसी पाऊल टाकलेले नाही. 

कम्युनिस्ट युनियनचे सभासद असलेले मुंबईतले गिरणी-कामगार एकीकडून क्रांतीचा जयजयकार करतात आणि दुसरीकडून देवीला कोंबडा मारून नवस फेडतात. 

आपल्या देशात एकाच काळात आदिमानव-युगापासून apple-युगापर्यत सारे काही एकदम नांदत असते. त्या वेळी तुम्ही कशालाही भारतीय संस्कृती म्हणू शकता! फक्त ही वास्तवापासून अधिक दूर असेल तितकी अधिक भारतीय. जयप्रकाशजींचे नवनिर्माण-आंदोलन प्रचंड जोराने करणाऱ्या गुजरातेत राखीव जागाविरोधी आंदोलनही तितक्याच तीव्रतेने होऊन हजारो दलिनांना उध्द्वस्त करण्यात येते. मराठवाड्याची अस्मिता विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्याच्या बाबतीत इतकी जागी होती, की शेकडो दलितांना आपल्या झोपड्या भस्मसात होताना पाहाव्या लागतात. कसले प्रबोधन, कसले फुले आणि कसले काय?

 एक तर धर्म, ईश्वर, पूजा-पाठ ह्यात मला कधीही रस वाटला नाही. शिल्पकारांचे कौशल्य म्हणून मला मूर्ती पहायला आवडतात. समजू लागलेल्या वयापासून माझा कोणत्याही मूर्तीला नमस्कार घडलेला नाही. 

पूर्वजन्म, पुनर्जन्म वगैरे थोतांडावर माझा विश्वास नाही. देव, धर्म या कल्पना धूर्त सत्ताधाऱ्यांनी दहशतीसाठी वापरलेल्या आहेत, याविषयी मला यत्किंचितही शंका नाही. 
 आपल्या देशात इतके संत जन्माला यायच्याऐवजी ऐहिक जीवनाला विज्ञानाचे अधिष्ठान देणारे शास्त्रज्ञ जन्माला आले असते तर हा देश अधिक सुखी झाला असता. मला कुठल्याही संतापेक्षा अॅनेस्थेशियाचा शोध लावून वैद्यकीय शस्त्रक्रिया वेदनाहीन करणारा संशोधक हा अधिक मोठा वाटतो.

 विज्ञान जन्मजात श्रेष्ठत्वकनिष्ठत्व मानत नाही. सत्याचे दर्शन घडवणाऱ्या वैज्ञानिकांचा, देवाचे नाव घेणाऱ्या धर्मगुरूंनी आणि त्यांच्या दहशतीखाली असणाऱ्या अडाणी राजे लोकांनी सगळ्यात अधिक छळ केला आहे. 

धर्म धर्म करणाऱ्या लोकांइतके सत्याचे आणि वास्तवाचे शत्रू नसतील. मग ते बायकांना नवऱ्याच्या चितेवर जिवंत जाळतील, नरबळी देऊन आपले राजमहाल आणि देवळे टिकाऊ करतील, कुणाला अस्पृश्य म्हणतील, कुणाला वाळीत टाकतील, काय वाटेल ते करतील. धर्म आणि पंथाच्या दुरभिमानातून माणसाचे रक्त सगळ्यात अधिक सांडलेले आहे; आणि या साऱ्या खटाटोपातून शेवटी नवे हुकूमशहाच उदयाला आलेले दिसतात.

 पण आपला इतिहास हा मुख्यतः राजे लोकांनी मुलूख बळकावण्यासाठी केलेल्या लढायांचा, जयापराजयाचा इतिहास आहे; आणि प्रत्येक विजयी राजाच्या भाट-चारणांची ही प्राचीन परंपरा आजही कशी टिकून आहे, ते आपण पाहतोच आहो. विजयी राजाच्या भाट-चारणांनी त्यातील सत्यावर स्तुतिस्तोत्रांच्या इतक्या झुली पांघरल्या आहेत, की भूतकाळातल्या त्या तसल्या व्यक्तींना झाकणारी शब्दांची आरास म्हणजे इतिहास हीच आपली समजूत आहे.

 संजय गांधीला बुध्द आणि ख्रिस्ताच्या पंक्तीला नेऊन बसवणारे नेते (?) निघाले. अशा ह्या देशात बुध्दीला आणि निश्चित पुराव्याला साक्ष ठेवून काही लिहिणे आणि बोलणे हा गुन्हा ठरतो.

 त्यातून आपल्या देशात नाममहात्म्याला फार मोठे स्थान आहे. नामस्मरणाने तरून जाता येते ही श्रद्धा. कुठे जाता येते आणि तरणे म्हणजे काय याचा विचार नाही. अंधश्रद्ध समाजात कुठलीही घटना पारखून घेण्याची शक्तीच उरत नाही. भाषेचा वापर मूठभर लोकांच्या स्वार्थासाठी भरमसाट रीतीने केला जातो. उच्चार आणि आचार यांच्यात मेळ नसल्याचे कुणालाही दुःख नाही. ‘सहनाववतु सहनौ भुनक्तु’ ही आमच्या वेदातील प्रार्थना, त्यातल्या

मानवतेवेषयी गळा काढून बोलायचे आणि ‘सहनाववतु’ म्हणताना “दूर हो. विटाळ होईल.” म्हणून माणसाला दूर लोटायचे. पुन्हा वेद श्रेष्ठ ते श्रेष्ठ, ते धडाधड पाठ म्हणणारे त्याहूनही श्रेष्ठ. त्यांना शासनाच्या वतीने शाली पांघरणारे आणखी श्रेष्ठ. सकाळी रेडियो लावला की देव दीनांचा वाली असल्याचे कुणी ना कुणी तालासुरात सांगत असते; आणि गॅलरीत आल्यावर समोरच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बेवारशी पोरे शिळेपाके शोधून काढताना दिसत असतात. त्या देवावर आणि सत्तेवर असलेल्या माणसांवर विशेषणांची खैरात चालू असते. दुर्दैवाने वास्तवाला विशेषणे मंजूर नसतात.
 कल्पनारम्यतेला मात्र ती पोषक ठरतात. 

अस्पृश्य मानल्या गेलेल्यांना ‘हरिजन’ म्हटले, की जादूचा मंत्र म्हटल्यासारखी अस्पृश्यता नष्ट होईल असे मानणे किंवा स्त्रियांना देवता म्हटल्यानंतर त्यांची गुलामी नष्ट होईल असे धरून चालणे, हे ह्या असल्या वास्तवापासून दूर असलेल्या कल्पनारम्यतेचे लक्षण आहे. पुण्याच्या फुले मंडईत त्या भिक्षुकशाहीविरोधी सत्यशोधकांच्या नावावर टिच्चून सार्वजनिक सत्य(?)नारायणाची पोथी वाचली जाते. लोक तीर्थप्रसाद घेऊन धन्य होतात आणि दिवसेंदिवस ह्या अंधश्रद्धेला शासनाकडून भरपूर खतपाणी घातले जात आहे. 

माझ्या वयाची साठ वर्ष मी ओलांडली पण गेल्या काही वर्षांत मी ही जी काही हिंदी सिनेमा नट-नटींसारखी देवदेवता आणि बुवा-माताजी मंडळींची चलती पाहतोय, तशी माझ्या तरुणपणीही पाहिली नव्हती. देऊळ बांधणे हा सत्तेवरच्या राजकीय पक्षात जाण्याइतकाच किफायतशीर धंदा झाला आहे. कधी कुठल्या शंकराचार्यांचे नावदेखील ऐकले नव्हते. त्यांची दीड दीड हजार रुपये भरून पाद्यपूजा करायला भक्तांचा क्यू लागतो. आमच्या सेक्युलर भारताच्या पंतप्रधानबाई त्यांच्या दर्शनाला जातात. चर्चेस्, मशिदी यांचे उत्पन्न भरमसाट वाढते आहे. यातून आपण विशिष्ट जातीचे किंवा पंथाचे अनुयायी या अहंकाराखेरीज पदरात काहीही पडत नाही. ह्या साऱ्या सामाजिक वास्तवाकडे पाहिले, की प्रबोधन हा शब्दच निरर्थक वाटायला लागतो. खुर्ची जाईल या भयाने ग्रस्त असलेले नेते, श्रीमंती जाईल या भयाने अस्वस्थ असलेले धनिक आणि असहायतेने निदान देव तरी आपल्या मदतीला येतो की काय हे पाहू या म्हणणारे दरिद्री लोक असाच देखावा दिसतो अाहे. वैचारिक आधुनिकतेचा समाजाला स्पर्शही झालेला दिसत नाही. शेवटी हेच खरे आहे असे वाटायला लागते. 

‘Justice is Simply the interest of the Stronger’.

 मनाच्या निराश मूडमध्ये हे लिहिले आहे असे तुम्हाला वाटेल. व्यक्तिगत जीवनात दुःख बाळगत राहावे असे माझ्या बाबतीत काहीही नाही. उद्या मला जेवायला मिळणार आहे किंवा नाही आणि आज रात्री झोपायला जागा सापडणार की नाही, ह्या चिंता घेऊन ज्या देशात लाखो लोक जगताहेत, तिथे माझ्यासारख्याने वैयक्तिक दुःख हा शब्दही उच्चारू नये, ह्या जाणिवेने मी कसलेही वैयक्तिक दुःख माझ्याभोवती रेंगाळू देत नाही. साहित्य, संगीत, नाट्य असल्या कलांत रमण्यात आणि थोडेफार इतरांना रमवण्यात आयुष्य गेले. उर्दू शायराच्या ढंगात बोलायचे झाले तर आजवर आयुष्याच्या वाटेत काट्यांपेक्षा फुलेच जास्त लाभली. ‘उपरा’, ‘बलुतं’, ‘आठवणीचे पक्षी’ ह्या पुस्तकांसारखे काही वाचले, की आपले जगणे सामाजिक दृष्ट्या असंबद्ध वाटायला लागते. कुणी मोठेपणा द्यायला लागले की ओशाळल्यासारखे वाटते.


(’एक शुन्य मी’ या पुस्तकातुन)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा